श्लोक 35
श्लोक 35
जगन्नाथ पंडित म्हणतात, हे माय, ह्या वसुंधरेला तू तिचं महान ऐश्वर्य प्रतित होतेस. तू स्वतः तर निर्मळ पवित्र आहेसच पण तुझ्या संपर्कात येणार्या सर्वांचे दुरीत दूर करतेस. सर्वाना तुझ्यासमान निर्मळ करतेस. मग ते कुणी जनसामान्य असो वा प्राणीपक्षी असो वा महा बलवान पंचमहाभूतापैकी कोणी असो.
ह्या पंचमहाभूतांपैकी वायूच बघ ना! कोणालाही फुलातून सुगंध चोरायची कला वा तंत्र अवगत नाही. कोणीही जी चोरी करू शकत नाही ती तो हसत हसत करतो. सदासर्वदा फुलांचा सुगंध बिनदिक्कत चोरत असतो.
अनेक वेळा माणसांना त्यांच्या अत्यंत जवळच्या, प्राणांपलिकडे प्रिय असलेल्या व्यक्तीच्या मृत्यूला सामोरं जावं लागतं. काही वेळेला शिक्षण, नोकरी अशा अनेक कारणांनी त्यांची ताटातूट होते. तर काही वेळा आपलेच प्रियजन आपल्याला दूर लोटतात. तेव्हा त्यांचा विरह मनाला अत्यंत पीडा देणारा असतो. शस्त्राप्रमाणे घायाळ करणारा घातक असतो. प्रियजनांच्या विरहरूपी
शस्त्राने ज्यांचे हृदय घायाळ झाले आहे, विदीर्ण झाले आहे अशा लोकांचे प्राण हरण करण्याचे कामही हा पवन हा हा म्हणता करतो.
प्राण हे वायूरूप असतात. माणूस जिवंत आहे का मरण पावला हे पाहण्यासाठी त्याच्या नाकासमोर पूर्वी सूत धरत. श्वसन चालू नसेल तर सूत हलत नाही. ‘गतवति वायौ देहापाये भार्या बिभ्यति तस्मिन् काये’ (देहातील वायू निघून गेले म्हणजेच श्वास सोडून गेले की पत्नीही त्या मृत शरीराला घाबरते) असा श्री आद्य शंकराचार्यांच्या चर्पटपञ्जरीतील उल्लेख आहे. जगन्नाथ पंडित म्हणतात, शरीरातील पंचप्राण चोरण्याचे भयंकर पापकर्म हा वारा क्षणार्धात करतो.
माय, ह्या पवमानाचे जेव्हा सर्वांना निर्मल करण्याची कीर्ती असलेल्या तुझ्या ह्या लहरींसंगे मिलन होते, हे वारे जेव्हा तुझ्या प्रवाहाला चाटून जातात, तुझ्या लहरींसवे मिसळतात, तेव्हा जलौघाच्या गाढ स्पर्शानेच, त्याची ही सर्व पापे धुवून तू त्या परधन आणि परप्राण हरण करणार्या वार्यालाही निर्मल करतेस. तुझ्या लाटांच्या, तरंगाच्या स्पर्शाने पाप आणि तापाने दग्ध झालेला वाराही परत थंडगार, निर्मळ होऊन सार्या जगाची पापे दूर करण्यासाठी सर्वत्र संचार करतो. तोही सर्व जीवांना सुखावतो. हे केवढे आश्चर्य! हा सर्व तुझ्या ह्या पुनित लाटांचा, मृदुल लहरींचा महिमा आहे
( ह्या संदर्भाने ‘हनुमन्नाटक’ (7-19) मधे
एक छान श्लोक आहे. दगड कधी पाण्यात तरंगतात का? ते कधीच तरंगत नाहीत उलट ते तरंगणार्यालाही
बुडवतात. पण जेव्हा इतरांनाही बुडवणारे दगड स्वतः तरून एखाद्या प्रचंड वानर सेनेलाही
तारून नेतात तेव्हा तो महिमा ना दगडांचा असतो, ना पाण्याचा असतो, ना वानरांचा
असतो. तो महिमा तर श्रीरामाचा असतो. त्याप्रमाणे येथे त्रिभुवनाला तात्काळ पुनित
करण्याचा हा महिमा वार्याचा नसून गंगेचा आहे.
ये मज्जंति निमज्जयंति च परांस्ते प्रस्तरा
दुस्तरे
वार्धौ वीर तरन्ति वानरभटान्
संतारयन्तेऽपि च
नैते ग्रावगुणा न वारिधिगुणा, नो वानराणां
गुणाः
श्रीमद्दाशरथेः प्रतापमहिमा सोऽयं समुजृम्भते।।)
----
अलभ्यं सौरभ्यं हरति सततं यः सुमनसां
क्षणादेव प्राणानपि विरहशस्त्रक्षतहृदां।
त्वदीयानां लीलाचलितलहरीणां व्यतिकरात्
पुनीते सोऽपि द्रागहह पवमानस्त्रिभुवनम् ।। 35 ।।
अन्वय – (भो अम्ब) यः सुमनसां अलभ्यं सौरभ्यं सततं हरति (तथा) क्षणाद् एव विरहशस्त्रक्षतहृदां प्राणान् अपि (हरति) सः अपि पवमानः त्वदीयानां लीलाचलितलहरीणां व्यतिकरात् द्राक् त्रिभुवनं पुनीते अहह! (35)
अन्वयार्थ - हे जननि – हे माझ्या माते गंगे ; यः - जो ; सुमनसां – फुलांचा ; अलभ्यं -इतरांस अप्राप्य ; सौरभ्यं – सुगंधाला ; सततं – नेहमी, निरंतर ; हरति – हरण करतो, चोरतो; तथा – त्याप्रमाणे; क्षणात् एव – क्षणभरात ; विरह-शस्त्र-क्षत-हृदाम् – (पत्नी वा इतर कोणाच्या) वियोगाच्या शस्त्राने ज्याचे हृदय विदीर्ण झाले आहे अशा पुरुषांच्या; प्राणान् – प्राणांना ; अपि – सुद्धा ; हरति – हरण करतो; सः – तो महापातककर्ता ; पवमानः – वायु; अपि – सुद्धा ; त्वदीयानां – तुझ्या ; लीलाचलितलहरिणा – चंचल झालेल्या लाटांच्या व्यतिकरात् – सम्मिश्रण वा संगमामुळे ; द्राक – शीघ्र; त्रिभुवनम् – त्रैलोक्याला; पुनीते – पवित्र करतो ; अहह – काय हे आश्चर्य! (35)
न ये कोणा हाती परिमल फुलांतील कधिही
परी त्याची चोरी पवन करतो नित्य सहजी ।
वियोगाचा कैसा शर करिच घायाळ हृदया
अशांच्याही प्राणा हरण करि वायू सहज गा।। 35.1 ।।
हरे सातत्याने सुमनधन वा प्राणधन जो
रूची ठेवे वायू गहन अपराधात नित जो ।
तरंगांमध्ये गे मिसळुनि पुन्हा हो पुनित तो
जगाच्या उद्धारा त्रिभुवनि फिरे पुण्यगति तो ।। 35.2 ।।
अनोखा कैसा हा जननि लहरींचाच महिमा
जयांचे होते गे मिलन लहरींच्यासह तुझ्या ।
मिटोनी पापे ते सबळचि कसे होति इतुके
क्षणार्धामध्ये ते त्रिभुवन करीती पुनित हे ।। 35.3 ।।
---------------------------------------------------

Comments
Post a Comment