श्लोक 35 ते 53 संस्कृत, मराठी विश्लेषणासहित



जगन्नाथ पण्डितकृता पीयूषलहरी / गङ्गालहरी (विश्लेषण)

श्लोक 35 - 53

श्लोक 35

जगन्नाथ पंडित म्हणतात, हे माय, ह्या वसुंधरेला तू तिचं महान ऐश्वर्य प्रतित होतेस. तू स्वतः तर निर्मळ पवित्र आहेसच पण तुझ्या संपर्कात येणार्‍या सर्वांचे दुरीत दूर करतेस. सर्वाना तुझ्यासमान निर्मळ करतेस. मग ते कुणी जनसामान्य असो वा प्राणीपक्षी असो वा महा बलवान पंचमहाभूतापैकी कोणी असो.

 ह्या पंचमहाभूतांपैकी  वायूच बघ ना! कोणालाही फुलातून सुगंध चोरायची कला वा तंत्र अवगत नाही. कोणीही जी चोरी करू शकत नाही ती तो हसत हसत करतो.  सदासर्वदा फुलांचा सुगंध बिनदिक्कत चोरत असतो.

अनेक वेळा माणसांना त्यांच्या अत्यंत जवळच्या, प्राणांपलिकडे प्रिय असलेल्या व्यक्तीच्या मृत्यूला सामोरं जावं लागतं. काही वेळेला शिक्षण, नोकरी अशा अनेक कारणांनी त्यांची ताटातूट होते. तर काही वेळा आपलेच प्रियजन आपल्याला दूर लोटतात. तेव्हा त्यांचा विरह मनाला अत्यंत पीडा देणारा असतो. शस्त्राप्रमाणे घायाळ करणारा घातक असतो.  प्रियजनांच्या विरहरूपी शस्त्राने ज्यांचे हृदय घायाळ झाले आहे, विदीर्ण झाले आहे अशा लोकांचे प्राण हरण करण्याचे कामही हा पवन हा हा म्हणता करतो.

प्राण हे वायूरूप असतात. माणूस जिवंत आहे का मरण पावला हे पाहण्यासाठी त्याच्या नाकासमोर पूर्वी सूत धरत. श्वसन चालू नसेल तर सूत हलत नाही. ‘गतवति वायौ देहापाये भार्या बिभ्यति तस्मिन् काये’ (देहातील वायू निघून गेले म्हणजेच श्वास सोडून गेले की पत्नीही त्या मृत शरीराला घाबरते) असा श्री आद्य शंकराचार्यांच्या चर्पटपञ्जरीतील उल्लेख आहे. जगन्नाथ पंडित म्हणतात, शरीरातील पंचप्राण चोरण्याचे भयंकर पापकर्म हा वारा क्षणार्धात करतो.

माय, ह्या पवमानाचे जेव्हा सर्वांना निर्मल करण्याची कीर्ती असलेल्या तुझ्या ह्या लहरींसंगे मिलन होते, हे वारे जेव्हा तुझ्या प्रवाहाला चाटून जातात, तुझ्या लहरींसवे मिसळतात, तेव्हा जलौघाच्या गाढ स्पर्शानेच, त्याची ही सर्व पापे धुवून तू त्या परधन आणि परप्राण हरण करणार्‍या वार्‍यालाही निर्मल करतेस. तुझ्या लाटांच्या, तरंगाच्या स्पर्शाने पाप आणि तापाने दग्ध झालेला वाराही परत थंडगार, निर्मळ होऊन सार्‍या जगाची पापे दूर करण्यासाठी सर्वत्र संचार करतो. तोही सर्व जीवांना सुखावतो. हे केवढे आश्चर्य! हा सर्व तुझ्या ह्या पुनित लाटांचा, मृदुल लहरींचा महिमा आहे.

 ----

अलभ्यं सौरभ्यं हरति सततं यः सुमनसां

क्षणादेव प्राणानपि विरहशस्त्रक्षतहृदां।

त्वदीयानां लीलाचलितलहरीणां व्यतिकरात्

पुनीते सोऽपि द्रागहह पवमानस्त्रिभुवनम् ।। 35 ।।

अन्वय – (भो अम्ब) यः सुमनसां अलभ्यं सौरभ्यं सततं हरति (तथा) क्षणाद् एव विरहशस्त्रक्षतहृदां प्राणान् अपि (हरति) सः  अपि पवमानः त्वदीयानां लीलाचलितलहरीणां व्यतिकरात् द्राक् त्रिभुवनं पुनीते अहह!

अन्वयार्थ - हे जननि – हे माझ्या माते गंगे ; यः - जो ; सुमनसां – फुलांचा ; अलभ्यं -इतरांस अप्राप्य ; सौरभ्यं – सुगंधाला ; सततं – नेहमी, निरंतर ; हरति – हरण करतो, चोरतो; तथा – त्याप्रमाणे; क्षणात् एव – क्षणभरात ; विरह-शस्त्र-क्षत-हृदाम् – (पत्नी  वा इतर कोणाच्या) वियोगाच्या शस्त्राने ज्याचे हृदय विदीर्ण झाले आहे अशा पुरुषांच्या; प्राणान् – प्राणांना ; अपि – सुद्धा ; हरति – हरण करतो; सः – तो महापातककर्ता ; पवमानः – वायु; अपि – सुद्धा ; त्वदीयानां – तुझ्या ; लीलाचलितलहरिणा – चंचल झालेल्या लाटांच्या व्यतिकरात् – सम्मिश्रण वा संगमामुळे  ; द्राक – शीघ्र; त्रिभुवनम् – त्रैलोक्याला; पुनीते – पवित्र करतो ; अहह – काय हे आश्चर्य!

 

न ये कोणा हाती  परिमल फुलांतील कधिही

परी त्याची चोरी पवन करतो नित्य सहजी

वियोगाचा कैसा शर करिच घायाळ हृदया

अशांच्याही प्राणा हरण करि वायू सहज गा।। 35.1 ।।

 

हरे सातत्याने सुमनधन वा प्राणधन जो

रूची ठेवे वायू गहन अपराधात नित जो 

तरंगांमध्ये गे  मिसळुनि पुन्हा हो पुनित तो

जगाच्या उद्धारा त्रिभुवनि फिरे पुण्यगति तो ।। 35.2 ।।

 

अनोखा कैसा हा जननि लहरींचाच महिमा

जयांचे होते गे मिलन लहरींच्यासह तुझ्या ।

मिटोनी पापे ते सबळचि कसे होति इतुके

क्षणार्धामध्ये ते त्रिभुवन करीती पुनित हे ।। 35.3 ।।

 ह्या संदर्भाने ‘हनुमन्नाटक’ (7-19) मधे एक छान श्लोक आहे. दगड कधी पाण्यात तरंगतात का? ते कधीच तरंगत नाहीत उलट ते तरंगणार्‍यालाही बुडवतात. पण जेव्हा इतरांनाही बुडवणारे दगड स्वतः तरून एखाद्या प्रचंड वानर सेनेलाही तारून नेतात तेव्हा तो महिमा ना दगडांचा असतो, ना पाण्याचा असतो, ना वानरांचा असतो. तो महिमा तर श्रीरामाचा असतो. त्याप्रमाणे येथे त्रिभुवनाला तात्काळ पुनित करण्याचा हा महिमा वार्‍याचा नसून गंगेचा आहे.

ये मज्जंति निमज्जयंति च परांस्ते प्रस्तरा दुस्तरे

वार्धौ वीर तरन्ति वानरभटान् संतारयन्तेऽपि च

नैते ग्रावगुणा न वारिधिगुणा, नो वानराणां गुणाः

श्रीमद्दाशरथेः प्रतापमहिमा सोऽयं समुजृम्भते।।

---------------------------------------------------


श्लोक 36

एकेकाळी ऐश्वर्य पायी लोळण घेणारा जगन्नाथराय निराधार, निराश्रित अवस्थेत असतानाही गंगेच्या घाटाच्या पायर्‍यांवर शांत, गाढ झोपलेला पाहून अपय्या दीक्षितांना तिरिमिरी आली असावी. त्याला उठवीत अत्यंत उपहासाने ते त्याला म्हणाले, ‘अरे निर्लज्जासारखं वस्त्रहीन अवस्थेत येथे असं गाढं  झोपायला तुला काहीच कसं वाटत नाही? झोप बाबा झोप तू झोपलास तरी गंगा सदैव जागी आहे.’

मला वाटतं, अप्पय्यांच्या ह्याच खोचक प्रश्नाचं, कुत्सित, बोचर्‍या टिकेचं उत्तर जगन्नाथ ह्या 36 व्या श्लोकात देत आहेत. त्यांचा वाद अप्पय्यांशीही राहिला नाही. आईच्या कुशीत शिरलेलं लेकरू जसं जगाची पर्वा न करता फक्त आईशी बोलत राहतं त्याप्रमाणे ते गंगेलाच आपलं मनोगत सांगत आहेत.

माय, तूच सांग अमुक एक करायच आहे, तमुक मिळवायचं आहे अशा इच्छा, आकांक्षांनी प्रेरित झालेल्या कोणा व्यक्तीला कधी गाढ निद्रा अनुभवता येईल का? ह्या जगात प्रत्येकजण आपला काही ना काही उद्देश सफळ व्हावा म्हणून कार्यरत आहेत.

कित्येक लोक लोकांच्या हितासाठी, कल्याणासाठी झटत असतात. कित्येक शुद्ध अंतःकरणाचे लोक उत्तम लोकाच्या प्राप्तीची इच्छा मनात धरून असतात. आणि स्वतःच्या तपाने, सदाचरणाने ते इह आणि परलोकीही उत्तम कीर्ती संपादन करतात.

परंतु माय, मला काहीही मिळवायचं राहिलेलं नाही. मला काही अपेक्षाही नाही. काही मिळविण्याच्या इच्छेने मी झपाटलोही नाही आणि झटतही नाही. अत्यंत त्यक्तकामा, अत्यंत निर्विकारपणे सर्व घटना साक्षीभावाने पहात आहे. मी अनन्य भावाने तुझ्याकडे आलो आहे. तुझ्याशिवाय अन्य मला कोणी नाही. माय, लोकांना कळत नाही की, मला तुझ्या किनार्‍यावर इतक्या गाढ निद्रेचा अनुभव कसा काय मिळत असावा ? तर ऐक, जग ज्याचं आश्रयस्थान आहे असा हा जगन्नाथ तुला सांगतो आहे, माय! , माझ्या सर्व चिंतांचा भार तुझ्या खांद्यावर टाकल्यावर मला चिंता ती काय? तू तर कृपासागर आहेस. माय तुझ्या कृपेने मी निश्चिंत आहे. तुझ्या खांद्यावर इहपरलोकाचा भार निःशंकपणे टाकल्यावर मला गाढ निद्रा कशी येणार नाही?

 

कियन्तः सन्त्येके नियतमिह लोकार्थघटकाः

परे पूतात्मान: कति च परलोकप्रणयिनः।

सुखं शेते मातस्तव खलु कृपातः पुनरयं

जगन्नाथः शश्वत्त्वयि निहितलोकद्वयभरः ।। 36 ।।

अन्वय – हे मातः, इह कियन्तः एके लोकार्थघटकाः नियतं कति परे च पूतात्मानः परलोकप्रणयिनः(सन्ति) अयं जगन्नाथः पुनः त्वयि निहितलोकद्वयभर तव कृपातः शश्वत् सुखं खलु शेते । (36)

अन्वयार्थ - हे मातः  – हे माते! ; इह – ह्या जगामध्ये; कियन्तः – काही थोडेसे, अल्प प्रमाणात; एके – काही श्रेष्ठ जन ;  लोकार्थघटकाः – लोककार्ये घडवून आणणारे म्हणजे परहितासाठी झटणारे ; सन्ति – असतात ; नियतं – निश्चितच ; कति – काही ;  च – आणि ; परे – इतर ; पूतात्मानः – (तप, सदाचरणाने) आपला आत्मा पवित्र केला आहे असे; परलोकप्रणयिनः – उत्तम लोक मनापासून इच्छिणारे, त्यावर प्रेम करणारे, तेथे जाणारे ; सन्ति  - असतात ; अयं जगन्नाथः – हा जगन्नाथ ( जग ज्याचे आश्रयस्थान आहे असा जगन्नाथ कवी (ह्या ठिकाणी पंडितराय जगन्नाथ आपण निराश्रित आहोत असे समजून गंगेला आपल्यावर कृपादृष्टी टाकण्यासाठी विनवत आहे. ) पुनः – तर ; त्वयि – तुझ्यावर ; निहित - ठेवलेला लोकद्वयभरः – दोन्ही लोकांचा भार ; तव – तुझ्या ; कृपातः – कृपेने ; शश्वत् – निरंतर; सुखं – सुखाने ; खलु च – निश्चयाने ; शेते – शयन करतो. (36)

 

जनांच्या कल्याणा निरत झटती लोकचि किती

किती पुण्यात्मे हे सुखद सुरलोका मिळविती।

अगे दोन्ही लोकी विमल यश कीर्ती मिळविती

तयासाठी कोणी बहुतचि अविश्रांत झटती ।।36.1

 

अगे माते माझा इह-परचि हा भार सगळा

अती विश्वासाने जननि तव खांद्यावर दिला।

जगन्नाथासी या लवभर न  चिंता छळतसे

इथे घेई निद्रा जननि तव तीरावर सुखे ।। 36.2 ।।  

---------------------------------------------------

श्लोक 37

एकदा एक वेडा, पाण्यात पडलेला विंचू बाहेर काढायचा प्रयत्न करत होता. पण दरवेळेला तो विंचू स्वतः पाण्यात बुडत असतानाही; त्याचा हात जवळ आला की त्याला डंख मारायला बघत होता. शेवटी एका पानाच्या सहाय्याने त्याने त्याला बाहेर काढता काढता सुद्धा त्या विंचवाने त्याला डंख मारला. हे बघणारा एक जण म्हणाला, ‘ विंचू हा विंचूच आहे. तो तुला डंख मारत असतानाही त्याला पाण्याबाहेर काढायचा नस्ता वेडेपणा तुला कोणी सांगितला होता?’ त्यावर तो वेडा म्हणाला, ‘डंख मारणं हा त्या विंचवाचा स्वभावच आहे. आणि त्याला बुडताना पाहून त्याला बाहेर काढणं हा माझा स्वभाव आहे.’ तो वेडा दुसरा तिसरा कोणी नसून महान संत रामकृष्ण परमहंसच होते.

