श्लोक 38

 

  

श्लोक 38



रात्रीकडे नेणारा संधिकाळ (प्रदोषकाळ) मोठा विलक्षण असतो. मनात विचारांची आवर्तनं निर्माण करणारा असतो. मनाची अस्वस्थता वाढवणारा, हुरहुर लावणारा असतो.

दोन नद्यांच्या संगमाजवळ दोन वेगवेगळे प्रवाह मिळाल्यावर दोन्ही प्रवाहात ‘पाणी’ च असलं तरी; त्यांचे वेगळे रंग, त्यांचे वाहण्याचे निराळे ढंग, त्यांच्या न्यार्‍या चवी , त्यांचे विभिन्न गुणधर्म ह्यांचा मिलाप होतां होता साधलं जाणारं अभिन्न भिन्नपण एक वेगळाच चित्रपट तयार करत जातं.

तर संधिकाळात प्रकाश आणि अंधाराची गूढ सरभेसळ , एकत्रीकरण ह्यांचं आकाशात चाललेलं हे नाट्य हळु हळु पृथ्वीवरही उतरत जातं आणि गूढ रहस्यमय वातावरण तयार करतं.

जगन्नाथराय आयुष्याच्या संध्येच्या तीरावर उभा आहे. अशावेळेला जणु काही आकाश, पृथ्वी आणि जगन्नाथरायांच्या मनात दाटून आलेली सांज अशा तिन्हीसांजा एकत्र आल्या आहेत. ह्या रहस्यमय वातावरणात आकाशात प्रकाशाच्या पसरणार्‍या विविध छटांमधे त्यांना शिवशंभू तांडवनृत्य करीत असावेत असा भास होत असावा.  पुष्पदंतालाही असाच प्रत्यय त्याच्या शिवमहिम्नात आला आहे.(श्लोक16)

अहो घेता शंभू कितिक गिरक्या नृत्यसमयी

करांच्या मुद्रांनी थरथरचि कापे जगतही ।

जटा संभाराची शिथिल सुटता गाठ शिरीची

उडे केसांचा हा विपुल तव संभार भवती ।।

 

महेशा जेंव्हा तू भयद करिसी तांडव भुवी

तुझ्या मुद्रांनी या थरथरचि कापे जगतही ।

तुझ्या ह्या बाहूंची धडक बसुनी नृत्यसमयी

नभीची नक्षत्रे तुटुन पडती ही विखरुनी ।।

 

 रात्रीकडे घेऊन जाणार्‍या संध्यासमयी आकाशात विविध रंगाचे झोत पसरलेले पाहून  जगन्नाथालाही ह्या शिवतांडवाचा येणारा प्रत्यय वर्णन करताना तो म्हणतो, ‘ माझ्यासमोर ह्या विश्वमय विश्वनाथ शिवाचं अद्भुत तांडव सुरू आहे. अशा वेळेला त्याच्या तांडव नृत्याने त्याचा जटासंभार शिथिल झाल्याने ह्या ‘उद्धृत व्योमकेशा’च्या जटा वर उडत आहेत. सर्वत्र विखुरल्या आहेत. आकाशभर पसरल्या आहेत.

त्या जटांचा सपकारा गंगेच्या तीरावर बसल्याने गंगेमधे उठणार्‍या गोलवा निर्माण झालेल्या लाटा ह्या तिच्या सुघड बाहूंप्रमाणे दिसत आहेत.  जणु काही ही जललता विविध हस्तमुद्रा करत तिच्या जललहरींच्या नृत्याने शिवाच्या तांडवाला साथ देत असल्याप्रमाणे दिसत आहेत. पार्वती तिच्या लास्य नृत्यासाठी प्रसिद्ध आहे. पण गंगा ही स्त्रियांमधे अशी विशेष आहे की, शिवासोबत तीही शास्त्रशुद्ध तांडव नृत्य करते.

