श्लोक 48

 

 

श्लोक 48


असं म्हणतात की, शेवटच्या क्षणी डोळ्यासमोर आपल्या आराध्य देवतेची मूर्ती आणण्याचा प्रयत्न करावा. जर आराध्य देवतेची सुंदर मूर्ती मनाला व्यापून असेल तर अंतकाळी भय, शोक, आसक्ती ,पीडा ह्यापासून माणसाला त्रास होणार नाही.

‘अन्ते मतिः सा गतिः । ’ शेवटच्या क्षणी जशी मती असेल तसी गती प्राप्त होते. जगन्नाथाच्या हृदयातही शेवटच्या क्षणी गंगेशिवय बाकी काहीही नाही. त्याच्या ह्या अनन्यभावानेच गंगा त्याच्या उद्धाराला धावून आली. गंगेला आपल्या उद्धारासाठी पाचारण करणार्‍या जगन्नाथाने त्याच्या शेवटच्या काही घटिका उरलेल्या असताना केलेले हे गंगामातेचे वर्णन अपूर्व आहे. गंगामैया प्रत्यक्ष समोर उभी ठाकावी असं सामर्थ्य त्याच्या शब्दाशब्दात दडलं आहे.

जगन्नाथराय म्हणतात, माय शरद ऋतुतील चंद्राच्या चांदण्यातूनच जणु काही तुझी ही मूर्ती घडवली असावी; अशी तू अत्यंत सौम्य, शांत, सर्वांना आह्लाददायक आहेस. सर्वांना हवीहवीशी वाटतेस.  तुझ्या माथ्यावर असलेली ही सौम्य धवल चंद्रकोर तुझ्या रूपाला खुलून दिसत आहे. तिचा प्रकाश तुझ्या आरसपानी कांतीवर पडून तू त्या धवल तेजाने उजळून निघाली आहेस. (शशि म्हणजे चंद्र; शकल म्हणजे तुकडा म्हणजेच चंद्रकोर. श्वेताल हा शब्द मला थोडा संदिग्ध वाटला. श्वेत + आल असा  घेतला तर आलवाल म्हणजे आळे. त्याप्रमाणे गोल हा कदाचित तिच्या पाण्यातील भोवर्‍यांना उद्देशून असावा का? तिचा मुकुट चंद्राप्रमाणे शुभ्र आणि भोवर्‍यांप्रमाणे गोल असावा? अथवा चंद्रकोर वळणदार आहे म्हणून चंद्राचा कोरीव वळणदार मुकुट असावा?)

हे गंगे तुझी चतुर्भुज मूर्ती मोठी लोभस आहे. तुझ्या एका हातात भूतमात्रांना नवसंजीवनी देणारा अमृतकुंभ आहे तर दुसर्‍या हातात सर्वांचे कल्याण दर्शविणारे कमळ आहे. (सर्व देवांच्या हातात कमळ असते) तिसर्‍या हाताने तू लोकांना इप्सित वर देणारी ‘वर मुद्रा’ धारण केली आहेस तर चौथ्या हाताने लोकांच्या मनातील सर्व भीती दूर करणारी ‘अभयमुद्रा’ धारण केली आहेस.

 अमृताची सुखद निर्झरी मोहक वळसे वळणे घेत वाहत असावी अथवा पर्वतमाथ्यावरून अमृताचा प्रपात अमृत तुषारांचे फवारे उडवत झाली कोसळत असावा  त्याप्रमाणे तुझा हा धवल उज्ज्वल, निर्मळ प्रवाह मोठा मनोज्ञ आहे. त्या अमृत निर्झरीचा कमनीय देह जणु तुला लाभला आहे. तुषारवृंद उडवत कोसळणार्‍या सुधा प्रपाताची घडण तुझ्या देहात अंगभूतच आहे. त्या अमृतनिर्झरीच्या रंगरूपाचे  दागिने  आणि वस्त्र गंगेने परिधान केले आहे. सकाळच्या सोनेरी उन्हात ते सोनेरीरंगात चमचमत असते तर रात्री चंद्रप्रकाशात रुपेरी चमकदार होते. एरवी त्याचे नीररंगही काय वर्णावेत?  ( अमृताचा रंग चंदेरी, मधाप्रमाणे सोनेरीसर किंवा जलाप्रमाणे रंगहीन असल्याची वेगेगळी मते आहेत. ) वस्त्राचा उंचीपणा जसा त्याच्या चुण्या, निर्‍या (fall) मधून कळतो तसा तुझ्या अमृतवस्त्रातील लहरीतून त्याचा उंचीपणा समजून येतो.

