श्लोक 30

 

श्लोक 30



आपल्या सामर्थ्याचा लोकांना परिचय व्हावा; आपला अफाट पराक्रम पाहून जगानी आश्चर्यानी तोंडात बोट घालावं; आपलं महान कार्य पाहून लोकांचे डोळे  आश्चर्याने विस्फारले जावेत, सर्व जगाने माझं अतुल्य कार्य पाहून माझा जयजयकार करावा, स्तुतीसुमनं उधळावीत असं कुठल्या समर्थ, कर्तबगार व्यक्तीला वाटणार नाही?

जगन्नाथ पंडित म्हणतात, हे गंगा माय, तुझ्याही मनात कित्येक दिवस अशी सुप्त इच्छा आहे की; ‘अशा एखाद्या पतिताहून पतित माणसाचा उद्धार मी असा काही चुटकीसरशी करून दाखवेन की सर्व जग बघतच राहील.’ ; पण ही तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी इतक्या खालच्या पातळीवर पोचलेला अधम पापी मात्र तुला मिळत नव्हता. त्यामुळे,  इतका काळ लोटूनही तुझी ही इच्छा चिरकाल तुझ्या मनातच राहून गेली होती. माय, पण तुझी ही इच्छा पूर्ण करण्यासाठीच मी तुझ्या दारी आलो आहे. माझ्या इतका पापी तुला दुसरा मिळणार नाही. माय तुझ्या कृपेचा इतका वर्षाव कर इतका वर्षाव कर की, आम्ही सर्व निर्मल होऊच पण, सर्व जगाला इतक्या त्वरित झालेल्या उद्धारामुळे आश्चर्याचा धक्का बसेल.

 

 कोऽप्येतावन्तं खलु समयमारभ्य मिलितो

यदुद्धारादाराद्भवति जगतो विस्मयभरः।

इतीमामीहां ते मनसि चिरकालं स्थितवती-

मयं सम्प्राप्तोऽहं सफलयितुमम्ब प्रणय नः ।। 30 ।।

अन्वय – हे अम्ब, यदुद्धारात्  आरात् जगतः विस्मयभरः भवति (एतादृशः) एतावन्तं समयं आरभ्य न कोऽपि  खलु मिलितः । इति ते मनसि चिरकालं स्थितवतीं इमां इहां सफलयितुं  अयं अहं सम्प्राप्तः (अस्मि) (अतः) नः प्रणय ।

अन्वयर्थ - हे जननि – हे माझ्या माते गंगे ; यत् उद्धारात् – ज्याच्या उद्धारामुळे ; आरात् – शीघ्र, लवकर ; जगतः – जगाला ; विस्मयभरः -  आश्चर्यातिशय, प्रचंड आश्चर्य ; भवति – होईल ;  एतादृशः – असा ; एतावन्तं – इतकं परिमाण असलेल्या अशा ; समयं आरभ्य – काळाला आरंभ करून , न – नाही ; कोऽपि – कोणीही ; खलु- खरोखर ; मिलितः – प्राप्त झाला, सापडला ; इति – अशी ;  ते – तुझ्या ; मनसि – मनात ; चिरकालं – पुष्कळ काळापर्यंत ; स्थितवतीं – राहणार्‍या ; इमां – ह्या , ईहां – इच्छेला ;  सफलयितुं – पूर्ण करण्याकरता ; अयं – हा ; अहं – मी , सम्प्राप्तः – प्राप्त झालो आहे , आलो आहे ; अतः – म्हणून ; नः – आम्हाला ; प्रणय – अनुग्रह कर, कृपा कर.

‘दुराचारी खासा मजसि गवसावा कुणीतरी

तया उद्धारावे सहजचि क्षणार्धात बघ मी ।

जयांच्या उद्धारे सकलजन हो विस्मयभरे

पहा तारीला मी किति अधम अधमातीतचि त्वरे ।। 30.1 ।।

 

बहू कीर्ती माझी त्वरित पसरावीच जगती’

मनीषा ऐसी गे चिर वसत होती तव हृदी ।

अशा संकल्पाचा हृदयि तव आरंभ घडला

तयासीही लोटे अपरिमित गे काळ किति हा ।। 30.2 ।।

 

मिळाला ऐसा ना अधम इतुका गे परि तुला

तुझ्या ह्या उद्देशा सफल करण्या मी पतित हा ।

तुझ्या दारी आलो करि तव मनीषा सफल गा

कृपा वर्षावाने पुनित करि आम्हासचि पुन्हा ।। 30.3 ।।

---------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

गंगालहरी अनुक्रमणिका

श्लोक 1

श्लोक 3