श्लोक 3

 

श्लोक 3

गंगेचं उसळणारं पाणी पाहून, तिच्या उंच उंच लाटा पाहून कवी मनाच्या जगन्नाथाच्या कल्पनाशक्तीचा वारूही भरधाव उधळला नाही तरच नवल! गंगेच्या लाटांवर नजर स्थिर करत जगन्नाथ पंडित गंगेला उद्देशून तिसरा श्लोक म्हणू लागला,


माय, कुठल्या मनस्विनी स्त्रीला सवत आवडेल? आपल्या पतीने महाक्रोधाने सर्व जगाचा नाश केल्यावरही, जी पत्नी कुठलाही राग व्यक्त न करता, फिरून सर्व विश्व तितक्याच आस्थेने , प्रेमाने निर्माण करते; अशा कर्तबगार पार्वतीला तर सवत कशी रुचावी?  ती सवत जर सुंदर, सुस्वाभावी, सुशील, कुलीन निर्मल गंगा असेल आणि पतीने तिला त्याच्या डोक्यावर बसवलं असेल तर पत्नीला राग येणं स्वाभाविकच आहे. पार्वतीच्या तळपायाची आग मस्तकी गेल्यावर प्रत्यक्ष महादेवांनाही तिच्या लाथेचा तडाखा माथ्यावर सहन करायला लागला.  (त्याची रोचक गोष्ट तळटिपेत देते) मग प्रत्यक्ष सवतीला म्हणजे गंगेला हिमाद्रिकन्येची दहशत वाटणं स्वाभाविक आहे.

सूर्य उगवल्यावर  काही लपून रहात नाही सर्व काही स्वच्छ दिसतं. तसच महादेवांच्या आणि गंगेच्या नात्याचे बिंग फुटलं.  उमादेवींना सर्व प्रकार अवगत झाला. नगाधिपतीची लाडकी कन्या असलेल्या गिरिजेचा अनावर राग माहित असल्याने गंगेचा नुसता थरथराट झाला. त्या थरकापामुळे  जणु काही तिच्या लाटा गगनाला भिडल्या. 

ह्या श्लोकात पंडितराय म्हणतात, पतिचं हे कपट उघड होताच, पार्वतीचे नेत्र महादेवांच्या माथ्यावरील जटाजुटांमधे खेळणार्‍या, अल्लडपणे बागडणार्‍या गंगेला पाहून, उदयाचलावर येणार्‍या लालबुंद सूर्यबिंबाप्रमाणे रागाने लाल झाले आहेत. हे जननी, हे गंगा माते, तिच्या भीतीने तर तुझ्या ह्या नीरदेहाचा थरकाप होत नाही? तिच्या जळजळीत कटाक्षाने तर तुझ्या ह्या लाटा उंच उंच उसळत नसाव्यात? ते काहीही असो पण तुझ्या ह्या उंच उंच उसळणार्‍या लाटा सर्व भूतमात्रांचे कल्याणच करतात. तुझ्या भयातही लोककल्याणच दडले आहे.

 

उदञ्चन्मार्तण्डस्फुटकपटहेरम्बजननी-

कटाक्षव्याक्षेपक्षणजनितसंक्षोभनिवहाः।

भवन्तु त्वङ्गन्तो हरशिरसि गंगातनुभुव-

स्तरङ्गाः प्रोत्तुङ्गा दुरितभयभङ्गाय भवताम् ।। 3 ।।

अन्वयउदञ्चन्मार्तण्डस्फुटकपटहेरम्बजननीकटाक्षव्याक्षेपक्षणजनितसंक्षोभनिवहाः हरशिरसि त्वगन्तः गङ्गातनुभुवः प्रोत्तुङ्गाः तरङ्गाः , भवतां दुरित भवभङ्गाय भवन्तु ।

अन्वयार्थ

उदञ्चन्मार्तण्डः - उगवणारा सूर्य; स्फुटकपट- कपट स्पष्ट होता; हेरम्बजननी- गणपतीची आई म्हणजे पार्वती; कटाक्ष- नजरेचा कटक्ष; व्याक्षेप- चिरकाल स्थिती; क्षणं – स्वल्पकाळ; जनित – उत्पन्न; संक्षोभनिवहाः- भयांचा समूह; हरशिरसि शिवाच्या माथ्यावर; त्वङ्गन्तः – कापतात, थरथरतात. गङ्गातनु – गंगेची तनू म्हणजे देह म्हणजे तिचा प्रवाह; भुवः – उत्पन्न होतात; प्रोत्तुङ्गाः तरङ्गाः -अत्यंत उंच उंच लाटा;  भवतां -  तुम्हा भक्त जनांच्या दुरितभय- पाप,भय,भीती भङ्गाय भवतु – त्याचा भंग, नाश होवो ।

 

तुला मोहूनी गे शिव करि शिरी धारण तुला

लबाडी शंभूची पुरति कळता ती गिरिसुता ।

असूया ईर्षेने मनि जळफळे पेटुन उठे

हृदी गौरीच्या त्या जहरि सवतीमत्सर उठे ।। 3.1।।

 

