श्लोक 2

 

श्लोक 2




आपल्या डबडबलेल्या डोळ्यांनी गंगेकडे पाहताना जगन्नाथाचं उर भरून आलं. माय, तू इतरांसारखी नाहीस. तू तुझ्या सर्व लेकरांशी प्रेमानेच वागतेस. त्याच्या मनातील विचारधारा त्याच्या मुखावाटे प्रकट होऊ लागली,

‘‘हे माते तू तर गुरूमाऊली आहेस. तुझ्या प्रवाहाकडे एकदा नुसती नजर जरी टाकली तरी ती हटत नाही. ज्याच्या हृदयात वाईट वासना आहेत त्यांचे दुरित म्हणजे पाप तू झटकून दूर करतेस. तुझ्या विशाल प्रवाहाकडे पाहता कोणीही आपल्या कोत्या कूपमंडूक प्रवृत्तीचा त्याग करेल. तुझी धीर गभीर धारा पाहून मनाचा उथळपणा जाऊन त्याच्या विचारांना सद्गुणांची, सद्विचारांची, सत्प्रवृत्तिची खोली लाभेल. तुझा निरंतर वाहणारा प्रवाह मनातील आळसही वाहून नेईल. सर्व भूतमात्राच्या हितासाठी समर्पित केलेलं तुझं जीवन पाहता मनातील स्वार्थी, तुच्छ विचार, लोभ, मोह कसे बरं टिकतील? तुझा सर्वांप्रति समभाव पाहून मी, माझा, माझ्यासाठी असे संकुचित स्वार्थी विचार वाहून जातील.

माय! अर्धवट ज्ञान किंवा अज्ञानाचा अंधार मोठी विचित्र परिस्थिती निर्माण करतो. अर्धवट उजेडात दोरीही सापासारखी दिसू लागते त्याप्रमाणे अज्ञानामुळे नाही नाही त्या गोष्टी खर्‍या वाटतात. तर योग्य गोष्टींचं आकलन होत नाही. लहानपणी विचारांना परिपक्वता नसल्यामुळे ज्या बागुलबुवाची क्षणोक्षणी धास्ती वाटते. तो बागुलबोवा थोडी समज वाढताच नष्ट होतो. माय! त्याप्रमाणे अज्ञान, विद्येचा अभाव मनात अविद्येचा, भयाचा एक महा प्रचंड, काल्पनिक वृक्ष तयार करतो.

 

काही अंजन इतकी प्रभावी असतात की, त्याच्यामुळे इतरांना सहजी न दिसणार्‍या गोष्टी त्याने दिसू लागतात. गुरू ज्ञानरूप अंजन जेव्हा शिष्याच्या डोळ्यात घालतो, तेव्हा त्याला ज्ञानाची अज्ञानभेदक दूरगामी नजर प्राप्त होते. तुझा हा अमोघ जलौघ माणसाच्या मनातील अज्ञान दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा गुरू आहे. ज्ञानाच्या प्रकाशाचं अस्तित्व हे अज्ञानाचा अंधार, भयाचा बागुलबोवा तात्काळ दूर करतात.

हे माय, धनाची समृद्धी तर तुझ्या ह्या जलौघामुळे लाभतेच लाभते. अजून मनाच्या कोतेपणला, मनाच्या दारिद्र्याला तू दूर करतेस. तुझा हा अखंड वाहणारा प्रवाह आमच्या तन मन धनास अजून समृद्ध करो. (2)

 

दरिद्राणां दैन्यं दुरितमथ दुर्वासनहृदां

द्रुतं दूरीकुर्वन्सकृदपि गतो दृष्टिसरणिम्।

अपि द्रागाविद्याद्रुमदलनदीक्षागुरुरिह

प्रवाहस्ते वारां श्रियमयमपारां दिशतु न: ।। 2 ।।

अन्वय – (हेे गंगे), इह दृष्टिसरणिं सकृत् अपि गतः (सन्) दरिद्राणां दैन्यं , अथ दुर्वासनहृदां दुरितं अपि द्रुतं दूरीकुर्वन्, द्रागाविद्याद्रुमदलनदीक्षागुरुः अयं ते वारां प्रवाहः, नः अपारां श्रियं दिशतु। (2)

अन्वयार्थ - (हे गङ्गे! ) इह दृष्टिसरणिं – नेत्रमार्गाप्रत; सकृत् अपि – एकदा जरी;  गतः(सन्) – प्राप्त झाला असता; दरिद्राणां दैन्यं – दीन जनांचे दारिद्र्य; अथ- आणि; दुर्वासनहृदां – ज्यांच्या मनात दुष्ट वृत्ती राहते असे, पापी पुरुषांचे; दुरितं – पाप; अपि- सुद्धा; दृतं- तात्काळ; दूरीकुर्वन्- दूर करणारी, झटकून टाकणारी; द्राक् – शीघ्र; अविद्याद्रुमदलनदीक्षागुरुः- माया, अज्ञान, मूर्खपणा त्यांचा जो द्रुम म्हणजे वृक्ष त्याच दलन म्हणजे खंडन करण्याची दीक्षा देणारा गुरू;  अयं – (जो) हा; ते- तुझा; वारां प्रवाहः – जळाचा प्रवाह; नः -  आम्हाला; अपारां- अपरिमित; श्रियं- सम्पत्ती; दिशतु- देवो. । (2)

जलौघासी पाहे निमिषभर जो दीन कुणिही

तयाच्या दैन्याची जननि न निशाणीहि उरवी

 मनी दुष्टांच्याही कणव अति निर्माण करिसी

प्रवृत्ती पापाची सकल करिसी ध्वस्त मनिची ।।2.1

 

मनी फोफावे जो  सघन तरु अज्ञानस्वरुपी

करी त्याचे उन्मूलन सहजि लाटा सुरधुनी

गुरू तो शिष्याला सजग करी ज्ञानांजनबळे

जलाने गे तैसे मम सकल अज्ञान हरणे।।2.2

 

गुरू माऊली तू तवची जलधारा पुनित ही

मनाच्या अज्ञाना अति जलद टाकी निरसुनी ।

तुझी धारा वाहे अविरतचि माते सुखमयी

हरो ती पापांना करुनि मजला मंगलमयी ।। 2.3

-------------------------------------------------------



Comments

Popular posts from this blog

गंगालहरी अनुक्रमणिका

श्लोक 1

श्लोक 3