श्लोक 8

 

श्लोक 8

गंगा = गम् + गा

गम्- ह्या संस्कृत क्रियापदाचा अर्थ जाणे असा आहे.

 गा - गामिनी  म्हणजे जाणारी ह्या अर्थी गा

म्हणून गंगा ह्या शब्दाचा अर्थ जाते, जात राहते,  निरंतर जात राहणारी, अखंड वाहत राहणारी असा आहे. जी ‘भवत्पादात्’ म्हणजे विष्णूच्या पायापासून निघते आणि सर्वांना विष्णूच्या पायापर्यंत पोचवते ती गंगा! जी भक्तांना ब्रह्मपदाकडे घेऊन जाते ती गंगा! हे गंगे, तुझी सुधा धारा अविश्रांत वाहतच राहते. तुझ्या कर्तव्यदक्षतेत कधीही खंड पडत नाही. तुझ्या प्रवाहाचा ओघ आणि ओढ विस्मित करणारी आहे.

माय, गंगा ही दोन अक्षरे कोणाला माहित नाहीत? ती सर्वश्रुत आहेत. सुप्रसिद्ध आहेत. गंगा ही दोन निर्मल अक्षरे उच्चारताच वा नुसतं त्यांच स्मरण केल्यानेही; तुझी पवित्र, ओघवती, चैतन्यमयी चरितसरिता नजरेसमोर येते. गंगा ह्या नावाचं गारूड मनाला सम्मोहित करतं. हृदयात व्यापून राहतं. मनाला अपार शांती प्रदान करतं. मनातील इतर सर्व त्रासदायक विचार, अनेक पीडा दूर होतात. विलक्षण समाधानाने मन भरून जातं. 

 तुझ्या नावात विलक्षण चैतन्य आहे. अपार माया, स्नेह आहे. अलौकिक अनुभूति आहे. अगाध ज्ञान आहे. अपरिमित आनंद आहे. अलोट वात्सल्य आहे. अमोघ वैराग्य आहे. तुझं हे मनाला परम आनंदित करणारे नाव  माझ्या देहात प्राण असेपर्यंत  माझ्या मुखात सतत राहो. प्रान्त ह्या संस्कृत शब्दाचा अर्थ सीमा. प्राणांची सीमा जीवन आणि मृत्यू ह्यांना जोडणारी आहे. प्राण ह्या सीमारेषेवर असे पर्यंत (प्राणप्रान्ते) हे गंगे तू माझी साथ सोडू नकोस.  माझा हा अंतिम पडाव तुझ्या दारी असताना मनाला  मालिन्य, शैथिल्य वा संभ्रम येऊ न देता माझ्या प्राणप्रयाणकाळीही तुझं नाव माझ्या मुखकमलात शेवटच्या क्षणापर्यंत लखलखत राहो. कमळ टवटवीत असेपर्यंत त्याचा सुवास टिकून राहतो. माझं चैतन्य शेवटच्या क्षणापर्यंत टिकवून ठेव ज्यायोगे माझ्या मुखात तुझ्या अमृतोपम नामाचा परिमल दरवळत राहील  (8)

स्मृतं सद्यः स्वान्तं विरचयति शान्तं सकृदपि

प्रगीतं यत्पापं झटिति भवतापं च हरति।

इदं तद् गङ्गेति श्रवणरमणीयं खलु पदं

मम प्राणप्रान्ते वदनकमलान्तर्विलसतु।।8

 

अन्वय – (हे  भागीरथी), यत् सकृत् अपि  स्मृतं (सत्) सद्यः स्वान्तं शान्तं विरचयति। प्रगीतं च (सत्) झटिति पापं (च) भवतापं हरति। तत् इदं खलु श्रवणरमणीयं गङ्गा इति  पदं मम प्राणप्रान्ते वदनकमलान्तः विलसतु । (8)

अन्वयार्थ - भो भागिरथी – हे गंगे; यत्- जे; सकृत -एकदा; अपि – सुद्धा; स्मृतं- चिंतिले असता; सद्यः – तात्काळ; स्वांतं- अंतःकरणातें; शांतं - द्वेश,लोभादि विकार रहित/ सुखयुक्त अशा; विरचयति- निर्माण करणे;  यत्- जे; सकृदपि – एकवारही; प्रगीतं – उत्कंठेने , भक्तिभावाने गीत उच्चारले असता; पापं– पाप; दुःख च - आणि भवतापं – संसार संबंधी दुःखे, ताप; झटिति – तत्काल; हरति – नाश करते; तत् – ते/हे; श्रवणरमणीयं- कानांना सुखकारक किंवा ऐकावयास मधुर; गंगा इति - गंगा असे; प्रसिद्ध पदं – विख्यात, नावाजलेला अक्षरसमुदाय;  मम – माझ्या; प्राणप्रान्ते – मरणसमयी; प्राण सीमारेषेवर असतांना; (प्रान्त- सीमा) वदनकमलान्तः – मुखकमलामधे; विलसतु – तळपत राहो, चमकत राहो, झगमगत राहो, क्रीडा करत राहो (8)

 

अगे “गंगा” ही जी श्रवण सुख दे अक्षरद्वयी

करे कानांनाही निरतिशय जी तृप्त सहजी

जया उत्कंठेने सहज स्मरता एकसमयी

मिळे चित्तासी ह्या अपरिमित शांती त्वरितची ।। 8.1 ।।


सुखे उच्चारीता मधुमधुर गंगा पद मुखी

सुटे संसाराचा अति जटिल गुंता सहजची ।

न ठेवी दुःखाच्या विफल लवलेशा क्षणभरी

मिळे चित्तासी ह्या अतिशय समाधान सुखही ।। 8.2 ।।


अगे सीमारेषेवर असति हे प्राण मम गे

मुखी राहो तेव्हा लखलखित हे नाम तव गे ।

`नमो गंगे' ऐशा मधु-मधुर शब्दांस रसना

सदा सेवो, ठेवो  मुखकमलि गे अंतसमया ।। 8.3 ।।

---------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

श्लोक 1

श्लोक 3

श्लोक 2