मराठी भावानुवाद

 

गङ्गालहरी  (मराठी)

(वृत्त- शिखरिणी  अक्षरे - 17, गण- य म न स भ ल ग , यति - 6, 11 )


खुले भाळी जैसा तिलक जणु लावण्यवतिसी

तसे गंगेचे हे सलिल नटवी ह्या अवनिसी ।

असे सौभाग्याचे प्रतिक जल हेची धरतिचे

असे गंगामाते तव सलिल ऐश्वर्य क्षितिचे ।। 1.1 ।।

 

सदा राहे तूची मधुर जलसम्पन्न सरिते

असे कल्याणाची सुखद पुतळी तूचि सरिते ।

तृषार्ता पृथ्वीची शमविसि तृष्णा तव जले

असे गंगाम्बु हे विभवचि स्वयंसिद्ध तव गे ।।1.2 ।।

 

सुधाधारा ह्या गे हरित अवनी ही फुलविती

तुझ्या मार्गामध्ये उधळण सुखाचीच करिती ।

फळांनी पुष्पांनी नटवि वसुधा तू सुरधुनी

महीची तृप्ती तू, बहु सुख समाधान असशी ।। 1.3।।

 

जयाच्या खड्गाने रिपु सकल ते दुष्ट वधिले

जगाची उत्पत्ती अति सहज ज्या खेळचि असे

अगे शंभू तोही तव सलिल सामर्थ्य बघुनी

तुला सन्मानाने मिरवित असे का नित शिरी ।। 1.4  ।।

 

तुझी धारा शुभ्रा स्फटिक धवला शुद्ध सरिते

सुधेची तू शोभे भगिनि दुसरी कल्पलतिके

असे तू वेदांचे उजळ अवघे पुण्य बरवे

असे वा देवांचे सुकृत नयना जे दिसतसे ।।1. 5 ।।

 

सुधेलाही जिंके मधुमधुर हेची जल तुझे

मृतालाही ज्याने अति सुखद संजीवनि मिळे

सदा चैतन्याने उसळत असे जे जल तुझे

अनर्थांसी सार्‍या नित शमवु दे माय मम गे ।।1.6 ।।

-------------------------------------------------------

जलौघासी पाहे निमिषभर जो दीन कुणिही

तयाच्या दैन्याची जननि न निशाणीहि उरवी

 मनी दुष्टांच्याही कणव अति निर्माण करिसी

प्रवृत्ती पापाची सकल करिसी ध्वस्त मनिची ।।2.1

 

मनी फोफावे जो  सघन तरु अज्ञानस्वरुपी

करी त्याचे उन्मूलन सहजि लाटा सुरधुनी

गुरू तो शिष्याला सजग करी ज्ञानांजनबळे

जलाने गे तैसे मम सकल अज्ञान हरणे।।2.2

 

गुरू माऊली तू तवची जलधारा पुनित ही

मनाच्या अज्ञाना अति जलद टाकी निरसुनी ।

तुझी धारा वाहे अविरतचि माते सुखमयी

हरो ती पापांना करुनि मजला मंगलमयी ।। 2.3

-------------------------------------------------------

तुला मोहूनी गे शिव करि शिरी धारण तुला

लबाडी शंभूची पुरति कळता ती गिरिसुता ।

असूया ईर्षेने मनि जळफळे पेटुन उठे

हृदी गौरीच्या त्या जहरि सवतीमत्सर उठे ।। 3.1।।

 

तिच्या नेत्रांमध्ये जणु उगवतीच्या रविसमा

प्रकाशे लालीमा जणुचि करण्या खाक तुजला ।

उमा टाकी कैशी जळजळित दृष्टी तुजवरी

अगे पाणी पाणी तव हृदय हो त्या बघुनची ।। 3.2 ।।

 

शिवानीच्या ऐशा तिखटचि कटाक्षांस बघुनी

भवानीचा मोठा फणफुणत  त्रागाच बघुनी ।

भयाने काया का थरथरत राहे तव अशी

जणू वाटे गंगाधर-शिरि पदन्यास करसी ।। 3.3 ।।

 

नभाशी लाटा ह्या तव सहजि स्पर्धाच करिती

जणू त्या स्वर्गाचा अति सहज सोपान बनती ।

तुझ्या या उत्तुंगा लहरी मम कल्याण करु दे

धुवोनी पापांसी  विमल करि सर्वां जननि गे ।। 3.4 ।।

-------------------------------------------------- 

अगे माझ्या पाठी जननि नित खंबीर असता

कुणा भ्यावे मी का? मजसि तव आधार असता ।

असे वाटूनी मी जननि अविचारीच बनलो

कुचेष्टा देवांची करुन उपहासेच हसलो ।। 4.1।।

 

रुचावे कैसे गे तुजसि मम उद्दामपण हे

कुचेष्टा देवांची करुन हसणे उद्धटपणे ।

अगे मांडे थट्टा सकल सुरवरांची नित नवी

सहाय्याला त्याच्या सुरवर कसे येतिल झणी ।। 4.2 ।।

 

अशा वेळी तूही नच जननि गे पाठ फिरवू

व्यथा सांगू कोणा? सुमुखचि कुणाचेच निरखू ?।

अगे उद्धाराचा समय मम येताच जवळी

अबोला ऐसा का जननि धरणे योग्य तुजसी ।। 4.3 ।।

 

अगे सोडूनी तू मजसि जरि जाशीलच अशी

अनाथासी कैसा तुजविणचि आधार जगती ।

कसा स्फुंदू माते शिरुनचि कुणाच्या कुशित मी

निराधारासी ह्या, तुजविण न कोणीच जगती ।। 4.4 ।।

---------------------------------------------------

तमा सारी दूरी कुमुदप्रिय तो चंद्रचि जसा

पथा दावी रात्री घनतमि प्रकाशून पथिका ।

तसे तू हारी गे सकल तिमिरासी हृदयिच्या

लया न्यावी पापे त्रिविधचि जलानेच तुझिया ।।5.1।।

 

उभ्या जन्मी ज्यांना कधिहि न सदाचार शिवला

अशाही पाप्यांनी हृदयि करिता आठव तुझा।

महा दोषातूनी हसत करिसी मुक्तचि तया

सदा देसी स्फूर्ती विरघळवि त्यांची शिथिलता ।।5.2।।

 

असे देवांनाही जलतनु तुझी वंद्य जगती

/

(तृषा शांतीसाठी सुर तव जला प्राशन करी)

अगे पीडा देती त्रिविध मम पापे मज अती ।

करो त्या पीडेचे निरसन तुझी नीरतनु ही

कृपादृष्टीने गे तगमग मनीचीच शमवी।।5.3 ।।

(संसेव्य चे वंद्य असणे व प्राशन करणे दोन्ही अर्थ आहेत.)

