श्लोक 5

 

श्लोक 5

हे जननी तू मनाची इतकी चांगली आहेस की, देव तर तुला पूजनीय (संसेव्य) मानतातच पण, ज्या ज्या लोकांनी आयुष्यात कधीही चांगलं काम केलं नाही त्यांनीही तुझा नुसता आठव करताच तू त्यांना भवसागरातून सुरक्षित तारुन नेतेस. किंवा गंगा ही स्वर्गातील नदी असल्याने देवांची तृष्णा भागविण्यासाठी, पीण्यासाठी (संसेव्य) ते गंगाजलच सुयोग्य, पात्र समजतात.

हे गंगामैय्या, अंधार्‍या रात्री चंद्र आशेचे किरण घेऊन येतो; त्याच्या सौम्य प्रकाशाने धीर देतो, मार्ग दाखवतो. माझ्या मनात निराशेचा अंधकार दाटला आहे. त्यातून बाहेर पडायला कुठला मार्ग तरी कसा दिसेल? माझ्यासाठी एकमेव मार्गदर्शक प्रकाश तूच आहेस. चंद्रप्रकाशाप्रमाणे माझ्यासाठी तू आशेचा प्रकाश आहेस. चंद्राच्या प्रकाशाने घनदाट अंधार निघून जावा आणि हळुहळु रस्ता दिसायला लागावा त्याप्रमाणे, माय तू माझ्या सोबत राहून मला योग्य मार्ग दाखवशील ही मला खात्री आहे. ‘बाळ, घाबरू नकोस’ म्हणून आईने पाठीवर हात ठेवला की सर्व भीती पळून जाते. तू माझ्या मनातील निराशेचा, अज्ञानचा अंधार दूर कर माय!

माय, मलाही माहित आहे की मी तुझा सुपुत्र नसून कुपुत्र आहे. पण माय, एका हाताची सर्वच बोटं सारखी नसतात ना गं! मी केलेल्या पापाचरणांमुळे माझ्या मनाला यातना होत आहेत. त्या व्यथेने माझा जीव अस्वस्थ आहे; तळमळत आहे. मी केलेल्या कायिक, वाचिक, मानसिक सर्व पापांवर तूच एक उतारा आहेस. तूच औषध आहेस. तूच मला तारून ने.  

स्मृतिं याता पुंसामकृतसुकृतानामपि च या

हरत्यन्तस्तन्द्रां तिमिरमिव चन्द्रांशुसरणिः।

इयं सा ते मूर्तिः सकल-सुर-संसेव्यसलिला

ममान्त:सन्तापं त्रिविधमपि पापं च हरताम्।।5

अन्वय – (हे गंगे), या अकृतसुकृतानां अपि पुंसां स्मृतिं याता च(सती)  चंद्राशुसरणिः तिमिरं इव अन्तस्तंद्रां हरति। सा इयं सकलसुरसंसेव्यसलिला ते मूर्तिः मम अन्तःसन्तापम् अथ त्रिविधं पापं च हरताम् । (5)

अन्वयार्थ - हे गंगे!;  या – जी; अकृत – जे केले नाही ते; सुकृत – पुण्य; अपि – तरीसुद्धा; अकृतसुकृतानां अपि – पुण्य न करणार्‍या; पुंसां – पुरुषांच्या;  स्मृतिं – स्मरणाप्रत, याता सती – प्राप्त झाली असता; सरणिः – रस्ता; चंद्रांशुसरणिः – चंद्राच्या किरणांचा पथ; तिमिरं इव – अंधाराला जसा; अंतः तंद्रा – अंतःकरणाील तंद्रा म्हणजे अज्ञानाला; हरति – नाश करतो;  सा इयं – ती ही; सकल सुर संसेव्य सलिला - सगळ्या देवांना जिचे पाणी सेवनीय आहे अशी; सलिल मूर्तिः  - तुझी प्रवाहरूप मूर्ती; मम – माझ्या; अंतः – अतःकरणातील; त्रिविधं पापं- कायिक, वाचिक, मानसिक अशी तीन प्रकारची पापं/दुष्कृत (आणि पातकांपासून उत्पन्न झालेला); त्रिविधसंतापं –(आध्यात्मिक, आधिदैविक, आधिभौतिक )अशा सन्तापं – दुःख, क्लेश हरताम्- दूर करो. (5)

 

तमा सारी दूरी कुमुदप्रिय तो चंद्रचि जसा

पथा दावी रात्री घनतमि प्रकाशून पथिका ।

तसे तू हारी गे सकल तिमिरासी हृदयिच्या

लया न्यावी पापे त्रिविधचि जलानेच तुझिया ।।5.1।।

 

उभ्या जन्मी ज्यांना कधिहि न सदाचार शिवला

अशाही पाप्यांनी हृदयि करिता आठव तुझा।

महा दोषातूनी हसत करिसी मुक्तचि तया

सदा देसी स्फूर्ती विरघळवि त्यांची शिथिलता ।।5.2।।

 

असे देवांनाही जलतनु तुझी वंद्य जगती

/

(तृषा शांतीसाठी सुर तव जला प्राशन करी)

अगे पीडा देती त्रिविध मम पापे मज अती ।

करो त्या पीडेचे निरसन तुझी नीरतनु ही

कृपादृष्टीने गे तगमग मनीचीच शमवी।।5.3 ।।

---------------------------------------------------

(संसेव्य चे वंद्य असणे व प्राशन करणे दोन्ही अर्थ आहेत.)

Comments

Popular posts from this blog

श्लोक 1

श्लोक 3

श्लोक 2