श्लोक 6

 

श्लोक 6

 

हे गंगे, हे जननी, तू वाहतच होतीस, वाहतच असतेस निरंतर वाहत राहशील. तुझ्या ह्या अखंड प्रवाहाने तू तुझ्या दोन्ही तीरांना समृद्ध बनवतेस. अलौकिक सुंदर बनवतेस. तुझ्या हया धीर गंभीर, वरतून शांत पण प्रवाही जलौघाची ओढ भल्याभल्यांना भुरळ घालते. सहाजिकच आहे. जे जे भव्य, जे जे दिव्य त्यापुढे कोणाचंही मस्तक सहजपणे झुकतं. तुझ्या विशाल पात्राला पाहून कोणालाही आपलं क्षुद्रपण मनोमन जाणवायला लागतं.

तुझ्या ह्या समृद्ध ऐश्वर्यापुढे आपलं सुवर्ण भांडार किति थिटं आहे, हिर्‍यामोत्याचे, रत्न माणकांचे खजिने किती क्षुल्लक आहेत, तुझ्या झगमगत्या नीर वस्त्राच्या तलम पोतापुढे आपली रेशमी वस्त्रही जाडीभरडी आहेत, तुझ्या पात्राच्या विशालतेपुढे आपलं राज्य नखभर सुद्धा नाही ह्या जाणीवेने सम्राटांच्या सम्राटालाही स्वतःच्या राज्याचा मोह सुटून तुझ्या तीरांचा मोह पडतो.

 सर्व प्राणीमात्रांची सदयतेने अविरत काळजी घेणारा हा तुझा कृपाळू नीरदेह पाहिला की भल्याभल्यांचा स्वकर्तृत्वाचा अभिमान गळून पडतो. तुझी अभंग सेवावृत्ती पाहिल्यावर ‘आता कोठे धावे मन तुझे चरण देखिलिया म्हणत मन शांतपणे हृदयाच्या गाभार्‍यात  येऊन बसतं. तुझ्या तीरावर स्थिरावतं.

तुझ्या जलौघाचं गारूड अनुभवत थोर थोर राजे रजवाडे, महान सम्राट अकस्मातपणे आपली महान राज्य कस्पटासमान, तृणवत् समजून सोडून देतात. राज्य, राजवैभव, मानमरातब सर्व सर्व त्यांना तुझ्या अनमोल प्रवाहापुढे मातिमोल वाटतं. त्यातील फोलपणा दिसू लागतो. कळू लागतो. तुझ्या तीरावरील वार्‍यावर डोलणार्‍या वेळूच्या बनांमधे कुठल्याही लौकिक वैभवाशिवाय राहणं हे त्यांना परमानंद देणारं वाटू लागतं. राजवाड्यात मिळणारी उत्तमोत्तम आहार, विहाराची सर्व सुखं निरस वाटायला लागतात आणि तुझं झुळझुळ वाहणारं पाणी अमृताप्रमाणे गोड वाटू लागतं. त्या पाण्यावरच आपली तहानभूक भागवून अत्यंत तृप्त मनाने, समाधानाने, परम संतोषाने ते तुझ्या तीरी राहू लागतात. जी मनःशांती त्याना राजवाड्यात लाभत नाही; सर्व भौतिक सुखाच्या राशींमधे मिळत नाही ती त्यांना सर्व सर्व सुखांचा त्याग करून तुझ्या सान्निध्यात लाभते. ह्या सुखापुढे त्यांना स्वर्गसुखही निरस वाटतं. मोक्षही सर्वस्वी फिका वाटतो. जणू काही त्यांना मिळालेला तो आनंद, मोक्षाकडे पाठ फिरवून, मोक्षाकडे साफ दुर्लक्ष करून त्याला उपहासाने हसत; हे दाखवू इच्छित असतो की, बाबरे मी कुठे? तू कुठे? माझी बरोबरी करायला तू जाऊ नकोस. माझ्या नखाचीही सर तुला कधी येणार नाही.  (6)

 

अपि प्राज्यं राज्यं तृणमिव परित्यज्य सहसा

विलोलद्वानीरं तव जननि तीरं श्रितवताम्।

सुधातः स्वादीयस्सलिलभरमातृप्ति पिबतां

जनानामानन्दः परिहसति निर्वाणपदवीम्।।6

 

अन्वय – (भो जननि) प्राज्यं अपि राज्यं सहसा तृणम् इव परित्यज्य, विलोलद्वानीरं तव तीरं श्रितवतां, सुधातः (च) स्वादीयःसलिलभरं आतृप्ति पिबतां जनानां आनंदः निर्वाणपदवीं परिहसति।

(भो जननि !) हे माते!; प्राज्यं अपि – समुद्रवलयांकित अशीही; राज्यं – राज्याते/राज्यासी; सहसा – एकाएकी, निर्लोभपणे; तृणं इव – गवताप्रमाणे; परित्यज्य – टाकून; विलोलद्वानीरं – विलोलंतः वानीराः यस्मिन् तत्। वायूने वेताची झाडे जेथे कापत आहेत अशा; वानीर – वेताची झाडे;  तव- तुझ्या; तीरं – तीरावर; श्रितवतां - आश्रय करते झाले;  सुधातः – अमृताहून;  स्वादीयस्सलिभरं – फार फार मधुर; सलिलाना भरः – पाण्याचा समूह; स्वादीयान् -अति मधुर; आतृप्ति - तृप्ति होईपर्यंत; पिबतां – पिणार्‍या; जनानां – लोकांचा; आनंदः – आनंद; निर्वाणपदवीं - मोक्षाचा दर्जा, स्थान, मार्गाचा; परिहसति – उपहास करतो. (6)

 

जयांच्या सीमा ह्या पसरतिच आसिंधु अशि ही

महासाम्राज्येही तृणसम अती तुच्छ स्मरुनी ।

महीची ऐश्वर्ये विभवहि अकस्मात त्यजुनी

तुझ्या ओढीने हे नृप कितिक आले तव तिरी ।। 6.1।।

 

बने वेळूची ही डुलति पवनासंगति जिथे

बनी वेतांच्या त्या वसतिच सुखाने नृप तिथे ।

मिळे त्यांना तृप्ती सलिल तव आकंठ पिउनी

सुधेलाही नाही सर तव जलाची लवभरी ।। 6.2 ।।

 

तुझे प्राशूनीय मधुर जल हे अमृतमयी

नृपांना लाभे जो सतत परमानंद हृदयी

अगे तो मोक्षासी सतत खिजवी गे हसुनची ।

म्हणे हे मोक्षाचे पदचि कवडीमोल मजसी ।। 6.3 ।।

---------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

श्लोक 1

श्लोक 3

श्लोक 2