---------------------------------------------------

जयांच्या सीमा ह्या पसरतिच आसिंधु अशि ही

महासाम्राज्येही तृणसम अती तुच्छ स्मरुनी ।

महीची ऐश्वर्ये विभवहि अकस्मात त्यजुनी

तुझ्या ओढीने हे नृप कितिक आले तव तिरी ।। 6.1।।

 

बने वेळूची ही डुलति पवनासंगति जिथे

बनी वेतांच्या त्या वसतिच सुखाने नृप तिथे ।

मिळे त्यांना तृप्ती सलिल तव आकंठ पिउनी

सुधेलाही नाही सर तव जलाची लवभरी ।। 6.2 ।।

 

तुझे प्राशूनीय मधुर जल हे अमृतमयी

नृपांना लाभे जो सतत परमानंद हृदयी

अगे तो मोक्षासी सतत खिजवी गे हसुनची ।

म्हणे हे मोक्षाचे पदचि कवडीमोल मजसी ।। 6.3 ।।

---------------------------------------------------

जळी स्नानासाठी अरुण-उदयाच्याच समयी

स्त्रिया राजांच्या ह्या जळि शिरति आकर्षक किती ।

तयांच्या अंगीची जळि विरघळे कस्तुरि उटी

मृगांची होई त्या तनु अमल त्याने त्वरितची ।।7.1।।

 

जथे देवांचे हे उतरति विमानातुन भुवी

सुरक्षेच्या वेढ्यातुन सुर मृगा ने सुरवनी ।

सुरांसगे जाती बसुनच विमानी मृग किती

खुशीने स्वेच्छेने शिरति फिरती नंदनवनी ।। 7.2 ।।

 

अगे कस्तूरीसी सलिल करता स्पर्श अमले

मिळे त्या पुण्याने `परिमलमृगा' स्वर्ग सुख हे ।

अशी ही पुण्याई तवचि करुणेचे फळ असे

तुझ्या संपर्की ये अति दुरुन त्याही सुख मिळे ।। 7.3 ।।

(परिमलमृग – कस्तूरीमृग. कस्तूरीमृगांची कस्तूरी वापरून केलेली उटी गंगेच्या पाण्यात विरघळली , तेंव्हा गंगेचा स्पर्श त्या कस्तूरीला झाल्याने, तत्क्षणी कस्तूरीमृगांनाही स्वर्ग प्राप्त झाला.)

---------------------------------------------------

अगे “गंगा” ही जी श्रवण सुख दे अक्षरद्वयी

करे कानांनाही निरतिशय जी तृप्त सहजी

जया उत्कंठेने सहज स्मरता एकसमयी

मिळे चित्तासी ह्या अपरिमित शांती त्वरितची ।। 8.1 ।।

 

सुखे उच्चारीता मधुमधुर गंगा पद मुखी

सुटे संसाराचा अति जटिल गुंता सहजची ।

न ठेवी दुःखाच्या विफल लवलेशा क्षणभरी

मिळे चित्तासी ह्या अतिशय समाधान सुखही ।। 8.2 ।।

 

अगे सीमारेषेवर असति हे प्राण मम गे

मुखी राहो तेव्हा लखलखित हे नाम तव गे ।

`नमो गंगे' ऐशा मधु-मधुर शब्दांस रसना

सदा सेवो, ठेवो  मुखकमलि गे अंतसमया ।। 8.3 ।।

---------------------------------------------------


कुणीही येता गे तुज जवळि त्यासी सुखविसी

असो साधा दुर्लक्षित खग कुणी वायस जरी

तुझ्या तीरी तोही अनुपम सुखासीच मिळवे

मनाजोगे खेळे मुदितमन स्वच्छंद विहरे ।। 9.1 ।।

 

कधी स्वर्गाची तो हृदयि अभिलाषा नच धरी

नको वाटे त्यासी सुखमयचि स्वर्गादिक गती ।

बुडाले शोकाते जन प्रियजनांच्याच विरहे

दिलासा लाभे त्या तव तिरि रहाताच सुभगे ।। 9.2 ।।

 

कितीही सायासा तनु-मन-श्रमासीच हरण्या

मनाच्या वैफल्या सकल थकव्यासीच तनुच्या ।

कराया दूरी गे प्रबल असती जे तट तुझे

करो दूरी कष्टा, श्रम, खटपटी, शीण अमुचे ।। 9.3 ।।

---------------------------------------------------

असे अद्वैताचे निरवयव जे ब्रह्मपदची

करीती ज्याचाची निगम महिमामंडन अति ।

परी वर्णू जाता म्हणति, ‘‘कळले ना अजुनही’’

पदा त्या वर्णाया शरण म्हणुनी मौन धरिती ।। 10.1 ।।

 

मती खुंटे सार्‍यांचिच उकलता ब्रह्मपद जे

स्फुरे ना वाचा ही स्वरुप बघुनी निर्गुण असे ।।

‘अशा तत्त्वाचे का अनुसरण सोडूनचि भले

करावा ऐसा का सलिल-तनुचा गौरव बरे’  ।। 10.2 ।।

 

विचारी का ऐसे जननि मजला आजचि असे

असे तूची तेचि खचितच महा ब्रह्मपद ते ।

अगे तूही मायाविरहित निराकार असशी

अगे अज्ञानाचा घनतम निवारी सहजची ।। 10.3 ।।

 

तुझी धारा वाहे अविरत; नसे नाश तुजसी

करी ना भेदासी हृदय तव गे निर्मळ अती ।

दिसे ना डोळ्यांना जननि असुनी ब्रह्मपद ते

परी चिद्रूपाची सगुण पुतळी तू मज दिसे ।। 10.4 ।।

निगम – वेद

---------------------------------------------------

विचारांच्या वाटे अति पलिकडे विष्णुपद जे

जयाच्या लाभाच्या मन कधि विचारास न धजे ।

किती मोठी दाने व्रत नियम ध्यानादि करुनी

मिळेना कोणासी हरि चरण जे घोर तपुनी  ।। 11.1 ।।

 

मिळेना यज्ञांनी; जमवुन महा पुण्य जवळी

करोनी कामे ती खडतर महा दुष्कर अशी

करोनी नाना त्या खटपटि न विष्णूपद मिळे

जिथे टेकीती गे करचि कचरूनी जन पुरे ।। 11.2 ।।

 

असे वैकुंठाचे पद सहजि देसी मिळवुनी

अगे सर्वांशी तू सतत समभावास धरुनी

जनांना नेशी त्या निकट हरिच्या पद्मपदिही

तुझ्या दातृत्वाला जननि तुलना या न जगती ।।11.2 ।।

---------------------------------------------------

तुझी दृष्टी ज्याच्यावर पडतसे गे क्षणभरी

तया संसाराचे भय न उरते गे लवभरी

कसा वर्णावा तो तवचि महिमा उज्ज्वल बरे

विषाचा कंठा जो मिरवि हर त्या तू रुचतसे ।। 12.1 ।।

 