जो तो ज्याचा त्याचा स्वभाव हा जन्मजात घेऊन येतो. निसर्गाने त्याला तो दिलेला असतो. तो बदलणं मोठी अवघड गोष्ट आहे. जगन्नाथराय म्हणतात,

माय, तू मला म्हणशील की, ‘तू आधी पापाचरण करून नंतर मला पापातून मुक्त कर अशी मला विनंती करण्यापेक्षा पापच करू नकोस नं!’ तर तसं होणं शक्य नाही. तू व्रात्य (उपनयनात विद्यार्थ्यांना व्रते म्हणजे नियम सांगत असत.ते न पाळणारा, व संस्कारहीन), अधम(नीच), पतित(पापी), पाखंड (नास्तिक) अशा किती प्रकारच्या पापी लोकांना त्यांच्या अनेक पापांमधून निरंतर मुक्ति देत असतेस. तुझी ह्या कामातील रुची इतकी विलक्षण आहे की, त्रैलोक्याचा कारभार बघणारे ब्रह्मा, विष्णू, महेश ह्यांचंही लक्ष त्यांच्या कामावरून एकवेळ ढळेल पण तुझ्या कामात जराही शिथिलता येणार नाही. तुझं पापक्षालनाचं काम तू निरंतर करत आहेस. तुझ्या ह्या कामात थोडीही ढील संभवत नाही. ते करताना तू दमतही नाहीस. कारण, हा तुझा स्वभावच आहे.

माय तसा माझ्या मनात पापाचरणाचा ओढा इतका जागृत आहे की, पापे करण्यापासून मी मला थांबवू शकत नाही. तो माझा स्वभाव आहे. स्वभाव बदलणं, अथवा त्या स्वभावाला मुरड घालणं ना तुला शक्य आहे ना मला! आपण दोघेही आपल्या आपल्या भूमिकेवर ठाम आहोत. माझ्या सारख्या पाप्यांनी पापे करीत रहावीत आणि तुझ्यासारख्या त्यांचा कळवळा येणार्‍या वात्सल्यमय मातेनी ती सतत झाकून घ्यावीत, या दोघांच्याही स्वभावाला औषध नाही.

 

भवत्या हि व्रात्याधमपतितपाखण्डपरिषत्-

परित्राणस्नेह: श्लथयितुमशक्यः खलु यथा।

ममाप्येवं प्रेमा दुरितनिवहेष्वम्ब जगति

स्वभावोऽयं सर्वैरपि खलु यतो दुष्परिहरः।।37

अन्वय – हे अम्ब यथा भवत्या हि व्रात्याधमपतितपाखंडपरिषत्परित्राणस्नेहः श्लथयितुं खलु अशक्यः एवं दुरितनिवहेषु प्रेमा ममाऽपि श्लथयितुं अशक्यः (अस्ति) यतः जगति अयं स्वभावः सर्वैः अपि दुष्परिहरः खलु ।

अन्वयाार्थ -  हे अम्ब – हे माते ; यथा – जसा, ज्याप्रमाणे ; भवत्या – तुला, तुझ्याकडून, तुझा ; हि – सुद्धा ; व्रात्याधमपतितपाखण्डपरिषत्-परित्राणस्नेह: - व्रात्य( उपनयनात विद्यार्थ्यांना व्रते म्हणजे नियम सांगतात. ते न पाळणारा व संस्कारहीन) , अधम (नीच), पतित(पापी), पाखंड(नास्तिक) ह्यांच्या सभेचे परित्राण म्हणजे पाप दूर करण्याविषयीचा स्नेह श्लथयितुं – सैल, ढिला, शिथील करण्यास अशक्यः – अशक्य ; खलु च – खरोखर असाच ; दुरितनिवहेषु – पातकांच्या समुहामध्ये, पातकां विषयी; मम – माझा ; अपि – सुदधा ; प्रेमा – प्रीती ; श्लथयितुं अशक्यः – ढिले करण्यास अशक्य (आहे) ; यतः – कारण ; जगति – ह्या जगामध्ये; अयं – हा; स्वभावः – स्वभाव ; दुष्परिहरः – कितीही कष्ट करून बदलण्यास कठीण; खलु - खरोखर. (37)

जगी या पाखंडी अधम पतितांचीच भरती

तयांच्या उद्धारा जननि असशी तू दृढव्रती ।

दुराचारी कोणी अधम असु दे नास्तिक कुणी

अशाही लोकांचा बहु कळवळा गे तव हृदी ।। 37.1 ।।

 

स्वभावामध्येची सहजचि वसे स्नेह तुझिया

उणावे ना थोडे जननि तव वात्सल्य, ममता ।

परी माते आहे मज जटिल पापातच रती

शके ना घालू मी मुरड मम कृत्यांस लवही ।। 37.2 ।।

 

स्वभावामध्ये गे जननि अपुल्या अंतर किती

न सोडी तू स्नेहा; दुरित करणे गे कधिच मी ।

स्वभावा कोणी का बदलु शकतो ह्याचि जगती

स्वभावाला नाही जगति कुठले औषध परी ।। 37.2 ।।

  ---------------------------------------------------

श्लोक 38

श्लोक 38

रात्रीकडे नेणारा संधिकाळ (प्रदोषकाळ) मोठा विलक्षण असतो. मनात विचारांची आवर्तनं निर्माण करणारा असतो. मनाची अस्वस्थता वाढवणारा, हुरहुर लावणारा असतो.

दोन नद्यांच्या संगमाजवळ दोन वेगवेगळे प्रवाह मिळाल्यावर दोन्ही प्रवाहात ‘पाणी’ च असलं तरी; त्यांचे वेगळे रंग, त्यांचे वाहण्याचे निराळे ढंग, त्यांच्या न्यार्‍या चवी , त्यांचे विभिन्न गुणधर्म ह्यांचा मिलाप होतां होता साधलं जाणारं अभिन्न भिन्नपण एक वेगळाच चित्रपट तयार करत जातं.

तर संधिकाळात प्रकाश आणि अंधाराची गूढ सरभेसळ , एकत्रीकरण ह्यांचं आकाशात चाललेलं हे नाट्य हळु हळु पृथ्वीवरही उतरत जातं आणि गूढ रहस्यमय वातावरण तयार करतं.

जगन्नाथराय आयुष्याच्या संध्येच्या तीरावर उभा आहे. अशावेळेला जणु काही आकाश, पृथ्वी आणि जगन्नाथरायांच्या मनात दाटून आलेली सांज अशा तिन्हीसांजा एकत्र आल्या आहेत. ह्या रहस्यमय वातावरणात आकाशात प्रकाशाच्या पसरणार्‍या विविध छटांमधे त्यांना शिवशंभू तांडवनृत्य करीत असावेत असा भास होत असावा.  पुष्पदंतालाही असाच प्रत्यय त्याच्या शिवमहिम्नात आला आहे.(श्लोक16)

अहो घेता शंभू कितिक गिरक्या नृत्यसमयी

करांच्या मुद्रांनी थरथरचि कापे जगतही ।

जटा संभाराची शिथिल सुटता गाठ शिरीची

उडे केसांचा हा विपुल तव संभार भवती ।।

 

महेशा जेंव्हा तू भयद करिसी तांडव भुवी

तुझ्या मुद्रांनी या थरथरचि कापे जगतही ।

तुझ्या ह्या बाहूंची धडक बसुनी नृत्यसमयी

नभीची नक्षत्रे तुटुन पडती ही विखरुनी ।।

 

 रात्रीकडे घेऊन जाणार्‍या संध्यासमयी आकाशात विविध रंगाचे झोत पसरलेले पाहून  जगन्नाथालाही ह्या शिवतांडवाचा येणारा प्रत्यय वर्णन करताना तो म्हणतो, ‘ माझ्यासमोर ह्या विश्वमय विश्वनाथ शिवाचं अद्भुत तांडव सुरू आहे. अशा वेळेला त्याच्या तांडव नृत्याने त्याचा जटासंभार शिथिल झाल्याने ह्या ‘उद्धृत व्योमकेशा’च्या जटा वर उडत आहेत. सर्वत्र विखुरल्या आहेत. आकाशभर पसरल्या आहेत.

त्या जटांचा सपकारा गंगेच्या तीरावर बसल्याने गंगेमधे उठणार्‍या गोलवा निर्माण झालेल्या लाटा ह्या तिच्या सुघड बाहूंप्रमाणे दिसत आहेत.  जणु काही ही जललता विविध हस्तमुद्रा करत तिच्या जललहरींच्या नृत्याने शिवाच्या तांडवाला साथ देत असल्याप्रमाणे दिसत आहेत. पार्वती तिच्या लास्य नृत्यासाठी प्रसिद्ध आहे. पण गंगा ही स्त्रियांमधे अशी विशेष आहे की, शिवासोबत तीही शास्त्रशुद्ध तांडव नृत्य करते.

गंगेच्या काठाला ज्या कपारी तयार झाल्या आहेत, त्यात वारंवार हे पाणी खुंदळत राहण्याने, घोळवलं जात असल्याने जणु काही शिवाचा डमरू वाजत आहे असा भास होत आहे. गंगा आणि गंगाधराच्या तांडव  नृत्याला ह्या डमरूच्या  खळ्ळ खळ्ळ  वा डम डम डम बोलांनी नटलेल्या तालाची जोड मिळाल्याने ते अधिक बहारदार झाले आहे.  हे सुरवर कल्लोलिनी हे माझी माय गे! शिवाच्या तांडवाला साथ देणारं तुझं हे नीरनृत्य मी अनिमेष नेत्रांनी बघत आहे. माझ्या पापांमुळे भोगत असलेल्या माझ्या ह्या दारूण दुःखांना ते पदरात घेवो. (38)


प्रदोषान्तर्नृत्यत्पुरमथनलीलोद्धृतजटा-

तटाभोगप्रेङ्खल्लहरिभुजसंतानविधुतिः।

बिलक्रोडक्रीडज्जलडमरुडंकारसुभग-

स्तिरोधत्तां तापं  त्रिदशतटिनीताण्डवविधिः।। 38 ।।

अन्वय – प्रदोषान्तः नृत्यत्पुरमथनलीलोद्धृतजटातटाभोगप्रङ्खल्लहरिभुजसंतानविधुतिः बिलक्रोडक्रीडज्जलडमरुटंकारसुभगः त्रिदशतटिनीताण्डवविधिः (मम) तापं तिरोधत्ताम् ।

अन्वयार्थ - हे मातः  – हे माते! ; प्रदोषान्तर् ( प्रदोषस्य अंतर्) सूर्यास्तानंतरच्या सहा घटिका इतक्या समयांतर्गत म्हणजेच समयामध्ये, किंवा प्रदोष हे शिवासंबंधी केले जाणारे खास व्रतही आहे; नृत्यन् – नाचणारा ; पुरमथन – शिव, त्याच्या लीला, या लीलेने उद्धृताः ऊर्ध्वप्रसारितजटाः -वर उडणार्‍या जटा, त्यांचा तटाभोगः -संयोगसंबंध, त्याने प्रेंखन्त्यः – हालणार्‍या, लहर्यः – लाटा, त्याच जणु भुजाः – हात, त्यांच्या संतानं – दीर्घ करणे, लीलेने इतस्ततः नाचवणे व विधुतिः – कंप, थरथर, हलणे यस्मिन् – ज्याच्यामधे अशा प्रदोषकाळी शिवाचे तांडव नृत्य चालले असता, त्याच्या जटेचा घात तुझ्या तीरावर झाल्यामुळे चंचल झालेल्या लहरीरूपी हातांच्या लांब जवळ हालण्याने योग्य हाव भाव साकार करीत होणारे नृत्य; बिलक्रोड – तीरावर असलेल्या कपारी त्यात क्रीडत् – खेळणारे, खळखळणारे जल- पाणी ; जणु काही डमरू टंकारः -  डमरूचा मधुर आवाज त्याने सुभग – सुंदर  झालेले त्रिदश तटिनी तांडव विधिः – देवांची नदी गंगा तिचे नृत्य मम – माझे तापं – पापांमुळे होणारे दुःख, कष्ट तिरोधत्तां – झाकून घेवोत, दूर करोत.

  

प्रदोषावेळी तो पुरमथन जे तांडव करी

तयाच्या आवेगे सकलचि जटाभार सुटुनी ।

जटा त्याच्या सार्‍या वरति उडती ह्या दशदिशी

पुर्‍या आकाशी त्या पसरति कशा अद्भुत अती ।। 38.1 ।।

 

जटांचा लागोनी सपकन तडाखा तव तटी

प्रवाही गंगेच्या किति कितिक लाटा उसळती ।

असे वाटे तेव्हा विविध करमुद्राच करिसी

तुझ्या लाटांच्या ह्या सुघटित भुजांसी हलवुनी ।। 38.2।।

 

कपारींमध्ये हे जल डमरु वाजे खळखळा

अहो त्याच्या ठेक्यावर थिरकता रंगत महा ।

शिवासंगे तूही जणु करितसे तांडव भुवी

तुझ्या ह्या नृत्याने शमवि मम गे दुःख जननी ।। 38.3 ।।

---------------------------------------------------

श्लोक 39

मोठ्या मिजाशीत फणा काढून फुत्कारणार्‍या आणि इतरांना दहशत निर्माण करणार्‍या नागाला चुकून जरी छोटीशी जखम झाली तरी, मुंग्यांना बरोबर त्या रक्ताचा वास येतो. इतरवेळेला क्षुद्र वाटणार्‍या अगणित मुंग्या जखमेचा मागोवा घेत त्याच्या जखमेला घेरतात, डसतात, पोखरतात, जखम मोठी करतात. आणि बघता बघता कुरतडून कुरतडून त्याचं सर्व शरीर खाऊन टाकतात.

 त्याप्रमाणे आपले ऐश्वर्य, विद्या, प्रत्युत्पन्न मति आणि प्रतिभा दिमाखात मिरवणार्‍या ह्या जगन्नाथाचा राजसत्तेचा आश्रय सुटताच काळ फिरला. त्याची परिस्थती प्रतिकूल होताच, सर्व क्षुद्र मनोवृत्तीचे लोक त्याच्यावर तुटून पडले.  ह्या क्षुद्र मनोवृत्तीच्या लोकांमधे अपय्यांसारखे पंडितही होते मग बाकींच्यांविषयी काय विचारता. अनेक पात्रता नसेलेलेही पुढे सरसावले नाहीत तरच नवल! सर्वांनी त्याला बहिष्कृत केले. जिणे अशक्य केले.

त्यामुळे अत्यंत उद्विग्न झालेला आणि गंगेला अनन्य भावाने शरण आलेला जगन्नाथराय गंगेला कळवळून म्हणत आहे, ‘माय गे मी माझ्यासाठी काय श्रेयस्कर आहे ह्याचा विचार न करता माझ्या कुशलमंगलाचा, क्षेमकल्याणाच्या चिंतेचा सर्व भार कायमचा तुझ्यावर टाकला आहे.

