श्लोक 3 गंगेचं उसळणारं पाणी पाहून, तिच्या उंच उंच लाटा पाहून कवी मनाच्या जगन्नाथाच्या कल्पनाशक्तीचा वारूही भरधाव उधळला नाही तरच नवल! गंगेच्या लाटांवर नजर स्थिर करत जगन्नाथ पंडित गंगेला उद्देशून तिसरा श्लोक म्हणू लागला, माय, कुठल्या मनस्विनी स्त्रीला सवत आवडेल? आपल्या पतीने महा क्रोधाने सर्व जगाचा नाश केल्यावरही, जी पत्नी कुठलाही राग व्यक्त न करता, फिरून सर्व विश्व तितक्याच आस्थेने , प्रेमाने निर्माण करते; अशा कर्तबगार पार्वतीला तर सवत कशी रुचावी? ती सवत जर सुंदर, सुस्वाभावी, सुशील, कुलीन निर्मल गंगा असेल आणि पतीने तिला त्याच्या डोक्यावर बसवलं असेल तर पत्नीला राग येणं स्वाभाविकच आहे. पार्वतीच्या तळपायाची आग मस्तकी गेल्यावर प्रत्यक्ष महादेवांनाही तिच्या लाथेचा तडाखा माथ्यावर सहन करायला लागला. (त्याची रोचक गोष्ट तळटिपेत देते) मग प्रत्यक्ष सवतीला म्हणजे गंगेला हिमाद्रिकन्येची दहशत वाटणं स्वाभाविक आहे. सूर्य उगवल्यावर काही लपून रहात नाही सर्व काही स्वच्छ दिसतं. तसच महादेवांच्या आणि गंगेच्या नात्याचे बिंग फुटलं. उमादेवींना सर्व प्रकार अवगत झाला. नगाधिपती...
Comments
Post a Comment