हृदी शंभूच्या तू उपजविच मोहा बघुन हे

शिवाची अर्धांगी फणफणत कोपागृही झुरे।

हिमाद्रीकन्येचा अनुनय परी ना शिव करे

तिला दुर्लक्षूनी शिव तुजसि माथ्यावरि धरे ।। 12.2 ।।

 

गुणांची ऐशी ही कदर गिरिशानेच करणे

अगे ह्याहूनी का अजुन कुठला गौरव असे ।

कसा सामान्यांनी जननि तव गावाच महिमा

असे शब्दांचे हे विभव अपुरे गे स्तुतिस गा ।। 12.3 ।।

---------------------------------------------------

कुकर्मे ऐकूनी अति अधम जी विकृत अती

खलांचा माथाही सहजचि झुकवा शरमुनी ।

मदोन्मत्तांनाही खजिल करि जे पाप मनि गे

न उच्चारावे ही म्हणतिच अधर्मी नर असे ।। 13.1 ।।

 

धजेना ज्या कर्मा अधम करण्या निंद्य म्हणुनी

खलांच्या ये अंगी सरसरुन काटाच श्रवणी ।

अशाही पापांचे निरसन चि तू एक करि गे

न घे विश्रामासी अनवरत सत्कार्य करि हे ।। 13.2 ।।

 

असे कोणापाशी तुजसमचि सामर्थ्य इतुके?

श्रमांचे वाटेना कधि तुजसि ओझे जललते

तुझ्या ह्या कीर्तीचा त्रिभुवनिच डंका घुमतसे

जगी सातत्याने सुविजय पताका फडकते ।।13.3 ।।

---------------------------------------------------

जगाच्या कल्याणा अवतरसि पृथ्वीवर कशी

तुझ्या धारा धो धो उतरतिच स्वर्गातुन भुवी।

जटांमध्ये बांधी तव सलिल धारा जखडुनी --

कसा कौशल्याने सहज त्रिपुरारी प्रबळची ।। 14.1 ।।

 

विपर्यासाचे हे! गुणहि बनतो दोषच कधी

विरागी शंभूला तव भुलविती सद्गुण अती ।

गुन्हा कैसा व्हावा जननि तव हा चांगुलपणा

प्रवाही धारा तू असुन तुज निर्बंध झरण्या ।। 14.3 ।।

 

निराकारालाही सगुण करिसी तू तव गुणे

जलौघालाही गे विमल म्हणुनी बंधन घडे ।

त्यजूनी स्वर्गाला अवनिवर येणे तुज पडे

गुणांची का होई परिणति दोषात सुभगे ।। 14.4 ।।

---------------------------------------------------

अपंगा अंधांना विकलमति वा मूक बधिरा

ग्रहांच्या पीडेने हतबलचि झाले जन तया ।

लुळे पंगू कोणी विकल विकृतीग्रस्तचि जगी

न प्राश्चित्ते ज्या असति कुठली ह्या कलियुगी ।। 15.1 ।।

 

हराया पापे जी ग्रथित नच शास्त्रोक्त विधिही

सहाय्यासी त्यांच्या हतबलचि हे देव असती ।

नरांसी ऐशा ज्या सुरहि निरुपायेच त्यजती

अती दुःखाने ते नरकपुरिमध्येच पिचती ।। 15.2 ।।

 

अशांना रक्षाया, विमल करण्यासी पुनरपी

तयांच्या दुःखाचे निरसन कराया सकलची ।

कराया दूरी गे नरकपुरिचा क्लेश सहजी

प्रभावी ऐसे तू जननि असशी औषध जगी ।। 15.3 ।।

---------------------------------------------------

तुझे पाणी आहे नितळ सहजी शीतल सखे

कसे वर्णावे ते सलिल महिम्यासी अमर गे ।

तुझ्या पुण्यस्पर्शे सगरसुत हो धन्य सगळे

अगे राखेतूनी फिरुन उठले दिव्यतनु ते ।। 16.1 ।।

 

पहा झाले रोमांचित मृदुल ते कोमल तनू

कलंकांचे प्रक्षालन घडुन तनु हो उज्ज्वल जणु

अती आनंदाने सगरसुत भारावुन हृदी

विमानाने आले मुदित सगळे स्वर्गसदनी ।। 16.2 ।।


हजारो वर्षांचा समय जरि गेलाच सरुनी

अजूनीही स्वर्गी सगरसुत ते हर्षित मनी

तुझा गाती ‘तो गे सकल महिमा अद्भुत अती

सदाचाराची ही तव विजयगाथा झळकती ।। 16.2 ।।

---------------------------------------------------

किती तीर्थे त्यांची गणति करिती कोण जगती

अती छोटी पापे धुवुनि जन उद्धार करिती ।

परी कारस्थाने रचुन  अति गे सावधपणी

करी कृत्ये काळी नर कुणि पिसाटापरि जगी ।। 17.1 ।।

 

अवाका शास्त्राचा अमल करण्याचा पुनरपि

पहा ओलांडूनी अधम कृति जे घोर करति ।

न प्रायश्चित्तेही कथिलिच जया शास्त्रवचनी

दिसे ना उद्धारा पथचि कुठला दाट तिमिरी  ।। 17.2 ।।


अशांसी पाहूनी हृदय दडपूनी सकल ही

खुजी तीर्थे घेती अति निमुट माघार जननी ।

परी येसी तूची त्वरित पतितांच्या मदतिसी

तयांच्या पापांना धुवुन करिसी निर्मलमति ।। 17.3 ।।


तयांच्या उद्धारा तुज सम असे तूच जगती

तुझ्या पासंगासी पुरति नच क्षेत्रेच कुठली ।

सदा आकाशी ह्या तव यशपताका फडकती

हरोनी पापे ‘ती’ सतत यशसोपान चढसी ।।17.4 ।।

---------------------------------------------------

स्वधर्माचा तू गे अनुपम असे कोष जननी

असे तू हर्षाचा नित नवनवोन्मेष हृदयी।

असे तूची पुण्यस्थल-प्रमुख गंगेच जगती

गमे त्रैलोक्याचे वसन जणु तू निर्मल अती ।। 18.1 ।।


जिथे बुद्धीचेही सकल सुटुनी प्रश्न सगळे

सुटे संसाराचा अति गहन गुंता तुजमुळे ।

समाधानाचे गे अविरत समाधीसुख मिळे

असे तो बुद्धीचा जननि परमानंद नित गे ।।18.2 ।।


अजाणा, अज्ञांना जननि पदरानेच तुझिया

अगे झाकूनी तू धरिसि हृदयाशी नित तुझ्या

गमे लक्ष्मीलाही तव जललता स्त्रीधन तिचे

मनीच्या क्षोभाला तव तनुलता दूर  करु दे ।।18.3 ।।

---------------------------------------------------

जयांना सत्तेची चढलि मदिरा ती विषभरी

अहंकाराने जे कृति करिति बेबंद लहरी ।

धनाने सत्तेने नृप असति उन्मत्त बहु जे

अगे हांजी हांजी करत फिरलो त्या पुढति गे ।। 19.1।।

 

