श्लोक 36
श्लोक 36
एकेकाळी ऐश्वर्य पायी लोळण घेणारा जगन्नाथराय
निराधार, निराश्रित अवस्थेत असतानाही गंगेच्या घाटाच्या पायर्यांवर शांत, गाढ
झोपलेला पाहून अपय्या दीक्षितांना तिरिमिरी आली असावी. त्याला उठवीत अत्यंत
उपहासाने ते त्याला म्हणाले, ‘अरे निर्लज्जासारखं वस्त्रहीन अवस्थेत येथे असं गाढं
झोपायला तुला काहीच कसं वाटत नाही? झोप
बाबा झोप तू झोपलास तरी गंगा सदैव जागी आहे.’
मला वाटतं, अप्पय्यांच्या ह्याच खोचक
प्रश्नाचं, कुत्सित, बोचर्या टिकेचं उत्तर जगन्नाथ ह्या 36 व्या श्लोकात देत आहेत.
त्यांचा वाद अप्पय्यांशीही राहिला नाही. आईच्या कुशीत शिरलेलं लेकरू जसं जगाची
पर्वा न करता फक्त आईशी बोलत राहतं त्याप्रमाणे ते गंगेलाच आपलं मनोगत सांगत आहेत.
माय, तूच सांग अमुक एक करायच आहे, तमुक
मिळवायचं आहे अशा इच्छा, आकांक्षांनी प्रेरित झालेल्या कोणा व्यक्तीला कधी गाढ
निद्रा अनुभवता येईल का? ह्या जगात प्रत्येकजण आपला काही ना काही उद्देश सफळ
व्हावा म्हणून कार्यरत आहेत.
कित्येक लोक लोकांच्या हितासाठी,
कल्याणासाठी झटत असतात. कित्येक शुद्ध अंतःकरणाचे लोक उत्तम लोकाच्या प्राप्तीची इच्छा
मनात धरून असतात. आणि स्वतःच्या तपाने, सदाचरणाने ते इह आणि परलोकीही उत्तम कीर्ती
संपादन करतात.
परंतु माय, मला काहीही मिळवायचं राहिलेलं नाही.
मला काही अपेक्षाही नाही. काही मिळविण्याच्या इच्छेने मी झपाटलोही नाही आणि झटतही
नाही. अत्यंत त्यक्तकामा, अत्यंत निर्विकारपणे सर्व घटना साक्षीभावाने पहात आहे.
मी अनन्य भावाने तुझ्याकडे आलो आहे. तुझ्याशिवाय अन्य मला कोणी नाही. माय, लोकांना
कळत नाही की, मला तुझ्या किनार्यावर इतक्या गाढ निद्रेचा अनुभव कसा काय मिळत
असावा ? तर ऐक, जग ज्याचं आश्रयस्थान आहे असा हा जगन्नाथ तुला सांगतो आहे, माय! ,
माझ्या सर्व चिंतांचा भार तुझ्या खांद्यावर टाकल्यावर मला चिंता ती काय? तू तर
कृपासागर आहेस. माय तुझ्या कृपेने मी निश्चिंत आहे. तुझ्या खांद्यावर इहपरलोकाचा
भार निःशंकपणे टाकल्यावर मला गाढ निद्रा कशी येणार नाही?
