श्लोक 9
श्लोक 9
निरंतर वाहणार्या गंगेला पाहून जगन्नाथ पंडितांना गलबलून आलं. नीर
वाहे डोळा अशी अवस्था झाली आणि उत्स्फूर्तपणे त्यांच्या मुखातून शब्द बाहेर आले
----
हे जननी, तुझ्याजवळ अपपरभाव नाहीच मुळी! लेकरू
काळं, नकटं असलं तरी त्याला आईजवळ यायला संकोच वाटत नाही. परकेपणा भासत नाही.
आईवरच्या जन्मसिद्ध हक्काने ते आईला
बिलगतं आणि कुठल्याही अपेक्षेविना वात्सल्यमूर्ती जननी त्याला कुशीत घेते. आई जवळ
यायला बालकाला कुठलं कारण लागत नाही, काळवेळ लागत नाही. आईच्या वात्सल्यालाही ना
कुठली अपेक्षा असते ना कुठल्या नियमाचं बंधन! माय-लेकराच्या नात्यातील हे देखणेपण
बाकी कुठल्या नात्यात नाही.
तुझ्या तीरावर कावळ्यांसारखे सामान्य
वाटणारे पक्षीही आनंदाने बागडत असतात, निवास करत असतात. तुझ्या तीरावर मिळणार्या
अलोट सुखामुळे त्यांना इंद्राच्या सर्व सुखांनी युक्त असलेल्या अलंकापुरी नगरीत
जायची इच्छा सुद्धा होत नाही. (काशीत मरण आलेल्या सर्वांना लगेचच मोक्ष मिळतो असं
म्हणतात. त्यामुळे माणूस मरण पावल्यावर पिंडाला कावळा शिवल्याशिवाय मोक्ष मिळत
नाही असं म्हणतात ते सर्व काशीला फोल ठरते. कावळ्यांना कामच न उरल्यानेही ते तुझ्या
तीरावर आनंदाने बागडत असावेत.)
आपल्या प्रिय जनांना गमावलेले, दुःखानी
गांजलेले, संकटांनी खचलेले, वैफल्याने ग्रस्त अनेक जीव त्यांचं दुःख हलकं
करण्यासाठी तुझ्यापाशी येतात. दीन दुबळ्या लेकरांबद्दल आईला जास्तच चिंता, आपुलकी,
कळकळ असते. त्यांच्या मदतीला ती तत्पर असते. डोळ्यात तेल घालून त्यांचं रक्षण करत
असते. माय तुझे हे दोन्ही तीर कायमच दुःखितांच्या नेत्रातील नीर पुसणारे, त्यांना
धीर देणारे असोत.(9)
यदन्तः खेलन्तो बहुलतरसन्तोषभरिता
न काका नाकाधीश्वरनगरसाकांक्षमनसः।
निवासाल्लोकानां जनिमरणशोकापहरणं
तदेतत्ते तीरं श्रमशमनधीरं भवतु नः ।।9
अन्वय
– (भो भागीरथि), यदन्तः खेलन्तः काकाः बहुलतरसन्तोषभरिताः(सन्तः)
नाकाधीश्वरनगरसाकांक्षमनसः न (भवन्ति)। निवासात् लोकानां जनिमरणशोकापहरणं ते तत्
एतत् तीरं, नः श्रमशमनधीरं भवतु।।(9)
भो गंगे – हे गंगे; यदन्तः – (यस्य अन्तः यदन्तः) ज्या तीरावर; खेलन्तः – क्रिडा करतात,खेळतात ते ; काकाः – कावळे; बहुलतरसन्तोषभरिताः – अतिशय आनंदाने युक्त झालेले; नाकाधीश्वरनगरसाकांक्षमनसः -इंद्राच्या अमरावती नगरीविषयी अंतःकरणात अभिलाषा युक्त न भवन्ति - होत नाहीत; तसेच निवासात् – निवास केल्याने, राहिल्याने लोकानां – जनांचे जनिमरणशोकापहरणं – जन्म, मृत्यू आणि शोक (पत्नी, पुत्र इत्यादि नाशापासून होणारे दुःख ते जनिमरणशोक ) त्याचा नाश करणारे; तत् – ते हे तुझे; तीरं- किनारे ; नः – आम्हाला; श्रमशमनधीरं- श्रमांचा नाश करण्यास समर्थ असलेले; भवतु – होवोत. (9)
कुणीही येता गे तुज जवळि त्यासी सुखविसी
असो साधा दुर्लक्षित खग कुणी वायस जरी ।
तुझ्या तीरी तोही अनुपम सुखासीच मिळवे
मनाजोगे खेळे मुदितमन स्वच्छंद विहरे ।। 9.1 ।।
कधी स्वर्गाची तो हृदयि अभिलाषा नच धरी
नको वाटे त्यासी सुखमयचि स्वर्गादिक गती ।
बुडाले शोकाते जन प्रियजनांच्याच विरहे
दिलासा लाभे त्या तव तिरि रहाताच सुभगे ।। 9.2 ।।
कितीही सायासा तनु-मन-श्रमासीच हरण्या
मनाच्या वैफल्या सकल थकव्यासीच तनुच्या
कराया दूरी गे प्रबल असती जे तट तुझे
करो दूरी कष्टा, श्रम, खटपटी, शीण अमुचे ।। 9.3 ।।
---------------------------------------------------
Comments
Post a Comment