गंगेच्या काठाला ज्या कपारी तयार झाल्या आहेत, त्यात वारंवार हे पाणी खुंदळत राहण्याने, घोळवलं जात असल्याने जणु काही शिवाचा डमरू वाजत आहे असा भास होत आहे. गंगा आणि गंगाधराच्या तांडव  नृत्याला ह्या डमरूच्या  खळ्ळ खळ्ळ  वा डम डम डम बोलांनी नटलेल्या तालाची जोड मिळाल्याने ते अधिक बहारदार झाले आहे.  हे सुरवर कल्लोलिनी हे माझी माय गे! शिवाच्या तांडवाला साथ देणारं तुझं हे नीरनृत्य मी अनिमेष नेत्रांनी बघत आहे. माझ्या पापांमुळे भोगत असलेल्या माझ्या ह्या दारूण दुःखांना ते  पदरात घेवो. (38)

 

प्रदोषान्तर्नृत्यत्पुरमथनलीलोद्धृतजटा-

तटाभोगप्रेङ्खल्लहरिभुजसंतानविधुतिः।

बिलक्रोडक्रीडज्जलडमरुडंकारसुभग-

स्तिरोधत्तां तापं  त्रिदशतटिनीताण्डवविधिः।। 38 ।।

अन्वय – प्रदोषान्तः नृत्यत्पुरमथनलीलोद्धृतजटातटाभोगप्रङ्खल्लहरिभुजसंतानविधुतिः बिलक्रोडक्रीडज्जलडमरुटंकारसुभगः त्रिदशतटिनीताण्डवविधिः (मम) तापं तिरोधत्ताम् । (38)

अन्वयार्थ - हे मातः  – हे माते! ; प्रदोषान्तर् ( प्रदोषस्य अंतर्) सूर्यास्तानंतरच्या सहा घटिका इतक्या समयांतर्गत म्हणजेच समयामध्ये, किंवा प्रदोष हे शिवासंबंधी केले जाणारे खास व्रतही आहे; नृत्यन् – नाचणारा ; पुरमथन – शिव, त्याच्या लीला, या लीलेने उद्धृताः ऊर्ध्वप्रसारितजटाः -वर उडणार्‍या जटा, त्यांचा तटाभोगः -संयोगसंबंध, त्याने प्रेंखन्त्यः – हालणार्‍या, लहर्यः – लाटा, त्याच जणु भुजाः – हात, त्यांच्या संतानं – दीर्घ करणे, लीलेने इतस्ततः नाचवणे व विधुतिः – कंप, थरथर, हलणे यस्मिन् – ज्याच्यामधे अशा प्रदोषकाळी शिवाचे तांडव नृत्य चालले असता, त्याच्या जटेचा घात तुझ्या तीरावर झाल्यामुळे चंचल झालेल्या लहरीरूपी हातांच्या लांब जवळ हालण्याने योग्य हाव भाव साकार करीत होणारे नृत्य; बिलक्रोड – तीरावर असलेल्या कपारी त्यात क्रीडत् – खेळणारे, खळखळणारे जल- पाणी ; जणु काही डमरू टंकारः -  डमरूचा मधुर आवाज त्याने सुभग – सुंदर  झालेले त्रिदश तटिनी तांडव विधिः – देवांची नदी गंगा तिचे नृत्य मम – माझे तापं – पापांमुळे होणारे दुःख, कष्ट तिरोधत्तां –झाकून घेवोत, दूर करोत. (38)

 

प्रदोषावेळी तो पुरमथन जे तांडव करी

तयाच्या आवेगे सकलचि जटाभार सुटुनी ।

जटा त्याच्या सार्‍या वरति उडती ह्या दशदिशी

पुर्‍या आकाशी त्या पसरति कशा अद्भुत अती ।। 38.1 ।।

 

जटांचा लागोनी सपकन तडाखा तव तटी

प्रवाही गंगेच्या किति कितिक लाटा उसळती ।

असे वाटे तेव्हा विविध करमुद्राच करिसी

तुझ्या लाटांच्या ह्या सुघटित भुजांसी हलवुनी ।। 38.2।।

 

कपारींमध्ये हे जल डमरु वाजे खळखळा

अहो त्याच्या ठेक्यावर थिरकता रंगत महा ।

शिवासंगे तूही जणु करितसे तांडव भुवी

तुझ्या ह्या नृत्याने शमवि मम गे दुःख जननी ।। 38.3 ।।


---------------------------------------------------

 

Comments

Popular posts from this blog

गंगालहरी अनुक्रमणिका

श्लोक 1

श्लोक 3