तुला सोडुनी मी नृपति पदि त्या नित्य झुकलो

तया मागे मागे फिरत बहु दुःखात पिचलो ।

नव्याने नित्याने फिरुन फिरुनी खेद मजला-

सतावे; गोष्टींचा किति निरनिराळ्या अजुन का ।। 19.2 ।।

 

हिताचा माझ्या मी करुनचि कसा घात शतदा

कसा कल्याणाचा पथ अडविला मीच मजला ।

अगे भूलोकी तू असुनहि दुरावाच धरुनी

न केले स्नाना मी जननि तुझिया निर्मळ जळी ।। 19.3 ।।

 

अशा ह्या वेड्याची कणव करि गे तूच हृदयी

क्षमा माझ्या सार्‍या गहन अपराधांसचि करी ।

अगे मानूनी तू क्षणभर कृपापात्र मजसी

तुझ्या वात्सल्याचा अनुभव मला दे कणभरी ।। 19.4 ।।

---------------------------------------------------

 तुझ्या तीरी माते, झुळुक झुळके शीतल सुखे

तरंगांची नक्षी  नितळ जळि  रेखे पवन गे ।

तरंगांनी त्या गे डुलति कमळे नाजुकपणे

परी होती सारी अति शिथिल पद्मांचिच दळे ।। 20.1 ।।


परागांचे त्यांच्या कण विखुरती दूर जळि गे

किनारा रंगे तो जणु अरुण कांतीत तव गे ।

करीता स्नानासी सुरवर स्त्रिया गे तव जळी

तयांच्या अंगिची मिसळत जळी गंधित उटी ।। 20.2 ।।

 

उटीने ते गंगाजल घडतसे गंधयुतही

जणू कोणी रेखे अभिनव नवे चित्र सलिली ।

तरंगा रेघा ह्या, उटि कमलतंतूच नलिनी

अगे ह्यांचा गुंता अनुपम गमे हे सुरनदी ।।20.3 ।।

 

परी गुंताडा हा जनन-मरणाचा भयद गे

मला त्याने आहे, जननि पुरते गे जखडले।

‘जला-जंजालाच्या’ अति सुखद स्पर्शे जननि गे

महा पीडादायी जननमरण जंजाळ विरु दे ।। 20.3 ।।

---------------------------------------------------

अगे ज्या लक्ष्मीचा पति अतिच श्रीमंत जगती

जयाची पाऊले अमल कमलांच्यासम जशी ।

गुलाबी कांतीची चमकति नखे उज्ज्वल अती

तयापासूनी गे जननि तव उत्पत्ति घडली ।। 21.1 ।।

 

सुटेना प्राणी तो कुणि मदनबाधेतुन कधी

मनोजासी त्या दे शिव तिखट प्रत्युत्तर युधी

महा योद्धा शंभू शिव करितसे राख तयिची

परी मोहूनी तो  तुज निज शिरी धारण करी ।। 21.2 ।।

 

जटांचा त्याच्या तो जरि सुखवि प्रासाद तुजसी

जरी विष्णूची ती चरणकमले मोहक अती ।

तरीही तू माते हरिचरण पद्मे हि त्यजसी

तुझे विश्रामाचे स्थल  शिव-जटा-त्याग करसी ।। 21.3 ।।--

 

विषाने, शस्त्राने जन मृतचि झाले जगति ह्या

अधोगामी जे जे जन ढळति नीतीपथचि वा ।

अशांच्या उद्धारा अवतरसि पृथ्वीवर पुन्हा

अगे उद्धारावे पतित-जन व्यासंग तव हा ।। 21.4 ।।

 

तुझा पाहूनी हा पतित विषयीचा कळवळा

प्रतिज्ञा पूर्तीच्यास्तवचि झटणे हे अविरता ।

बघोनी निष्ठा ही तव अति असामान्य प्रतिची

कळावे कैसे ना जननि तव माहात्म्य जगती ।। 21.5 ।।

---------------------------------------------------

गिरीतूनी येती कितिक सरिता हे सुरधुनी

मिळाले का कोणा परि शिवशिरी स्थान कधिही? ।

जलौघाने वा का चरण कमलाकांत हरिचे

करे प्रक्षाळूनी विमल कुणि का निर्झरि स्वये ।। 22.1 ।।

 

कुणापाशी आहे इतुकि क्षमता गे सुरसरी

तुझ्या तोडीची ना जननि सरिता एकही जगी ।

कवींनी द्याया गे तुजसी उपमा ना दुजि कुणी

नसे तोलामोलाचिच तुजसमा एकहि नदी ।। 22.2 ।।

---------------------------------------------------

कसे चालावे ह्या सुरळितचि माझ्याविण जगी

नको शंका ऐसी क्षणभर विधात्या हृदि अशी ।

सुखे ब्रह्मा बैसो अविरत समाधीत गढुनी

करावे रुद्राने समय कितिही तांडव भुवी ।। 23.1 ।।

 

हरे जो दुःखांसी, हरिहि बहु निश्चिंत हृदयी

सुखे झोपो शेषावर नित करो तो शयनची ।

नको प्रायश्चित्ते तप यजन दानेच कुठली

जगाच्या चालाया नच गरज ह्यांचीच उरली ।। 23.2 ।।

 

जगाच्या उद्धारा सुरनदि पुरे एकच अशी

करे सारी कामे सकलचि सुरांना न जमली ।

मनीषा पूर्तीसी; नित शमविण्या क्षोभ सहजी

असे गंगा जागी नित निरसण्या दुःख जगती ।। 23.3 ।।

---------------------------------------------------

अनाथाचे माझ्या अति कटु असे दुःखद जिणे

दयेने ओथंबे हृदय तव वात्सल्यमय हे ।

अगे उद्धाराचे सकल पथ हे बंद मजसी

परी सर्वा देसी मिळवुनचि तू पुण्यगति ही ।। 24.1 ।।

 

स्वधर्मापासूनी सतत ढळलेला पतित मी

जगाच्या उद्धारा सतत झटते तू दृढव्रती ।

भवाच्या रोगांनी अति गलितगात्रे जगतसे

परी तूची माते अति निपुण हा वैद्य मज गे ।। 24.2 ।।

 

