श्लोक 1 ते 17 संस्कृत, मराठी विश्लेषणासहित जगन्नाथ पण्डितकृता पीयूषलहरी / गङ्गालहरी (विश्लेषण) पेरुभट्ट आणि लक्ष्मी ह्या अत्यंत विद्वान तेलंगी ब्राह्मण दाम्पत्याच्या पोटी जन्मलेला जगन्नाथराय हा मुलगा गङ्गालहरी ह्या काव्याचा कवी. वडिलांनाच महागुरू मानून त्यांच्याकडूनच जगन्नाथाने विद्या संपादन केली. (त्यांच्या रसगंगाधर ह्या ग्रंथात वडिलांचा महागुरू असा उल्लेख आहे.) जगाला दीपविणारी विद्वत्ता , उत्तम शरीरसंपदा आणि तारुण्य असलेल्या ह्या सरस्वतीच्या पुत्रावर लक्ष्मीची कृपादृष्टी नव्हती. अर्थातच त्याच्या महत्वाकांक्षी मनाला स्वस्थ बसणे मानवले नाही. त्याने सरळ दिल्लीची वाट धरली. मोगल साम्राज्यात शहाजहानच्या पदरी तो स्थिरावला. बादशहाची मुलगी लवंगिका ह्या तडफदार कवीवर भाळली होती. एक दिवस बादशहा शहाजहान आणि जगन्नाथ पंडित बसलेले असतांना अचानक लवंगिका तेथे आली. बादशहाने ह्या शीघ्रकवीला स्वतःच्या मुलीवरच त्याक्षणी काव्य करुन दाखवायची आज्ञा केली. जगन्नाथ प...