श्लोक 47
श्लोक 47
श्लोक 47
अनन्य भावाने शरण आलेल्या जगन्नाथाच्या
मनाची घालमेल; गंगेनी आपला अव्हेर करू नये म्हणून तिची विनवणी; आपण आधीच्या
श्लोकांमधे पाहिली. ह्या श्लोकात जगन्नाथराय
चा पवित्रा एकदम बदललेला आहे. तो गंगेला बजावत आहे, माय! तुझ्याकडे येणार्या अनेक सर्वसाधारण पाप्यांपैकी
एक असं समजून तू मला कमी लेखू नकोस. माझे भयंकर अपराध तुला माहित नाहीत का?’
महा भयंकर रोगाला उपचार करायचा असेल तर
साधीसुधी औषधं चालत नाहीत. डोळ्यात तेल घालून त्या रोग्याकडे लक्ष द्यावं लागतं.
सतत उपचार चालू ठेवण्यासाठी त्याला अति दक्षता विभागात कायम तज्ज्ञांच्या
निरीक्षणाखाली ठेवावं लागतं. त्याप्रमाणे जगन्नाथराय म्हणत आहे, ‘माय माझी पापे
दूर करणं ही साधीसुधी गोष्ट नाही. तूही माझी एक एक पापे ऐकलीस तर हादरून जाशील.
तुझाही थरकाप उडेल अशी माझी पापे आहेत. म्हणून म्हणतो की, जगन्नाथाची घटका आता
भरली आहे; त्याला मोक्ष मिळण्याचा समय समोर येऊन ठेपला आहे. तू सज्ज हो. पूर्ण
तयारीत रहा.
तू तुझा हा अत्यंत रमणीय असलेला शेला
अंगावर पांघरून न घेता, कमरेला कसून बांध. (पूर्वी लढाई अगर काही महत्त्वाचे काम
करताना जोर येण्यासाठी म्हणून लोक कपड्याने कंबर घट्ट बांधीत असत.) तुझ्या अंगावर
दागिने म्हणून जे सर्प मिरवत आहेस त्यांनी तुझ्या मुकुटावर अलगद ठेवलेली ही इवलीशी
चंद्रकोर करकचून बांध; आणि ‘जगन्नाथाला पापमुक्त करणे’ ह्या नव्या लढाईला सामोरे
जाण्यास सज्ज हो.
सामान्य लोकांच्या येण्याजाण्याची कोणी
दखलही घेत नाहीत. त्यांच्या येण्या जाण्यासाठी आमरस्ता असतो. पण राजा येणार असेल
तर त्याचा प्रशस्त मार्ग वेगळा असतो. भालदार चोपदार त्याच्या येण्याची वर्दी देत
असतात. त्याच्या उलट एखाद्या महा भयंकर गुन्हेगारालाही न्यायालयात आणायचं असेल तरी
पोलिसांच्या महाबंदोबस्तात शक्यतो वेगळ्या रस्त्याने आणले जाते. त्याला
न्यायाधिशांसमोर हजर करण्यासंबंधी शिरस्तेदार त्याच्या नावाचा पुकारा करतो. येथे जगन्नाथराय आपण कोणी सामान्य नसून,
पाप्यांचाही मुकुटमणी आहोत हे सांगत, त्याच्या येण्याची जोरदार वर्दी देत आहे.
‘सावधान! सावधान! सर्वांनी सावधान! महापाप्यांचा हा मुकुटमणी जगन्नाथ येत आहे.’
जगन्नाथराय म्हणतात, माय हा पाप्यांचा
पापी महापापी जगन्नाथ तुझ्याजवळ आला आहे. त्याच्या उद्धाराचा समय आला आहे. तुझी
सर्व ताकद पणाला लाव. तुझं सामर्थ्य सार्या विश्वाला दिसू देत. तुझं सर्व कौशल्य
आज जगाला दाखवायची वेळ आली आहे. जे देवांनाही असाध्य आहे असं हे महापाप्यांचा मुकटमणी असलेल्या जगन्नाथाच्या
उद्धाराचं अशक्यप्राय काम तुझी वाट पहात आहे. सज्ज हो. माझा उद्धार कर. देवांनी तर
हे शक्य नाही म्हणून माझ्याकडे पाठच फिरवली आहे.
हे दुष्कर काम तुझ्याशिवाय हे कोणाला शक्य नाही.
बधान द्रागेवं द्रढिमरमणीयं परिकरं
किरीटे बालेन्दुं नियमय पुन: पन्नगगणैः।
न कुर्यास्त्वं हेलामितरजनसाधारणतया
जगन्नाथस्यायं सुरधुनि समुद्धारसमयः ।। 47 ।।
अन्वयार्थ - हे मातः सुरधुनि – हे माते!
देवनदी गंगे अयं - हा ; जगन्नाथस्य – जगन्नाथाचा ; समुद्धार समयः
– उद्धार करण्याची वेळ अस्ति – आहे.
अतः एव – म्हणूनच ; त्वं – तू ; द्रागेव- द्राक्
एव – शीघ्र, लगेचच; परिकरः – कंबरेला
बांधायचे वस्त्र. द्रढिमरमणीयम् परिकरम् बधान -तुझी कंबर कसून तयार हो किंवा तुझा (शेला)
कमरेला अत्यंत घट्ट बांध.(पूर्वी लढाई अगर काही महत्त्वाचे काम करताना जोर
येण्यासाठी म्हणून लोक कपड्याने कंबर घट्ट बांधीत असत.) किरीटे – मुकुटावर
; पन्नगगणैः – शरीरावर भूषणार्थ धारण केलेल्या सर्पांनी ; बालेन्दुं –
चंद्रकोर ; नियमय – घट्ट बांध ; इतरजनसाधारणतया – अल्प,स्वल्प पापे
करणार्या इतर सामान्य जनांप्रमाणे, त्याच्या बरोबरीने मला समजून ; त्वं –
तू ; मम - माझी ; हेलां – अवहेलना ; न कुर्याः – करू
नयेस.
तुझा शेला बांधी कसुनि कमरेसी भरजरी
विषारी सर्पांनी करकचुन बांधी शशि शिरी ।
असे पापी साधा अशि मम उपेक्षा नच करी
जगन्नाथाची या भरलि घटिका मोक्षसमयी ।। 47 ।।
---------------------------------------------------
.jpeg)
Comments
Post a Comment