श्लोक 32

 

श्लोक 32



माणसाला रोज नवे नवे सुखोपभोग मोहवीत राहतात. मृगजळामागे धावत राहिल्याप्रमाणे माणूस ह्या लौकिक गोष्टींमागे धावत राहतो. जसा मृग मृगजळापर्यंत पोहचू शकत नाही आणि तहानेने अजून अजून व्याकूळ होत रहातो त्याप्रमाणे हया  काल्पनिक सुखांनी माणसाचं समाधान कधी होत नाही. त्याची वाढत जाणारी तृष्णाही शमत नाही.

जगन्नाथ पंडित म्हणतात, माय! तुझं तसं नाही. तू म्हणजे नितांत समाधान आहेस. तुझा हा नीर देह डोळ्यांनी नुसता निरखत राहणं ही मनाची खरी शांती आहे. नाहीतर अनेक सम्राटांचे सम्राट आपली आसिंधु पसरलेली राज्यं तृणवत् सोडून गंगेच्या किनारी येऊन राहिले नसते.

तुझा हा विलोभनीय नीर देह म्हणजे देहाची विश्रांती आहे. मनाची सुख शांती आहे.  नेत्रांची सम्पत्ती आहे. त्याच्यावरून नजर हटत नाही. नजरेने जणु तुझा प्रवाह पिऊन देहमनालाही पुष्टी, संतुष्टी मिळते इतका तो प्रभावी आहे. तुझ्या लाटांचा कलकल ध्वनी कानांना सुखावणारा आहे.

हे माय गे, जो माणूस त्याच्या विशाल नेत्रांनी कधी तुझा प्रवाह डोळ्यात साठवून ठेवत नाही, तुझ्या सलिल गात्रांना निरखत नाही, तुझा निरंतर वाहणारा प्रवाह त्याच्या नेत्रांनी अनुभवत नाही त्याच्या सुंदर नेत्रांचा काय उपयोग? ज्यासाठी त्याला विशाल नेत्र भगवंताने दिले त्याचा अनुचितच वापर झाला असे म्हणावे लागेल. अरेरे!

माय, तुझ्या लहरींचा होणारा हा मंद मंद कलकल आवाज मोठा गोड आहे. कानांना सुखावणारा आहे. तुझ्या तीरावर स्वस्थ बसून जर कोणी सरस्वतीच्या वीणेप्रमाणे मधुर झंकारणारा, तर कधी मृदु मुलायम ‘झाल्या’ (सतारीवर वाजवला जाणारा प्रकार) प्रमाणे किलकिल करणारा लहरींचा मधुरध्वनी ऐकला तर त्याला परम शांती लाभेल. पण जर हा मधुर झंकार दुर्लक्षित केला, ऐकलाच नाही तर त्याच्या कानांचा तरी असून काय उपयोग? ? माय, तू जीवनाला दिशा देणारं सूत्र आहेस,  आयुष्य जगण्याचं तंत्र आहेस. सुखाचा मंत्र आहेस. तुला मी शरण आलो आहे.  

 

विशालाभ्यामाभ्यां किमिह नयनाभ्यां खलु फलं

 याभ्यामालीढा परमरमणीया तव तनुः।

अयं हि न्यक्कारो जननि मनुजस्य श्रवणयो

र्ययोर्नान्तर्यातस्तव लहरिलीलाकलकलः।। 32 ।।

अन्वय – भो जननि, मनुजस्य याभ्यां नयनाभ्यां तव परमरणीया तनुः न आलीढा आभ्यां विशालाभ्यां (नयनाभ्यां) इह किं खलु फलं (अस्ति) तथा ययोः श्रवणयोः अन्तः तव लहरिलीलाकलकलः न यातः  तयोः अयं हि न्यक्कारः (एव)!

अन्वयार्थ - हे जननि – हे माझ्या माते गंगे ;  मनुजस्य – मनुष्यांच्या ; याभ्यां – ज्या ; नयनाभ्यां – डोळ्यांनी ; तव- तुझी ; परमरमणीया – अतिशय सुंदर ;  तनुः – मूर्ति ; न – नाही ; आलीढा – (चाटली), अवलोकिली ; आभ्यां – ह्या ; विशालाभ्यां- आकर्ण , मोठ्या ; खलु – खरोखर ; नयनाभ्यां – डोळ्यांना ; इह – ह्या जगात ; किं – काय, कोणते ; खलु फलं – फळ आहे? ; तथा – तसेच ; ययोः – ज्या ; श्रवणयोः – कानांच्या ; अन्तः – अन्तर्भागी, आत ; तव – तुझा ; लहरिलीलाकलकलः – लहरींच्या मनोरंजक खेळाचा कलकल आवाज ; न – नाही ; यातः – आला ; तयोः – त्यांस ; अयं - हा ; धिक्कारः हि – धिक्कार असो.

 

मनासी मोही गे जलमय तुझी सुंदर छबी

परी ह्या रूपा जी कमलनयने ना निरखिती

टपोरे ऐसे ते नयन सले वा न असले

असूनीही त्यांचे नित निरुपयोगीच असणे ।। 32.1 ।।

 

तरंगांची क्रीडा कलकलचि चाले सुरमयी

 तयाच्या माधुर्ये अविरत श्रुतींनाच रिझवी

श्रुती ना ऐकी ज्या, सुखद अनुभूती कुठुन त्या

फुका गात्रे ऐशी सतत करु धिःकार तयिचा ।।32.2 ।।

---------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

गंगालहरी अनुक्रमणिका

श्लोक 1

श्लोक 3