श्लोक 41

 

श्लोक 41



माणसाच्या देहबोलीतून, त्याच्या नेत्रातून, त्याच्या शब्दांच्या आर्ततेतून त्याचा खरेपणा, सत्यता प्रत्ययाला येत असते. जगन्नाथरायाचं गंगेविषयीचं अपार प्रेम त्याच्या शब्दा शब्दातून व्यक्त होत आहे. त्याची आपल्या गंगामातेविषयी असलेली ओढ ही इतर लोकांप्रमाणे काही हेतू मनात धरून नाही.

जन्मदात्री गर्भश्रीमंत आहे का सामान्य आहे; नामांकित, प्रसिद्ध व्यक्ती आहे का कोणी तिच्या अस्तित्वाची दखलही घेतली नाही अशी दुर्लक्षित व्यक्ती आहे;  ह्याचं ज्ञान शिशुला नसतं. त्याला ही माझी आई आहे आणि मला पाहिजे तेव्हा मी तिला बिलगु शकतो, प्रेमाने तिच्यावर अधिकार गाजवू शकतो एवढाच अनन्यभाव मनात असतो.

जगन्नाथ राय म्हणतात, कोणा दात्याच्या औदार्याचा, दानशूरपणाचा बोलबाला जनामधे पसरायला वेळ लागत नाही. हा हा म्हणता लोकांच्या बोलण्यातून त्याच्या दातृत्वाची कीर्ती फार लवकर सर्वत्र पसरते. त्याच्याकडे याचकांची रीघ लागते.

हे माय, तुझ्या मनात सदैव प्राणीमात्रांच्या कल्याणाचीच चिंता असते. तू सतत लोकहितास्तव जागरूक असतेस. तू लोकांना जे जे हवं असेल ते अभीष्ट तर देतेसच पण त्यांच्या कल्पनेपेक्षाही जास्त दान देतेस. कोणालाही विन्मुख पाठवत नाहीस. तुझ्या दानीपणाची कीर्ती ऐकून तुझ्याजवळ काही ना काही याचना करायला येणार्‍यांची रीघ लागली आहे. तुझ्या ह्या दातृत्वामुळेच लोक तुला इतका मान देतात. सर्व लोकांना तू पूजनीय आहेस.

माय, मी तुझी स्तुती करत तुझ्याजवळ उभा असल्याने, तुला वाटत असेल, ह्या अशा अनेक याचकांप्रमाणेच मीही काहीतरी मागण्यासाठी तुझ्याकडे आलो असेन; तर माय, तसं मात्र नाही. मला तुझ्याकडून काहीही अपेक्षा नाही.  माय मी शपथपूर्वक सांगतो, तुझ्याविषयी माझ्या मनात अपार प्रेम आहे. एखादे लेकरू जसे अनन्यभावाने त्याच्या आईला बिलगते तसा मी तुझ्यापाशी आलो आहे कारण तू माझा एकमेव आसरा आहेस. विश्रांतीस्थान आहेस. (41)

 

 

प्रपद्यन्ते लोकाः कति न भवतीमत्रभवती-

मुपाधिस्तत्रायं स्फुरति यदभीष्टं वितरसि

शपे तुभ्यं मातर्मम तु पुनरात्मा सुरधुनि

स्वभावादेव त्वय्यमितमनुरागं विधृतवान् ।। 41 ।।

अन्वय – हे मातः सुरधुनि ! अत्रभवतीं भवतीं कति लोकाः न प्रपद्यन्ते यत् (त्वं) अभीष्टं वितरसि तत्र अयं उपाधिः स्फुरति । मम पुनः  आत्मा तु स्वभावादेव त्वयि अमितं अनुरागं विधृतवान् इति तुभ्यं शपे। (41)

 

अन्वयार्थ - हे मातः  – हे माते! ; धुनिः – नदी, हे सुरधुनि – हे  देवनदी गंगे ; अत्रभवतीं – ह्या लोकात पूज्य अशा ; भवतीं – तुला ; कति – कोण ; लोकाः न प्रपद्यन्ते-  लोक शरण येत नाहीत?; यद् – ज्याअर्थी ; अभीष्टं - (शरण आलेल्यांचे) इच्छित फल ; वितरसि – देतेस ; तत्र - त्याविषयी ; अयं - हा उपाधिः – विशेषता, मुख्य कारण ; स्फुरति – जागरूक आहे. ; मम – माझे ; पुनः – तर ; आत्मा – अंतःकरण ; तु – तर ; स्वभावात् एव – स्वभावतःच, मुळातच ; त्वयि - तुझ्या ठिकाणी ; अमितं – असीम, अत्यंत ; अनुराग – प्रीती ; विधृतवान् – धारण करते. ; इति – हे  तुभ्यं – तुला  शपे – शपथ घेऊन सांगतो. (41)

 

किती घ्यावे घेता करहि अपुरे दोन पडती

सदा देणारी ही रिति न कधि हो ओंजळ तुझी ।

अगे देसी इच्छेहुन कितिक तू जास्त पटीनी

अशी कीर्ती मोठी तव पसरता हे सुरधुनि ।। 41.1 ।। --

 

न येती कैसे गे शरण तुजला लोक सगळे

नसे कैसी तू गे सकलचि जना वंद्य सरिते।

कहाणी ना माझी परि इतर लोकांसम असे

तुझ्या ओढीने गे नित झुरत अंतःकरण हे ।। 41.2 ।।

 

असे सत्याचे हे मम वचन; ना अनृत फुके

अगे घेऊनी मी शपथ तुजला सांगत असे ।

अपेक्षा ना माझी तुजकडुन काहीच जननि

अगे प्रीती माझी तुजवर असे उत्कट अती ।। 41.3 ।।

(अनृत – खोटे)

---------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

गंगालहरी अनुक्रमणिका

श्लोक 1

श्लोक 3