श्लोक 46
श्लोक 46
इतका वेळ गंगेची विविध प्रकारे स्तुती
करणार्या जगन्नाथाने आता आतडं पिळवटून टाकेल असं मागणं ह्या 46 व्या श्लोकात
मागितलं आहे. ‘आई मला हे पाहिजे मला ते पाहिजे असा आईवर हक्क गाजवणारं, आईने माझी
सगळी काळजी घेतलीच पाहिजे असं म्हणणारं लेकरू आईच्या बाबतीत मात्र तेवढच बेफिकीर
असतं. त्याला मातृहृदयाची कल्पना नसते. तिच्या निर्व्याज प्रेमाची किंमत नसते.
पण,
ज्या जगाने इतके दिवस डोक्यावर मिरवलं त्याने पायदळी तुडवावं हा अनुभव लेकराला
नवीन असतो. भीतीदायक असतो. हृदयाला घरं पाडणारा असतो. छान छान वाटणार्या जगाने
केलेली पराकोटीची निंदा, नालस्ती ह्यांचा समाना करता करता ते घाबरून जातं; मान
मरातब, ऐश्वर्य, सर्वस्व हिरावून घेणारी, असंभाव्य वाटणारी वर्तणूक अनुभवून मनाने
बिथरून जातं; जगाने त्याला जगण्याचीही आशा ठेवली नाही, हे अनुभवल्यावर इतके दिवस
चिंतामुक्त बेलगाम उंडारणारं लेकरू असहाय्य होतं. पुढचे रस्ते कायमचे बंद झालेले
असतात.
अशावेळी जन्मदात्री मात्र तितक्याच
वत्सलपणे त्याची काळजी करत वाट बघत असते. त्याचे सर्व अपराध पोटात घालून, त्याला
पदरात झाकून घेण्यासाठी उत्सुक असते. तेव्हा आईची खरी किंमत कळते. मग जगनन्नाथ राय
म्हणतो,
‘माय तुझं पाणी पिऊन माझी तहान भागताच
तुझे आभार तर सोडाच पण तुझी साधी चौकशीही न करता कृतघ्नाप्रमाणे, सत्वर तुझ्याकडे
पाठ फिरवून, मी माझ्या मूर्ख सवंगड्यांसोबत मजा करत भटकत राहिलो. पण मला कुठेच
शांति, विश्रांती, स्वस्थता लाभली नाही. माय, लोकांनी केलेल्या दारूण अपमानांनी,
दिलेल्या अत्यंत कडवट वागणुकीने माझी झोप पार पार उडाली आहे. (चिरात् उन्निद्रं
मां) ह्या जगात रहावं, जगावं ह्यासाठी
आशेचा एकही किरण मला डोळ्यासमोर दिसत नाही. ह्या जगाकडून मी पराभूत झालो आहे. आता
अजून लढण्याची ताकद माझ्यात नाही. चहू बाजूंनी धक्के खात, माय मी प्रचंड थकलो आहे.
मला विश्रांतीची गरज आहे. चिर विश्रांतीची
नितांत आवश्यकता आहे. तुझ्या तरंगांच्या सन्निध असलेला हा वारा अत्यंत शीतल
आहे. मंद मंद वाहणार्या ह्या सुखद, शीतल
झुळकींनी कायम प्रसन्न असलेल्या हया तुझ्या मांडीवर मला चिर निद्रा घेऊ दे. माय, तू मला तुझ्या कुशीत घे. तुझ्या कुशीत
लाटांचं अंगाई गीत ऐकत ऐकत मला चिरनिद्रा मिळू दे. माय! मला दीर्घकाळासाठी निजव.
मी दमलो आहे. फार फार दमलो आहे. माय मला थोपट. मला झोपव. ह्या निद्रेच्याही
पलीकडची गाढ निद्रा (काळनिद्रा) मला आवश्यक आहे. मला तुझ्या कुशीत शांत सुदीर्घ
निद्रा घेऊ दे.
पयः पीत्वा मातस्तव सपदि यातः सहचरै-
र्विमूढैः संरन्तुं क्वचिदपि न विश्रान्तिमगमम्।
इदानीमुत्सङ्गे मृदुपवनसञ्चारशिशिरे
चिरादुन्निद्रं मां सदयहृदये शायय चिरम् ।। 46 ।।
अन्वय – हे मातः, तव पयः पीत्वा सपदि विमूढैः सहचरैः सह संरंन्तु यातः क्वचिदपि
विश्रांतिं न अगमम् । (अतः) हे सदयहृदये, इदानीं त्वं चिरात् उन्निद्रं मां
मृदुपवनसंचारशिशिरे उत्संगे चिरं शायय।
अन्वयार्थ - हे मातः – हे माते! ; तव
– तुझे ; पयः – पाणी ; पीत्वा -पिऊन
, सपदि – तत्काल ; विमूढैः – अत्यंत मूर्ख अशा
; सहचरैः सह – सोबत्यांबरोबर ; संरन्तुम् – क्रीडा
करण्यास ; यातः – गेलेला (मी) ; क्वचिदपि – कोठेच, विश्रांतिं
न अगमम् – विश्रांतीला पावलो नाही ; अतः – म्हणून
; हे सदयहृदये – हे दयाळु (माते) ; इदानीं – सांप्रत
, त्वं – तू ; चिरात् – पुष्कळ वेळ ; उन्निद्रं
मां – झोप उडाल्याने त्रस्त झालेल्या मला , मृदु पवन संचार
शिशिरे – मंद वायूच्या गतीने शीतल झालेल्या ; उत्संगे - तीररुपी
अंकावर ; चिरं – दीर्घकाळ ; शायय – नीजव,
झोपव.
तुझ्या पाण्याने गे शमवुनचि तृष्णा त्वरित मी
सख्यांसंगे क्रीडा करित फिरलो गे कितितरी ।
परी ना ठेवीली कणभर तुझी जाण हृदयी
कधी ना मानीले जननि उपकारांस तव मी ।। 46.1 ।।
मिळाले ना मूर्खांसह सुख समाधान मजसी
उपेक्षा हालांनी तळमळत निद्रेविणच मी ।
अशांती बेचैनी तुज जवळ आणी परतुनी
असे तूची माते सदय हृदया वत्सल अती ।। 46.2 ।।
न साहे माते गे, तव विरह आता क्षणभरी
तुझ्या अंकी वाहे पवन मृदु हा शीतल किती
तयाने होती गे तव लहरि ह्या सौम्य सुखदा
तुझ्या ह्या लाटांनी निजव मजला थोपटुन गा ।। 46.3 ।।
दयाळू माते हे मजवरि कृपा सत्वर करी
सुदीर्घा निद्रा ही जननि तव अंकीच निजवी
अगे गा अंगाई मधुर लहरींची सुखदशी
जयाने ना यावी पुनरपि कधी जाग मजसी ।। 46.4 ।।
---------------------------------------------------

Comments
Post a Comment