तुझे धवल अलंकारही मन मोहवून घेणारे आहेत. शुभ्र रंगाची मगर हे तुझं वाहन आहे. त्या शुभ्र मगरीवर तू उभी आहेस. तुझ्या सर्व भक्तांना तुझं हे रूप आश्वस्त करणारं आहे.

 जो कोणी ह्या रूपाचं मनात सतत चिंतन करेल , ध्यान करेल, ह्या रूपावर आपलं सर्व लक्ष केंद्रित करेल; त्याच्या मनात तुझं हे रूप असं काही ठसेल की तुझ्या रुपाचं/ बिंबाचं जणु प्रतिबिंबच पडलेलं असावं. ‘प्रत्यक्षाहुन प्रतिमा उत्कट’ असा हा तुझा भक्त जणु काही तुझं दुसरं निर्मल रूप आहे असच वाटेल. अशा भक्ताला जगही वंद्यच समजेल. त्याचा उपमर्द करायला, त्याचा अपमान करायला, त्याची अवहेलना करायला कोणी धजावणार नाही.

जगन्नाथ मनानी गंगामय झाला होता. आता ना लोकांना हा महापंडित त्याज्य राहिला ना त्याला लोकांच्या अवहेलनेचं भय राहिलं! सर्व मालिन्य गंगेनी धुवून टाकलं. त्याच्या पीयूषलहरींनी तो स्वतःच पावन झाला नाही तर जो ह्या पीयूष लहरी म्हणेल त्याचं मन गंगेसारखं निर्मळ होईल.  (48)

 

शरच्चन्द्रश्वेतां शशिशकलश्वेतालमुकुटां

करैः कुम्भाम्भोजे वरभयनिरासौ च दधतीम्।

सुधाधाराकाराभरणवसनां शुभ्रमकर-

स्थितां त्वां ये ध्यायन्त्युदयति न तेषां परिभवः ।। 48 ।।

अन्वय -  हे मातः, शरच्चंद्रश्वेतां शशिशकलश्वेतालमुकुटां करैः कुम्भाम्भोजे वरभयनिरासौ च दधतीं, सुधाधाराकाराभरणवसनां शुभ्रमकरस्थितां त्वां ये ध्यायन्ति, तेषां परिभवः न उदयति ।

अन्वयार्थ - हे मातः  हे माते! ; शरच्चंद्रश्वेतां – शरदऋतूतील चंद्राप्रमाणे शुभ्र वर्ण असलेली ; शशि शकल श्वेतालमुकुटां – चंद्रकोरीमुळे शुभ्र मुकुट असलेली ; करै – हातांनी ;  अम्भोज – कमळ, कुंभांभोजे – अमृतकलश आणि कमळांना (घेतलेली);  भयनिरास – भय दूर करणारी , वरभयनिरासौ – अभीष्टदान आणि भीतीचे निराकरण यांस ; च – आणि , दधतीम् – धारण करणार्‍या ; सुधाधाराकाराभरणवसनां – अमृताच्या धारांप्रमाणे ज्यांचा (शुभ्र) वर्ण, रूप आहे ती (आभरणानि म्हणजे) भूषणे, दागिने, (वसनानि) वस्त्रे  असलेल्या ; त्वां – तुला ; ये – जे ; ध्यायन्ति – चिंतितातात, ध्यान करतात ; तेषां – त्यांचा ; परिभवः – अनादर ; न उदयति – उत्पन्न होत नाही.

 

 

तुझी मूर्ती रम्या शरद पुनवेच्या शशि समा

कला चंद्राची ही सजवि तव भाळा अनुपमा ।

सुधा धारा वाहे, तशि धवल वस्त्रे झुळझुळा

तुला शोभा देती सुविमल अलंकार धवला ।। 48.1 ।।

 

उभी गंगा शोभे धवल मगरीच्यावर सदा

तुझ्या भक्तांना तू वर अभय देसीच शुभदा ।

सुधायुक्ता कुंभा धरिसि कमलासी तव करी

तुझ्या ह्या रूपाचे स्मरण करि त्या कोण हिणवी? ।। 48.2 ।।

---------------------------------------------------

श्लोक 49


Comments

Popular posts from this blog

गंगालहरी अनुक्रमणिका

श्लोक 1

श्लोक 3