प्रस्तावना

 


नो

अनुप्रास, यमक, नादमाधुर्य असलेलं गंगालहरी सारखं अनुपम काव्य वाचताना वा पाठ म्हणतांना मन प्रसन्नतेने भरून जातं. त्याच्यातील अनेक ओळी; जशा 20 व्या श्लोकातील ‘मरुल्लीलालोल्ललहरिलुलिताम्भोजपटली ------- जलं ते जबालं मम जननजालं जरयतु’ त्याच्या नादमाधुर्याने मुखात घोळत राहतात तर, ‘चिरादुन्निद्रं मां सदयहृदये शायय चिरम्’ सारख्या ओळी त्यातील आर्त भावामुळे भाल्यासारख्या मनात रुतून बसतात. तर श्लोक 40, 51 मधील सवतीमत्सराच्याही अनोख्या कल्पना अचंबित करून टाकतात. ह्या सर्व स्तोत्राचे भावगर्भ आर्तपण, कल्पनाविलास, प्रवाहीपण तसेच ठेऊन; ते जर माझ्या माय मराठीत आणता आलं तर त्याची गोडी अनेकांना चाखायला मिळेल अशा हेतूने मी गंगा दशहरा च्या सुयोग्य मुहूर्तावर  मराठी समवृत्त भाषांतर  समाज माध्यमांवर ठेवले.

ज्याप्रमाणे प्रवाही नदीचा उगम खडकाळ डोंगरातून होतो आणि हा प्रवास दूर सागराला मिळेपर्यंत चालू राहतो; तशी गद्यातील विश्लेषणाने झालेली सुरवात समवृत्त पद्याने जास्त प्रवाहीत होऊन लोकांची रुची वाढेल ह्या माझ्या कल्पनेला उचलून धरत हे सर्व लेखन (peeyushlahari.blogspot.com) ह्या ब्लॉगवर असूनही अनेकांनी ‘आम्हाला हे पुस्तक स्वरूपात पाहिजे’ असा आग्रह धरला. ह्या असंख्य वाचकांच्या प्रेमाची मी कायमच ऋणी आहे.

त्याचवेळेस नागपूरच्या संस्कृत प्रचारिणीसभेचे डॉ.  चंद्रगुप्त वर्णेकर ह्यांनी ‘आपण हे पुस्तक स्वरूपात लगेचच प्रकाशित करू’ असे सांगून मला सुखद धक्का दिला. त्यांची मी ऋणी आहे.

 हे विश्लेषण लिहीतांना मला डॉ. सौ. माणिक श्रीनंद ठकार ह्यांनी खूप मदत केली.  त्या माझे सासरे पं. कै. नारायणशास्त्री दीक्षित यांच्या विद्यार्थिनी व संस्कृतच्या तज्ज्ञ आहेत. त्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात संस्कृत प्राकृत भाषा विभागात व संस्कृत प्रगत अध्ययन केंद्रात विविध प्रकल्पात संशोधन करत होत्या. त्यांनी पीएच् डी सोबत  धर्मशास्त्रावरही काम केले आहे. अनेक विद्याशाखांचे त्या अध्यापनही करत होत्या. त्यांनी अनुवादाचे, आशयाचे परीक्षण करून  त्यात सुधारणा तसेच तो उत्कृष्ट होण्यासाठी  अनेक सूचना केल्या. त्यांच्या मोलाच्या मार्गदर्शनासाठी मी त्यांची ऋणी आहे. माझे पती श्री प्रवीण दीक्षित ह्यांनीही वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केले. त्यांनाही धन्यवाद.

तसेच वीणाताई गानू व त्यांच्या सहकार्यांनी प्रुफ रिडींग आणि त्याला पुस्तकाप्रत न्यायचा मोठाच कार्यभाग सांभाळला त्यांचीही मी ऋणी आहे. पडद्यामागील माहित नसलेले अनेक मदतीचे हात जे मला दिसले नाहीत पण त्यांच्याशिवाय हे पुस्तक पूर्ण होऊ शकलं नसतं अशा सर्वांचे मी आभार व्यक्त करते. हे पुस्तक आपल्याला नक्की आवडेल. आपण गंगालहरी ह्या मूळ  स्तोत्राचा, विश्लेषणाचा व समवृत्त पद्याचा आनंद घेऊन इतरांनाही तो द्यावा अशी रसिक वाचकांना प्रेमाची विनंती करते.

अरुंधती प्रवीण दीक्षित.

12 जून 2026

---------------------------------------

लेखिकेचा परिचय

 अरुंधती दीक्षित यांनी रसायन शास्त्रात विशेष प्राविण्याने पदवी प्राप्त केली आहे. त्यांची नाते लडाखशी, अनुवाद चम्पकम्, अनुवाद पारिजात ही समवृत्त भावनुवादाची पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांच्या अनुवाद पारिजात ह्या पुस्तकाला अनुवादासाठी असलेला न्यामूर्ती महादेव गोविंद रानडे  पुरस्कार (2017) मिळाला आहे.