आज सर्वजण माझ्या विरोधात उभे आहेत. अत्यंत प्रतिकूल काळ माझ्यासमोर ठाकला आहे. माय! आकाशच फाटलं तर त्याला कुठे कुठे ठिगळं लावणार? जगानी माझ्याकडे पाठ फिरवलीच आहे; पण, माय माझ्या अशा कठीण काळात तूही माझी साथ सोडलीस, ह्या तुझ्या लेकराला टाकून गेलीस तर, ‘गंगा शरण आलेल्यांना पदरात घेते’ ह्या लोकांच्या ठाम विश्वासाला प्रचंड हादरे बसतील माय! तीनही लोकातील विश्वास लयास जाईल. लोकांच्या विश्वासालाच तडा जाईल. इतके दिवस असलेला लोकांचा भरवसा अस्तास जाईल. आईशिवाय मुलावर निःस्सीम,प्रेम कोणी करू शकेल का गं?  आता तुझ्या कुशीत शिरण्यासाठी उतावीळ झालेल्या ह्या जगन्नाथाला जर तू झिडकारलस तर, आईचं निर्व्याज प्रेम, निष्कपट करुणा पोरकी होईल माय! तिने तुझ्याशिवाय कोठे जावे?

सदैव त्वय्येवार्पितकुशलचिन्ताभरमिमं

यदि त्वं मामम्ब त्यजसि समयेऽस्मिन्सुविषमे।

तदा विश्वासोऽयं त्रिभुवनतलादस्तमयते

निराधारा चेयं भवति खलु निर्व्याजकरुणा ।। 39 ।।

 

अन्वय – हे अम्ब, सदैव त्वय्येव अर्पितकुशलचिंताभरं इमं मां अस्मिन् सुविषमे समये यदि त्वं त्यजसि तदा अयं विश्वासः ; त्रिभुवनतलात् अस्तं अयते । इयं च खलु निर्व्याजकरुणा निराधारा भवति । (39)

अन्वयार्थ - हे मातः  – हे माते! ; सदा एव – नेहमीच ; त्वयि एव – तुझ्यावरच ; अर्पितः – दिला आहे,  स्थिर केला आहे; कुशलचिंताभरम्- कल्याणाच्या चिंतेचा भार ; येन – ज्याने ; इमं मां – ह्या मला ; अस्मिन् – ह्या , सुविषम समये – अत्यंत कठीण, दुस्तर अशा प्रसंगी ; यदि त्वं – जर तू ; त्यजसि – टाकशील, सोडून देशील ; तदा – तर ; अयं विश्वासः – (गंगा शरणागताचे रक्षण करते) हा विश्वास ; त्रिभुवनतलात् – त्रैलो्क्याच्या तळापासून ; अस्तं अयते – अस्तास जाईल, नष्ट होईल ; इयं च खलु – खरोखर ही निरंतर तुझ्या जवळ असणारी ; निर्व्याज करुणा – निष्कपट करुणा, दया ; निराधारा – आधार रहित, पोरकी ; भवति – होईल.(39)

 

अगे कल्याणाची फिकिर मुळि केली न कधि मी

दिले चिंता-ओझे तुजवर सदा सोपवुन मी ।

सदा विश्वासूनी तुजवरचि निश्चिंतचि असे

परी आता माते समय फिरला पूर्ण मम गे ।। 39.1 ।।

 

अगे दुर्दैवाच्या मजसि बसता क्रूर थपडा

नको सोडू माझ्या बिकट समयी तूच मजला ।

तडा विश्वासासी जननि जर गेलाच तर गे

दयाळू सर्वांसीअशि विमल कीर्ती तव बुडे ।। 39.2 ।।

 

जगा ठावी आहे जननि तव निर्व्याज करुणा

शिशूसी ना देसी, जग म्हणतसे अंतर कदा

परी माते जाशी मजसि झिडकारूनच अशी

तरी कारुण्याला कठुनचि उरे आश्रय जगी ।। 39.3 ।।

---------------------------------------------------

श्लोक 40

नजरेसमोर गंगेच्या उसळणार्‍या उत्तुंग लाटा पाहून जगन्नाथरायाच्या मनातही कल्पनाविलासाच्या उत्तुंग लाटा निर्माण झाल्या असाव्यात. शिवाच्या दोन्ही कर्तृत्ववान ललनांची तुलना मनात केली गेली असावी.

पार्वती असो वा गंगा असो दोघींमधे कोण श्रेष्ठ हे ठरवणं कठीण! दोघीही जगाच्या कल्याणाचा वसा घेऊनच जन्माला आलेल्या. दोघी गुणवती, दोघीही राखेतून जग निर्माण करण्याचं अद्भुत सामर्थ्य बाळगून! प्रलयकाळी यद् दृष्ट्म् तत् नष्टम् करून टाकणारा शिव; मदनाला भस्म करून त्याची राख अंगाला लावणारा भस्मचर्चित शिव हा दोघींचा जोडीदार असूनही त्याच शून्यातून परत जग निर्माण करायची पार्वतीची धमक अनन्यसाधारणच म्हणावी लागेल; तर कपिलमुनींनी शापाने जाळून राख केलेले सगराचे साठ हजार पुत्र राखेतून उभे करणारी गंगा अभूतपूर्वच म्हणायला हवी.

जगन्नाथराय विचार करू लागले, पार्वती शंभूवरील तिच्या नितातं प्रेमाने त्याचा वामभाग व्यापून राहिली तर गंगेला शंभूने माथ्यावरील जटांमधे स्थान दिले. अशा कर्तृत्ववान, मनस्विनी, चिरतरूण, स्वाभिमानी सौंदर्यवतींना सवत कशी मान्य व्हावी? पार्वती तर जगज्जननी! तिला गंगेचा अवखळपणा कसा सहन व्हावा! त्रिपुरारी भगवान शिवांच्या मस्तकावरून नाचत, खेळत, उड्यामारत खाली उतरणार्‍या गंगेच्या लाटांनी शिवाच्या अपार प्रेमाने त्याचे अर्धे अंग बनूनन राहिलेल्या पार्वतीच्या भांगात उडवलेल्या तुषारांनी जणु मोत्याची माळच गुंफली! तिच्या भांगात इतस्ततः पसरणार्‍या ह्या लहरी पाहून, पार्वतीचे डोळे रागाने लाल झाले. तिने आपल्या कोमल कांती असलेल्या मृदुल हातांनी गंगेच्या लहरींना दूर लोटले. अचानक दोघी सवतीसमोर आल्यावर दोघींचाही क्रोध अनावर होणारच.

पार्वतीने हाताने दूर ढकलल्यावर, सवतीकडून झालेला गंगेचा अपमान गंगेला कसा सहन व्हावा? ती रागाने उसळून उठली. पार्वती जगज्जननी असल्याने तिच्या क्रोधाची दहशत वाटणही स्वाभाविक आहे. भय आणि क्रोघ ह्या दोन्ही भावनांनी गंगेच्या लाटा उंच उंच उसळत आहेत.

जगन्नाथ राय म्हणतात, माय! क्रोधाने उसळणार्‍या ह्या तुझ्या उंच उंच लाटा पाहिल्यावर अस वाटतं की, जगात तुझ्या लाटांचा उत्कर्षच होत आहे. माय, तुझ्या ह्या उंच उसळणार्‍या लाटा कायम विजयी होवोत. (40

 

कपर्दादुल्लस्य प्रणयमिलदर्धाङ्गयुवतेः

पुरारेः प्रेङ्खन्त्यो मृदुलतरसीमन्तसरणौ

भवान्या सापत्न्यस्फुरितनयनं कोमलरुचा

करेणाक्षिप्तास्ते जननि विजयन्तां लहरयः।। 40 ।।

 

अन्वय – हे जननि, प्रणयमिलदर्धांगयुवतेः पुरारेः कपर्दात् उल्लस्य मृदुलतरसीमन्तसणौ प्रेंखन्त्यः, भवान्यः कोमलरुचा करेण सापत्न्यस्फुरितनेत्रं आक्षिप्ताः ते लहरयः विजयन्ताम् ।

अन्वयार्थ - हे मातः  – हे माते! ; प्रणयः – स्नेह ; प्रणयमिलंती – स्नेहाने नित्य संयोग पावणारी, अर्धांग - शरीराचा अर्धा भाग ; युवतिः – स्त्री ; यस्य- ज्याची, म्हणजे प्रेमाने ज्याचे अर्धे  अंग व्यापून, संयोग होउन जी पार्वती राहिली आहे अशा; पुरारेः – त्रिपुरासुराचा अरि म्हणजे शत्रू त्या शिवाच्या, कपर्दात् – जटांमधून ; उल्लस्य – नाचत, खेळत, उड्या मारत, प्रकट होत; मृदुलतर – (उमेच्या)अत्यंत कोमल, सीमन्तसरणौ – (केसांच्या) भांगामध्ये; प्रेंखंन्त्यः – इतस्ततः पसरणार्‍या भवान्या – पार्वतीकडून; कोमलरुचा करेण – अत्यंत कोमल कांती असलेल्या हाताने ; सापत्न्य स्फुरित नयनं – सवतीमत्सराने रागाने डोळे मोठे व लाल झालेल्या पार्वतीकडून आक्षिप्ता  ते – हाताने दूर लोटल्या जात आहेत अशा तुझ्या ; लहरयः – लाटा ; विजयन्ताम् – उत्कर्ष पावोत, विजयी होवोत.

जटाजूटातूनी विहरत शिवाच्या उतरसी

जलाचे मोती हे उधळित दिशांना विखरुनी ।

लयीमध्ये घेसी सुबक गिरक्या नृत्य करता

अगे डौलामध्ये ठुमकत जटातून तयिच्या ।। 40.1 ।।


 

पुरारीच्यासंगे अवचित दिसे कोण युवती

म्हणोनी पाहे तू अपरिचित सौंदर्यवति ही ।

घनिष्ठप्रेमाने बिलगुन शिवाच्या तनुस जी

उरे जी शंभूच्या अविरतचि अर्धांग स्वरुपी ।। 40.2 ।।

 

तरंगावेगाने सहज जलमोती उधळता

तिच्या भांगामध्ये तव जलमणी माळ दिसता ।

बघे कोपाने ती तुजसि रमणी रक्तनयना

तरंगांना देई ढकलुन करांनी मृदु तिच्या ।। 40.3 ।।

 

करीता दूरी गे तुजसिच असे लोटुन करे

महा क्रोधाने तू थरथरचि कापे जललते ।

तयाने लाटा ज्या उसळति उत्तुग गगनी 

घडो ह्या लाटांचा अविरतचि उत्कर्ष जगती ।। 40.3 ।।

(जल-निकरजलबिंदुंचा समुदाय) 

---------------------------------------------------


(जगन्नाथाचा हा श्लोक आजच्या Gen Z च्या चष्म्यातून पाहिला तर महादेवांनी पत्नीला दिला ground fl. Flat तर प्रेयसीला मात्र Top floor terrace Flat! प्रेयसी टॉप फ्लोअर वरून कॅपश्यूल लिफ्टमधून उरताना महादेवांच्या गळ्यात हात घालून त्यांना लगटून मोठ्या तोर्‍यात बाहेर पडताना समोरच उभ्या असलेल्या कर्तबगार, सौंदर्यवती पत्नीकडे पाहून जर आपल्या गळ्यातील एखादा मोत्याचा कंठा जर तिला देऊ केला तर ती स्वीकारेल काय? ती स्वतःच अरबोपती असलेली पत्नी हा अपमान कसा सहन करू शकेल? सवतीमत्सराने लाल लाल डोळे झालेली पार्वती तो मोत्याचा कंठा आपल्या हाताने झिडकारूनचच टाकेल. त्या करोडोपति असलेल्या त्या प्रेयसीने देऊ केलेला कंठा तिच्या दृष्टीने मातीमोल तर आहेच पण तिच्या स्वाभिमानाला ठेच लागेल असाच आहे. पण त्यामुळे घाबरून गेलेल्या गंगेची हृदयाची धडधड वाढली खरी! ती तिच्या उंच उंच उसळणार्‍या लांटांमधून दिसून येऊ लागली.)


---------------------------------------------------

श्लोक 41

माणसाच्या देहबोलीतून, त्याच्या नेत्रातून, त्याच्या शब्दांच्या आर्ततेतून त्याचा खरेपणा, सत्यता प्रत्ययाला येत असते. जगन्नाथरायाचं गंगेविषयीचं अपार प्रेम त्याच्या शब्दा शब्दातून व्यक्त होत आहे. त्याची आपल्या गंगामातेविषयी असलेली ओढ ही इतर लोकांप्रमाणे काही हेतू मनात धरून नाही.

जन्मदात्री गर्भश्रीमंत आहे का सामान्य आहे; नामांकित, प्रसिद्ध व्यक्ती आहे का कोणी तिच्या अस्तित्वाची दखलही घेतली नाही अशी दुर्लक्षित व्यक्ती आहे;  ह्याचं ज्ञान शिशुला नसतं. त्याला ही माझी आई आहे आणि मला पाहिजे तेव्हा मी तिला बिलगु शकतो, प्रेमाने तिच्यावर अधिकार गाजवू शकतो एवढाच अनन्यभाव मनात असतो.

जगन्नाथ राय म्हणतात, कोणा दात्याच्या औदार्याचा, दानशूरपणाचा बोलबाला जनामधे पसरायला वेळ लागत नाही. हा हा म्हणता लोकांच्या बोलण्यातून त्याच्या दातृत्वाची कीर्ती फार लवकर सर्वत्र पसरते. त्याच्याकडे याचकांची रीघ लागते.

हे माय, तुझ्या मनात सदैव प्राणीमात्रांच्या कल्याणाचीच चिंता असते. तू सतत लोकहितास्तव जागरूक असतेस. तू लोकांना जे जे हवं असेल ते अभीष्ट तर देतेसच पण त्यांच्या कल्पनेपेक्षाही जास्त दान देतेस. कोणालाही विन्मुख पाठवत नाहीस. तुझ्या दानीपणाची कीर्ती ऐकून तुझ्याजवळ काही ना काही याचना करायला येणार्‍यांची रीघ लागली आहे. तुझ्या ह्या दातृत्वामुळेच लोक तुला इतका मान देतात. सर्व लोकांना तू पूजनीय आहेस.

