श्लोक 44

 

 

श्लोक 44



(सुहृत् हो,  आपले पंचांग आणि निसर्ग ह्यांचा फार सुंदर मेळ आहे.  आज जेष्ठ (अधिक महिना ) चालू झाला हे पुढचे नऊ दिवस उत्तर भारतात नवतापाचे समजले जातात. ह्या नऊ दिवसात उन्हाळा त्याच्या चरम सीमेवर असतो. आजपासून गंगादशहरा म्हणजे गंगेचा उत्सव वा जन्ममहोत्सव सुरू  होतो. नऊ दिवसांच्या भयंकर उन्हाळ्याला शमवायला दशहरा समाप्तीच्या दिवशी गंगा अवतरणाचा म्हणजेच गंगेचा जन्मदिन साजरा केला जातो. आपल्या पूर्वजांनी अत्यंत विचारपूर्वक तयार केलेल्या उत्सवांचे कौतुक वाटते.

ह्या सोबतच  आकाशात अजून एक घटना घडते. ती म्हणजे अगस्तीचा तारा लोप पावतो. ( ह्या वर्षी 15 मे ला तो लोप पावला) हो तोच अगस्ती ज्याने गोड पाण्याचे सर्व समुद्र पिऊन टाकले होते. असा हा उन्हाळ्यात समुद्र पिणारा अगस्ती आकाशातून लोप पावला की पुढच्या पंधरा दिवसात पाऊस सुरू होतो आणि खार्‍या पाण्याचे समुद्र  पावसाने भरायला सुरवात होते.)

(असो ह्या गंगा लहरींमधले अत्यंत सुंदर शेवटचे 10 श्लोक आपण पुढच्या दहा दिवसात पाहणार आहोत.)

काही देवांची साधना मोठी कठीण असते. त्यांना प्रसन्न करण्यासाठी मोठ्या कष्टाने त्यांची सेवा करावी लागते. खडतर व्रते आचरावी लागतात. काही लोक आपले इप्सित साध्य करण्यासाठी हा खडतर साधनेचा मार्ग अवलंबतात.

काही लोकांना विविध प्रकारचे यज्ञ करून यज्ञाचे फळ मिळविण्यामधे रुची असते. ते नाना प्रकारचे यज्ञ करून देवाला प्रसन्न करून घेतात आणि आपली मनोकामना पूर्ण करतात.  पुत्र प्राप्तीसाठी पुत्रकामेष्ठी यज्ञ करतात. महान कीर्ती, प्रजेवर अधिकार व साम्राज्यप्राप्तीसाठी ‘वाजपेय’ यज्ञ करतात. असे अनेक प्रकारचे काम्य यज्ञ ते करत राहतात.

कोणाला इंद्रिय निग्रह असलेला योग पथ योग्य वाटतो. ज्ञानेश्वरमाऊली  म्हणतात, ‘आधी डोंगर खाऊन तोंड फाटावं आणि नंतर तो गिळता यावा म्हणून उकळत विष प्यावं तसा हा योग मार्ग अवघड आहे. थंडी तीच नेसावी। कडक उन्हे पांघरावी। आणि पावसाच्या वर्षावी । घर समजून रहावे ।। असा इंद्रियवृत्तींचा निरोध करणारा काटेरी योग पथ कोणाला मोह घालतो.

जगन्नाथराय म्हणतात, हे गंगे, तुझा संचार तिन्ही लोकात असतो द्यूलोक म्हणजेच स्वर्ग, भूलोक म्हणजे पृथ्वी आणि पाताळ; इतक्या तुझ्या कक्षा असीम आहेत. म्हणूनच तुझे त्रिपथगा हे नाव सार्थ आहे. तुझं नामस्मरण ह्या संसाराचे बंध तटातट तोडून स्वर्गाची प्राप्ती करून देतं. माय, मनोकामना पूर्ण करणारे हे सर्व कठीण मार्ग एका बाजूला आणि तुझ्या नामस्मरणाचा अत्यंत सुगम मार्ग एका बाजूला असे दोन पर्याय पाहून मी अविरत तुझे नाम मुखाने घेण्याचा दुसरा सुखद पर्याय स्वीकारला आहे. त्यात इंद्रियांचे दमन नाही, कुठलेही कष्ट नाहीत.’