शमेना तृष्णा ही मम विषय-व्याकूळ मनिची

सुधा-धारा तू गे जलतनुचि तू अमृतमयी

अनन्याभावाने जननि तव हा बाळ दमुनी

तुझ्यापाशी आला; करि उचित जे गे तुज मनी ।। 24.3 ।।

---------------------------------------------------

क्षणी ज्या आली तू सुरसरिच स्वर्गातुन भुवी

क्षणापासूनी त्या जनहितकथा हो सुरु भुवी ।

तुझ्या स्पर्शाने हे सकल जन स्वर्गास मिळवी

विमानी लोकांची लगबगचि जाण्या सुर-पुरी ।। 25.1।।

 

विमानांचे ताफे सुरपथि करी व्यत्यय अती

प्रभावे गंगेच्या नरकपुरि ती ओस पडली

न ये ऐकू कानी यमसदन-आक्रोश कधिही

जिथे पापांसाठी अति भयद शिक्षाच मिळती ।। 25.2 ।।


मिळेना जीवात्मे कितिक फिरुनी गे तव तिरी

यमाच्या दूतांच्या  पुनरपि निराशाच पदरी

अशी ही कल्याणी तव सुरस गाथा सुखमयी

तुझ्या रूपाने गे सुख अवतरे ह्या महिवरी ।। 25.3 ।।

---------------------------------------------------

मनी कामक्रोधे धगधगत आहेच वणवा

जयाच्या ज्वाळा ह्या उसळुनि करी दग्ध तनुला ।

न ह्या दाहासी गे शमविल असा मार्गचि दुजा

उपायू नाशी जो सकल अमुच्या दुःखद व्यथा ।। 26.1 ।।

 

परी तू स्वर्गीची अनुपम अशी अमृतझरी

प्रवाहासंगे ह्या सतत फिरती वायुलहरी ।

तयाने लाटा ह्या उठति पुढती धावति किती

अति वेगाने त्या फुटतिच तिरी आदळतिही ।। 26.2 ।।

 

जलाच्या बिंदुंचे वर उधळती मौक्तिक अहा

फवार्‍यांनी त्या गे तव जल तुषारे उसळत्या,

महा हव्यासाचा विझवि वणवा जो भडकला

अगे दाहासी ह्या शमवि अमुच्या दग्ध तनुच्या ।। 26.3 ।।

---------------------------------------------------


गळा नीळा ज्याचा, विभवचि शिवाचे खचित ज्या

जटांचा त्याचा हा कितिकचि पसारा पसरला ।

असे गुंतागुंती शिव शिरि जटांची अमुप ही

तयातूनी जाशी बिकट वहिवाटा उमजुनी ।। 27.1 ।।

 

जलौघाची व्याप्ती अगणित अमर्याद तव ही

कसे ब्रह्मांडाही अति सहज घेरे चहु दिशी ।

असे ब्रह्मांडाचा परिघ कितीही विस्तृत जरी

धरे त्रैलोक्याला सकल भुवनांसीच उदरी ।। 27.2 ।।

 

प्रवाही गंगेच्या परि डुलत ब्रह्मांड बघुनी

तरंगे कैसे हे फळ चिमुकले वाटत मनी ।

जलाच्या राशी ज्या हरति नित पापे सुरधुनी

हरो त्याची तापत्रयचि अमुचे नित्य जननी ।। 27.3 ।।

---------------------------------------------------

अगे उद्धाराचा विषय मम चर्चेस निघता

दुराचारी ऐशा मजसि बघता तत्क्षणि पहा ।

कशी तीर्थे माना त्वरित शरमेने झुकविती

करा ठेवी कानी `शिवशिव' म्हणे देवगण ही ।। 28.1 ।।

 

अगे माझ्या पापांपुढति सुर सामर्थ्यहि फिके

कपालीही होई हतबल दुरापास्तचि म्हणे ।

तिथे होई अंतःकरण नवनीतासम तुझे

दयार्द्रा होसी तू मजवर कृपामेघ बरसे ।। 28.2 ।।

 

मला पाप्यालाही पुनित करिता जाह्नवि त्वरे

सुरांना, तीर्थांना परिचय नव्याने तव घडे

‘कसे प्रक्षाळावे नित दुरित आम्हाविण कुणी’

असा ताठा त्यांचा चुटकिसरशी  चूर करिसी ।। 28.3 ।।

---------------------------------------------------

नसे ज्यांना नीती नियम कुठले सभ्य जगिचे

असे पापी जेव्हा पडतिच विचारात कधि गे ।

अहो दुष्कर्मे ही उचित असती का अनुचिता

तयांच्या चित्तीही उमटत असे सम्भ्रम असा ।। 29.1।।

 

अशावेळी पापी त्यजिति दुरिते त्याज्य म्हणुनी

नसे ज्या पापांसी अधम-मनि थारा लवभरी ।

असे पापांचे जे समुह असती बेघर कुणी

तयांसाठी मी गे सदनचि असे केवळ जगी ।। 29.2 ।।

 

परी उद्धाराया त्वरित मज पाप्यास जननी

सुसिद्धा आहे तू सतत कसुनी कंबर तुझी ।

कुठे सौजन्याची तव अमल मूर्तीच जननी

कुठे मी हा पापी नर नच पशू केवळ जगी ।। 29.3 ।।

 

तुझी आस्था माझ्याविषयि बघुनी माय मम गे

अगे भांबावूनी नच मजसि काही कळतसे ।

तुझ्या प्रेमामध्ये भिजुन जरि गेलो तरि कसे

स्तुती गाण्या यावे बळ कुवत सामर्थ्य मज गे ।। 29.4।।

---------------------------------------------------

‘दुराचारी खासा मजसि गवसावा कुणीतरी

तया उद्धारावे सहजचि क्षणार्धात बघ मी ।

जयांच्या उद्धारे सकलजन हो विस्मयभरे

पहा तारीला मी किति अधम अधमातीतचि त्वरे ।। 30.1 ।।

 

बहू कीर्ती माझी त्वरित पसरावीच जगती’

मनीषा ऐसी गे चिर वसत होती तव हृदी ।

अशा संकल्पाचा हृदयि तव आरंभ घडला

तयासीही लोटे अपरिमित गे काळ किति हा ।। 30.2 ।।

 

मिळाला ऐसा ना अधम इतुका गे परि तुला

तुझ्या ह्या उद्देशा सफल करण्या मी पतित हा ।

तुझ्या दारी आलो करि तव मनीषा सफल गा

कृपा वर्षावाने पुनित करि आम्हासचि पुन्हा ।। 30.3 ।।

---------------------------------------------------

अगे श्वाना जैसा बनुन अति लाचार फिरलो

भराया पोटाची खळगि धनिकांचे पद धुतो ।

धनी फेके त्याची उरिव तुकड्यांसी चघळिता

कसा लाचारीचा मजसि जडला छंदचि नवा ।। 31.1 ।।

 

असत्यासी बोले नच कचरता योग्य म्हणुनी

करे चर्चा सारी अनुचित कुतर्का लढवुनी ।

असे प्रस्थापाया अनृतही पटाईत बहु मी

करे मी शास्त्रांच्या सहज उपहासास जननी ।। 31.2 ।।

 