माय, मी तुझी स्तुती करत तुझ्याजवळ उभा असल्याने, तुला वाटत असेल, ह्या अशा अनेक याचकांप्रमाणेच मीही काहीतरी मागण्यासाठी तुझ्याकडे आलो असेन; तर माय, तसं मात्र नाही. मला तुझ्याकडून काहीही अपेक्षा नाही.  माय मी शपथपूर्वक सांगतो, तुझ्याविषयी माझ्या मनात अपार प्रेम आहे. एखादे लेकरू जसे अनन्यभावाने त्याच्या आईला बिलगते तसा मी तुझ्यापाशी आलो आहे कारण तू माझा एकमेव आसरा आहेस. विश्रांतीस्थान आहेस. (41)

 

 

प्रपद्यन्ते लोकाः कति न भवतीमत्रभवती-

मुपाधिस्तत्रायं स्फुरति यदभीष्टं वितरसि

शपे तुभ्यं मातर्मम तु पुनरात्मा सुरधुनि

स्वभावादेव त्वय्यमितमनुरागं विधृतवान् ।। 41 ।।

अन्वय – हे मातः सुरधुनि ! अत्रभवतीं भवतीं कति लोकाः न प्रपद्यन्ते यत् (त्वं) अभीष्टं वितरसि तत्र अयं उपाधिः स्फुरति । मम पुनः  आत्मा तु स्वभावादेव त्वयि अमितं अनुरागं विधृतवान् इति तुभ्यं शपे। (41)

 

अन्वयार्थ - हे मातः  – हे माते! ; धुनिः – नदी, हे सुरधुनि – हे  देवनदी गंगे ; अत्रभवतीं – ह्या लोकात पूज्य अशा ; भवतीं – तुला ; कति – कोण ; लोकाः न प्रपद्यन्ते-  लोक शरण येत नाहीत?; यद् – ज्याअर्थी ; अभीष्टं - (शरण आलेल्यांचे) इच्छित फल ; वितरसि – देतेस ; तत्र - त्याविषयी ; अयं - हा उपाधिः – विशेषता, मुख्य कारण ; स्फुरति – जागरूक आहे. ; मम – माझे ; पुनः – तर ; आत्मा – अंतःकरण ; तु – तर ; स्वभावात् एव – स्वभावतःच, मुळातच ; त्वयि - तुझ्या ठिकाणी ; अमितं – असीम, अत्यंत ; अनुराग – प्रीती ; विधृतवान् – धारण करते. ; इति – हे  तुभ्यं – तुला  शपे – शपथ घेऊन सांगतो. (41)

 

किती घ्यावे घेता करहि अपुरे दोन पडती

सदा देणारी ही रिति न कधि हो ओंजळ तुझी ।

अगे देसी इच्छेहुन कितिक तू जास्त पटीनी

अशी कीर्ती मोठी तव पसरता हे सुरधुनि ।। 41.1 ।। --

 

न येती कैसे गे शरण तुजला लोक सगळे

नसे कैसी तू गे सकलचि जना वंद्य सरिते।

कहाणी ना माझी परि इतर लोकांसम असे

तुझ्या ओढीने गे नित झुरत अंतःकरण हे ।। 41.2 ।।

 

असे सत्याचे हे मम वचन; ना अनृत फुके

अगे घेऊनी मी शपथ तुजला सांगत असे ।

अपेक्षा ना माझी तुजकडुन काहीच जननि

अगे प्रीती माझी तुजवर असे उत्कट अती ।। 41.3 ।।

(अनृत – खोटे)

---------------------------------------------------

श्लोक 42

 

आपल्या सनातन धर्माप्रमाणे भगवंत आपल्या देहातच राहतो. जर देह देवाचे मंदिर असेल तर मस्तक हे त्या मंदिराचा कळस आहे. ह्या कळसाची पूजा तिलकाशिवाय कशी होईल? तिलक म्हणजे सर्वोच्च मानबिंदू! तिलक हा आपल्या भारतीय परंपरेतील धार्मिक आणि भावनिक आस्थेचं पवित्र, हृद्य प्रतिक आहे. देवाला तिलक लावताना, स्वतःला तिलक लावताना,  ब्राह्मण, कन्या, माता, पुरूष बालके, अतिथी, पितर ह्यांना तिलक लावताना म्हणायचे वेगवेगळे मंत्र आहेत.

पूर्वी राजे महाराजे काही शुभ कार्याला किंवा युद्धाला निघाले तर घरातील स्त्रिया त्याना तिलक लावून त्याच्या यशाची कामना करत आणि राजेही कार्यास निघण्यापूर्वी आणि यश प्राप्त करून आल्यावर कुलदेवतेला तिलक लावीत आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला असावा म्हणून  त्यांच्या पायीचे चंदन आपल्या कपाळावर तिलक म्हणून धारण करीत. आपल्या स्वतःला चंदन लावताना खालील श्लोक म्हणतात.

चन्दनस्य महत्पुण्यं पवित्रं पापनाशनम् ।

आपदां हरते नित्यं लक्ष्मीस्तिष्ठति सर्वदा ।।

 

 माता, पिता गुरुजन अशा वंद्य लोकांच्या पायाची माती कपाळी लावताना त्याच्यां विषयी मनात उसळेल्या सर्व कृतज्ञतेच्या पवित्र भावना, त्यातून मिळालेलं सुखं काही आगळच असतं. उभयपक्षी नात्याच्या रेशमी धाग्यांचं मऊ, मुलायमपण जपणारं, अजून दृढ करणारं असतं. दूरदेशी राहून परत आल्यावर आपल्या जन्मभूमीच्या मातीत हात बुडवून तो कपाळावर भस्माच्या पट्ट्याप्रमाणे ओढताना भूमातेचा झालेला वियोग संपून तिच्या कुशीत शिरल्याचा आनंद मिळतो. मनाच्या तळापासून उत्सूर्तपणे, अत्यंत सहज होणारी ही कृती आहे. 

जगन्नाथराय म्हणतात, ‘माय ह्या भूलोकी, स्वेच्छेने कोणी तुझी माती हाती उचलून घेऊन तिचा स्वतःच्या भाळी तिलक लावला तरी त्या मृत्तिकेच्या टिळ्यातही तुझ्या वात्सल्याची असामान्य ताकद निर्माण होते. कारण कपाळाला माती लावणं म्हणजे पूज्य व्यक्तीची स्पंदनात्मक शक्ती आपल्या आज्ञाचक्राशी एकरूप करणे. (तर दुसर्‍याला तिलक लावणं म्हणजे आपली स्पंदने, शुभ संवेदना  त्या माणसाच्या आज्ञाचक्राशी एकरुप करणे)

 माय, सूर्य उगवताक्षणीच जसा अंधाराचा नाश होतो, काने कोपरे, सर्व वस्तू प्रकाशित होतात त्याप्रमाणे, हा मृत्तिका तिलक सर्व अज्ञानाचा नाश करतो. सर्व जग कसं स्वच्छ स्पष्ट दाखवतो. मनातील सर्व किंतु परंतु दूर करतो.

इतकच कशाला सर्वजण म्हणतात की, विधिलिखित कधी टाळता येत नाही; पण ब्रह्मदेवाने कपाळावर लिहिलेल्या अत्यंत दुर्दैवी अक्षरांच्या ओळी, अत्यंत कटु विधिलिखितही पुसून टाकायची क्षमता ह्या तुझ्या तिरीच्या मृत्तिकेच्या तिलकात आहे. माय तुझ्या तटीची कपाळी लावलेली ही माती माझा सगळा शोक, समस्त दुःखे, माझे अपरिमित कष्ट, माझी दुर्बलता ह्यांचा नाश करो. माय तुझं हे लेकरू तुला अनन्यभावे शरण आलं आहे.

 

ललाटे या लोकैरिह खलु सलीलं तिलकिता

तमो हन्तुं धत्ते तरुणतरमार्तण्डतुलनाम् ।

विलुम्पन्ती सद्यो विधिलिखितदुर्वर्णसरणिं

त्वदीया सा मृत्स्ना मम हरतु कृत्स्नामपि शुचम् ।। 42 ।।

अन्वय -  हे मातः या इह लोके सलीलं ललाटे तिलकिता (अस्ति) सा खलु तमो हन्तुं तरुणतरमार्तंडतुलनां धत्ते। ( या च ) विधिलिखित दुर्वर्णसरणिं सद्यः विलुम्पन्ती सा त्वदीया मृत्स्ना मम कृत्स्नां अपि शुचम् हरतु ।

 अन्वयार्थ - हे मातः  – हे माते! ; या – जी ; इह – ह्या लोकी ; लोकैः – लोकांनी ;  सलीलं – स्वेच्छेने ; ललाटे – कपाळावर, भाळी, तिलकिता – तिलक म्हणून धारण केली; सा – ती ; खलु – खरोखर ;  तमः – अज्ञानाला ; हन्तुं – नाश करण्यास ; तरुणतर मार्तंड तुलनाम – उगवणार्‍या सूर्याच्या तेजाला  धत्ते - धारण करते. या- आणि जी ; विधिलिखित – ब्रह्मदेवाने (मनुष्याच्या जन्मसमयी कपाळावर ) लिहीलेल्या दुर्वर्ण सरणिः – दुःखसूचक अक्षरांच्या ओळी ; सद्यः – तिलक करताच ; विलुम्पन्ती – पुसून टाकणारी ; सा – ती ;  त्वदीया – तुझी, तुझ्या तीरावरील ; मृत्स्ना – माती ; मम – माझे ; कृत्स्ना – सर्व ; अपि – सुद्धा ;  शुचं –  शोक, कष्ट, दुर्बलता, दुःख ; हरतु – हरण करो .

 

कुणी स्वच्छेने ही उचलुन तटीची तव मृदा

ललाटी लावीता तिलकचि तिचा हर्षितमना

कपाळी दुर्दैवी विधिलिखित त्यांच्या  बदलते

पुसे ती ब्रह्म्याच्या अटळ कटु शब्दा त्वरित गे।। 42.1 ।।

 

जसा होता सूर्योदय सकल ती सूर्य किरणे

महा अंधाराला सहज गिळती सत्वर तसे ।--

हरे भाळीचा जो तिलक नित अज्ञान अवघे

हरो तो शोकासी मम दुरित दुःखास सुभगे ।। 42.2 ।।

(सूर्याला ऋग्वेदात तरणिर्विश्वदर्शित म्हटले आहे. तरणि/तारिणी म्हणजे नाव. आकाशाचा महासागर तरून जाणारा, ज्याला सारं विश्व दिसतं वा विश्व दृश्यमान करणारा. )

---------------------------------------------------

श्लोक 43

जगात पुष्कळ नद्या असतील पण गंगेची महतीच काही वेगळी! जगन्नाथराय म्हणतात, माय, तू ज्या ज्या प्रदेशातून वाहत जातेस ते ते प्रदेश खरोखरच धन्य होत!  तेथील प्राणी, पक्षी, किटक वर्ग, माणसे खरोखरच भाग्यवंत समजली पहिजेत.

आद्य शंकराचार्यही त्यांच्या गंगास्तोत्रात म्हणतात, गंगेच्या जवळ रहायला मिळण्यासारखे पुण्यप्रद काही नसेल. गंगेच्या तीरावर रहायला मिळणे म्हणजे पृथ्वीवर राहून वैकुंठाचे सर्व सुख मिळविण्यासारखे आहे.(श्लोक 10)

तव तटनिकटे यस्य निवासः खलु वैकुण्ठे तस्य निवास:

तुझ्या तटावर राहती जे नर। वैकुंठचि त्यां लाभे भूवर 

इतकच नाही तर पुढे जाऊन ते म्हणतात, माय! ज्या नरदेहाची इतकी महती पुन्हा पुन्हा सांगितली जाते, एकवेळ तो नरदेह मिळाला नाही तरी चालेल; मला कुलीन घराण्यात राजाचा जन्म मिळाला नाही तरी चालेल; पण तुझा वियोग नको. तुझ्या तीरावर मी कासव, मासा अथवा एखादा दुलक्षित दुबळा सरडा होऊन राहण्यातही धन्यता मानतो.  

वरमिह नीरे कमठो मीनः किं वा तीरे शरट: क्षीणः ।

अथवा श्वपचो मलिनो दीनस्तव न  हि दूरे नृपतिकुलीन: ।।11

 

बरे राहणे तुझ्या तिरी गं । होऊन मासा अथवा कासव

होईन दुबळा सरडा मीही । तुझ्या विना परि नकोच जीवन ।। )

 

गंगालहरींध्ये जगन्नाथराय म्हणतात, ज्या प्रदेशातून ही पावन गंगा नदी प्रवाहित होत  नाही, ते लोक खरोखरच दुर्दैवी आहेत. असे लोक आपल्या दुर्दैवाची खंत न बाळगता जर, आपण जेथे राहतो तेथेच राहण्यात समाधान मानत असतील, त्याच जागेची त्याच्या मनात प्रचंड ओढ असेल तर; हे गंगे तुझ्या तीरावरील ह्या वृक्षराजीही जणु काही त्यांच्या फुलणार्‍या फुलांच्या ताटव्यांच्या रूपाने हसत हसत त्यांचा उपहास करत असतात. जणु काही म्हणत असतात, ‘अरे वेड्या तू गंगेचा अनुभवच घेतला नाहीस; गंगेचं सख्य आणि सौख्य काय असतं हे तुला माहितच नाही. एकदा जर तू ते अनुभवलंस तर तुझी ह्या तुझ्या गावाची आसक्ती पार सुटून जाईल.’

गंगेच्या तीरावरील ह्या वृक्षराजींची मुळं गंगेच्या पाण्यापर्यंत पोचल्याची ग्वाही त्यांची  सतत हिरवीगार तरतरीत, ताजीतवानी पानं देत असतात; त्यांच्यावर विविध फुलांचे फुललेले गुच्छ , मी मी म्हणत वर डोकावणारे रंगिबेरंगी फुलांचे तुरे त्यातून ही ग्वाही मिळत राहते.

 अशा फुलांच्या झुपक्यांमधून मध गोळा करण्यासाठी भुंग्यांची गर्दी झालेली असते.  भुंगेही मध घेण्यासाठी इतके आतुर असतात की, झाडांची, फुलांची परवानगी घ्यावी हे त्यांच्या गावीही नसते. चोरी हा त्यांच्यालेखी अपराध नसतो. इतक्या विविध फुलांच्या ताटव्यांमधून, घोसांमधून फिरल्याने सहाजिकच परागकण अंगाला चिकटून भुंग्यांचे देह परागधूलीने माखून गेलेले असतात. अशा प्रकारे चोरीच्या अपराधाने आणि परागधूलीने मलिन झालेल्या भुग्यांनाही हे दिलदार वृक्ष फुलांच्या सुगंधाने न्हाऊ घालून निर्मळ करतात.

जगन्नाथ राय अशा अतंर्बाह्य सुंदर असलेल्या तरुवरांकडे पाहून इच्छा व्यक्त करतात की, गंगेप्रमाणेच सर्वांचे कल्याण करणार्‍या; गंगातीरावरील ह्या वृक्षांचे माझ्याशी कायमचे मैत्र जडो.