तरूणभारत (नागपूर), सकाळ (मुंबई) ह्या वृत्तपत्रात तर जीवन विकास (रामकृष्णमठ) जयजय रघुवीर समर्थ (सज्जनगड), प्रज्ञालोक (नागपूर), चिंतन(ठाणे), मेनका अशा अनेक मासिकांसाठी व कालनिर्णय ह्या कॅलेंडर साठी लिखाण केले आहे. त्यांचे सर्व लिखाण https://anuvadparijat.blogspot.com/ ह्या ब्लॉग वर उपलब्ध आहे. त्याचा आस्वाद  भारतातीलव परदेशातील असंख्य रसिक वाचक वारंवार घेत आहेत.

जगन्नाथ पण्डितकृता पीयूषलहरी / गङ्गालहरी (विश्लेषण)


                  
पेरुभट्ट आणि लक्ष्मी ह्या अत्यंत विद्वान तेलंगी ब्राह्मण दाम्पत्याच्या पोटी जन्मलेला जगन्नाथराय हा मुलगा गङ्गालहरी ह्या काव्याचा कवी. वडिलांनाच महागुरू मानून त्यांच्याकडूनच जगन्नाथाने विद्या संपादन केली. (त्यांच्या रसगंगाधर ह्या ग्रंथात वडिलांचा महागुरू असा उल्लेख आहे.) जगाला दीपविणारी विद्वत्ताउत्तम शरीरसंपदा आणि तारुण्य असलेल्या ह्या सरस्वतीच्या पुत्रावर लक्ष्मीची कृपादृष्टी नव्हती. अर्थातच त्याच्या महत्वाकांक्षी मनाला स्वस्थ बसणे मानवले नाही. त्याने सरळ दिल्लीची वाट धरली.

             मोगल साम्राज्यात शहाजहानच्या पदरी तो स्थिरावला. बादशहाची मुलगी लवंगिका ह्या तडफदार कवीवर भाळली होती. एक दिवस बादशहा शहाजहान आणि जगन्नाथ पंडित बसलेले असतांना अचानक लवंगिका तेथे आली. बादशहाने ह्या शीघ्रकवीला स्वतःच्या मुलीवरच त्याक्षणी काव्य करुन दाखवायची आज्ञा केली. जगन्नाथ पंडिताची रसवंती पाझरु लागली. त्याने केलेले ते उत्तम काव्य ऐकल्यावर प्रसन्न झालेल्या बादशहाने त्याला `काय पाहिजे ते मागअसं सांगितले आणि जगन्नाथ पंडिताने लवंगिकेचीच मागणी केली. एक तर जगन्नाथ पंडिताचं वय लवंगिकेपेक्षा बरच जास्त होतं आणि तो हिंदू म्हणजे बादशहाच्या दृष्टीने काफर होता. पण-- नाईलाजाने बादशहाला त्याची मागणी पूर्ण करायला लागली. बादशहाने जगन्नाथ पंडिताला घर,सम्पत्ती जहागिरीही दिली.

पण  एका यवन कन्येबरोबरचा तो विवाह हिंदू आणि मुसलमान दोन्ही पक्षांना सारखाच अमान्य होता. औरंगजेब राज्यावर  आल्या आल्या त्याने  जगन्नाथ पंडिताची जहागिरीसंपत्ती जप्त केली. दोन्ही समाजाने वाळीत टाकलेला  जगन्नाथ पंडित उघड्यावर पडला. त्याला गंगामातेच्या किनार्‍याशिवाय कोणाचाच आधार उरला नव्हता. एक दिवस पहाटे लवंगिकेच्या उरलेल्या एकमेव वस्त्रावर स्वतःच्याही शरीराची लाज झाकत लवंगिकेजवळ गंगेच्या घाटावर झोपलेल्या जगन्नाथ पंडिताकडे अप्पय्या दीक्षितांची नजर गेली. अप्पय्या दीक्षित  ह्या व्याकरण पंडितांने आधीही हा कसला कवी?’ म्हणून जगन्नाथ पंडितांची वारंवार अवहेलना केली होती. आता तर दयनीय अवस्थेत झोपलेल्या जगन्नाथाला पाहून   अप्पय्या दीक्षित खवचटपणे म्हणाले,--

‘‘किं निःश्शङ्कं शेषे शेषे वयसि त्वमागते मृत्यौ।

अथवा सुखं शयीथाः निकटे जागर्ति जाह्नवी भवतः।।’’

