श्लोक 33
श्लोक 33
गंगेच्या महा प्रतापाचं वर्णन करताना
जगन्नाथ पंडित म्हणतात, गंगेच्या ह्या विशाल पात्राला, ह्या अफाट जलौघाला कुठला आपपर
भाव नाहीच मुळी! जो तिच्या तीरी येईल तो तिचाच असतो. कुठलाही आजादुजा भाव न ठेवता ती
त्याच्यावर कृपेचा वर्षाव करत असते.
किनार्यावर तो प्रतापी असो वा पापी असो;
सज्जन असो वा दुर्जन असो; सम्पन्न असो की विपन्न असो; सश्रद्ध असो की अश्रद्ध असो
; सर्वाधार असो वा निराधार असो; निष्कलंक असो वा कलंकित असो गंगामाता सर्वांना
सारख्याच स्नेहाने आपल्या पदरात घेते. सर्वांनाच मोक्ष प्रदान करते. सर्वांचीच पापे
धुवून त्यांना निष्कलंक करते. सर्वांनाच स्वर्गाचे अधिकारी बनवते. कोणाचीही निराशा
करत नाही. कोणीही भक्त तिच्या किनार्यावरून विन्मुख जात नाही. जेथून जेथून गंगेचा
हा पुण्यदायी प्रवाह वाहतो तेथील सार्यांचे निरंतर कल्याण करत ही गंगामैया वाहत
असते.
पण ज्या प्रदेशातून, ज्या वस्त्यांमधून
गंगेचा पुण्यदायी पावन प्रवाह वाहत नाही तेथील दुनिया पक्षपात करणारी,
लोकालोकांमधे भेदभाव करणारी, त्यांना असमान वागणूक देणारी नितांत दुःखाची असते. तेथे
लोकांना दिल्या जाणार्या वागणूकीत आकाश-पाताळा इतका फरक लोकांना अनुभवायला लागतो.
तेथे पुण्यात्मे विमानाने मोठ्या आनंदाने स्वर्गात जात असतात तर; तेथे अधर्मी,
दुराचारी लोकांना यमदूत तत्क्षणी बंदी बनवून यमलोकात घेऊन जातात. तेथील असह्य यमयातना
भोगणे हेच त्यांचे नशिब ठरते. अशी आणि इतकी कमालीची तफावत जिथे गंगा नाही अशा अशुभ
प्रदेशातच संभवते.
विमानैः स्वच्छन्दं सुरपुरमयन्ते सुकृतिनः
पतन्ति द्राक्पापा जननि नरकान्तः परवशाः।
विभागोऽयं तस्मिन्नशुभमयमूर्तौ जनपदे
न यत्र त्वल्लीला दलितमनुजाशेषकलुषा।। 33 ।।
अन्वय – हे जननि, सुकृतिनः सुरपुरं
विमानैः स्वच्छदं अयन्ते, पापाः परवशाः (सन्तः) नरकान्तः द्राक् पतन्ति, यत्र
दलितमनुजाशेष कलुषा त्वल्लीला न, तस्मिन् अशुभमयमूर्तौ जनपदे अयं विभागः अस्ति। (33)
अन्वयार्थ - हे जननि –
हे माझ्या माते गंगे ; सुकृतिनः – ज्यांनी पुण्य केले आहे असे पुण्यवान लोक
सुरपुरं – देवांच्या गावी म्हणजे स्वर्गाप्रत ; विमानैः – विमानांनी
; स्वच्छंदं- यथेच्छपणे; अयन्ते – जातात ; परवशाः – (यमाच्या
दूतांच्या) अधीन असलेले; पापाः – पापी पुरूष ; नरकान्तः – नरकामधे ;
द्राक् – शीघ्र; पन्तन्ति – पडतात; यत्र – जेथे, ज्या
प्रदेशात ; ( दलितमनुजाशेषकलुषा ) अशेषं –
सर्व; कलुषं- पाप ; दलितं – नाशिलेले ; मनुजानां – माणसांचे
; अशेष कलुषं – संपूर्ण पाप ; यया – जिने ( मानवांचे संपूर्ण पाप नाश करणारी ) तव-
तुझी ; लीला – चरित्र, न अस्ति – असत नाही ; तस्मिन् -त्या ;
अशुभमयमूर्तौ – पाप युक्त स्वरूप असलेल्या अशा; जनपदे – देशात ; अयं
- हा ; विभागः – भेद ; अस्ति
– आहे. (33)
न वाहे देशी ज्या सलिलचि सलीले तव सुखे
कुणी ना स्नेहार्द्रा तुजसम सर्वांप्रति तिथे ।
अहो पुण्यात्मे ते सहजिच विमानी बसुनिया
सुखाने स्वच्छंदे सरपुरित त्या पावति सदा ।। 33.1।।
कृतांताचे तेथे बळजबरिने दूत जुलमी
कसे पाप्यांना गे परि पकडुनी नेति नरकी ।
जिथे गंगौघाने अमल करण्या सर्व जन हे
नसे माते तूची फरकचि तिथे हा दिसतसे ।। 33.2।।
जिथे वाहे गंगे! तव पुनित धारा सुखमयी
तिथे चिंता दुःखे दिसत न दुजाभाव
कधिही ।
परी ना वाहे गे तव सुखद
गंगौघ जिथुनी
प्रदेशांसी त्या गे नित अवकळा ये अशुभ ती ।। 33.3 ।।
---------------------------------------------------

Comments
Post a Comment