 ह्या नामस्मरणाचे वर्णन करताना ज्ञानदेव म्हणतात, देवाने कुटुंबवत्सलांना नामरूपी नौकेवर घातले आहे. निर्मल भक्तांचिया पोटी । प्रेमाची मी बांधितो पेटी । आणि तयांना लावितो तटी । सायुज्यसुखाच्या साक्षेपे ।।

तर जगन्नाथ म्हणतात, माय! तुझे नाम घेता घेता मी कृतकृत्य झालो आहे. माझं मन शांत झालं आहे. संसाराचा सारा गुंता सुटला आहे.  कारण माय तू म्हणतेस, अहो म्हणोनि माझिया भक्ता । उरली नसे एकही चिंता । सर्व संकटी उद्धार करण्या । सर्वदा असे मी तत्पर ।।

हे माय, अत्यंत जटिल, चिवट वाटणारे, तुटता न तुटणारे हे संसारबंध तुझ्या नामस्मरणाने एखाद्या गवताच्या जाळ्यासारखे सहज तुटून गेले आहेत. गवताच्या भार्‍याला बांधलेली दोरी सुटताच गवत वार्‍यावर अस्ताव्यस्त विखरून जावं त्याप्रमाणे संसाराचा गुंता विरून गेला आहे. नमो गंगे!

 

यजन्त्येके देवान्कठिनतरसेवांस्तदपरे

वितानव्यासक्ता यमनियमरक्ताः कतिपये।

अहं तु त्वन्नामस्मरणकृतकामस्त्रिपथगे

जगज्जालं जाने जननि तृणजालेन सदृशम् ।। 44 ।।

 

अन्वय – हे त्रिपथगे जननि, एके कठिनतरसेवान् देवान् यजन्ति तदपरे वितानव्यासक्ताः  (सन्ति) कतिपये यमनियमरक्ताः सन्ति । अहं तु त्वन्नामस्मरणकृतकामः जगज्जालं तृणजालेन सदृशं जाने । (44)

हे त्रिपथगे – हे माते! हे तीन मार्गांनी (आकाश, भूलोक, पाताळ) वाहणार्‍या गंगे, एके -  कित्येक ; कठिनतर सेवान् - फार कठीण भक्ती ; येषां – ज्यांची ; तान् देवान् – त्या देवांना , यजन्ति – त्यांची आाराधना ,पूजा करतात ; तदपरे -  त्याहून काही वेगळे, दुसरे, वितान व्यासक्ताः – यज्ञाच्या ठिकाणी विशेष आस्था बाळगणारे ; सन्ति - आहेत अशा; कतिपये – कित्येक ; यमनियमरक्ताः – यम नियमांची गोडी असणारे, यमनियमात रमणारे;  सन्ति – असतात. ; अहं – मी ; तु – मात्र, तर ; त्वन्नाम स्मरण कृतकामः - तुझ्या नामस्मरणानेच कृतकृत्य, संतुष्ट असा ; जगज्जालं – जगाचा सारा गुंता ; तृणजालेन सदृशं – गवताच्या गुंत्यासारखा ; जाने – समजतो. (44)

 

करीती काही हे सुरवर अपेक्षा अतिच ती

बहु कष्टाच्या त्या खडतरचि सेवेचिच मनी ।

अशाही देवांसी नित भजति काही सुजनही

पुरी व्हावी इच्छा म्हणुनचि तयांना सुखविती ।। 44.1 ।।

 

धरे कोणी आस्था किति विविध यज्ञातचि सदा

करे नाना यज्ञा विविधचि मनीषा पुरविण्या ।

रुची योगामध्ये यमनियम युक्ता मनि कुणा

निरोधाने कैसे सुजन तनुसी कष्टविति गा ।। 44.2 ।।

 

तुझ्या नामाचा हा सुगम पथ भावे मम हृदी

तुझ्या नामाचे हे स्मरण करिते धन्य मजसी ।

हृदी गंगा नामे अविरतचि मी तृप्त मनसा

जगाच्या जंजाळा सहज मनि मानी तृणसमा ।। 44.3।।

---------------------------------------------------

श्लोक 45

श्लोक 46

Comments

Popular posts from this blog

गंगालहरी अनुक्रमणिका

श्लोक 1

श्लोक 3