रुची वैगुण्याची, सतत परदोषांस चघळी

जशी माशी शोधे जखमचि कुणाची चिघळली।

असे कानी येता सतत ‘गुणभांडार’ मम गे

मुखासी माझ्या ह्या  तुजविण कसे कोण निरखे ।। 31.3 ।।

---------------------------------------------------

मनासी मोही गे जलमय तुझी सुंदर छबी

परी ह्या रूपा जी कमलनयने ना निरखिती

टपोरे ऐसे ते नयन सले वा न असले

असूनीही त्यांचे नित निरुपयोगीच असणे ।। 32.1 ।।

 

तरंगांची क्रीडा कलकलचि चाले सुरमयी

 तयाच्या माधुर्ये अविरत श्रुतींनाच रिझवी

श्रुती ना ऐकी ज्या, सुखद अनुभूती कुठुन त्या

फुका गात्रे ऐशी सतत करु धिःकार तयिचा ।।32.2 ।।

---------------------------------------------------

न वाहे देशी ज्या सलिलचि सलीले तव सुखे

कुणी ना स्नेहार्द्रा तुजसम सर्वांप्रति तिथे ।

अहो पुण्यात्मे ते सहजिच विमानी बसुनिया

सुखाने स्वच्छंदे सरपुरित त्या पावति सदा ।। 33.1।।

 

कृतांताचे तेथे बळजबरिने दूत जुलमी

कसे पाप्यांना गे परि पकडुनी नेति नरकी ।

जिथे गंगौघाने अमल करण्या सर्व जन हे

नसे माते तूची फरकचि तिथे हा दिसतसे ।। 33.2।।

 

जिथे वाहे गंगे! तव पुनित धारा सुखमयी

तिथे चिंता दुःखे दिसत न दुजाभाव कधिही ।

परी ना वाहे गे तव सुखद गंगौघ जिथुनी

प्रदेशांसी त्या गे नित अवकळा ये अशुभ ती ।। 33.3 ।।

---------------------------------------------------

करे विद्वानाचा वध कुणि अती निर्दयपणे

लबाडीने कोणी कनक धन नेई लुटुन ते

गुरूपत्नीलाही अधम कुणी भोगे फसवुनी

सुरापानाऐसी अति अधम कृत्ये नित करी ।। 34.1

 

महापाप्यांनी या स्मरुन तुजसी अंतसमयी

जरी केले गंगाजल जवळ ते अंतसमयी

तरी त्यांच्या पायी सुरवर मुनी नित्य नमिती

अती पुण्यात्म्यांच्या वरचढचि त्या देव समजी ।। 34.2

 

मिळे यज्ञाचे ज्या फळ सकल सर्वस्व त्यजुनी

नरांपेक्षा ऐशा वरचढ सुखे त्यांस मिळती ।

तयांना स्वर्गाची गति मिळुन उत्कृष्ट प्रतिची

करीती क्रीडा ते, विविध सुख आनंद लुटती ।। 34.3

---------------------------------------------------

न ये कोणा हाती  परिमल फुलांतील कधिही

परी त्याची चोरी पवन करतो नित्य सहजी

वियोगाचा कैसा शर करिच घायाळ हृदया

अशांच्याही प्राणा हरण करि वायू सहज गा।। 35.1 ।।

 

हरे सातत्याने सुमनधन वा प्राणधन जो

रूची ठेवे वायू गहन अपराधात नित जो

तरंगांमध्ये गे  मिसळुनि पुन्हा हो पुनित तो

जगाच्या उद्धारा त्रिभुवनि फिरे पुण्यगति तो ।। 35.2 ।।

 

अनोखा कैसा हा जननि लहरींचाच महिमा

जयांचे होते गे मिलन लहरींच्यासह तुझ्या ।

मिटोनी पापे ते सबळचि कसे होति इतुके

क्षणार्धामध्ये ते त्रिभुवन करीती पुनित हे ।। 35.3 ।।

---------------------------------------------------

जनांच्या कल्याणा निरत झटती लोकचि किती

किती पुण्यात्मे हे सुखद सुरलोका मिळविती।

अगे दोन्ही लोकी विमल यश कीर्ती मिळविती

तयासाठी कोणी बहुतचि अविश्रांत झटती ।।36.1

 

अगे माते माझा इह-परचि हा भार सगळा

अती विश्वासाने जननि तव खांद्यावर दिला।

जगन्नाथासी या लवभर न  चिंता छळतसे

इथे घेई निद्रा जननि तव तीरावर सुखे ।। 36.2 ।।  

---------------------------------------------------

जगी या पाखंडी अधम पतितांचीच भरती

तयांच्या उद्धारा जननि असशी तू दृढव्रती ।

दुराचारी कोणी अधम असु दे नास्तिक कुणी

अशाही लोकांचा बहु कळवळा गे तव हृदी ।। 37.1 ।।

 

स्वभावामध्येची सहजचि वसे स्नेह तुझिया

उणावे ना थोडे जननि तव वात्सल्य, ममता ।

परी माते आहे मज जटिल पापातच रती

शके ना घालू मी मुरड मम कृत्यांस लवही ।। 37.2 ।।

 

स्वभावामध्ये गे जननि अपुल्या अंतर किती

न सोडी तू स्नेहा; दुरित करणे गे कधिच मी ।

स्वभावा कोणी का बदलु शकतो ह्याचि जगती

स्वभावाला नाही जगति कुठले औषध परी ।। 37.2 ।।

---------------------------------------------------

प्रदोषावेळी तो पुरमथन जे तांडव करी

तयाच्या आवेगे सकलचि जटाभार सुटुनी ।

जटा त्याच्या सार्‍या वरति उडती ह्या दशदिशी

पुर्‍या आकाशी त्या पसरति कशा अद्भुत अती ।। 38.1 ।।

 

जटांचा लागोनी सपकन तडाखा तव तटी

प्रवाही गंगेच्या किति कितिक लाटा उसळती ।

असे वाटे तेव्हा विविध करमुद्राच करिसी

तुझ्या लाटांच्या ह्या सुघटित भुजांसी हलवुनी ।। 38.2।।

 

कपारींमध्ये हे जल डमरु वाजे खळखळा

अहो त्याच्या ठेक्यावर थिरकता रंगत महा ।

शिवासंगे तूही जणु करितसे तांडव भुवी

तुझ्या ह्या नृत्याने शमवि मम गे दुःख जननी ।। 38.3 ।।

---------------------------------------------------

अगे कल्याणाची फिकिर मुळि केली न कधि मी

दिले चिंता-ओझे तुजवर सदा सोपवुन मी ।

सदा विश्वासूनी तुजवरचि निश्चिंतचि असे

परी आता माते समय फिरला पूर्ण मम गे ।। 39.1 ।।

 