 

नरान्मूढांस्तत्तज्जनपदसमासक्तमनसो

हसन्तः सोल्लासं विकचकुसुमव्रातमिषतः।

पुनानाः सौरभ्यैः सततमलिनो नित्यमलिना-

न्सखायो न: सन्तु त्रिदशतटिनीतीरतरवः ।। 43 ।।

अन्वय – तत्तज्जनपदसमासक्तमनसः मूढान्  नरान् विकचकुसुमव्रातमिषतः सोल्लासं हसन्तः, नित्यमलिनान् अलिनः सततं सौरभ्यैः पुनानाः त्रिदशतटिनीतीरतरवः नः सखायः सन्तु । (43)

अन्वयार्थ - तत् जनपद  समासक्त मनसा -  आपण ज्या ज्या देशात रहतो त्या त्याच देशात राहण्याविषयी ज्यांचे अंतःकरण आक्त झाले आहे अशा ; मूढान् – सारासार विवेकशून्य अशा ; नरान् – लोकांना ; विकच- कुसुम -व्रात – मिषत – विकास पावलेल्या फुलांच्या समुदायाच्या रूपाने/मिषाने ; सोल्लासं – अत्यंत आनंदाने हसन्तः – हसणारे ;  नित्य मलिना्न् – नेहमी परागांनी मलीन असणारे, व परद्रव्य म्हणजेच फुलांचा मध हरण करणे, पीणे ह्या दोषांनी युक्त अशा , अलिनः – भ्रमरांस ; सततं -  नेहमी, सौरभ्यैः – सुगंधाने ; पुनानाः – पवित्र करणारे ; त्रिदशतटिनीतीरतरवः - देवांची नदी जी गंगा तिच्या तीरावरील तरु, वृक्ष ; नः – आमचे ; सखायः – मित्र ; सन्तु – होवोत, असोत. (43)

 

न वाहे गंगा ही जरिहि मुलुखातून अपुल्या

तरी वाटे ज्यांना मुलुख प्रिय सम्पन्नचि भला ।

तुझ्या तीरीचे हे तरुवर तयांनाच हसति

फुलाच्या घोसांच्या सुमधुर रुपाने कितिकिती ।। 43.1 ।।

 

मधाच्या आस्वादास्तव बहु उतावीळ हृदयी

फुलांचा प्राशीती मधु तरुअनुज्ञेविण जरी ।

अहो ज्या भुंग्यांची तनु सकल ही माखत अती

परागांनी सार्‍या दिनभर फुलातून फिरुनी ।। 43.2 ।।

 

परागांनी झाल्या मलिनचि मिलिंदास तरु हे

पुन्हा आमोदाने करिति सहजी निर्मळ पुरे ।

तुझ्या तीरीच्या ह्या सहृदय तरूंशी सुरधुनी

असो गे जिह्वाळा अतुट जडु दे मैत्र हृदयी ।। 43.3 ।।

---------------------------------------------------

श्लोक 44

काही देवांची साधना मोठी कठीण असते. त्यांना प्रसन्न करण्यासाठी मोठ्या कष्टाने त्यांची सेवा करावी लागते. खडतर व्रते आचरावी लागतात. काही लोक आपले इप्सित साध्य करण्यासाठी हा खडतर साधनेचा मार्ग अवलंबतात.

काही लोकांना विविध प्रकारचे यज्ञ करून यज्ञाचे फळ मिळविण्यामधे रुची असते. ते नाना प्रकारचे यज्ञ करून देवाला प्रसन्न करून घेतात आणि आपली मनोकामना पूर्ण करतात.  पुत्र प्राप्तीसाठी पुत्रकामेष्ठी यज्ञ करतात. महान कीर्ती, प्रजेवर अधिकार व साम्राज्यप्राप्तीसाठी ‘वाजपेय’ यज्ञ करतात. असे अनेक प्रकारचे काम्य यज्ञ ते करत राहतात.

कोणाला इंद्रिय निग्रह असलेला योग पथ योग्य वाटतो. ज्ञानेश्वरमाऊली  म्हणतात, ‘आधी डोंगर खाऊन तोंड फाटावं आणि नंतर तो गिळता यावा म्हणून उकळत विष प्यावं तसा हा योग मार्ग अवघड आहे. थंडी तीच नेसावी। कडक उन्हे पांघरावी। आणि पावसाच्या वर्षावी । घर समजून रहावे ।। असा इंद्रियवृत्तींचा निरोध करणारा काटेरी योग पथ कोणाला मोह घालतो.

जगन्नाथराय म्हणतात, हे गंगे, तुझा संचार तिन्ही लोकात असतो द्यूलोक म्हणजेच स्वर्ग, भूलोक म्हणजे पृथ्वी आणि पाताळ; इतक्या तुझ्या कक्षा असीम आहेत. म्हणूनच तुझे त्रिपथगा हे नाव सार्थ आहे. तुझं नामस्मरण ह्या संसाराचे बंध तटातट तोडून स्वर्गाची प्राप्ती करून देतं. माय, मनोकामना पूर्ण करणारे हे सर्व कठीण मार्ग एका बाजूला आणि तुझ्या नामस्मरणाचा अत्यंत सुगम मार्ग एका बाजूला असे दोन पर्याय पाहून मी अविरत तुझे नाम मुखाने घेण्याचा दुसरा सुखद पर्याय स्वीकारला आहे. त्यात इंद्रियांचे दमन नाही, कुठलेही कष्ट नाहीत.’

 ह्या नामस्मरणाचे वर्णन करताना ज्ञानदेव म्हणतात, देवाने कुटुंबवत्सलांना नामरूपी नौकेवर घातले आहे. निर्मल भक्तांचिया पोटी । प्रेमाची मी बांधितो पेटी । आणि तयांना लावितो तटी । सायुज्यसुखाच्या साक्षेपे ।।

तर जगन्नाथ म्हणतात, माय! तुझे नाम घेता घेता मी कृतकृत्य झालो आहे. माझं मन शांत झालं आहे. संसाराचा सारा गुंता सुटला आहे.  कारण माय तू म्हणतेस, अहो म्हणोनि माझिया भक्ता । उरली नसे एकही चिंता । सर्व संकटी उद्धार करण्या । सर्वदा असे मी तत्पर ।।

हे माय, अत्यंत जटिल, चिवट वाटणारे, तुटता न तुटणारे हे संसारबंध तुझ्या नामस्मरणाने एखाद्या गवताच्या जाळ्यासारखे सहज तुटून गेले आहेत. गवताच्या भार्‍याला बांधलेली दोरी सुटताच गवत वार्‍यावर अस्ताव्यस्त विखरून जावं त्याप्रमाणे संसाराचा गुंता विरून गेला आहे. नमो गंगे!

 

यजन्त्येके देवान्कठिनतरसेवांस्तदपरे

वितानव्यासक्ता यमनियमरक्ताः कतिपये।

अहं तु त्वन्नामस्मरणकृतकामस्त्रिपथगे

जगज्जालं जाने जननि तृणजालेन सदृशम् ।। 44 ।।

 

अन्वय – हे त्रिपथगे जननि, एके कठिनतरसेवान् देवान् यजन्ति तदपरे वितानव्यासक्ताः  (सन्ति) कतिपये यमनियमरक्ताः सन्ति । अहं तु त्वन्नामस्मरणकृतकामः जगज्जालं तृणजालेन सदृशं जाने । (44)

हे त्रिपथगे – हे माते! हे तीन मार्गांनी (आकाश, भूलोक, पाताळ) वाहणार्‍या गंगे, एके -  कित्येक ; कठिनतर सेवान् - फार कठीण भक्ती ; येषां – ज्यांची ; तान् देवान् – त्या देवांना , यजन्ति – त्यांची आाराधना ,पूजा करतात ; तदपरे -  त्याहून काही वेगळे, दुसरे, वितान व्यासक्ताः – यज्ञाच्या ठिकाणी विशेष आस्था बाळगणारे ; सन्ति - आहेत अशा; कतिपये – कित्येक ; यमनियमरक्ताः – यम नियमांची गोडी असणारे, यमनियमात रमणारे;  सन्ति – असतात. ; अहं – मी ; तु – मात्र, तर ; त्वन्नाम स्मरण कृतकामः - तुझ्या नामस्मरणानेच कृतकृत्य, संतुष्ट असा ; जगज्जालं – जगाचा सारा गुंता ; तृणजालेन सदृशं – गवताच्या गुंत्यासारखा ; जाने – समजतो. (44)

 

करीती काही हे सुरवर अपेक्षा अतिच ती

बहु कष्टाच्या त्या खडतरचि सेवेचिच मनी ।

अशाही देवांसी नित भजति काही सुजनही

पुरी व्हावी इच्छा म्हणुनचि तयांना सुखविती ।। 44.1 ।।

 

धरे कोणी आस्था किति विविध यज्ञातचि सदा

करे नाना यज्ञा विविधचि मनीषा पुरविण्या ।

रुची योगामध्ये यमनियम युक्ता मनि कुणा

निरोधाने कैसे सुजन तनुसी कष्टविति गा ।। 44.2 ।।

 

तुझ्या नामाचा हा सुगम पथ भावे मम हृदी

तुझ्या नामाचे हे स्मरण करिते धन्य मजसी ।

हृदी गंगा नामे अविरतचि मी तृप्त मनसा

जगाच्या जंजाळा सहज मनि मानी तृणसमा ।। 44.3।।

---------------------------------------------------

श्लोक 45

जे स्वतः झटून मेहनत घेत असतात, अभ्यासात उत्तम असतात, चांगल्या गुणांनी पास होणार असतात; अशा विद्यार्थ्यांना यश मिळावं म्हणून खास शिकवणी वर्ग घेतले जातात. शाळा, खासगी प्रशिक्षण वर्ग यांमधे अशा विद्यार्थ्यांनी आपल्याकडे यावं ह्यासाठी चढाओढ असते. खरतर असे विद्यार्थी आपल्या गुणांनी, मेहनतीने यश मिळवणारच असतात पण; त्यांना यशाचं श्रेय देण्यासाठी पुढे येणार्‍यांचा अंतस्थ सुप्त हेतू त्या यशामधे आमचा मोठा वाटा होता हे सांगून स्वतःकडे श्रेय कसे घेता येईल हाच असतो. नाहीतर परीक्षांचे निकाल जाहीर झाल्या झाल्या पानं पानं भरून अमुक अमुक मार्गदर्शकाचे इतके विद्यार्थी यशस्वी झाल्याच्या जाहिराती झळकल्याच नसत्या.

ज्या विद्यार्थ्यांना खरोखरीच मदतीची गरज आहे, ज्यांना कोणाच्या मदतीशिवाय स्वतःच्या हिमतीवर अभ्यास करणे शक्य नाही, असे विद्यार्थी कायम दुर्लक्षित राहतात.

जगन्ननाथराय म्हणतात, हे माय ह्या जगात जे लोक पुण्यसंपादन करण्यासाठी  जन्मभर अथक प्रयत्न करत असतात, क्षणाचीही विश्रांती घेत नाहीत, अशांना त्यांच्या प्रयत्नाचं श्रेय मिळावं म्हणून देवा देवांमध्येही जणु पुण्यवानांचा उद्धार करण्याची अहमहमिका असते. त्यांना स्वर्लोक मिळावा, पुण्यगति लाभावी म्हणून देवगणमधेही स्पर्धा चालते.  

पण ज्यांना योग्य मार्ग दिसला नाही, सापडला नाही, ज्यांनी आयुष्यभर कुठली पुण्यकर्म केली नाहीत, अशा बुडत्यांचा पाय जास्त जास्त खोलात रुतत जातो पण त्यांना काडीचीही मदत कोणी करत नाही. जे आपल्याला कोणी मदत करेल का म्हणून मोठ्या आशेने वाट बघत, अपेक्षेने इतरांकडे, देवांकडे बघत असतात; ते निराशेच्या खोल गर्तेत पडले तरी त्यांच्याकडे कोणी ढुंकूनही पहात नाही. जणु काही हे जग फक्त पुण्यवंतांसाठीच आहे.

पण! -- माय, अशांना पाहून तुझं मन हेलावलं नाही असं कसं होईल? देवांनी जरी त्यांच्याकडे पाठ फिरवली, सर्व जग त्यांचा तिरस्कार करत असलं, तरी तू मात्र त्यांना आपलं म्हणतेस. त्याचा सर्व भार तुझ्या डोक्यावर घेतेस. त्यांना दुःखी, कष्टी, दुर्लक्षित राहू देत नाहीस. त्याच्या इह पर लोकीचा प्रवास सुखरूप पार पाडतेस. तुझ्यासाख्या वात्सल्यमूर्तीशिवाय हे कसं काय शक्य आहे? मला तर अशा पतितांच्या मदतीला धावून येणारं तुझ्याशिवाय दुसरं कोणीही दिसत नाही.

 

अविश्रान्तं जन्मावधिसुकृतजन्मार्जनकृतां

सतां श्रेयः कर्तुं कति न कृतिनः सन्ति विबुधाः।

निरस्तालम्बानामकृतसुकृतानां तु भवतीं

विनाऽमुष्मिँल्लोके न परमवलोके हितकरम् ।। 45 ।।

 

अन्वय -  हे जननि, जन्मावधि अविश्रान्तं सुकृतजन्मार्जनकृतां सतां श्रेयः कर्तुं कति विबुधाः कृतिनः न सन्ति । निरस्तालम्बानां तु अकृतसुकृतानां (जनानां) हितकरं अमुष्मिन् लोके भवतीं विना परं न अवलोके

अन्वयार्थ - हे जननि– हे माते!  जन्मावधि – जन्माचा पूर्ण अवधी, काळ, संपूर्ण आयुष्यभर, जन्मापासून ; अविश्रांतं – अविरत ; सुकृतजन्मार्जनकृतां – सुकृताने ज्यांनी चांगला जन्म मिळवला आहे ; सतां श्रेयः कर्तुं –  साधुंचे कल्याण करण्यास कति – कितीतरी ; विबुधाः – देव , सन्ति – आहेत ; न – नाही; निरस्तालम्बानां – ज्यांचे सर्व आधार दूर झाले आहेत; अकृत सुकृतानां – ज्यांनी काही पुण्य कर्म केले नाही अशा ; तु – तर ; हितकरं – हित करणारा ; अमुष्मिन् लोके –  पर, दुसर्‍या लोकांमध्ये ; भवतीं विना – तुझ्या शिवाय;  परं न – दुसरा कोणी नाही , इति अवलोके – असे पाहतो. (45)

 

अहो नाना पुण्ये सुजन, मुनि आजन्म करति

मिळो जागा स्वर्गी म्हणुनचि अविश्रांत झटति ।

अशांना लाभावी सुरसदनि त्या पुण्यगति ही

म्हणोनी उद्धारा अहमहमिका ह्या सुरगणी ।। 45.1 ।।

 

जयांनी ना केले परि अमल सत्कर्म कुठले

कुणाच्या आधाराविणचि दयनीया स्थितित जे ।

अगे माते ज्यांना जवळ नच केले सुरवरे

दुजा ना आधारू तुजविण तयांसी जननि गे ।। 45.2 ।।


अगे वाहे चिंता अविरत तयांची जननि तू

सदा दोन्ही लोकी इह पर असो रक्षि नित तू ।

तुझ्या वाचोनी गे मजसि दिसते ना कुणि दुजे 

करे वात्सल्याने जवळ नित पाप्यांसहि असे ।। 45.3 ।।

---------------------------------------------------


श्लोक 46

इतका वेळ गंगेची विविध प्रकारे स्तुती करणार्‍या जगन्नाथाने आता आतडं पिळवटून टाकेल असं मागणं ह्या 46 व्या श्लोकात मागितलं आहे. ‘आई मला हे पाहिजे मला ते पाहिजे असा आईवर हक्क गाजवणारं, आईने माझी सगळी काळजी घेतलीच पाहिजे असं म्हणणारं लेकरू आईच्या बाबतीत मात्र तेवढच बेफिकीर असतं. त्याला मातृहृदयाची कल्पना नसते. तिच्या निर्व्याज प्रेमाची किंमत नसते.