कियन्तः सन्त्येके नियतमिह लोकार्थघटकाः
परे पूतात्मान: कति च परलोकप्रणयिनः।
सुखं शेते मातस्तव खलु कृपातः पुनरयं
जगन्नाथः शश्वत्त्वयि निहितलोकद्वयभरः ।। 36 ।।
अन्वय – हे मातः, इह कियन्तः
एके लोकार्थघटकाः नियतं कति परे च पूतात्मानः परलोकप्रणयिनः(सन्ति) अयं जगन्नाथः
पुनः त्वयि निहितलोकद्वयभर तव कृपातः शश्वत् सुखं खलु शेते । (36)
अन्वयार्थ - हे मातः – हे माते! ; इह – ह्या जगामध्ये; कियन्तः
– काही थोडेसे, अल्प प्रमाणात; एके – काही श्रेष्ठ जन ; लोकार्थघटकाः – लोककार्ये घडवून आणणारे
म्हणजे परहितासाठी झटणारे ; सन्ति – असतात ; नियतं – निश्चितच ; कति
– काही ; च – आणि ; परे –
इतर ; पूतात्मानः – (तप, सदाचरणाने) आपला आत्मा पवित्र केला आहे असे; परलोकप्रणयिनः
– उत्तम लोक मनापासून इच्छिणारे, त्यावर प्रेम करणारे, तेथे जाणारे ; सन्ति - असतात ; अयं जगन्नाथः – हा
जगन्नाथ ( जग ज्याचे आश्रयस्थान आहे असा जगन्नाथ कवी (ह्या ठिकाणी पंडितराय
जगन्नाथ आपण निराश्रित आहोत असे समजून गंगेला आपल्यावर कृपादृष्टी टाकण्यासाठी
विनवत आहे. ) पुनः – तर ; त्वयि – तुझ्यावर ; निहित -
ठेवलेला लोकद्वयभरः – दोन्ही लोकांचा भार ; तव – तुझ्या ; कृपातः
– कृपेने ; शश्वत् – निरंतर; सुखं – सुखाने ; खलु च –
निश्चयाने ; शेते – शयन करतो.
जनांच्या कल्याणा निरत झटती लोकचि किती
किती पुण्यात्मे हे सुखद सुरलोका मिळविती।
अगे दोन्ही लोकी विमल यश कीर्ती मिळविती
तयासाठी कोणी बहुतचि अविश्रांत झटती ।।36.1
अगे माते माझा इह-परचि हा भार सगळा
अती विश्वासाने जननि तव खांद्यावर दिला।
जगन्नाथासी या लवभर न चिंता छळतसे
इथे घेई निद्रा जननि तव तीरावर सुखे ।। 36.2 ।।
---------------------------------------------------
श्लोक 37
एकदा एक वेडा, पाण्यात पडलेला विंचू बाहेर काढायचा प्रयत्न करत होता. पण दरवेळेला तो विंचू स्वतः पाण्यात बुडत असतानाही; त्याचा हात जवळ आला की त्याला डंख मारायला बघत होता. शेवटी एका पानाच्या सहाय्याने त्याने त्याला बाहेर काढता काढता सुद्धा त्या विंचवाने त्याला डंख मारला. हे बघणारा एक जण म्हणाला, ‘ विंचू हा विंचूच आहे. तो तुला डंख मारत असतानाही त्याला पाण्याबाहेर काढायचा नस्ता वेडेपणा तुला कोणी सांगितला होता?’ त्यावर तो वेडा म्हणाला, ‘डंख मारणं हा त्या विंचवाचा स्वभावच आहे. आणि त्याला बुडताना पाहून त्याला बाहेर काढणं हा माझा स्वभाव आहे.’ तो वेडा दुसरा तिसरा कोणी नसून महान संत रामकृष्ण परमहंसच होते.
जो तो ज्याचा त्याचा स्वभाव हा जन्मजात घेऊन येतो. निसर्गाने त्याला तो दिलेला असतो. तो बदलणं मोठी अवघड गोष्ट आहे. जगन्नाथराय म्हणतात,
माय, तू मला म्हणशील की, ‘तू आधी पापाचरण करून नंतर मला पापातून मुक्त कर अशी मला विनंती करण्यापेक्षा पापच करू नकोस नं!’ तर तसं होणं शक्य नाही. तू व्रात्य (उपनयनादि संस्कार न झालेला), अधम(नीच), पतित(पापी), पाखंड (नास्तिक) अशा किती प्रकारच्या पापी लोकांना त्यांच्या अनेक पापांमधून निरंतर मुक्ति देत असतेस. तुझी ह्या कामातील रुची इतकी विलक्षण आहे की, त्रैलोक्याचा कारभार बघणारे ब्रह्मा, विष्णू, महेश ह्यांचंही लक्ष त्यांच्या कामावरून एकवेळ ढळेल पण तुझ्या कामात जराही शिथिलता येणार नाही. तुझं पापक्षालनाचं काम तू निरंतर करत आहेस. तुझ्या ह्या कामात थोडीही ढील संभवत नाही. ते करताना तू दमतही नाहीस. कारण, हा तुझा स्वभावच आहे.