अगे दुर्दैवाच्या मजसि बसता क्रूर थपडा

नको सोडू माझ्या बिकट समयी तूच मजला ।

तडा विश्वासासी जननि जर गेलाच तर गे

दयाळू सर्वांसीअशि विमल कीर्ती तव बुडे ।। 39.2 ।।

 

जगा ठावी आहे जननि तव निर्व्याज करुणा

शिशूसी ना देसी, जग म्हणतसे अंतर कदा

परी माते जाशी मजसि झिडकारूनच अशी

तरी कारुण्याला कठुनचि उरे आश्रय जगी ।। 39.3 ।।

---------------------------------------------------

जटाजूटातूनी विहरत शिवाच्या उतरसी

जलाचे मोती हे उधळित दिशांना विखरुनी  ।

लयीमध्ये घेसी सुबक गिरक्या नृत्य करता

अगे डौलामध्ये ठुमकत जटातून तयिच्याा  ।। 40.1 ।।


पुरारीच्यासंगे अवचित दिसे कोण युवती

म्हणोनी पाहे तू अपरिचित सौंदर्यवति ही ।

घनिष्ठप्रेमाने बिलगुन शिवाच्या तनुस जी

उरे जी शंभूच्या अविरतचि अर्धांग स्वरुपी ।। 40.2 ।।

 

तरंगावेगाने सहज जलमोती उधळता

तिच्या भांगामध्ये तव जलमणी माळ दिसता ।

बघे कोपाने ती तुजसि रमणी रक्तनयना

तरंगांना देई ढकलुन करांनी मृदु तिच्या ।। 40.3 ।।

 

करीता दूरी गे तुजसिच असे लोटुन करे

महा क्रोधाने तू थरथरचि कापे जललते ।

तयाने लाटा ज्या उसळति उत्तुंंग गगनी 

घडो ह्या लाटांचा अविरतचि उत्कर्ष जगती ।। 40.3 ।।

(जल-निकरजलबिंदुंचा समुदाय)

---------------------------------------------------

किती घ्यावे घेता करहि अपुरे दोन पडती

सदा देणारी ही रिति न कधि हो ओंजळ तुझी ।

अगे देसी इच्छेहुन कितिक तू जास्त पटीनी

अशी कीर्ती मोठी तव पसरता हे सुरधुनि ।। 41.1 ।। --

 

न येती कैसे गे शरण तुजला लोक सगळे

नसे कैसी तू गे सकलचि जना वंद्य सरिते।

कहाणी ना माझी परि इतर लोकांसम असे

तुझ्या ओढीने गे नित झुरत अंतःकरण हे ।। 41.2 ।।

 

असे सत्याचे हे मम वचन; ना अनृत फुके

अगे घेऊनी मी शपथ तुजला सांगत असे ।

अपेक्षा ना माझी तुजकडुन काहीच जननि

अगे प्रीती माझी तुजवर असे उत्कट अती ।। 41.3 ।।

(अनृत – खोटे)

---------------------------------------------------

कुणी स्वच्छेने ही उचलुन तटीची तव मृदा

ललाटी लावीता तिलकचि तिचा हर्षितमना

कपाळी दुर्दैवी विधिलिखित त्यांच्या  बदलते

पुसे ती ब्रह्म्याच्या अटळ कटु शब्दा त्वरित गे।। 42.1 ।।

 

जसा होता सूर्योदय सकल ती सूर्य किरणे

महा अंधाराला सहज गिळती सत्वर तसे ।--

हरे भाळीचा जो तिलक नित अज्ञान अवघे

हरो तो शोकासी मम दुरित दुःखास सुभगे ।। 42.2 ।।

(सूर्याला ऋग्वेदात तरणिर्विश्वदर्शित म्हटले आहे. तरणि/तारिणी म्हणजे नाव. आकाशाचा महासागर तरून जाणारा, ज्याला सारं विश्व दिसतं वा विश्व दृश्यमान करणारा. )

---------------------------------------------------

न वाहे गंगा ही जरिहि मुलुखातून अपुल्या

तरी वाटे ज्यांना मुलुख प्रिय सम्पन्नचि भला ।

तुझ्या तीरीचे हे तरुवर तयांनाच हसति

फुलाच्या घोसांच्या सुमधुर रुपाने कितिकिती ।। 43.1 ।।

 

मधाच्या आस्वादास्तव बहु उतावीळ हृदयी

फुलांचा प्राशीती मधु तरुअनुज्ञेविण जरी ।

अहो ज्या भुंग्यांची तनु सकल ही माखत अती

परागांनी सार्‍या दिनभर फुलातून फिरुनी ।। 43.2 ।।

 

परागांनी झाल्या मलिनचि मिलिंदास तरु हे

पुन्हा आमोदाने करिति सहजी निर्मळ पुरे ।

तुझ्या तीरीच्या ह्या सहृदय तरूंशी सुरधुनी

असो गे जिह्वाळा अतुट जडु दे मैत्र हृदयी ।। 43.3 ।।

---------------------------------------------------

करीती काही हे सुरवर अपेक्षा अतिच ती

बहु कष्टाच्या त्या खडतरचि सेवेचिच मनी ।

अशाही देवांसी नित भजति काही सुजनही

पुरी व्हावी इच्छा म्हणुनचि तयांना सुखविती ।। 44.1 ।।

 

धरे कोणी आस्था किति विविध यज्ञातचि सदा

करे नाना यज्ञा विविधचि मनीषा पुरविण्या ।

रुची योगामध्ये यमनियम युक्ता मनि कुणा

निरोधाने कैसे सुजन तनुसी कष्टविति गा ।। 44.2 ।।

 

तुझ्या नामाचा हा सुगम पथ भावे मम हृदी

तुझ्या नामाचे हे स्मरण करिते धन्य मजसी ।

हृदी गंगा नामे अविरतचि मी तृप्त मनसा

जगाच्या जंजाळा सहज मनि मानी तृणसमा ।। 44.3।।

---------------------------------------------------

अहो नाना पुण्ये सुजन, मुनि आजन्म करति

मिळो जागा स्वर्गी म्हणुनचि अविश्रांत झटति ।

अशांना लाभावी सुरसदनि त्या पुण्यगति ही

म्हणोनी उद्धारा अहमहमिका ह्या सुरगणी ।। 45.1 ।।

 

