श्लोक 49

 

श्लोक 49


हे माय, तुझी छवी अत्यंत मनोहर आहे, शोकात बुडालेल्या माझ्यासारख्या कुणालाही आश्वस्त करणारी, धीर देणारी आहे. ओठ किंचित विलग होऊन तुझ्या मुखावर उमटणारे अमृताप्रमाणे मंदस्मित भवाग्नीमधे होरपळणार्‍या जीवांना नवसंजीवनी, नवीन ताकद देणारं आहे. ह्या संसाररूपी वणव्यात भाजून निघणार्‍यांना तुझं हे मंद मंद स्मित पाहून, तू नक्कीच त्यांना जवळ करशील ह्याचा भरवसा वाटतो. सगळ्या लोकांनी वाळीत टाकलं तरी, माझी माय मला दूर लोटणार नाही हा असीम विश्वास तुझ्या ह्या मंदस्मितातून तू देत असतेस.

जसा हा चंद्र कायम अमृताचा वर्षाव करत असतो, मनाला शांती देतो त्याप्रमाणे तुझा हा जलौघ थकल्या भागल्या जीवांवर जणु अमृतमयी चांदण्याचा वर्षाव करून त्यांचे दुःख दूर करतो. अगे माय! एखाद्या वृक्षात वीज शिरल्यावर तो आतून पेटून उठावा; आतून धगधगत रहावा त्याप्रमाणे सर्व लोकांनी वाळीत टाकलेला माझा अंतरात्मा धगधगत आहे. त्याला शांत करण्याचं सामर्थ्य तुझ्या शिवाय कोणात नाही.  हे माय, माझ्या तनुमनाची होरपळ, हे शंतनू पत्नी गंगे, तू शांत कर गे. (49)

 

(वृत्त- पृथ्वी, अक्षरे -17, गण- ज स ज स य ल ग, यति- 8,9)

दरस्मितसमुल्लसद्वदनकान्तिपूरामृतै-

र्भवज्वलनभर्जिताननिशमूर्जयन्ती नरान् ।

चिदेकमयचन्द्रिकाचयचमत्कृतिं तन्वती

तनोतु मम शंतनोः सपदि शंतनोरङ्गना ।। 49 ।।

अन्वय – दरस्मितसमुल्लसद्वदनकान्तिपूरामृतैः भवज्वलनभर्जितान् नरान् अनिशम् ऊर्जयन्ती, चिदेकमयचन्द्रिकाचयचमत्कृतिं च तन्वती शंतनोः अङ्गना मम तनोः शं सपदि तनोतु । (49)

अन्वयार्थ - हे मातः  – हे माते! ; दरस्मितसमुल्लसद्वदनकान्तिपूरामृतै - दरं स्मितं – थोडे, मंद हास्य ;  तेन समुल्लसत् वदनम्  - त्याने विकास पावणारे मुख ; तस्य कान्तिपूर + अमृतैः –मंद स्मिताने उजळून/ फुलून जाणार्‍या मुखाच्या कांतीने जणू परिपूर्ण होणार्‍या अमृताने ; भव ज्वलन भर्जितान् नरान् – संसाररूप अग्नीने होरपळणार्‍या लोकांना ; अनिशं – निरंतर ; ऊर्जयन्ति – जगविणारी ;  चिदेकमय - चैतन्यरूप ; चंद्रिका चय चमत्कृतिं – चांदण्याच्या समूहाच्या चमत्काराला ; तन्वती – प्रकट करणारी ; शंतनोः अंगना – राजा शंतनूची पत्नी, गंगा ;  मम तनोः – माझ्या देहाच्या ; सपदि - त्वरित ,सत्वर, लगेचच  शं तनोः – कल्याणास वाढवो .(49)

 

प्रफुल्लित मुखावरी स्मित सुमंद शोभे तुझ्या

प्रदान करि जीवना, बरसवीतसे अमृता ।

अती सुखद चांदणे झिरपते स्मितातून ह्या

अनंत जणु ब्रह्म हे प्रकटवी सुखाच्या सुखा ।। 49.1 ।।

 

कसेचि जन भाजुनी  निघतसे भवाग्नीत ह्या

तयांस जगवी तुझी स्मितरुपी सुधा गे सदा ।

प्रकाशि हृदयी चिरंतनचि चित्कला मूर्त तू

तनूस मम शांतवी सुखवि शंतनू पत्नि तू  ।। 49.2 ।।

---------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

गंगालहरी अनुक्रमणिका

श्लोक 1

श्लोक 3