तिच्या नेत्रांमध्ये जणु उगवतीच्या रविसमा

प्रकाशे लालीमा जणुचि करण्या खाक तुजला ।

उमा टाकी कैशी जळजळित दृष्टी तुजवरी

अगे पाणी पाणी तव हृदय हो त्या बघुनची ।। 3.2 ।।

 

शिवानीच्या ऐशा तिखटचि कटाक्षांस बघुनी

भवानीचा मोठा फणफुणत  त्रागाच बघुनी ।

भयाने काया का थरथरत राहे तव अशी

जणू वाटे गंगाधर-शिरि पदन्यास करसी ।। 3.3 ।।

 

नभाशी लाटा ह्या तव सहजि स्पर्धाच करिती

जणू त्या स्वर्गाचा अति सहज सोपान बनती ।

तुझ्या या उत्तुंगा लहरी मम कल्याण करु दे

धुवोनी पापांसी  विमल करि सर्वां जननि गे ।। 3.4 ।।

---------------------------------------------------

(तळटीप - सौंदर्यलहरी ह्या स्तोत्रात 86 व्या श्लोकात पार्वतीच्या क्रोधाची एक छोटी गोष्ट आहे.

पतीपत्नी गप्पागोष्टी करतांना पतिदेवांना हमखास काही खोचक बोलायची हुक्की येते. तशीच उमेची थट्टा करायची लहर शंभूदेवांना आली खरी पण चुकून त्यांच्या जिभेवरून ‘‘प्रिय उमे’’ ह्या संबोधनाऐवजी ‘‘प्रिये गंगे’’ असे शब्द निसटले मात्र!   ही थट्टा जरा जास्तच झाली. उमेसारख्या तेजस्वी, लावण्यवती, मानिनीला आपल्या पतिमुखातून सवतीचा इतक्या प्रेमळपणे झालेला उल्लेख कसा बरं सहन व्हावा? सर्व विश्वाचा कारभार चालवणार्‍या,  मोठा अधिकार असलेल्या उमेसारख्या पत्नीला तर हे कधीच रुचणार नाहीत. ते शब्द एखाद्या शल्यासारखे तिच्या हृदयात घुसले.

थट्टा करता करता चुकून जिभेवरून निसटलेले शब्द शंभूमहादेवांना महागात पडले. महा भयंकर क्रोधाने उमेची तनुलता थरथरतांना पाहून शिवाला आपल्यावर होणार्‍या अंगार-वर्षावाचा अंदाज आला आणि त्यानी तात्काळ गिरीजेच्या पायांवर त्याचे मस्तक झुकवून क्षमायाचना केली. पण हाय रे हाय! पार्वतीच्या पायांची जोरदार लाथ त्याच्या कपाळावर बसली.

पती-पत्नीच्यामधल्या ह्या भांडणप्रसंगाला कोणी शेजारी प्रेक्षक लाभला तर तो  त्याचा चांगलाच आस्वाद आणि आनंद घेतो. त्यातल्या त्यात तो जर कोणी शत्रुपक्षातला असेल तर मग काय विचारता! त्याला हास्याच्या उकळ्या नाही फुटल्या तरच नवल! येथेही  शिवाचा कट्टर शत्रू अनंग (कामदेव) हजर होता. बोलून चालून त्याला शरीर नसल्याने तो गिरिजेच्या लोभस चेहर्‍याचा तर कधी सुंदर अवयवांचा आश्रय घेऊन राहतो.  शिवाच्या कपाळावरील अग्निनेत्राने त्याला जाळून अनंग /अंगहीन केले हे शल्य त्याच्या मनात खूप काळापासून होते. त्या अग्निनेत्रावर असा सणसणित लत्ताप्रहार होताना पाहून, आपल्या शत्रूची अशी फटफजिती होताना पाहून, अनंगाला खुदुखुदु हसू येऊ लागले.  शिवमस्तकावरील प्रहारावेळी उमेच्या पायातील पैंजणांमधून त्यावेळी जो किलकिल आवाज झाला तो पैजणांचा नसून आनंदाच्या उकळ्या फुटणार्‍या मदनाच्या उपहास गर्भ खुदुखुद हसण्याचा असावा.अशी श्री आद्यशंकराचार्यांनी केलेली सुंदर कल्पना आहे.

कधी गप्पागोष्टी करित असता गे तुजसवे

जरा खोटे खोटे हसत वदता खोचकपणे ।

मुखी शंभूच्या ये चुकुन ‘‘प्रिय भागीरथि’’ असे

रुचावे कैसे ते वचन अपमानीत करि जे ।। 

 

ढळे जिह्वा ऐसी दुखवि गिरिशाची तव हृदी

तनु कापे त्याने, विपुल उसळे क्रोध हृदयी ।

कळाले शंभूसी धडगत न त्याची लव मुळी

इलाजासी त्याच्या शरण तुज जाणे उचितची ।। 

  

जरी घाली लोटांगण तव पदी शंभुशिवही

कपाळी शंभूच्या त्वरितचि पदाघात करिसी ।

अनंगासी होई सुख बघुन हे दृश्य भलते

म्हणे तो आहाहा! मम विजय हा थोरचि असे ।। )

---------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

श्लोक 1

श्लोक 2