श्लोक 34

 


श्लोक 34



गंगेच्या पावित्र्याचं वर्णन करताना, तिच्या सामर्थ्याची महति विषद करताना, तिच्या सर्वांशी समभावाने असलेल्या वात्सल्याची स्तुती करताना सहाजिकच जगन्नाथ पंडित जरा जास्तच भावुक झाले आहेत. कारण गंगेनी ज्याच्यावर कृपा करावी असं त्यांना वाटत आहे ती व्यक्ती ते स्वतःच आहेत. (एखादं लहान मूल  आपण केलेल्या वाईट गोष्टीसाठी आईने शिक्षा करू नये ह्यासाठी आधीच, शेजारच्या नंदूने ह्यापेक्षाही जास्त वाईट वागून देखील त्याच्या आईने त्याला गोळी दिली असे सांगते. तसेच काहिसे हे विधान आहे. )

‘आपल्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त महापापी, दुराचारी व्यक्तीलाही गंगा जर अंतसमयी तिची आठवण काढताच, पुण्यगति प्राप्त करून देत असेल तर मला का देणार नाही?’ असा त्याच्या मनातला (किंवा श्लोकाचा अंतस्थ भाव) अजाण लेकराप्रमाणे असलेला निष्पाप भाव गंगेलाही नक्कीच भावेल असा आहे.

मनुस्मृतीत(11/54 ) महापापे कोणती ते सांगणरा श्लोक आहे.

ब्रह्महत्या सुरापानं स्तेयं गुर्वङ्गनागमः ।

 महान्ति पापकान्याहुः संसर्गश्चापि तैः सह ।।

जगन्नाथ पंडित म्हणतात, विप्रांना ठार मारणारे, गुरुगृहीच्या पवित्र स्त्रियांची अभिलाषा धरून, फसवून त्यांचा उपभोग घेणारे, दारुबाज दारुडे, सोनेनाणे, दागदागिने लुबाडणारे; असे हे सर्व महा पातके करणारे; महा पापी आहेतच पण त्यांच्याशी  मैत्री करणारेही तितकेच पापी आहेत.

ज्या घोर अपराधांना क्षमा करणेही अशक्य आहे असे शास्त्र सांगते; असे अपराध करणारेही खूप असतात अशांनीही मरणसमयी गंगेची नुसती आठवण काढली; गंगेच्या जलौघात देहत्याग केला तर त्यांना मुक्ती मिळते.त्यांनाही गंगेच्या सामर्थ्यामुळे दिव्य लोक प्राप्त होतो.

इतकेच काय, सर्व देवही त्यांना नमन करतात. ज्या यज्ञात मोठी मोठी दाने द्यावी लागतात असे यज्ञ ज्यांनी केले आहेत; महान तप आचरले आहे; मोठमोठी दाने देऊन मरणोत्तर , स्वर्गात अनेक सुखे अनुभवत आहेत; त्यांच्या पेक्षाही श्रेष्ठ लोक आणि वरचढ सुखे त्यांना फक्त गंगेच्या अनुग्रहामुळे प्राप्त होतात.

जगन्नाथ पंडित म्हणतात, ‘माय ही तुझ्या जलाच्या अंगभूत गुणांची महती आहे. ही तुझ्या वात्सल्याची कहाणी आहे. ही तुझ्या सामर्थ्याची निशाणी आहे. माय, मग मलाही दूर लोटणार नाहीस ना? मला माझ्या पापातून मुक्त करशील ना? मलाही चांगली गति देशील ना? मीही अनन्यभावाने तुला शरण आलो आहे.’ (34)

 

अपि घ्नन्तो विप्रानविरतमुशन्तो गुरुसतीः

पिबन्तो मैरेयं पुनरपि हरन्तश्च कनकम् ।

विहाय त्वय्यन्ते तनुमतनुदानाध्वरजुषा-

मुपर्यम्ब क्रीडन्त्यखिलसुरसम्भावितपदाः ।। 34 ।।

अन्वय – हे जननि, अविरतं विप्रान् अपि घ्नन्तः, पुनरपि गुरुसतीः उशन्तः, मैरेयं अपि च पिबन्तः, कनकं च हरन्तः (ते) अन्ते त्वयि तनुं वाहाय अखिलसुरसंभावितपदाः (भूत्वा) अतनुदानाध्वरजुषांउपरि क्रीडन्ति । (34)

अन्वयार्थ - भो अंब – हे माझ्या माते गंगे ; अविरतं- निरंतर ; विप्रान् - ब्राह्मणांना ; अपि – सुद्धा ; घ्नन्तः – मारणारे ; पुनः - आणि ; गुरुसती – गुरूजनांच्या पतिव्रता स्त्रियांना ; उशन्तः – इच्छिणारे , भोगणारे ; मैरेयं – मद्याप्रत ; अपि – सुद्धा ; पिबन्तः – पिणारे ; कनकं – सोने ; च – आणि ; हरन्तः – चोरणारे; अन्ते – मरणसमयी  ; त्वयि – तुझ्या ठायी तुझ्या प्रवाहात , तनुं – देहाला ; विहाय – सोडून, टाकून ; अखिल – सर्व ; सुराः – देव त्यांनी संभावित – पूजिलेली ; पदानि – चरण ; अखिलसुरसंभावितपदाः – सर्व देवही ज्यांचे चरण वंदितात असे ; भूत्वा – होऊन ; अतनु – पुष्कळ मोठी दाने ज्यात आहेत असे अध्वर – यज्ञ ;  त्यांस जुषन्ति – सेविणारे— अतनुदानाध्वरजुषां – स्वर्गादि उत्तम लोकी जाऊन, त्यांची दिव्य भोगरूपी फळे भोगणार्‍या सत्पुरूषांच्या; उपरि – वर ; उर्ध्वलोकी , क्रीडन्ति – क्रीडा करतात. (34)

 

करी विद्वानाचा वध कुणि अती निर्दयपणे

लबाडीने कोणी कनक धन नेई लुटुन ते

गुरूपत्नीलाही अधम कुणी भोगे फसवुनी

सुरापानाऐसी अति अधम कृत्ये नित करी ।। 34.1 ।।

 

महापाप्यांनी या स्मरुन तुजसी अंतसमयी

जरी केले गंगाजल जवळ ते अंतसमयी ।

तरी त्यांच्या पायी सुरवर मुनी नित्य नमिती

अती पुण्यात्म्यांच्या वरचढचि त्या देव समजी ।। 34.2 ।।

 

मिळे यज्ञाचे ज्या फळ सकल सर्वस्व त्यजुनी

नरांपेक्षा ऐशा वरचढ सुखे त्यांस मिळती ।

तयांना स्वर्गाची गति मिळुन उत्कृष्ट प्रतिची

करीती क्रीडा ते, विविध सुख आनंद लुटती ।। 34.3 ।।

---------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

गंगालहरी अनुक्रमणिका

श्लोक 1

श्लोक 3