श्लोक 42
श्लोक 42
आपल्या सनातन धर्माप्रमाणे भगवंत आपल्या
देहातच राहतो. जर देह देवाचे मंदिर असेल तर मस्तक हे त्या मंदिराचा कळस आहे. ह्या
कळसाची पूजा तिलकाशिवाय कशी होईल? तिलक म्हणजे सर्वोच्च मानबिंदू! तिलक हा आपल्या
भारतीय परंपरेतील धार्मिक आणि भावनिक आस्थेचं पवित्र, हृद्य प्रतिक आहे. देवाला
तिलक लावताना, स्वतःला तिलक लावताना,
ब्राह्मण, कन्या, माता, पुरूष बालके, अतिथी, पितर ह्यांना तिलक लावताना
म्हणायचे वेगवेगळे मंत्र आहेत.
पूर्वी राजे महाराजे काही शुभ कार्याला
किंवा युद्धाला निघाले तर घरातील स्त्रिया त्याना तिलक लावून त्याच्या यशाची कामना
करत आणि राजेही कार्यास निघण्यापूर्वी आणि यश प्राप्त करून आल्यावर कुलदेवतेला
तिलक लावीत आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला असावा म्हणून त्यांच्या पायीचे चंदन आपल्या कपाळावर तिलक
म्हणून धारण करीत. आपल्या स्वतःला चंदन लावताना खालील श्लोक म्हणतात.
चन्दनस्य महत्पुण्यं पवित्रं पापनाशनम् ।
आपदां हरते नित्यं लक्ष्मीस्तिष्ठति
सर्वदा ।।
माता,
पिता गुरुजन अशा वंद्य लोकांच्या पायाची माती कपाळी लावताना त्याच्यां विषयी मनात
उसळेल्या सर्व कृतज्ञतेच्या पवित्र भावना, त्यातून मिळालेलं सुखं काही आगळच असतं.
उभयपक्षी नात्याच्या रेशमी धाग्यांचं मऊ, मुलायमपण जपणारं, अजून दृढ करणारं असतं.
दूरदेशी राहून परत आल्यावर आपल्या जन्मभूमीच्या मातीत हात बुडवून तो कपाळावर
भस्माच्या पट्ट्याप्रमाणे ओढताना भूमातेचा झालेला वियोग संपून तिच्या कुशीत
शिरल्याचा आनंद मिळतो. मनाच्या तळापासून उत्सूर्तपणे, अत्यंत सहज होणारी ही कृती
आहे.
जगन्नाथराय म्हणतात, ‘माय ह्या भूलोकी, स्वेच्छेने
कोणी तुझी माती हाती उचलून घेऊन तिचा स्वतःच्या भाळी तिलक लावला तरी त्या
मृत्तिकेच्या टिळ्यातही तुझ्या वात्सल्याची असामान्य ताकद निर्माण होते. कारण
कपाळाला माती लावणं म्हणजे पूज्य व्यक्तीची स्पंदनात्मक शक्ती आपल्या आज्ञाचक्राशी
एकरूप करणे. (तर दुसर्याला तिलक लावणं म्हणजे आपली स्पंदने, शुभ संवेदना त्या माणसाच्या आज्ञाचक्राशी एकरुप करणे)
माय,
सूर्य उगवताक्षणीच जसा अंधाराचा नाश होतो, काने कोपरे, सर्व वस्तू प्रकाशित होतात
त्याप्रमाणे, हा मृत्तिका तिलक सर्व अज्ञानाचा नाश करतो. सर्व जग कसं स्वच्छ
स्पष्ट दाखवतो. मनातील सर्व किंतु परंतु दूर करतो.
इतकच कशाला सर्वजण म्हणतात की, विधिलिखित
कधी टाळता येत नाही; पण ब्रह्मदेवाने कपाळावर लिहिलेल्या अत्यंत दुर्दैवी
अक्षरांच्या ओळी, अत्यंत कटु विधिलिखितही पुसून टाकायची क्षमता ह्या तुझ्या
तिरीच्या मृत्तिकेच्या तिलकात आहे. माय तुझ्या तटीची कपाळी लावलेली ही माती माझा
सगळा शोक, समस्त दुःखे, माझे अपरिमित कष्ट, माझी दुर्बलता ह्यांचा नाश करो. माय
तुझं हे लेकरू तुला अनन्यभावे शरण आलं आहे.
ललाटे या लोकैरिह खलु सलीलं तिलकिता
तमो हन्तुं धत्ते तरुणतरमार्तण्डतुलनाम् ।
विलुम्पन्ती सद्यो विधिलिखितदुर्वर्णसरणिं
त्वदीया सा मृत्स्ना मम हरतु कृत्स्नामपि शुचम् ।। 42 ।।
अन्वय -
हे मातः या इह लोके सलीलं ललाटे तिलकिता (अस्ति) सा खलु तमो हन्तुं
तरुणतरमार्तंडतुलनां धत्ते। ( या च ) विधिलिखित दुर्वर्णसरणिं सद्यः विलुम्पन्ती
सा त्वदीया मृत्स्ना मम कृत्स्नां अपि शुचम् हरतु ।
अन्वयार्थ - हे
मातः – हे माते! ; या –
जी ; इह – ह्या लोकी ; लोकैः – लोकांनी ; सलीलं – स्वेच्छेने ; ललाटे – कपाळावर,
भाळी, तिलकिता – तिलक म्हणून धारण केली; सा – ती ; खलु –
खरोखर ; तमः – अज्ञानाला ; हन्तुं
– नाश करण्यास ; तरुणतर मार्तंड तुलनाम – उगवणार्या सूर्याच्या तेजाला धत्ते - धारण करते. या- आणि जी ;
विधिलिखित – ब्रह्मदेवाने (मनुष्याच्या जन्मसमयी कपाळावर ) लिहीलेल्या
दुर्वर्ण सरणिः – दुःखसूचक अक्षरांच्या ओळी ; सद्यः – तिलक करताच ; विलुम्पन्ती
– पुसून टाकणारी ; सा – ती ; त्वदीया
– तुझी, तुझ्या तीरावरील ; मृत्स्ना – माती ; मम – माझे ; कृत्स्ना
– सर्व ; अपि – सुद्धा ; शुचं
– शोक, कष्ट, दुर्बलता, दुःख ; हरतु
– हरण करो .
कुणी स्वच्छेने ही उचलुन तटीची तव मृदा
ललाटी लावीता तिलकचि तिचा हर्षितमना ।
कपाळी दुर्दैवी विधिलिखित त्यांच्या बदलते
पुसे ती ब्रह्म्याच्या अटळ कटु शब्दा त्वरित गे।। 42.1 ।।
जसा होता सूर्योदय सकल ती सूर्य किरणे
महा अंधाराला सहज गिळती सत्वर तसे ।--
हरे भाळीचा जो तिलक नित अज्ञान अवघे
हरो तो शोकासी मम दुरित दुःखास सुभगे ।। 42.2 ।।
(सूर्याला ऋग्वेदात तरणिर्विश्वदर्शित म्हटले आहे. तरणि/तारिणी
म्हणजे नाव. आकाशाचा महासागर तरून जाणारा, ज्याला सारं विश्व दिसतं वा विश्व दृश्यमान
करणारा. )
---------------------------------------------------

Comments
Post a Comment