माय तसा माझ्या मनात पापाचरणाचा ओढा इतका जागृत आहे की, पापे करण्यापासून मी मला थांबवू शकत नाही. तो माझा स्वभाव आहे. स्वभाव बदलणं, अथवा त्या स्वभावाला मुरड घालणं ना तुला शक्य आहे ना मला! आपण दोघेही आपल्या आपल्या भूमिकेवर ठाम आहोत. माझ्या सारख्या पाप्यांनी पापे करीत रहावीत आणि तुझ्यासारख्या त्यांचा कळवळा येणार्या वात्सल्यमय मातेनी ती झाकून घेत रहावीत, या दोघांच्याही स्वभावाला औषध नाही. (37)
भवत्या हि व्रात्याधमपतितपाखण्डपरिषत्-
परित्राणस्नेह: श्लथयितुमशक्यः खलु यथा।
ममाप्येवं प्रेमा दुरितनिवहेष्वम्ब जगति
स्वभावोऽयं सर्वैरपि खलु यतो दुष्परिहरः।। 37 ।।
अन्वय – हे अम्ब यथा भवत्या हि व्रात्याधमपतितपाखंडपरिषत्परित्राणस्नेहः श्लथयितुं खलु अशक्यः एवं दुरितनिवहेषु प्रेमा ममाऽपि श्लथयितुं अशक्यः (अस्ति) यतः जगति अयं स्वभावः सर्वैः अपि दुष्परिहरः खलु ।(37)
अन्वयाार्थ - हे अम्ब – हे माते ; यथा – जसा, ज्याप्रमाणे ; भवत्या – तुला, तुझ्याकडून, तुझा ; हि – सुद्धा ; व्रात्याधमपतितपाखण्डपरिषत्-परित्राणस्नेह: - व्रात्य(संस्कारहीन) , अधम (नीच), पतित(पापी), पाखंड(नास्तिक) ह्यांच्या सभेचे परित्राण म्हणजे पाप दूर करण्याविषयीचा स्नेह श्लथयितुं – सैल, ढिला, शिथील करण्यास अशक्यः – अशक्य ; खलु च – खरोखर असाच ; दुरितनिवहेषु – पातकांच्या समुहामध्ये, पातकां विषयी; मम – माझा ; अपि – सुदधा ; प्रेमा – प्रीती ; श्लथयितुं अशक्यः – ढिले करण्यास अशक्य (आहे) ; यतः – कारण ; जगति – ह्या जगामध्ये; अयं – हा; स्वभावः – स्वभाव ; दुष्परिहरः – कितीही कष्ट करून बदलण्यास कठीण; खलु - खरोखर. (37)
जगी या पाखंडी अधम पतितांचीच भरती
तयांच्या उद्धारा जननि असशी तू दृढव्रती ।
दुराचारी कोणी अधम असु दे नास्तिक कुणी
अशाही लोकांचा बहु कळवळा गे तव हृदी ।। 37.1 ।।
स्वभावामध्येची सहजचि वसे स्नेह तुझिया
उणावे ना थोडे जननि तव वात्सल्य, ममता ।
परी माते आहे मज जटिल पापातच रती
शके ना घालू मी मुरड मम कृत्यांस लवही ।। 37.2 ।।
स्वभावामध्ये गे जननि अपुल्या अंतर किती
न सोडी तू स्नेहा; दुरित करणे गे कधिच मी ।
स्वभावा कोणी का बदलु शकतो ह्याचि जगती
स्वभावाला नाही जगति कुठले औषध परी ।। 37.3 ।।
---------------------------------------------------

Comments
Post a Comment