 पण, ज्या जगाने इतके दिवस डोक्यावर मिरवलं त्याने पायदळी तुडवावं हा अनुभव लेकराला नवीन असतो. भीतीदायक असतो. हृदयाला घरं पाडणारा असतो. छान छान वाटणार्‍या जगाने केलेली पराकोटीची निंदा, नालस्ती ह्यांचा समाना करता करता ते घाबरून जातं; मान मरातब, ऐश्वर्य, सर्वस्व हिरावून घेणारी, असंभाव्य वाटणारी वर्तणूक अनुभवून मनाने बिथरून जातं; जगाने त्याला जगण्याचीही आशा ठेवली नाही, हे अनुभवल्यावर इतके दिवस चिंतामुक्त बेलगाम उंडारणारं लेकरू असहाय्य होतं. पुढचे रस्ते कायमचे बंद झालेले असतात.

अशावेळी जन्मदात्री मात्र तितक्याच वत्सलपणे त्याची काळजी करत वाट बघत असते. त्याचे सर्व अपराध पोटात घालून, त्याला पदरात झाकून घेण्यासाठी उत्सुक असते. तेव्हा आईची खरी किंमत कळते. मग जगनन्नाथ राय म्हणतो,

‘माय तुझं पाणी पिऊन माझी तहान भागताच तुझे आभार तर सोडाच पण तुझी साधी चौकशीही न करता कृतघ्नाप्रमाणे, सत्वर तुझ्याकडे पाठ फिरवून, मी माझ्या मूर्ख सवंगड्यांसोबत मजा करत भटकत राहिलो. पण मला कुठेच शांति, विश्रांती, स्वस्थता लाभली नाही. माय, लोकांनी केलेल्या दारूण अपमानांनी, दिलेल्या अत्यंत कडवट वागणुकीने माझी झोप पार पार उडाली आहे. (चिरात् उन्निद्रं मां) ह्या जगात रहावं, जगावं  ह्यासाठी आशेचा एकही किरण मला डोळ्यासमोर दिसत नाही. ह्या जगाकडून मी पराभूत झालो आहे. आता अजून लढण्याची ताकद माझ्यात नाही. चहू बाजूंनी धक्के खात, माय मी प्रचंड थकलो आहे.  मला विश्रांतीची गरज आहे. चिर विश्रांतीची नितांत आवश्यकता आहे. तुझ्या तरंगांच्या सन्निध असलेला हा वारा अत्यंत शीतल आहे.  मंद मंद वाहणार्‍या ह्या सुखद, शीतल झुळकींनी कायम प्रसन्न असलेल्या हया तुझ्या मांडीवर मला चिर निद्रा घेऊ दे.  माय, तू मला तुझ्या कुशीत घे. तुझ्या कुशीत लाटांचं अंगाई गीत ऐकत ऐकत मला चिरनिद्रा मिळू दे. माय! मला दीर्घकाळासाठी निजव. मी दमलो आहे. फार फार दमलो आहे. माय मला थोपट. मला झोपव. ह्या निद्रेच्याही पलीकडची गाढ निद्रा (काळनिद्रा) मला आवश्यक आहे. मला तुझ्या कुशीत शांत सुदीर्घ निद्रा घेऊ दे.

 

पयः पीत्वा मातस्तव सपदि यातः सहचरै-

र्विमूढैः संरन्तुं क्वचिदपि न विश्रान्तिमगमम्।

इदानीमुत्सङ्गे मृदुपवनसञ्चारशिशिरे

चिरादुन्निद्रं मां सदयहृदये शायय चिरम् ।। 46 ।।

अन्वय – हे मातः, तव पयः पीत्वा सपदि विमूढैः सहचरैः सह संरंन्तु यातः क्वचिदपि विश्रांतिं न अगमम् । (अतः) हे सदयहृदये, इदानीं त्वं चिरात् उन्निद्रं मां मृदुपवनसंचारशिशिरे उत्संगे चिरं शायय।

 अन्वयार्थ - हे मातः  – हे माते! ; तव – तुझे ; पयः – पाणी ; पीत्वा -पिऊन , सपदि – तत्काल ; विमूढैः – अत्यंत मूर्ख अशा ; सहचरैः सह – सोबत्यांबरोबर ; संरन्तुम् – क्रीडा करण्यास ; यातः – गेलेला (मी) ; क्वचिदपि – कोठेच, विश्रांतिं न अगमम् – विश्रांतीला पावलो नाही ; अतः – म्हणून ; हे सदयहृदये – हे दयाळु (माते) ; इदानीं – सांप्रत , त्वं – तू ; चिरात् – पुष्कळ वेळ ; उन्निद्रं मां – झोप उडाल्याने त्रस्त झालेल्या मला , मृदु पवन संचार शिशिरे – मंद वायूच्या गतीने शीतल झालेल्या ; उत्संगे  - तीररुपी अंकावर ; चिरं – दीर्घकाळ ; शायय – नीजव, झोपव.  

 

तुझ्या पाण्याने गे शमवुनचि तृष्णा त्वरित मी

सख्यांसंगे क्रीडा करित फिरलो गे कितितरी ।

परी ना ठेवीली कणभर तुझी जाण हृदयी

कधी ना मानीले जननि उपकारांस तव मी ।। 46.1 ।।

 

मिळाले ना मूर्खांसह सुख समाधान मजसी

उपेक्षा हालांनी तळमळत निद्रेविणच मी ।

अशांती बेचैनी तुज जवळ आणी परतुनी

असे तूची माते सदय हृदया वत्सल अती ।। 46.2 ।।

 

न साहे माते गे, तव विरह आता क्षणभरी

तुझ्या अंकी वाहे पवन मृदु हा शीतल किती

तयाने होती गे तव लहरि ह्या सौम्य सुखदा

तुझ्या ह्या लाटांनी निजव मजला थोपटुन गा ।। 46.3 ।।

 

दयाळू माते हे मजवरि कृपा सत्वर करी

सुदीर्घा निद्रा ही जननि तव अंकीच निजवी 

अगे गा अंगाई मधुर लहरींची सुखदशी

जयाने ना यावी पुनरपि कधी जाग मजसी ।। 46.4 ।।

---------------------------------------------------

श्लोक 47

अनन्य भावाने शरण आलेल्या जगन्नाथाच्या मनाची घालमेल; गंगेनी आपला अव्हेर करू नये म्हणून तिची विनवणी; आपण आधीच्या श्लोकांमधे पाहिली.  ह्या श्लोकात जगन्नाथराय चा पवित्रा एकदम बदललेला आहे. तो गंगेला बजावत आहे, माय!  तुझ्याकडे येणार्‍या अनेक सर्वसाधारण पाप्यांपैकी एक असं समजून तू मला कमी लेखू नकोस. माझे भयंकर अपराध तुला माहित नाहीत का?’

महा भयंकर रोगाला उपचार करायचा असेल तर साधीसुधी औषधं चालत नाहीत. डोळ्यात तेल घालून त्या रोग्याकडे लक्ष द्यावं लागतं. सतत उपचार चालू ठेवण्यासाठी त्याला अति दक्षता विभागात कायम तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली ठेवावं लागतं. त्याप्रमाणे जगन्नाथराय म्हणत आहे, ‘माय माझी पापे दूर करणं ही साधीसुधी गोष्ट नाही. तूही माझी एक एक पापे ऐकलीस तर हादरून जाशील. तुझाही थरकाप उडेल अशी माझी पापे आहेत. म्हणून म्हणतो की, जगन्नाथाची घटका आता भरली आहे; त्याला मोक्ष मिळण्याचा समय समोर येऊन ठेपला आहे. तू सज्ज हो. पूर्ण तयारीत रहा.

तू तुझा हा अत्यंत रमणीय असलेला शेला अंगावर पांघरून न घेता, कमरेला कसून बांध. (पूर्वी लढाई अगर काही महत्त्वाचे काम करताना जोर येण्यासाठी म्हणून लोक कपड्याने कंबर घट्ट बांधीत असत.) तुझ्या अंगावर दागिने म्हणून जे सर्प मिरवत आहेस त्यांनी तुझ्या मुकुटावर अलगद ठेवलेली ही इवलीशी चंद्रकोर करकचून बांध; आणि ‘जगन्नाथाला पापमुक्त करणे’ ह्या नव्या लढाईला सामोरे जाण्यास सज्ज हो.

सामान्य लोकांच्या येण्याजाण्याची कोणी दखलही घेत नाहीत. त्यांच्या येण्या जाण्यासाठी आमरस्ता असतो. पण राजा येणार असेल तर त्याचा प्रशस्त मार्ग वेगळा असतो. भालदार चोपदार त्याच्या येण्याची वर्दी देत असतात. त्याच्या उलट एखाद्या महा भयंकर गुन्हेगारालाही न्यायालयात आणायचं असेल तरी पोलिसांच्या महाबंदोबस्तात शक्यतो वेगळ्या रस्त्याने आणले जाते. त्याला न्यायाधिशांसमोर हजर करण्यासंबंधी शिरस्तेदार त्याच्या नावाचा पुकारा करतो.  येथे जगन्नाथराय आपण कोणी सामान्य नसून, पाप्यांचाही मुकुटमणी आहोत हे सांगत, त्याच्या येण्याची जोरदार वर्दी देत आहे. ‘सावधान! सावधान! सर्वांनी सावधान! महापाप्यांचा हा मुकुटमणी जगन्नाथ येत आहे.’

जगन्नाथराय म्हणतात, माय हा पाप्यांचा पापी महापापी जगन्नाथ तुझ्याजवळ आला आहे. त्याच्या उद्धाराचा समय आला आहे. तुझी सर्व ताकद पणाला लाव. तुझं सामर्थ्य सार्‍या विश्वाला दिसू देत. तुझं सर्व कौशल्य आज जगाला दाखवायची वेळ आली आहे. जे देवांनाही असाध्य आहे असं हे  महापाप्यांचा मुकटमणी असलेल्या जगन्नाथाच्या उद्धाराचं अशक्यप्राय काम तुझी वाट पहात आहे. सज्ज हो. माझा उद्धार कर. देवांनी तर हे शक्य नाही म्हणून माझ्याकडे पाठच फिरवली आहे.  हे दुष्कर काम तुझ्याशिवाय हे कोणाला शक्य नाही.  

बधान द्रागेवं द्रढिमरमणीयं परिकरं

किरीटे बालेन्दुं नियमय पुन: पन्नगगणैः।

कुर्यास्त्वं हेलामितरजनसाधारणतया

जगन्नाथस्यायं सुरधुनि समुद्धारसमयः ।। 47 ।।

अन्वय - हे  सुरधुनि, अयं जगन्नाथस्य समुद्धारसमयः ( अत एव) त्वं द्रागेव द्रढिमरमणियं परिकरं बधान। पुनः किरीटे पन्नगगणैः बालेन्दुं नियमय । इतरजनसाधारणतया त्वं (मम) हेलां न कुर्याः ।

अन्वयार्थ - हे मातः सुरधुनि – हे माते! देवनदी गंगे अयं - हा ; जगन्नाथस्य – जगन्नाथाचा ; समुद्धार समयः – उद्धार करण्याची वेळ अस्ति – आहे.  अतः एव – म्हणूनच ; त्वं – तू ; द्रागेव- द्राक् एव – शीघ्र, लगेचच;  परिकरः – कंबरेला बांधायचे वस्त्र. द्रढिमरमणीयम् परिकरम् बधान  -तुझी कंबर कसून तयार हो किंवा तुझा (शेला) कमरेला अत्यंत घट्ट बांध.(पूर्वी लढाई अगर काही महत्त्वाचे काम करताना जोर येण्यासाठी म्हणून लोक कपड्याने कंबर घट्ट बांधीत असत.) किरीटे – मुकुटावर ; पन्नगगणैः – शरीरावर भूषणार्थ धारण केलेल्या सर्पांनी ; बालेन्दुं – चंद्रकोर ; नियमय – घट्ट बांध ; इतरजनसाधारणतया – अल्प,स्वल्प पापे करणार्‍या इतर सामान्य जनांप्रमाणे, त्याच्या बरोबरीने मला समजून ; त्वं – तू ; मम - माझी ; हेलां – अवहेलना ; न कुर्याः – करू नयेस.  

तुझा शेला बांधी  कसुनि कमरेसी भरजरी

विषारी सर्पांनी करकचुन बांधी शशि शिरी ।

असे पापी साधा अशि मम उपेक्षा नच करी

जगन्नाथाची या भरलि घटिका मोक्षसमयी ।। 47 ।।

---------------------------------------------------

श्लोक 48

असं म्हणतात की, शेवटच्या क्षणी डोळ्यासमोर आपल्या आराध्य देवतेची मूर्ती आणण्याचा प्रयत्न करावा. जर आराध्य देवतेची सुंदर मूर्ती मनाला व्यापून असेल तर अंतकाळी भय, शोक, आसक्ती ,पीडा ह्यापासून माणसाला त्रास होणार नाही.

‘अन्ते मतिः सा गतिः । ’ शेवटच्या क्षणी जशी मती असेल तसी गती प्राप्त होते. जगन्नाथाच्या हृदयातही शेवटच्या क्षणी गंगेशिवय बाकी काहीही नाही. त्याच्या ह्या अनन्यभावानेच गंगा त्याच्या उद्धाराला धावून आली. गंगेला आपल्या उद्धारासाठी पाचारण करणार्‍या जगन्नाथाने त्याच्या शेवटच्या काही घटिका उरलेल्या असताना केलेले हे गंगामातेचे वर्णन अपूर्व आहे. गंगामैया प्रत्यक्ष समोर उभी ठाकावी असं सामर्थ्य त्याच्या शब्दाशब्दात दडलं आहे.