जयांनी ना केले परि अमल सत्कर्म कुठले

कुणाच्या आधाराविणचि दयनीया स्थितित जे ।

अगे माते ज्यांना जवळ नच केले सुरवरे

दुजा ना आधारू तुजविण तयांसी जननि गे ।। 45.2 ।।


अगे वाहे चिंता अविरत तयांची जननि तू

सदा दोन्ही लोकी इह पर असो रक्षि नित तू ।

तुझ्या वाचोनी गे मजसि दिसते ना कुणि दुजे 

करे वात्सल्याने जवळ नित पाप्यांसहि असे ।। 45.3 ।।

---------------------------------------------------

तुझ्या पाण्याने गे शमवुनचि तृष्णा त्वरित मी

सख्यांसंगे क्रीडा करित फिरलो गे कितितरी ।

परी ना ठेवीली कणभर तुझी जाण हृदयी

कधी ना मानीले जननि उपकारांस तव मी ।। 46.1 ।।

 

मिळाले ना मूर्खांसह सुख समाधान मजसी

उपेक्षा हालांनी तळमळत निद्रेविणच मी ।

अशांती बेचैनी तुज जवळ आणी परतुनी

असे तूची माते सदय हृदया वत्सल अती ।। 46.2 ।।

 

न साहे माते गे, तव विरह आता क्षणभरी

तुझ्या अंकी वाहे पवन मृदु हा शीतल किती

तयाने होती गे तव लहरि ह्या सौम्य सुखदा

तुझ्या ह्या लाटांनी निजव मजला थोपटुन गा ।। 46.3 ।।

 

दयाळू माते हे मजवरि कृपा सत्वर करी

सुदीर्घा निद्रा ही जननि तव अंकीच निजवी 

अगे गा अंगाई मधुर लहरींची सुखदशी

जयाने ना यावी पुनरपि कधी जाग मजसी ।। 46.4 ।।

---------------------------------------------------

तुझा शेला बांधी  कसुनि कमरेसी भरजरी

विषारी सर्पांनी करकचुन बांधी शशि शिरी ।

असे पापी साधा अशि मम उपेक्षा नच करी

जगन्नाथाची या भरलि घटिका मोक्षसमयी ।। 47 ।।

---------------------------------------------------

तुझी मूर्ती रम्या शरद पुनवेच्या शशि समा

कला चंद्राची ही सजवि तव भाळा अनुपमा ।

सुधा धारा वाहे, तशि धवल वस्त्रे झुळझुळा

तुला शोभा देती सुविमल अलंकार धवला ।। 48.1 ।।

 

उभी गंगा शोभे धवल मगरीच्यावर सदा

तुझ्या भक्तांना तू वर अभय देसीच शुभदा ।

सुधायुक्ता कुंभा धरिसि कमलासी तव करी

तुझ्या ह्या रूपाचे स्मरण करि त्या कोण हिणवी? ।। 48.2 ।।

---------------------------------------------------

(वृत्त- पृथ्वी, अक्षरे -17, गण- ज स ज स य ल ग, यति- 8,9)

प्रफुल्लित मुखावरी स्मित सुमंद शोभे तुझ्या

प्रदान करि जीवना, बरसवीतसे अमृता ।

अती सुखद चांदणे झिरपते स्मितातून ह्या

अनंत जणु ब्रह्म हे प्रकटवी सुखाच्या सुखा ।। 49.1 ।।

 

कसेचि जन भाजुनी निघतसे भवाग्नीत ह्या

तयांस जगवी तुझी स्मितरुपी सुधा गे सदा ।

प्रकाशि हृदयी चिरंतनचि चित्कला मूर्त तू

तनूस मम शांतवी सुखवि शंतनू पत्नि तू  ।। 49.2 ।।

---------------------------------------------------

(वृत्त शार्दूलविक्रीडित, अक्षरे – 19, गण- म सज स त त ग, यति – 12,7)

मंत्रांनी कर टेकिले मजपुढे, झाली उणी औषधे

संत्रासूनचि देव जाय पुरते, झाली सुधा म्लान गे ।

गे पाहोनि मलाच भंगति कसे पाचू भयाने पहा !

पोळे हा मजला भवाग्नि पुरता, चाटी भवाग्नी शिखा ।। 50.1।।

 

 

कालीयावर  नाचता हरिपदा मालिन्य आले विषे

त्यासी तूच धुवोनि टाकि अमले भागीरथि प्राणदे ।

लाटा ह्या तव पुण्यश्लोक सरिते स्वर्गीय नादा करी

दे शांती भवतापदग्ध मज हया स्वर्लोककल्लोलिनी ।। 50.2 ।।

---------------------------------------------------

(वृत्त स्रग्धरा, अक्षरे – 21, गण- म र भ न य य य , यति- 7 7 7) (शांताकारं भुजगशयनं  ---ची चाल)

होते सामर्थ्यशाली त्रिपुर असुर जे त्या वधे जो पुरारी

द्यूतामध्येच त्यासी हसत हसत ती धूळ चारेच गौरी

हारे सर्वस्व शंभू शशि, वृषभ, मणी, चर्मवस्त्रे गणांसी

तेव्हा लावे स्वतःसी त्वरितचि पणा; डंख दे हार भारी ।। 51.1 ।।

 

दृष्टिक्षेपास टाकी तुजवर गिरिजा; मंद हासेच गाली

‘‘गंगा लावा पणाला’’ जणु सुचवितसे ‘‘प्राणनाथा त्वरे ही’’।

संकेताने उमेच्या तव हृदि उसळे क्षोभ उद्रेक भारी

त्याने लाटा तुझ्या का सतत उसळति गर्जती उंच जाती ।। 51.2 ।।

 

वाटे पाहून त्यांसी अभिनय करिते कोण नृत्यांगना ही

दुःखावेगे जणू का घट धरुन शिरी नाचते तांडवासी ।

आवेगे हेंदकाळे, घटजल उसळे, त्याच लाटा तुझ्या गे,

पापे नाशून आम्हा पुनितचि करु दे माय हे पुण्यश्लोके ।। 51.3 ।।

---------------------------------------------------

(वृत्तइंद्रमाला/उपजाती; म्हणजेच  इंद्रवज्रा आणि उपेंद्रवज्राचे मिश्रण)

जाळे अनंगा शिवशंभु जोची । त्याच्या जटांसी नित भूषवी जी ।

होता तिचे दर्शनमात्र लोका । पीडा व्यथा जाय लया तयांची ।। 52.1 ।।

लाटा जिच्या चंचल उंच उंच । चित्तास वेधूनचि घेति दिव्य ।

गंगा करो ती मम अंग अंग । अहो सदा निर्मळ निष्कलंक ।। 52.2 ।।

---------------------------------------------------

पीयूषलहरी ऐशा  । जगन्नाथेचि निर्मिल्या

म्हणे त्यांस सदा लाभे । संपत्ती, सौख्य पूर्णता ।। 53 ।।

---------------------------------------------------

सुदीर्घ गंगालहरी मनोज्ञा । वाचून हो हर्ष ‘अरुंधतीला’ ।

येई तिला जी अनुभूति चित्ता । ती देतसे ती रसिकांस सार्‍या ।।

---------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

गंगालहरी अनुक्रमणिका

श्लोक 1

श्लोक 3