श्लोक 1
श्लोक 1
अप्पय्याचे शब्द जिव्हारी बसलेल्या जगन्नाथ पंडिताने कळवळून गंगेकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात पाणी दाटून आलं. 'माय, तू असताना मी अनाथ कसा असेन?'
त्याच्या मुखातून गंगेच्या स्तुतीचा निरंतर ओघ सुरू झाला--------!
हे गंगा मैय्या तुझ्या ह्या निर्मल जलाचा महिमा मी काय आणि कसा वर्णन करू?
तुझ्या निर्मल जलाची गोडी, विपुल जलौघाचा विशाल विस्तार, जलाचा निरंतर टिकणारा
ताजेपणा सर्वच अलौकिक आहे. (तळटीप पहावी)
‘‘हे गंगामाते, वसु म्हणजे धन, दौलत. ही वसुंधा सर्व प्रकारच्या
ऐश्वर्याने सम्पन्न आहे. परंतु ह्या वसुंधरेला सम्पन्न, वैभवशाली करण्यात तुझं
योगदान फार मोठं आहे. तुझ्या सहभागाविना ही धरित्री इतकी सुजला, सुफला, सस्य
श्यामला झाली नसती. तिची खरी समृद्धी, सम्पन्नता, श्रीमंती ही तूच आहेस.
गंगा जल हेच तुझं स्वयंसिद्ध ऐश्वर्य आहे. तुला ते उदारहस्ते शिव, विष्णु
वा कोणत्या देवाने बहाल केलेलं नाही तर, ते तुझं अंगभूत ऐश्वर्य आहे. तुझं हे
निर्मल जल तुला सर्वोच्च पदी विराजमान करतं. तुझं हे ईशित्व, योग्यता,
सामर्थ्य, सम्पन्नता, निरिच्छता, दुसर्याला उदारहस्ते ऐश्वर्य प्रदान करण्याचा
मोठेपणा, तुझी दीन दुःखितांविषयी असलेली करुणा, प्रेम ह्या सर्व गुणांमुळेच तर
भगिरथाने तुला भूतलावर आणलं. आणि तूही सर्व सगर पुत्रांचा उद्धार
केलास.
ज्याप्रमाणे अलंकारांनी नटलेल्या लावण्यवतीला माथ्यावरचा सौभाग्याचा कुंकुमतिलक
विशेष शोभून दिसतो त्याप्रमाणे ह्या वसुंधरेवर सौभाग्याचा तिलक लावल्याप्रमाणे
तुझं गंगाजल मनोरम आहे. हे गंगा जल ह्या वसुधेचं सौभाग्य आहे.
तुझ्या प्रवाहात कधी जलाची कमतरता नसते. तुझा विशाल
जलप्रवाह अलोट जलानी तुला समृद्ध करतो. तुझं जल अनेक गुणांनी श्रीमंत आहे. ते अमृताप्रमाणे मधुर आहे.
माय! बाळाच्या मुखातून निघालेल्या सुभाषिताने जसा आईचा सुसंस्कृपणा कळतो
तशी तुझ्या तीरावरील समृद्धी पाहून तुझ्या जलाच्या महान ऐश्वर्याचा सहज अंदाज करता येतो. तुझ्या जलाच्या सम्पन्नतेची ,
वैभवाची चुणूक तुझ्या तीरावरची सुबत्ता, मुबलकता पाहून समजते. तुझे किनारे
सुजल असल्याने धनधान्य, तरुलता, वनश्री, पक्षी, प्राणी आणि मानव संस्कृतीं हयांची
कायम भरभराट करत राहतात. हे भगवती गंगे, समग्र ऐश्वर्य, समग्र धर्म, समग्र यश,
समग्र श्री, पूर्ण ज्ञान, पूर्ण वैराग्य ह्या सहांच्या समुच्चयाला भग म्हणतात. हे
परम ऐश्वर्य तुझ्यापाशी असल्यानेच तुला ‘भगवती गंगे’ असं संबोधलं जातं.
आद्य शंकराचार्य तुझं वर्णन करताना म्हणतात,
त्रैलोक्याचे असे तू, त्रिभुवनजननी सार सामर्थ्य,शक्ती
।
येई ना या जलाची, लवभर सरही ,वस्तुसी कोणत्याही
।।
अक्राळविक्राळ, बलाढ्य संकट असो वा भीषण समस्या; त्यांना छिन्नविच्छिन्न
करण्यासाठी शिव समर्थ आहे. नित्य शस्त्रसज्ज आहे. त्यासाठीच त्याने हातात कायम
परशू धारण केला आहे. म्हणूनच शिवाला खंडपरशू म्हणतात. तो देवांचाही देव महादेव जणु काही खेळाखेळात करावीत इतक्या
सहजगत्या हे 14 भुवनांचं सर्व विश्व निर्माण करतो. ज्या महादेवाच्या पायाशी सर्व
प्रकारचं अद्भुत सामर्थ्य, ऐश्वर्य लोळण घेतं, त्या महादेवालाही गंगा हे त्याचं
महान ऐश्वर्य वाटतं. म्हणून तो तिला आपल्या माथ्यावर धारण करतो.
