श्लोक 40
श्लोक 40
नजरेसमोर गंगेच्या उसळणार्या उत्तुंग
लाटा पाहून जगन्नाथरायाच्या मनातही कल्पनाविलासाच्या उत्तुंग लाटा निर्माण झाल्या
असाव्यात. शिवाच्या दोन्ही कर्तृत्ववान ललनांची तुलना मनात केली गेली असावी.
पार्वती असो वा गंगा असो दोघींमधे कोण
श्रेष्ठ हे ठरवणं कठीण! दोघीही जगाच्या कल्याणाचा वसा घेऊनच जन्माला आलेल्या. दोघी
गुणवती, दोघीही राखेतून जग निर्माण करण्याचं अद्भुत सामर्थ्य बाळगून! प्रलयकाळी यद् दृष्ट्म् तत्
नष्टम् करून
टाकणारा शिव; मदनाला भस्म करून त्याची राख अंगाला लावणारा भस्मचर्चित शिव हा
दोघींचा जोडीदार असूनही त्याच शून्यातून परत जग निर्माण करायची पार्वतीची धमक
अनन्यसाधारणच म्हणावी लागेल; तर कपिलमुनींनी शापाने जाळून राख केलेले सगराचे साठ
हजार पुत्र राखेतून उभे करणारी गंगा अभूतपूर्वच म्हणायला हवी.
जगन्नाथराय विचार करू लागले, पार्वती
शंभूवरील तिच्या नितातं प्रेमाने त्याचा वामभाग व्यापून राहिली तर गंगेला शंभूने
माथ्यावरील जटांमधे स्थान दिले. अशा कर्तृत्ववान, मनस्विनी, चिरतरूण, स्वाभिमानी
सौंदर्यवतींना सवत कशी मान्य व्हावी? पार्वती तर जगज्जननी! तिला गंगेचा अवखळपणा
कसा सहन व्हावा! त्रिपुरारी भगवान शिवांच्या मस्तकावरून नाचत, खेळत, उड्यामारत
खाली उतरणार्या गंगेच्या लाटांनी शिवाच्या अपार प्रेमाने त्याचे अर्धे अंग बनूनन
राहिलेल्या पार्वतीच्या भांगात उडवलेल्या तुषारांनी जणु मोत्याची माळच गुंफली!
तिच्या भांगात इतस्ततः पसरणार्या ह्या लहरी पाहून, पार्वतीचे डोळे रागाने लाल
झाले. तिने आपल्या कोमल कांती असलेल्या मृदुल हातांनी गंगेच्या लहरींना दूर लोटले.
अचानक दोघी सवतीसमोर आल्यावर दोघींचाही क्रोध अनावर होणारच.
पार्वतीने हाताने दूर ढकलल्यावर, सवतीकडून
झालेला गंगेचा अपमान गंगेला कसा सहन व्हावा? ती रागाने उसळून उठली. पार्वती
जगज्जननी असल्याने तिच्या क्रोधाची दहशत वाटणही स्वाभाविक आहे. भय आणि क्रोघ ह्या
दोन्ही भावनांनी गंगेच्या लाटा उंच उंच उसळत आहेत.
जगन्नाथ राय म्हणतात, माय! क्रोधाने उसळणार्या ह्या तुझ्या उंच उंच लाटा पाहिल्यावर अस वाटतं की, जगात तुझ्या लाटांचा उत्कर्षच होत आहे. माय, तुझ्या ह्या उंच उसळणार्या लाटा कायम विजयी होवोत. (40)
कपर्दादुल्लस्य प्रणयमिलदर्धाङ्गयुवतेः
पुरारेः प्रेङ्खन्त्यो मृदुलतरसीमन्तसरणौ ।
भवान्या सापत्न्यस्फुरितनयनं कोमलरुचा
करेणाक्षिप्तास्ते जननि विजयन्तां लहरयः।। 40 ।।
अन्वय – हे जननि,
प्रणयमिलदर्धांगयुवतेः पुरारेः कपर्दात् उल्लस्य मृदुलतरसीमन्तसणौ प्रेंखन्त्यः,
भवान्यः कोमलरुचा करेण सापत्न्यस्फुरितनेत्रं आक्षिप्ताः ते लहरयः विजयन्ताम् ।
अन्वयार्थ - हे मातः – हे माते! ; प्रणयः – स्नेह ; प्रणयमिलंती
– स्नेहाने नित्य संयोग पावणारी, अर्धांग - शरीराचा अर्धा भाग ; युवतिः
– स्त्री ; यस्य- ज्याची, म्हणजे प्रेमाने ज्याचे अर्धे अंग व्यापून, संयोग होउन जी पार्वती राहिली आहे
अशा; पुरारेः – त्रिपुरासुराचा अरि म्हणजे शत्रू त्या शिवाच्या, कपर्दात्
– जटांमधून ; उल्लस्य – नाचत, खेळत, उड्या मारत, प्रकट होत; मृदुलतर
– (उमेच्या)अत्यंत कोमल, सीमन्तसरणौ – (केसांच्या) भांगामध्ये; प्रेंखंन्त्यः
– इतस्ततः पसरणार्या भवान्या – पार्वतीकडून; कोमलरुचा करेण –
अत्यंत कोमल कांती असलेल्या हाताने ; सापत्न्य स्फुरित नयनं – सवतीमत्सराने
रागाने डोळे मोठे व लाल झालेल्या पार्वतीकडून आक्षिप्ता ते – हाताने दूर लोटल्या जात आहेत अशा
तुझ्या ; लहरयः – लाटा ; विजयन्ताम् – उत्कर्ष पावोत, विजयी होवोत.
जटाजूटातूनी विहरत शिवाच्या उतरसी
जलाचे मोती हे उधळित दिशांना विखरुनी ।
लयीमध्ये घेसी सुबक गिरक्या नृत्य करता
अगे डौलामध्ये ठुमकत जटातून तयिच्या ।। 40.1 ।।
पुरारीच्यासंगे अवचित दिसे कोण युवती
म्हणोनी पाहे तू अपरिचित सौंदर्यवति ही ।
घनिष्ठप्रेमाने बिलगुन शिवाच्या तनुस जी
उरे जी शंभूच्या अविरतचि अर्धांग स्वरुपी ।। 40.2 ।।
तरंगावेगाने सहज जलमोती उधळता
तिच्या भांगामध्ये तव जलमणी माळ दिसता ।
बघे कोपाने ती तुजसि रमणी रक्तनयना
तरंगांना देई ढकलुन करांनी मृदु तिच्या ।। 40.3 ।।
करीता दूरी गे तुजसिच असे लोटुन करे
महा क्रोधाने तू थरथरचि कापे जललते ।
तयाने लाटा ज्या उसळति उत्तुंग गगनी
घडो ह्या लाटांचा अविरतचि उत्कर्ष जगती ।। 40.3 ।।
(जल-निकर – जलबिंदुंचा समुदाय)
---------------------------------------------------

Comments
Post a Comment