श्लोक 43

 

श्लोक 43



जगात पुष्कळ नद्या असतील पण गंगेची महतीच काही वेगळी! जगन्नाथराय म्हणतात, माय, तू ज्या ज्या प्रदेशातून वाहत जातेस ते ते प्रदेश खरोखरच धन्य होत!  तेथील प्राणी, पक्षी, किटक वर्ग, माणसे खरोखरच भाग्यवंत समजली पहिजेत.

आद्य शंकराचार्यही त्यांच्या गंगास्तोत्रात म्हणतात, गंगेच्या जवळ रहायला मिळण्यासारखे पुण्यप्रद काही नसेल. गंगेच्या तीरावर रहायला मिळणे म्हणजे पृथ्वीवर राहून वैकुंठाचे सर्व सुख मिळविण्यासारखे आहे.(श्लोक 10)

तव तटनिकटे यस्य निवासः खलु वैकुण्ठे तस्य निवास:

तुझ्या तटावर राहती जे नर। वैकुंठचि त्यां लाभे भूवर 

इतकच नाही तर पुढे जाऊन ते म्हणतात, माय! ज्या नरदेहाची इतकी महती पुन्हा पुन्हा सांगितली जाते, एकवेळ तो नरदेह मिळाला नाही तरी चालेल; मला कुलीन घराण्यात राजाचा जन्म मिळाला नाही तरी चालेल; पण तुझा वियोग नको. तुझ्या तीरावर मी कासव, मासा अथवा एखादा दुलक्षित दुबळा सरडा होऊन राहण्यातही धन्यता मानतो.  

वरमिह नीरे कमठो मीनः किं वा तीरे शरट: क्षीणः ।

अथवा श्वपचो मलिनो दीनस्तव न  हि दूरे नृपतिकुलीन: ।।11

 

बरे राहणे तुझ्या तिरी गं । होऊन मासा अथवा कासव

होईन दुबळा सरडा मीही । तुझ्या विना परि नकोच जीवन ।। )

 

गंगालहरींध्ये जगन्नाथराय म्हणतात, ज्या प्रदेशातून ही पावन गंगा नदी प्रवाहित होत  नाही, ते लोक खरोखरच दुर्दैवी आहेत. असे लोक आपल्या दुर्दैवाची खंत न बाळगता जर, आपण जेथे राहतो तेथेच राहण्यात समाधान मानत असतील, त्याच जागेची त्याच्या मनात प्रचंड ओढ असेल तर; हे गंगे तुझ्या तीरावरील ह्या वृक्षराजीही जणु काही त्यांच्या फुलणार्‍या फुलांच्या ताटव्यांच्या रूपाने हसत हसत त्यांचा उपहास करत असतात. जणु काही म्हणत असतात, ‘अरे वेड्या तू गंगेचा अनुभवच घेतला नाहीस; गंगेचं सख्य आणि सौख्य काय असतं हे तुला माहितच नाही. एकदा जर तू ते अनुभवलंस तर तुझी ह्या तुझ्या गावाची आसक्ती पार सुटून जाईल.’

गंगेच्या तीरावरील ह्या वृक्षराजींची मुळं गंगेच्या पाण्यापर्यंत पोचल्याची ग्वाही त्यांची  सतत हिरवीगार तरतरीत, ताजीतवानी पानं देत असतात; त्यांच्यावर विविध फुलांचे फुललेले गुच्छ , मी मी म्हणत वर डोकावणारे रंगिबेरंगी फुलांचे तुरे त्यातून ही ग्वाही मिळत राहते.

 अशा फुलांच्या झुपक्यांमधून मध गोळा करण्यासाठी भुंग्यांची गर्दी झालेली असते.  भुंगेही मध घेण्यासाठी इतके आतुर असतात की, झाडांची, फुलांची परवानगी घ्यावी हे त्यांच्या गावीही नसते. चोरी हा त्यांच्यालेखी अपराध नसतो. इतक्या विविध फुलांच्या ताटव्यांमधून, घोसांमधून फिरल्याने सहाजिकच परागकण अंगाला चिकटून भुंग्यांचे देह परागधूलीने माखून गेलेले असतात. अशा प्रकारे चोरीच्या अपराधाने आणि परागधूलीने मलिन झालेल्या भुग्यांनाही हे दिलदार वृक्ष फुलांच्या सुगंधाने न्हाऊ घालून निर्मळ करतात.

जगन्नाथ राय अशा अतंर्बाह्य सुंदर असलेल्या तरुवरांकडे पाहून इच्छा व्यक्त करतात की, गंगेप्रमाणेच सर्वांचे कल्याण करणार्‍या; गंगातीरावरील ह्या वृक्षांचे माझ्याशी कायमचे मैत्र जडो.

 

नरान्मूढांस्तत्तज्जनपदसमासक्तमनसो

हसन्तः सोल्लासं विकचकुसुमव्रातमिषतः।

पुनानाः सौरभ्यैः सततमलिनो नित्यमलिना-

न्सखायो न: सन्तु त्रिदशतटिनीतीरतरवः ।। 43 ।।

अन्वय – तत्तज्जनपदसमासक्तमनसः मूढान्  नरान् विकचकुसुमव्रातमिषतः सोल्लासं हसन्तः, नित्यमलिनान् अलिनः सततं सौरभ्यैः पुनानाः त्रिदशतटिनीतीरतरवः नः सखायः सन्तु ।

अन्वयार्थ - तत् जनपद  समासक्त मनसा -  आपण ज्या ज्या देशात रहतो त्या त्याच देशात राहण्याविषयी ज्यांचे अंतःकरण आक्त झाले आहे अशा ; मूढान् – सारासार विवेकशून्य अशा ; नरान् – लोकांना ; विकच- कुसुम -व्रात – मिषत – विकास पावलेल्या फुलांच्या समुदायाच्या रूपाने/मिषाने ; सोल्लासं – अत्यंत आनंदाने हसन्तः – हसणारे ;  नित्य मलिना्न् – नेहमी परागांनी मलीन असणारे, व परद्रव्य म्हणजेच फुलांचा मध हरण करणे, पीणे ह्या दोषांनी युक्त अशा , अलिनः – भ्रमरांस ; सततं -  नेहमी, सौरभ्यैः – सुगंधाने ; पुनानाः – पवित्र करणारे ; त्रिदश तटिनी तीर तरवः - देवांची नदी जी गंगा तिच्या तीरावरील तरु, वृक्ष ; नः – आमचे ; सखायः – मित्र ; सन्तु – होवोत, असोत.

 

न वाहे गंगा ही जरिहि मुलुखातून अपुल्या

तरी वाटे ज्यांना मुलुख प्रिय सम्पन्नचि भला ।

तुझ्या तीरीचे हे तरुवर तयांनाच हसति

फुलाच्या घोसांच्या सुमधुर रुपाने कितिकिती ।। 43.1 ।।

 

मधाच्या आस्वादास्तव बहु उतावीळ हृदयी

फुलांचा प्राशीती मधु तरुअनुज्ञेविण जरी ।

अहो ज्या भुंग्यांची तनु सकल ही माखत अती

परागांनी सार्‍या दिनभर फुलातून फिरुनी ।। 43.2 ।।

 

परागांनी झाल्या मलिनचि मिलिंदास तरु हे

पुन्हा आमोदाने करिति सहजी निर्मळ पुरे ।

तुझ्या तीरीच्या ह्या सहृदय तरूंशी सुरधुनी

असो गे जिह्वाळा अतुट जडु दे मैत्र हृदयी ।। 43.3 ।।

---------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

गंगालहरी अनुक्रमणिका

श्लोक 1

श्लोक 3