जगन्नाथराय म्हणतात, माय शरद ऋतुतील चंद्राच्या चांदण्यातूनच जणु काही तुझी ही मूर्ती घडवली असावी; अशी तू अत्यंत सौम्य, शांत, सर्वांना आह्लाददायक आहेस. सर्वांना हवीहवीशी वाटतेस.  तुझ्या माथ्यावर असलेली ही सौम्य धवल चंद्रकोर तुझ्या रूपाला खुलून दिसत आहे. तिचा प्रकाश तुझ्या आरसपानी कांतीवर पडून तू त्या धवल तेजाने उजळून निघाली आहेस. (शशि म्हणजे चंद्र; शकल म्हणजे तुकडा म्हणजेच चंद्रकोर. श्वेताल हा शब्द मला थोडा संदिग्ध वाटला. श्वेत + आल असा  घेतला तर आलवाल म्हणजे आळे. त्याप्रमाणे गोल हा कदाचित तिच्या पाण्यातील भोवर्‍यांना उद्देशून असावा का? तिचा मुकुट चंद्राप्रमाणे शुभ्र आणि भोवर्‍यांप्रमाणे गोल असावा? अथवा चंद्रकोर वळणदार आहे म्हणून चंद्राचा कोरीव वळणदार मुकुट असावा?)

हे गंगे तुझी चतुर्भुज मूर्ती मोठी लोभस आहे. तुझ्या एका हातात भूतमात्रांना नवसंजीवनी देणारा अमृतकुंभ आहे तर दुसर्‍या हातात सर्वांचे कल्याण दर्शविणारे कमळ आहे. (सर्व देवांच्या हातात कमळ असते) तिसर्‍या हाताने तू लोकांना इप्सित वर देणारी ‘वर मुद्रा’ धारण केली आहेस तर चौथ्या हाताने लोकांच्या मनातील सर्व भीती दूर करणारी ‘अभयमुद्रा’ धारण केली आहेस.

 अमृताची सुखद निर्झरी मोहक वळसे वळणे घेत वाहत असावी अथवा पर्वतमाथ्यावरून अमृताचा प्रपात अमृत तुषारांचे फवारे उडवत झाली कोसळत असावा  त्याप्रमाणे तुझा हा धवल उज्ज्वल, निर्मळ प्रवाह मोठा मनोज्ञ आहे. त्या अमृत निर्झरीचा कमनीय देह जणु तुला लाभला आहे. तुषारवृंद उडवत कोसळणार्‍या सुधा प्रपाताची घडण तुझ्या देहात अंगभूतच आहे. त्या अमृतनिर्झरीच्या रंगरूपाचे  दागिने  आणि वस्त्र गंगेने परिधान केले आहे. सकाळच्या सोनेरी उन्हात ते सोनेरीरंगात चमचमत असते तर रात्री चंद्रप्रकाशात रुपेरी चमकदार होते. एरवी त्याचे नीररंगही काय वर्णावेत?  ( अमृताचा रंग चंदेरी, मधाप्रमाणे सोनेरीसर किंवा जलाप्रमाणे रंगहीन असल्याची वेगेगळी मते आहेत. ) वस्त्राचा उंचीपणा जसा त्याच्या चुण्या, निर्‍या (fall) मधून कळतो तसा तुझ्या अमृतवस्त्रातील लहरीतून त्याचा उंचीपणा समजून येतो.

तुझे धवल अलंकारही मन मोहवून घेणारे आहेत. शुभ्र रंगाची मगर हे तुझं वाहन आहे. त्या शुभ्र मगरीवर तू उभी आहेस. तुझ्या सर्व भक्तांना तुझं हे रूप आश्वस्त करणारं आहे.

 जो कोणी ह्या रूपाचं मनात सतत चिंतन करेल , ध्यान करेल, ह्या रूपावर आपलं सर्व लक्ष केंद्रित करेल; त्याच्या मनात तुझं हे रूप असं काही ठसेल की तुझ्या रुपाचं/ बिंबाचं जणु प्रतिबिंबच पडलेलं असावं. ‘प्रत्यक्षाहुन प्रतिमा उत्कट’ असा हा तुझा भक्त जणु काही तुझं दुसरं निर्मल रूप आहे असच वाटेल. अशा भक्ताला जगही वंद्यच समजेल. त्याचा उपमर्द करायला, त्याचा अपमान करायला, त्याची अवहेलना करायला कोणी धजावणार नाही.

जगन्नाथ मनानी गंगामय झाला होता. आता ना लोकांना हा महापंडित त्याज्य राहिला ना त्याला लोकांच्या अवहेलनेचं भय राहिलं! सर्व मालिन्य गंगेनी धुवून टाकलं. त्याच्या पीयूषलहरींनी तो स्वतःच पावन झाला नाही तर जो ह्या पीयूष लहरी म्हणेल त्याचं मन गंगेसारखं निर्मळ होईल.  (48)  

 

शरच्चन्द्रश्वेतां शशिशकलश्वेतालमुकुटां

करैः कुम्भाम्भोजे वरभयनिरासौ च दधतीम्।

सुधाधाराकाराभरणवसनां शुभ्रमकर-

स्थितां त्वां ये ध्यायन्त्युदयति न तेषां परिभवः ।। 48 ।।

अन्वय -  हे मातः, शरच्चंद्रश्वेतां शशिशकलश्वेतालमुकुटां करैः कुम्भाम्भोजे वरभयनिरासौ च दधतीं, सुधाधाराकाराभरणवसनां शुभ्रमकरस्थितां त्वां ये ध्यायन्ति, तेषां परिभवः न उदयति ।

अन्वयार्थ - हे मातः   हे माते! ; शरच्चंद्रश्वेतां – शरदऋतूतील चंद्राप्रमाणे शुभ्र वर्ण असलेली ; शशि शकल श्वेतालमुकुटां – चंद्रकोरीमुळे शुभ्र मुकुट असलेली ; करै – हातांनी ;  अम्भोज – कमळ, कुंभांभोजे – अमृतकलश आणि कमळांना (घेतलेली);  भयनिरास – भय दूर करणारी , वरभयनिरासौ – अभीष्टदान आणि भीतीचे निराकरण यांस ; च – आणि , दधतीम् – धारण करणार्‍या ; सुधाधाराकाराभरणवसनां – अमृताच्या धारांप्रमाणे ज्यांचा (शुभ्र) वर्ण, रूप आहे ती (आभरणानि म्हणजे) भूषणे, दागिने, (वसनानि) वस्त्रे  असलेल्या ; त्वां – तुला ; ये – जे ; ध्यायन्ति – चिंतितातात, ध्यान करतात ; तेषां – त्यांचा ; परिभवः – अनादर ; न उदयति – उत्पन्न होत नाही.

 

 

तुझी मूर्ती रम्या शरद पुनवेच्या शशि समा

कला चंद्राची ही सजवि तव भाळा अनुपमा ।

सुधा धारा वाहे, तशि धवल वस्त्रे झुळझुळा

तुला शोभा देती सुविमल अलंकार धवला ।। 48.1 ।।

 

उभी गंगा शोभे धवल मगरीच्यावर सदा

तुझ्या भक्तांना तू वर अभय देसीच शुभदा ।

सुधायुक्ता कुंभा धरिसि कमलासी तव करी

तुझ्या ह्या रूपाचे स्मरण करि त्या कोण हिणवी? ।। 48.2 ।।

---------------------------------------------------

श्लोक 49

हे माय, तुझी छवी अत्यंत मनोहर आहे, शोकात बुडालेल्या माझ्यासारख्या कुणालाही आश्वस्त करणारी, धीर देणारी आहे. ओठ किंचित विलग होऊन तुझ्या मुखावर उमटणारे अमृताप्रमाणे मंदस्मित भवाग्नीमधे होरपळणार्‍या जीवांना नवसंजीवनी, नवीन ताकद देणारं आहे. ह्या संसाररूपी वणव्यात भाजून निघणार्‍यांना तुझं हे मंद मंद स्मित पाहून, तू नक्कीच त्यांना जवळ करशील ह्याचा भरवसा वाटतो. सगळ्या लोकांनी वाळीत टाकलं तरी, माझी माय मला दूर लोटणार नाही हा असीम विश्वास तुझ्या ह्या मंदस्मितातून तू देत असतेस.

जसा हा चंद्र कायम अमृताचा वर्षाव करत असतो, मनाला शांती देतो त्याप्रमाणे तुझा हा जलौघ थकल्या भागल्या जीवांवर जणु अमृतमयी चांदण्याचा वर्षाव करून त्यांचे दुःख दूर करतो. अगे माय! एखाद्या वृक्षात वीज शिरल्यावर तो आतून पेटून उठावा; आतून धगधगत रहावा त्याप्रमाणे सर्व लोकांनी वाळीत टाकलेला माझा अंतरात्मा धगधगत आहे. त्याला शांत करण्याचं सामर्थ्य तुझ्या शिवाय कोणात नाही.  हे माय, माझ्या तनुमनाची होरपळ, हे शंतनू पत्नी गंगे, तू शांत कर गे. (49)

 

(वृत्त- पृथ्वी, अक्षरे -17, गण- ज स ज स य ल ग, यति- 8,9)

दरस्मितसमुल्लसद्वदनकान्तिपूरामृतै-

र्भवज्वलनभर्जिताननिशमूर्जयन्ती नरान् ।

चिदेकमयचन्द्रिकाचयचमत्कृतिं तन्वती

तनोतु मम शंतनोः सपदि शंतनोरङ्गना ।। 49 ।।

अन्वय – दरस्मितसमुल्लसद्वदनकान्तिपूरामृतैः भवज्वलनभर्जितान् नरान् अनिशम् ऊर्जयन्ती, चिदेकमयचन्द्रिकाचयचमत्कृतिं च तन्वती शंतनोः अङ्गना मम तनोः शं सपदि तनोतु । (49)

अन्वयार्थ - हे मातः  – हे माते! ; दरस्मितसमुल्लसद्वदनकान्तिपूरामृतै - दरं स्मितं – थोडे, मंद हास्य ;  तेन समुल्लसत् वदनम्  - त्याने विकास पावणारे मुख ; तस्य कान्तिपूर + अमृतैः –मंद स्मिताने उजळून/ फुलून जाणार्‍या मुखाच्या कांतीने जणू परिपूर्ण होणार्‍या अमृताने ; भव ज्वलन भर्जितान् नरान् – संसाररूप अग्नीने होरपळणार्‍या लोकांना ; अनिशं – निरंतर ; ऊर्जयन्ति – जगविणारी ;  चिदेकमय - चैतन्यरूप ; चंद्रिका चय चमत्कृतिं – चांदण्याच्या समूहाच्या चमत्काराला ; तन्वती – प्रकट करणारी ; शंतनोः अंगना – राजा शंतनूची पत्नी, गंगा ;  मम तनोः – माझ्या देहाच्या ; सपदि - त्वरित ,सत्वर, लगेचच  शं तनोः – कल्याणास वाढवो .(49)

 

प्रफुल्लित मुखावरी स्मित सुमंद शोभे तुझ्या

प्रदान करि जीवना, बरसवीतसे अमृता ।

अती सुखद चांदणे झिरपते स्मितातून ह्या

अनंत जणु ब्रह्म हे प्रकटवी सुखाच्या सुखा ।। 49.1 ।।

 

कसेचि जन भाजुनी  निघतसे भवाग्नीत ह्या

तयांस जगवी तुझी स्मितरुपी सुधा गे सदा ।

प्रकाशि हृदयी चिरंतनचि चित्कला मूर्त तू

तनूस मम शांतवी सुखवि शंतनू पत्नि तू  ।। 49.2 ।।

---------------------------------------------------


     श्लोक 50

ओडिसी नृत्यात नृत्यांगनेच्या पांढर्‍या शुभ्र पेहरावाला उठाव येण्यासाठी मागे काळा पडदा लावलेला असतो. ह्या काळ्या पार्श्वभूमीवर नर्तिकेच्या सर्व हालचाली उठावदार दिसतात. येथेही जगन्नाथरायांनी स्वतःची प्रतिमा जास्तीजास्त पतित, पापी अशी रेखाटण्यामुळे त्या पार्श्वभूमीवर गंगेची महती विशेष अधोरेखित झाली आहे. एका बाजूला पापी लोकांचं काळं जग तर दुसर्‍या बाजूला पुण्यवंतांचं उज्ज्वल धवल जग! जगन्नाथ हा जणु महापापी लोकांमधला विषकंद तर गंगा म्हणजे कितीही भयंकर पापांचं उच्चाटन करणारी अमृताने सांद्र झालेली अनुपम स्वर्गीय शक्ती!   एका बाजूला कमतरतेची खोल खाई तर शेजारीच सद्गुणांचे गगनचुंबी हिमशिखर!  ही दोघांमधील दाखवलेली तफावत एक सुंदर कृष्णधवल परस्पर विरोधी श्लोकचित्र तयार करते.

जगन्नाथराय म्हणतात, हे जननी मी फार भयंकर माणूस आहे. माझ्या पापांचा पाढा वाचला तर तो पुरा होणार नाही. माझी पापे क्षालन करण्याचा विषय समोर येताच; मंत्रांमधील शक्तीच जणु गळून गेली. औषधांचा प्रभाव ओसरणीला लागला. मला पहाताच सार्‍या रामबाण औषधांनीही ह्याला औषध नाही म्हणून जणु उघडेला जडिबुटींचा बटवा बंद करून टाकला. माझा पापांच्या क्षेत्रातील ‘पराक्रम’ ऐकून देवांची घाबरगुंडी उडाली. नवसंजीवन रसाने संपृक्त असलेल्या असलेल्या अमृताचे पार चिपाड होऊन गेले.  अत्यंत ताकदवान, वेगवान भरारीसाठी जो गरूड पक्षी प्रसिद्ध आहे असा गरूड ज्यांची देवता आहे अशी मौल्यवान पाचू रत्ने मला पहाताच भंगली.

हे माय मी पापांनी संपृक्त तर तू अमृताने सांद्र आहेस. येथे हा संसारदुःखाचा वणवा भडकला आहे. त्याच्या ज्वाळांनी मला चहूबाजूने वेढलं आहे. त्याच्या भयंकर ज्वाळा मला चट् चट् चाटत आहेत. त्याचे चटके बसून माझं अंतःकरण होरपळत आहे. हा असह्य दाह तुझ्याशिवाय कोण शमवू शकेल? तुझ्या अमृतमय लहरींमधे इतके सामर्थ्य आहे की, ह्या मुकुंदाच्या पायांना कालियावर नाचतांना त्याचं जे विष लागलं होतं ते तुझ्या पीयूषलहरींनी धवून टाकलं. संसाराच्या ज्वालांनी मला पुरत घेरलं आहे मी त्यात जळतो आहे. तुझ्यात उठणार्‍या ह्या प्रसन्नतेच्या आनंदाच्या उत्तुंग लहरीच माझ्या अंतःकरणाचा दाह निववू शकतील.  

