श्लोक 45

 

श्लोक 45



जे स्वतः झटून मेहनत घेत असतात, अभ्यासात उत्तम असतात, चांगल्या गुणांनी पास होणार असतात; अशा विद्यार्थ्यांना यश मिळावं म्हणून खास शिकवणी वर्ग घेतले जातात. शाळा, खासगी प्रशिक्षण वर्ग यांमधे अशा विद्यार्थ्यांनी आपल्याकडे यावं ह्यासाठी चढाओढ असते. खरतर असे विद्यार्थी आपल्या गुणांनी, मेहनतीने यश मिळवणारच असतात पण; त्यांना यशाचं श्रेय देण्यासाठी पुढे येणार्‍यांचा अंतस्थ सुप्त हेतू त्या यशामधे आमचा मोठा वाटा होता हे सांगून स्वतःकडे श्रेय कसे घेता येईल हाच असतो. नाहीतर परीक्षांचे निकाल जाहीर झाल्या झाल्या पानं पानं भरून अमुक अमुक मार्गदर्शकाचे इतके विद्यार्थी यशस्वी झाल्याच्या जाहिराती झळकल्याच नसत्या.

ज्या विद्यार्थ्यांना खरोखरीच मदतीची गरज आहे, ज्यांना कोणाच्या मदतीशिवाय स्वतःच्या हिमतीवर अभ्यास करणे शक्य नाही, असे विद्यार्थी कायम दुर्लक्षित राहतात.

जगन्ननाथराय म्हणतात, हे माय ह्या जगात जे लोक पुण्यसंपादन करण्यासाठी  जन्मभर अथक प्रयत्न करत असतात, क्षणाचीही विश्रांती घेत नाहीत, अशांना त्यांच्या प्रयत्नाचं श्रेय मिळावं म्हणून देवा देवांमध्येही जणु पुण्यवानांचा उद्धार करण्याची अहमहमिका असते. त्यांना स्वर्लोक मिळावा, पुण्यगति लाभावी म्हणून देवगणमधेही स्पर्धा चालते.  

पण ज्यांना योग्य मार्ग दिसला नाही, सापडला नाही, ज्यांनी आयुष्यभर कुठली पुण्यकर्म केली नाहीत, अशा बुडत्यांचा पाय जास्त जास्त खोलात रुतत जातो पण त्यांना काडीचीही मदत कोणी करत नाही. जे आपल्याला कोणी मदत करेल का म्हणून मोठ्या आशेने वाट बघत, अपेक्षेने इतरांकडे, देवांकडे बघत असतात; ते निराशेच्या खोल गर्तेत पडले तरी त्यांच्याकडे कोणी ढुंकूनही पहात नाही. जणु काही हे जग फक्त पुण्यवंतांसाठीच आहे.

पण! -- माय, अशांना पाहून तुझं मन हेलावलं नाही असं कसं होईल? देवांनी जरी त्यांच्याकडे पाठ फिरवली, सर्व जग त्यांचा तिरस्कार करत असलं, तरी तू मात्र त्यांना आपलं म्हणतेस. त्याचा सर्व भार तुझ्या डोक्यावर घेतेस. त्यांना दुःखी, कष्टी, दुर्लक्षित राहू देत नाहीस. त्याच्या इह पर लोकीचा प्रवास सुखरूप पार पाडतेस. तुझ्यासाख्या वात्सल्यमूर्तीशिवाय हे कसं काय शक्य आहे? मला तर अशा पतितांच्या मदतीला धावून येणारं तुझ्याशिवाय दुसरं कोणीही दिसत नाही.

 

अविश्रान्तं जन्मावधिसुकृतजन्मार्जनकृतां

सतां श्रेयः कर्तुं कति न कृतिनः सन्ति विबुधाः।

निरस्तालम्बानामकृतसुकृतानां तु भवतीं

विनाऽमुष्मिँल्लोके न परमवलोके हितकरम् ।। 45 ।।

 

अन्वय -  हे जननि, जन्मावधि अविश्रान्तं सुकृतजन्मार्जनकृतां सतां श्रेयः कर्तुं कति विबुधाः कृतिनः न सन्ति । निरस्तालम्बानां तु अकृतसुकृतानां (जनानां) हितकरं अमुष्मिन् लोके भवतीं विना परं न अवलोके

अन्वयार्थ - हे जननि– हे माते!  जन्मावधि – जन्माचा पूर्ण अवधी, काळ, संपूर्ण आयुष्यभर, जन्मापासून ; अविश्रांतं – अविरत ; सुकृतजन्मार्जनकृतां – सुकृताने ज्यांनी चांगला जन्म मिळवला आहे ; सतां श्रेयः कर्तुं –  साधुंचे कल्याण करण्यास कति – कितीतरी ; विबुधाः – देव , सन्ति – आहेत ; न – नाही; निरस्तालम्बानां – ज्यांचे सर्व आधार दूर झाले आहेत; अकृत सुकृतानां – ज्यांनी काही पुण्य कर्म केले नाही अशा ; तु – तर ; हितकरं – हित करणारा ; अमुष्मिन् लोके –  पर, दुसर्‍या लोकांमध्ये ; भवतीं विना – तुझ्या शिवाय;  परं न – दुसरा कोणी नाही , इति अवलोके – असे पाहतो. (45)

 

अहो नाना पुण्ये सुजन, मुनि आजन्म करति

मिळो जागा स्वर्गी म्हणुनचि अविश्रांत झटति ।

अशांना लाभावी सुरसदनि त्या पुण्यगति ही

म्हणोनी उद्धारा अहमहमिका ह्या सुरगणी ।। 45.1 ।।

 

जयांनी ना केले परि अमल सत्कर्म कुठले

कुणाच्या आधाराविणचि दयनीया स्थितित जे ।

अगे माते ज्यांना जवळ नच केले सुरवरे

दुजा ना आधारू तुजविण तयांसी जननि गे ।। 45.2 ।।


अगे वाहे चिंता अविरत तयांची जननि तू

सदा दोन्ही लोकी इह पर असो रक्षि नित तू ।

तुझ्या वाचोनी गे मजसि दिसते ना कुणि दुजे 

करे वात्सल्याने जवळ नित पाप्यांसहि असे ।। 45.3 ।।

---------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

गंगालहरी अनुक्रमणिका

श्लोक 1

श्लोक 3