श्लोक 51
श्लोक 51
हार, पराभव कायम दुःखदायकच असतात; त्यातून
जर ती व्यक्ती एकदाही पराभव न चाखलेली शूर, वीर, धीर असेल तर, त्याला ती हार
जिह्वारी लागली नाही तरच नवल. त्रिपुरासुरांसारख्या महा बलाढ्य असुरांनाही मारणार्या
श्री महादेवांना द्यूत खेळताना हसत हसत पार्वतीने हरवलं. शिवपार्वतीच्या
सारीपाटाच्या खेळात शिव कधि जिंकल्याचं कोणी पाहिलं आहे का? कितीही मोठमोठ्या
मोठमोठ्या आपत्तींनी, निसर्गाचा कितिही विनाश केला, प्रलय जरी झाला तरी, सार्या
निसर्गाला सावरत ही उमा परत त्याला नवजीवन देते. नवसंजीवनी देते. प्रलयकारी शिवाला
पार्वतीसमोर तरी हार मान्यच करावी लागते.
ह्या प्रलयकारी शंभूजवळ स्वतःचं असं आहे तरी
काय? गजचर्म, कुठे रुद्राक्षादि मण्यांच्या माळा, म्हातारा नंदी, कृश झालेली
चंद्रकोर, नंदी, वीरभद्र, भैरव, शृंगी,
भृंगी, घंटाकर्ण, इत्यादि त्याचे सर्व सेवक गण असे सर्व मुख्य मुख्य वैभव पणाला लावता लावता शंभूकडे
काहीच उरलं नाही. महादेवांनी सर्व पणाला
लावले आणि गमावलेही. आता नक्कीच त्यांना स्वतःला पणाला लावावे लागणार; ह्याच एका क्षणाची पार्वतीमाता जणु वाट बघत होती.
पतीची अडचणीची वेळ हीच सवतीचा काटा
काढायची अचूक वेळ असते. अशावेळी ही हिमकन्या थोडीच सोडणार आहे? तिने काही न बोलता
नुसता एक नेत्र कटाक्ष शिवाच्या मस्तकावरील गंगेकडे टाकला. ‘‘ नाथ! अजून ती तर उरली आहे
नं! तिलाही लावा पणाला!’’
तिच्या त्या सूचक नेत्रपल्लवीने हे गंगे,
तुझा जो काय थरकाप झाला; त्याने तुझ्या लाटा अशा काही उंच उंच उसळायला लागल्या की
जणू डोक्यावर जलाने भरलेला घट घेऊन कोणी नृत्यांगना भयाने तांडव नृत्य करत असावी. जलकुंभातून
हेंदकाळणार्या पाण्यानी ती बावरलेली ओलेती नृत्यांगना अजूनच सुंदर दिसावी
त्याप्रमाणे तुझी भयभीत झालेली, गांगरलेली, कातर छवीही अजून मनोरम दिसू लागली. भीती,
क्रोध, अपमान ह्या समिश्र भावनांनी उसळणार्या तुझ्या ह्या लाटा त्यातील अलौकिक
सौंदर्याने अजून देखण्या दिसत आहेत. तुझ्या लाटा कधि कोणाच्या वाईटाची इच्छा करत
नाहीत. त्या सर्वांचे निरंतर कल्याण, हित करतात. दुसर्याचे अनिष्ट करावे, दुसर्याला
त्रास द्यावा हा तुझा स्वभाव नाही. हे कृपाळू माते, तुझ्या ह्या उसळणार्या लाटा
आमचे निरंतर कल्याण करोत. (51)
(वृत्त
– स्रग्धरा, अक्षरे – 21, गण- म र भ न य य य , यति- 7 7 7)
द्यूते नागेन्द्रकृत्तिप्रमथगणमणिश्रेणिनन्दीन्दुमुख्यं
सर्वस्वं हारयित्वा स्वमथ पुरभिदि द्राक् पणीकर्तुकामे ।
साकूतं हैमवत्या मृदुलहसितया वीक्षितायास्तवाम्ब
व्यालोलोल्लासिवल्गल्लहरिनटघटीताण्डवं नः पुनातु ।। 51 ।।
अन्वय – हे अम्ब! द्यूते नागेन्द्रकृत्तिप्रमथगणमणिश्रेणिनन्दीन्दुमुख्यं सर्वस्वं हारयित्वा अथ द्राक्
स्वं पणीकर्तुकामे पुरभिदि, मृदुलहसितया हैमवत्या साकूतं वीक्षितायाः तव व्यालोलोल्लासिवल्गल्लहरिनटघटीताण्डवं नः पुनातु ।
अन्वयार्थ - हे अम्ब – हे माते, द्युते
– द्युतामध्ये , नागेन्द्रकृत्तिः – गजचर्म; प्रमथ गणः- शिवाचे नंदी,
वीरभद्र, भैरव, शृंगी, भृंगी, घंटाकर्ण इत्यादि सेवक गण ; मणिश्रेणिः –
रुद्राक्षादि मण्यांच्या माळा; नन्दिः –
स्ववाहन वृषभ नंदी ; इन्दु – चंद्र , मुख्यं – इत्यादि मुख्य गोष्टींनी युक्त
असे ; सर्वस्वं – सर्व धन ; हारयित्वा – हारून घालवून ; अथ – नंतर ; द्राक् – लगेच ; पणीकर्तुकामे
– (स्वतःला) पणास लावण्याची इच्छा करणार्या , पुरभिदि –
त्रिपुरासुराला मारणार्या शिवाला ; मृदुल हसितया - मंद स्मित करणार्या ; हैमवत्या –
हिमवताची कन्या हिमवती म्हणजे पार्वतीने ; साकूतं – साभिप्रायाने ; वीक्षितायाः
– पाहिलेल्या तव – तुझ्या ; व्यालोला
– चंचल ; उल्लासिन्यः – वर उसळणार्या ; वल्गन्त्यः – आवाज
करणार्या ; नटः – नटाप्रमाणे लाटा ; घटिताण्डवं – डोक्यावर घट घेऊन
तांडव नृत्य करणे ; (लाटारूपी नटाचे जणु घट नृत्य) ; नः – आम्हास , पुनातु
– पवित्र करो. (51)
होते सामर्थ्यशाली त्रिपुर असुर जे त्या वधे जो पुरारी
द्यूतामध्येच त्यासी हसत हसत ती धूळ चारेच गौरी ।
हारे सर्वस्व शंभू शशि, वृषभ, मणी, चर्मवस्त्रे गणांसी
तेव्हा लावे स्वतःसी त्वरितचि पणा; डंख दे हार भारी ।। 51.1 ।।
दृष्टिक्षेपास टाकी तुजवर गिरिजा; मंद हासेच गाली
‘‘गंगा लावा पणाला’’ जणु सुचवितसे ‘‘प्राणनाथा त्वरे ही’’।
संकेताने उमेच्या तव हृदि उसळे क्षोभ उद्रेक भारी
त्याने लाटा तुझ्या का सतत उसळति गर्जती उंच जाती ।। 51.2 ।।
वाटे पाहून त्यांसी अभिनय करिते कोण नृत्यांगना ही
दुःखावेगे जणू का घट धरुन शिरी नाचते तांडवासी ।
आवेगे हेंदकाळे, घटजल उसळे, त्याच लाटा तुझ्या गे,
पापे नाशून आम्हा पुनितचि करु दे माय हे पुण्यश्लोके ।। 51.3 ।।
---------------------------------------------------
Comments
Post a Comment