 ‘‘अरे, मृत्यू जवळ आल्यावर जीवनाच्या अंतिम समयी सुद्धा काही लाज लज्जा न बाळगता कोडग्यासारखा झोपतोस तरी कसा?’’  निर्धन झालेल्या जगन्नाथ पंडिताला हिणवत परत तो म्हणला, ‘झोप बाबा सुखाने झोप. तू झोपलास तरी तुझ्याजवळ गंगा तर सतत जागी आहे!’’ सर्व ऐश्वर्य तर कधीच निघून गेलं आहे. गंगेच्या घाटाशिवाय तुला रहायला घर कुठे आहे? गंगेशवाय तुला कोणाचा आसरा नाही. हे जणू त्याचे ळजळीत शब्द सूचित करत होते. अप्पय्यांच्या वाग्बाणाने विद्ध झालेला जगन्नाथ अप्पय्याला काही बोलला नाही. पण मनातील उठलेलं काहूर शांत कसं होणार? ‘खरय माय’, त्याने गंगेकडे दृष्टिक्षेप टाकला. ‘तुझ्याशिवाय मला दुसरं आहेच कोण? आणि माय तू असलीस तर दुसरं कोणी असायला कशाला पाहिजे?’ मनात उचंबळून आलेल्या सर्व भावना अनन्यभावाने गंगेच्या स्तुतीपर एका एका श्लोकातून उत्स्फूर्तपणे त्यांच्या मुखातून बाहेर पडू लागल्या. जणु गंगेपर्यंत उतरण्यासाठी--- नव्हे नव्हे गंगेने एक एक पायरी वर चढत येण्यासाठी बावन्न श्लोकरूपी पायर्‍या असलेला गंगालहरींचा मनोरम घाट जगन्नाथ बांधत होता. गंगेसाठी पायघड्यांप्रमाणे अंथरलेल्या मखमली रत्नजडित श्लोकांवरून गंगेला एक एक पायरी चढून वर यायला भाग पाडलं त्यानं. बावन्न पायर्‍या चढून शेवटच्या श्लोकाला जगाने दूर लोटलेल्या ह्या आपल्या पुत्राला लवंगिकेसह तिने आपल्या कुशीत घेत आपल्यात सामावून घेतलं तीच ही गंगालहरी! जगन्नाथ पंडित आपल्या काव्याला  पीयूषलहरी म्हणतात. दिल्लीश्वरो वा जगदीश्वरो वा’ म्हणजे मी दिल्लीश्वराच्या पायी तरी राहीन किंवा जगदीश्वराच्या तरी पायी लीन होईन असे म्हणणारा हा महाकवी संस्कृत साहित्याला मोलाचे योगदान देऊन गंगेत विलीन झाला.

मित्रांनो, एखादी अमर कलाकृती टोकदार भाल्याप्रमाणे हृदयात घुसते आणि कायमची तिथेच विसावते. त्यातील भावभावनांच्या छटा मनात कायमचं काहूर माजवून जातात. अस्वस्थ करतात. चकवा लागल्या प्रमाणे त्याच्याभोवतीच मनाला  फिरत ठेवतात.  

               17 मे ते 25 मे ला येणार्‍या गंगादशहराच्या निमित्ताने ह्या अनुपम स्तोत्राचा आस्वाद मराठीतही घेता यावा म्हणून  गंगालहरींना मराठीत विश्लेषण आणि भावानुवादित करुन उद्यापासून आपल्यासारख्या रसिकांसमोर ठेवत आहे. ह्या गंगालहरी वाचतांना आपल्या मनात आनंदलहरी निर्माण करतील अशी आशा आहे.

--------------------------------------

हे नीरगात्री गंगे, तू उताराकडे वहात जाणारी निम्नगा! पण हे माय, तुझ्या भक्तांना मात्र तू बोट धरून वैराग्याची एक एक पायरी चढवत नेतेस आणि स्वतः स्वर्गापर्यंत पोचणारा स्वर्गसोपान होतेस. माय, जगाने झिडकारलेल्या तुझ्या निःसीम भक्ताला जगन्नाथ पंडिताला आणि लवंगिकेला लेकरांप्रमाणे तू कायमचं तुझ्या कुशीत घेतलस. त्याच्या पीयूष लहरींच्या अमृतस्पर्शाने जगन्नाथ आजही अमर झाला. जगन्नाथाचा ‘‘प्राणप्रयाणमहोत्सव’’ मी ‘गंगालहरीं’च्या साक्षीने अनुभवणार आहे. तुझ्या शांत गंभीर लहरींप्रमाणे हे ‘शिखरिणी’ वृत्त शब्दांना एकतारी प्रमाणे मंद सुरेल साथ देत राहील. त्याच्यासवे माझा मराठी भावानुवादाचा छोटासा दीप, तुझ्या प्रवाहात सोडत आहे. त्याला तुझ्या लहरींसवे डुलत डुलत पार करव.

गुणाढ्याने लिहीलेल्या बृहत्कथा ह्या विशाल ग्रंथांचे एक एक पान वाचून तो अग्नीत अर्पण करत गेला आणि अग्नी त्याला भस्मसात करत गेला. तुझे तसे नाही. तू सर्वांना तारून नेतेस. खवळलेला भवसागरही पार करवतेस; म्हणून, तुझ्या प्रवाहात सोडलेला भावार्थदीप लाटांसोबत जपून पुढे नेशील ह्या विश्वासाने तो तुला अर्पण करत आहे.

लहानपणी माझ्या हाती गंगालहरीचा अनुवाद ठेवणार्‍या वामन पंडित , ल.गो. विंझे, द.कृ. पाध्ये ह्या पूर्वसुरींना नमन करून मी गंगालहरीचा भावानुवाद/ गद्य-पद्य विश्लेषण काव्यात सांगत आहे. 

------------------------------------




Comments

Popular posts from this blog

गंगालहरी अनुक्रमणिका

श्लोक 1

श्लोक 3