 

(वृत्त शार्दूलविक्रीडित, अक्षरे – 19, गण- म सज स त त ग, यति – 12,7)

 

मन्त्रैर्मीलितमौषधैर्मुकुलितं त्रस्तं सुराणां गणैः

स्रस्तं सान्द्रसुधारसैर्विदलितं गारुत्मतैर्ग्रावभिः ।

वीचिक्षालितकालियाहितपदे स्वर्लोककल्लोलिनि

त्वं तापं तिरयाधुना मम भवज्वालावलीढात्मनः।। 50 ।।

हे मातः – हे माते! ; वीचि-क्षालित – लाटांनी धुतलेले ; कालियाहितपदे - कालिया सर्पाचा शत्रु असलेल्या कृष्णाचे पदं- चरण ; यया - जिने (विष्णुचे पाय धुणार्‍या) ; स्वर्लोककल्लोलिनी – हर्ष प्रसन्नतेच्या मोठमोठ्या लाटा उसळणार्‍या हे स्वर्गलोकीची नदी गंगे ; यतः – माझ्या तापशांतीविषयी ; मंत्रैः – वेदांनी, मंत्रांनी ; मीलितं –डोळे मिटून घेतले. औषधैः – अनेक शास्त्रसिद्ध औषधांनी ; मुकुलितम् – कळ्यांप्रमाणे मिटून गेली. हतवीर्य झाली, निरुपयोगी ठरली ; सुराणां गणैः – देवांच्या समूहांनी ; त्रस्तं – आपल्या हातून उद्धार होत नाही म्हणून घाबरून गेले, भयभीत झाले ; सांद्रसुधारसैः – तापशामक अमृतरसाने संपृक्त ; स्रस्तं – गळून गेले ; गारुत्मतैः ग्रावभिः – ज्यांची देवता गरूड आहे असे रत्न पाचू  ; विदलितं – फुटले ; ततः – म्हणून ; त्वं – तू ; भवज्वाला अवलीढा आत्मनः  - संसाराच्या ज्वाळांनी अंतःकरण घेरणार्‍या, चाटणार्‍या, वेढून घेणार्‍या मम – माझ्या ; तापं – त्रिविध तापाला ; अधुना- आता ; तिरय – निवारण कर घालव.

 

मंत्रांनी कर टेकिले मजपुढे, झाली उणी औषधे

संत्रासूनचि देव जाय पुरते, झाली सुधा म्लान गे ।

गे पाहोनि मलाच भंगति कसे पाचू भयाने पहा !

पोळे हा मजला भवाग्नि पुरता, चाटी भवाग्नी शिखा ।। 50.1।।

 

कालीयावर  नाचता हरिपदा मालिन्य आले विषे

त्यासी तूच धुवोनि टाकि अमले भागीरथि प्राणदे ।

लाटांनी तव पुण्यश्लोक सरिते स्वर्गीय नादा करी

दे शांती भवतापदग्ध मज हया स्वर्लोककल्लोलिनी ।। 50.2 ।।

---------------------------------------------------

श्लोक 51


हार, पराभव कायम दुःखदायकच असतात; त्यातून जर ती व्यक्ती एकदाही पराभव न चाखलेली शूर, वीर, धीर असेल तर, त्याला ती हार जिह्वारी लागली नाही तरच नवल. त्रिपुरासुरांसारख्या महा बलाढ्य असुरांनाही मारणार्‍या श्री महादेवांना द्यूत खेळताना हसत हसत पार्वतीने हरवलं. शिवपार्वतीच्या सारीपाटाच्या खेळात शिव कधि जिंकल्याचं कोणी पाहिलं आहे का? कितीही मोठमोठ्या मोठमोठ्या आपत्तींनी, निसर्गाचा कितिही विनाश केला, प्रलय जरी झाला तरी, सार्‍या निसर्गाला सावरत ही उमा परत त्याला नवजीवन देते. नवसंजीवनी देते. प्रलयकारी शिवाला पार्वतीसमोर तरी हार मान्यच करावी लागते.

 ह्या प्रलयकारी शंभूजवळ स्वतःचं असं आहे तरी काय? गजचर्म, कुठे रुद्राक्षादि मण्यांच्या माळा, म्हातारा नंदी, कृश झालेली चंद्रकोर,  नंदी, वीरभद्र, भैरव, शृंगी, भृंगी, घंटाकर्ण, इत्यादि त्याचे सर्व सेवक गण असे सर्व  मुख्य मुख्य वैभव पणाला लावता लावता शंभूकडे काहीच उरलं नाही.  महादेवांनी सर्व पणाला लावले आणि गमावलेही. आता नक्कीच त्यांना स्वतःला  पणाला  लावावे लागणार;  ह्याच एका क्षणाची पार्वतीमाता जणु वाट बघत होती.

पतीची अडचणीची वेळ हीच सवतीचा काटा काढायची अचूक वेळ असते. अशावेळी ही हिमकन्या थोडीच सोडणार आहे? तिने काही न बोलता नुसता एक नेत्र कटाक्ष शिवाच्या मस्तकावरील गंगेकडे टाकला. ‘‘नाथ! अजून ती तर उरली आहे नं! तिलाही लावा पणाला!’’

 

तिच्या त्या सूचक नेत्रपल्लवीने हे गंगे, तुझा जो काय थरकाप झाला; त्याने तुझ्या लाटा अशा काही उंच उंच उसळायला लागल्या की जणू डोक्यावर जलाने भरलेला घट घेऊन कोणी नृत्यांगना भयाने तांडव नृत्य करत असावी. जलकुंभातून हेंदकाळणार्‍या पाण्यानी ती बावरलेली ओलेती नृत्यांगना अजूनच सुंदर दिसावी त्याप्रमाणे तुझी भयभीत झालेली, गांगरलेली, कातर छवीही अजून मनोरम दिसू लागली. भीती, क्रोध, अपमान ह्या समिश्र भावनांनी उसळणार्‍या तुझ्या ह्या लाटा त्यातील अलौकिक सौंदर्याने अजून देखण्या दिसत आहेत. तुझ्या लाटा कधि कोणाच्या वाईटाची इच्छा करत नाहीत. त्या सर्वांचे निरंतर कल्याण, हित करतात. दुसर्‍याचे अनिष्ट करावे, दुसर्‍याला त्रास द्यावा हा तुझा स्वभाव नाही. हे कृपाळू माते, तुझ्या ह्या उसळणार्‍या लाटा आमचे निरंतर कल्याण करोत. (51)

 

(वृत्त स्रग्धरा, अक्षरे – 21, गण- म र भ न य य य , यति- 7 7 7)

द्यूते नागेन्द्रकृत्तिप्रमथगणमणिश्रेणिनन्दीन्दुमुख्यं

सर्वस्वं हारयित्वा स्वमथ पुरभिदि द्राक् पणीकर्तुकामे ।

साकूतं हैमवत्या मृदुलहसितया वीक्षितायास्तवाम्ब

व्यालोलोल्लासिवल्गल्लहरिनटघटीताण्डवं नः पुनातु ।। 51 ।।

 

अन्वय – हे अम्ब! द्यूते नागेन्द्रकृत्तिप्रमथगणमणिश्रेणिनन्दीन्दुमुख्यं सर्वस्वं हारयित्वा अथ द्राक् स्वं पणीकर्तुकामे पुरभिदि, मृदुलहसितया हैमवत्या साकूतं वीक्षितायाः  तव व्यालोलोल्लासिवल्गल्लहरिनटघटीताण्डवं नः पुनातु । (51)

 

अन्वयार्थ - हे अम्ब – हे माते, द्युते – द्युतामध्ये , नागेन्द्रकृत्तिः – गजचर्म; प्रमथ गणः- शिवाचे नंदी, वीरभद्र, भैरव, शृंगी, भृंगी, घंटाकर्ण इत्यादि सेवक गण ; मणिश्रेणिः – रुद्राक्षादि मण्यांच्या माळा;  नन्दिः – स्ववाहन वृषभ नंदी ;  इन्दु – चंद्र ,  मुख्यं – इत्यादि मुख्य गोष्टींनी युक्त असे ; सर्वस्वं – सर्व धन ; हारयित्वा – हारून घालवून ;  अथ – नंतर ; द्राक् – लगेच ; पणीकर्तुकामे – (स्वतःला) पणास लावण्याची इच्छा करणार्‍या , पुरभिदि – त्रिपुरासुराला मारणार्‍या शिवाला ; मृदुल हसितया -  मंद स्मित करणार्‍या ; हैमवत्या – हिमवताची कन्या हिमवती म्हणजे पार्वतीने ; साकूतं – साभिप्रायाने ; वीक्षितायाः – पाहिलेल्या  तव – तुझ्या ; व्यालोला – चंचल ; उल्लासिन्यः – वर उसळणार्‍या ; वल्गन्त्यः – आवाज करणार्‍या ; नटः – नटाप्रमाणे लाटा ; घटिताण्डवं – डोक्यावर घट घेऊन तांडव नृत्य करणे ; (लाटारूपी नटाचे जणु घट नृत्य) ; नः – आम्हास , पुनातु – पवित्र करो. (51)

 

होते सामर्थ्यशाली त्रिपुर असुर जे त्या वधे जो पुरारी

द्यूतामध्येच त्यासी हसत हसत ती धूळ चारेच गौरी ।

हारे सर्वस्व शंभू शशि, वृषभ, मणी, चर्मवस्त्रे गणांसी

तेव्हा लावे स्वतःसी त्वरितचि पणा; डंख दे हार भारी ।। 51.1 ।।

 

दृष्टिक्षेपास टाकी तुजवर गिरिजा; मंद हासेच गाली

‘‘गंगा लावा पणाला’’ जणु सुचवितसे ‘‘प्राणनाथा त्वरे ही’’।

संकेताने उमेच्या तव हृदि उसळे क्षोभ उद्रेक भारी

त्याने लाटा तुझ्या का सतत उसळति गर्जती उंच जाती ।। 51.2 ।।

 

वाटे पाहून त्यांसी अभिनय करिते कोण नृत्यांगना ही

दुःखावेगे जणू का घट धरुन शिरी नाचते तांडवासी ।

आवेगे हेंदकाळे, घटजल उसळे, त्याच लाटा तुझ्या गे,

पापे नाशून आम्हा पुनितचि करु दे माय हे पुण्यश्लोके ।। 51.3 ।।

---------------------------------------------------

श्लोक 52

जगन्नाथरायांच्या मनात निर्माण झालेली गंगेच्या उंच उंच लाटांची तीव्र ओढ ; तिच्या कुशीत शिरण्याची उत्कट अभिलाषा त्याच्या शब्दा शब्दातून व्यक्त होत आहे. माय, माझं मलीन झालेलं सर्वांग केवळ तुझ्या दर्शनाने पवित्र निष्कलंक होऊ दे; हे त्याचं मागणं मागताना ते म्हणतात,

मदनाला विश्वजयी म्हणतात. जगात कोणी असा नाही जो आपल्या आयुष्यात एकदाही मदनबाधेचा शिकार झाला नाही. बोलून चालून विश्वविजयीच तो! पण ह्या मदनाला शंभू शिवाने आपला तिसरा डोळा उघडून राख राख करून टाकलं. मदनाला शरीरहीन, अंगहीन बनवलं म्हणून तो अनंग झाला. असा जो ‘अनंग-रिपु’ (म्हणजे मदनाचा शत्रू) शिव आपल्या वैराग्यासाठी प्रसिद्ध आहे.

 हे गंगे, त्यालाही तुझा मोह पडून त्याच्या उत्तमांगावर म्हणजे मस्तकावर, जटाजूटांमधे त्याने तुला सर्वोच्च स्थान दिलं. त्याचं कारणही तसच आहे. कारण हे माय, ‘लोकांचं दुःख दूर करणे’ ह्या एकमेव व्रताने तू झपाटल्याप्रमाणे काम करत आहेस. सर्व प्राणिमात्रांचं दुःख दूर करण्याचा जणु काही तू विडाच उचललेला आहेस. तुझ्या उंच उंच उठणार्‍या ह्या लाटा माझं अंग अंग निर्मळ करोत. माझ्या मनात साचलेलं दुःख धुवून टाकोत. (52)

(वृत्तइंद्रमाला/उपजाती, इंद्रवज्रा आणि उपेंद्रवज्राचे मिश्रण)

विभूषितानङ्गरिपूत्तमाङ्गा सद्यः कृतानेकजनार्तिभङ्गा

मनोहरोत्तुङ्गचलत्तरङ्गा गङ्गा ममाङ्गान्यमलीकरोतु ।। 52 ।।

 

अन्वय – विभूषितानङ्गरिपूत्तमाङ्गा, सद्यः कृतानेकजनार्तिभङ्गा, मनोहरोत्तुङ्गचलत्तरङ्गा गङ्गा मम अङ्गानि अमलीकरोतु ।

अन्वयार्थ - विभूषितं – भूषित केलेले, सजविलेले ; अनंग – मदन ; रिपू – शत्रू ; अनंगरिपोः – मदनाच्या शत्रूचे म्हणजेच शिवाचे ; उत्तमांग – डोके, मस्तक ; यया – जिने ;  (जिने शिवाचे मस्तक भूषविले आहे अशा गंगेचे)  सद्यः –  आजच्या आज, त्याच दिवशी तात्काळ ; आर्ति –दुःख कष्ट पीडा व्यथा दारूण दुःख; कृतानेकजनार्तिभंगा – अनेक लोकांचे दुःख दूर करणारी ; मनोहरोत्तुंगचलत्तरंगाः - सुंदर , मोठ्या उंच उंच, चंचल लाटा असलेली गंगा ; मम – माझ्या ; अंगानि – सर्वांगांना ; अमली करोतु – निर्मळ, पवित्र करो .    

जाळे अनंगा शिवशंभु जोची । त्याच्या जटांसी नित भूषवी जी ।

होता तिचे दर्शनमात्र लोका । पीडा व्यथा जाय लया तयांची ।। 52.1 ।।

लाटा जिच्या चंचल उंच उंच । चित्तास वेधूनचि घेति दिव्य ।

गंगा करो ती मम अंग अंग । अहो सदा निर्मळ निष्कलंक ।। 52.2 ।

 

---------------------------------------------------

श्लोक 53

इमां पीयूषलहरीं जगन्नाथेन निर्मिताम् ।

यः पठेत्तस्य सर्वत्र जायन्ते सुखसम्पदः ।। 53 ।।

पीयूषलहरी ऐशा  । जगन्नाथेचि निर्मिल्या

म्हणे त्यांस सदा लाभे । संपत्ती, सौख्य पूर्णता ।।

--------------------------------------------------- 

सुदीर्घ गंगालहरी मनोज्ञा । वाचून हो हर्ष ‘अरुंधतीला’ ।

येई तिला जी अनुभूति चित्ता । ती देतसे ती रसिकांस सार्‍या ।।

Comments

Popular posts from this blog

गंगालहरी अनुक्रमणिका

श्लोक 1

श्लोक 3