चांगल्या मनाच्या लोकांना सुमन म्हणतात. देवांनाही सुमन किंवा सुर
म्हणतात.(सुष्ठ राति - सुष्ठु म्हणजे जनहिताचं, कल्याणकारी. राति म्हणजे देतात ते सुर! ) देव कायम
लोकांच्या हिताची कामं करतात. म्हणुनच त्यांना सुर म्हणतात. देव जी काही सत्कृत्य
करतात, लोकांच्या हिताचं काम करतात, त्याचं दृश्य स्वरूप, कृतीचा परिपाक/परिणाम
म्हणजे तूच आहेस. कारण जगाच्या हितासाठी झटण्यापलिकडे तू काही जाणत नाहीस.
तुझा हा विशाल प्रवाह कायम सर्व भूतमात्रांचं कल्याण करण्यासाठीच वाहत
असतो. माय, वेद तरी वेगळं काय सांगतात गं? ‘‘ विमोह टाकुन कर्मफळाचा सिद्ध होई पार्था । कर्तव्याने घडतो माणुस जाणुन
पुरुषार्था’’ हेच तर
सांगतात ना? तुझं नावच गंगा! गंगा म्हणजे कायम पुढे पुढे जाणारी. मागे वळूनही तू
पहात नाहीस. दोन्ही किनार्यांना सुबत्तेचं भरभरून, विपुल दान देऊनही तुझ्या
निरिच्छ मनाला कुठल्याही फळाची आशा नाही.
पतित-पावना हे जननी मम। परोपकारास्तव तव जीवन
तुझ्या तिरावर राहती त्यांचे। कौतुक पुरविसी कल्पलतेसम
चारही वेदांची शिकवण सत्यात आणणारा असा हा तुझा जलप्रवाह आहे. माय,
तुझ्या तीरावर विचारांनी समृद्ध असलेल्या संस्कृतिंचा उदय झाला. त्यांची भरभराट
झाली; वेद हे त्याचंच फलित आहेत. ह्या वेदांचं सारं सर्वस्व तूच आहेस.
अमृताहून गोड असलेलं तुझं पाणी अनेक जीवांना जीवन देणारं आहे. अमृत मृतांना
संजीवनी देतं. त्याप्रमाणे सर्व जीवसृष्टीला संजीवनी देण्याचं काम तू करतेस. जीवन
प्रदान करतेस. त्यांना जगवतेस, फुलवतेस, समृद्ध करतेस. अमृत आणि अमृतासमान तुझं
गोड पाणी ह्यात काही अंतर आहे असं मला वाटत नाही.
तसं पाहिलं तर ही सुधा आणि तुझी ही सुधाधारा दोघीही जणु जुळ्या बहिणी
वाटाव्या इतकं तुमच्यात साम्य आहे. तुमच्या कृती सर्व जीव जंतूना उत्तम आयुष्य
आरोग्य देतात. जीवन प्रदान करतात. तू समुद्राला मिळतेस तर सुधा ही सिंधूतच होती.
समुद्रमंथनाच्यावेळी ती बाहेर आली. समुद्रातून बाहेर आलेला सुधांशु(चंद्र) हाही
अमृत किरणं बरसवत असतो. त्यामुळे सुधा, सुधांशु आणि गंगा तुम्ही
एकमेकांची भावंडे आहात. सुधा आणि सुधांशु प्रमाणे शांत, शीतल, निस्वार्थपणे
वाहणारा हा तुझा जलौघ हित, कल्याण, परोपकार करतच पुढे जातो.
केले विश्व पवित्र मंगलमयी पृथ्वीस आनंदवी
श्रद्धास्थानचि वाटते मम हृदी ऐसीच भागीरथी
नाशी पाप अमंगलास अवघ्या दुःखे करी दूर जी
माझे रक्षण ती करो; मम हिता पाहो सदा जाह्नवी।।
--------------------------------
(तळटीप - गंगाजलामधे
असलेले बॅक्टेरिओफेज नावाचे उपयोगी बॅक्टेरिया
गंगेच्या पाण्यातील बाकी विषाणुंना खाऊन टाकतात. गंगाजलात असलेलं
गंधकाचं सूक्ष्म प्रमाण आणि ऑक्सिजनचा असलेला एक विशेष प्रकार (ड्युटेरॉन नावाचा
आयसोटोप) गंगेचं पाणी स्वच्छ ठेवतो. ह्या विशिष्ट द्रव्यांमुळे आणि विशेष अशा
सूक्ष्म जीवांमुळे इतर सर्वसाधारण पाण्याप्रमाणे गंगाजल कधी
खराब होत नाही, नासत नाही.)
