श्लोक 7

 

 

श्लोक 7

हे जननी! हे माते, तुझ्या स्पर्शमात्रे सर्व भूतमात्रांचा उद्धार होतो मग तो स्पर्श प्रत्यक्ष असो वा अप्रत्यक्ष! दूरान्वयानेही जो तुझ्या संपर्कात येतो त्याचे सत्वर हित करण्याचे दायित्व, जबाबदारी तू स्वीकारतेस. त्यावेळी हा उच्च हा नीच, हा लहान हा मोठा असा भेदभाव तू करत नाहीस. सर्वांवर तू आईसारखी समान माया करतेस कारण वात्सल्य हा तुझा स्थायीभाव आहे. आपल्या दीन दुबळ्या लेकरावर तर आईचा जास्तच जीव असतो. त्याच्यासाठी तिचा जीव तिळतिळ तुटत असतो. त्याच्यासाठी तिच्या मनात अपार करूणा दाटून येते.

 तुझही तसच आहे. तुझ्या पाण्यात राजस्त्रिया रोज सकाळी स्नान करतात. त्यांच्या अंगावर त्यांनी कस्तूरीची उटी लावलेली असते. ह्‌या राजस्त्रियांचं तू कल्याण करतेसच पण, त्यांच्या अंगाची कस्तूरी पाण्यात मिसळताक्षणीच तुला, नाभीत कस्तूरी धारण करणार्‍या त्या कस्तूरी मृगांचाही कळवळा आल्याशिवाय रहात नाही. त्यांनाही तू विनाविलंब मोक्ष प्रदान करतेस. (कस्तूरी मृगांची कस्तूरी काढून घेण्यापूर्वी त्यांची मृगया केली जाते. ह्या दुःखाने तुला त्यांचा कळवळा येतो.) अशा ह्या मृगांना ( मानवंदना म्हणून) हजारो देव त्यांना घेऊन जाण्यासाठी विमानातून भूलोकी उतरतात. देवांचा हा ताफा मोठ्या लवाजम्यासह सन्मानाने कस्तूरीमृगांना सुरक्षित कड्यात(वेढ्यात)(escort)मधे विमानातून इंद्राच्या नंदनवनात घेऊन जातो. मोठ्या हर्षाने, स्वेच्छेने ते तेथे प्रवेश करतात, बागडतात.  तुझ्या कृपेने त्यांचे देह अमल, विमल दिव्य होतात. इंद्राच्या अलकापुरीच्या नंदनवनात देवांच्या समूहासह ते आनंद लुटत असतात. माय ही सर्व तुझीच कृपा! (7)

प्रभाते स्नातीनां नृपतिरमणीनां कुचतटी-

गतो यावन्मातर्मिलति तव तोयैर्मृगमदः।

मृगास्तावद्वैमानिकशतसहस्रैः परिवृता

विशन्ति स्वच्छन्दं विमलवपुषो नन्दनवनम्।।7

अन्वय - भो मातः , प्रभाते स्नातीनां नृपतिरमणीनां कुचतटिगतः मृगमदः, तव तोयैः यावत् मिलति तावत् मृगाः , वैमानिकशतसहस्रैः परिवृताः विमलवपुषः सन्तः, स्वच्छंदं नंदनवनं विशन्ति। (7)

 

अन्वयार्थ - भो मातः ! - हे आई; प्रभाते – प्रभातकाळी; स्नातीनां (स्नांति ताः -स्नान करतात त्या स्नाती)- तुझ्या पाण्यात स्नान करणार्‍या; नृपतिरमणीनां – राजांच्या सुंदर स्त्रियांच्या; कुचतटिगतः - स्तनांच्या भागावर रात्री विलासार्थ लावलेला; मृगमद- कस्तूरी; तव तुझ्या; तोयैः – पाण्याशी, पाण्यासोबत; यावत् – जेव्हा; मिलति - संलग्न होते, मिसळते, संपर्कात येते तेव्हा; तावत् – तात्काल; विमलवपुषः – ज्यांचे (वपु-) शरीर पातके जाऊन निष्पाप झाले आहे ते; मृगाः – (कस्तूरी) मृग/हरिण, वैमानिकशतसहस्रैः - विमानातून आकाशात फिरणार्‍या (देवांची) शते आणि त्या शतांची सहस्रे - म्हणजे अगणित देवगणांनी; परिवृताः – वेढलेले, युक्त झालेले(मृग); नंदनवनं – इंद्राच्या क्रीडावनात; स्वच्छंदं – यथेच्छ, मनसोक्त; विशंति – प्रवेश करतात, संचार करतात. (7)

 

जळी स्नानासाठी अरुण-उदयाच्याच समयी

स्त्रिया राजांच्या ह्या जळि शिरति आकर्षक किती ।

तयांच्या अंगीची जळि विरघळे कस्तुरि उटी

मृगांची होई त्या तनु अमल त्याने त्वरितची ।।7.1।।

 

जथे देवांचे हे उतरति विमानातुन भुवी

सुरक्षेच्या वेढ्यातुन सुर, मृगा ने सुरवनी

सुरांसगे जाती बसुनच विमानी मृग किती

खुशीने स्वेच्छेने शिरति फिरती नंदनवनी ।। 7.2 ।।

 

अगे कस्तूरीसी सलिल करता स्पर्श अमले

मिळे त्या पुण्याने `परिमलमृगा' स्वर्ग सुख हे

अशी ही पुण्याई तवचि करुणेचे फळ असे

तुझ्या संपर्की ये अति दुरुन त्याही सुख मिळे ।। 7.3 ।।

(परिमलमृग – कस्तूरीमृग. कस्तूरीमृगांची कस्तूरी वापरून केलेली उटी राजस्त्रियांनी अंगाला लावली. गंगेत स्नान करताना ती गंगेच्या पाण्यात विरघळली , तेंव्हा गंगेचा स्पर्श त्या कस्तूरीला झाल्याने, तत्क्षणी कस्तूरीमृगांनाही स्वर्ग प्राप्त झाला.)

---------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

श्लोक 1

श्लोक 3

श्लोक 2