(वृत्त- शिखरिणी अक्षरे - 17, गण- य म न स भ ल ग , यति - 6, 11 )
समृद्धं सौभाग्यं सकलवसुधायाः किमपि तन्-
महैश्वर्यं लीलाजनितजगतः खण्डपरशोः।
श्रुतीनां सर्वस्वं सुकृतमथ मूर्तं सुमनसां
सुधासोदर्यं* ते सलिलमशिवं नः शमयतु ।। 1 ।।
अन्वय - भो गंगे, सकलवसुधायाः किमपि समृद्धं सौभाग्यं , लीलाजनितजगतः खण्डपरशोः महैश्वर्यं, श्रुतीनां सर्वस्वं, सुमनसां मूर्तं सुकृतं, अथ सुधासोदर्यं तत् ते सलिलं , नः शमयतु (1)
(भो गङ्गे!) हे गंगे ते- तुझे तत् – ते सलिलं- जलप्रवाह नः – आमच्या अशिवं – अपवित्र शमयतु – शमवो. नाश करो. यत् - जे सकल वसुधायाः – संपूर्ण पृथ्वीचे किमपि – अवर्णनीय, अमूल्य समृद्धं - समपन्नता सौभाग्यं - , लीलाजनितजगतः – ज्याने विना सायास ही 14 जगे निर्माण केली आहेत तो खण्डपरशोः – शत्रूचे खंडन/ नाश करणारा परशु ज्याच्या जवळ आहे असा शिव महैश्वर्यं- असीम सम्पत्ती श्रुतीनां - वेदांचे सर्वस्वं – संपूर्ण धन सर्वस्व, सुमनसां- पवित्र मनाच्या देवांचे मूर्तं -मूर्तिमंत सुकृतं - पुण्य सुधासौंदर्यं - अमृतासमान शोभा / सुधासोदर्यं – अमृताची बहीण असणं.
(सुधासोदर्यम्* - सुधा म्हणजे अमृत हे समुद्रमंथनातून बाहेर आले तर गंगा समुद्रात विलीन होते. एकाच समुद्राच्या पोटी असलेल्या या जणु सख्या बहिणीच आहेत. त्यांचे गुण ही सारखेच आहेत. दोघीही कल्याणकारीच आहेत असा अर्थ अभिप्रेत आहे. काही ठिकाणी सुधासौंदर्यम् असा पाठही आहे. अर्थात ह्याचाही अर्थ अमृताप्रमाणे सौंदर्य असलेली म्हणजेच कल्याणकारी असाच आहे. )
खुले भाळी जैसा तिलक जणु लावण्यवतिसी
तसे गंगेचे हे सलिल नटवी ह्या अवनिसी ।
असे सौभाग्याचे प्रतिक जल हेची धरतिचे
असे गंगामाते तव सलिल ऐश्वर्य क्षितिचे ।। 1.1 ।।
सदा राहे तूची मधुर जलसम्पन्न सरिते
असे कल्याणाची सुखद पुतळी तूचि सरिते ।
तृषार्ता पृथ्वीची शमविसिच तृष्णा तव जले
असे गंगाम्बु हे विभवचि स्वयंसिद्ध तव गे ।।1.2 ।।
सुधाधारा ह्या गे हरित अवनी ही फुलविती
तुझ्या मार्गामध्ये उधळण सुखाचीच करिती ।
फळांनी पुष्पांनी नटवि वसुधा तू सुरधुनी
महीची तृप्ती तू, बहु सुख समाधान असशी ।। 1.3।।
जयाच्या खड्गाने रिपु सकल ते दुष्ट वधिले
जगाची उत्पत्ती अति सहज ज्या खेळचि असे ।
अगे शंभू तोही तव सलिल सामर्थ्य बघुनी
तुला सन्मानाने मिरवित असे का नित शिरी ।। 1.4 ।।
तुझी धारा शुभ्रा स्फटिक धवला शुद्ध सरिते
सुधेची तू शोभे भगिनि दुसरी कल्पलतिके ।
असे तू वेदांचे उजळ अवघे पुण्य बरवे
असे वा देवांचे सुकृत नयना जे दिसतसे ।।1. 5 ।।
सुधेलाही जिंके मधुमधुर हेची जल तुझे
मृतालाही ज्याने अति सुखद संजीवनि मिळे ।
सदा चैतन्याने उसळत असे जे जल तुझे
अनर्थांसी सार्या नित शमवु दे माय मम गे ।।1.6 ।।
----------------------------------------
Comments
Post a Comment