श्लोक 29
श्लोक 29
दुराचारी लोकांमधे सुद्धा श्रेणी असतात.
काही दुराचारी लोकांच्या जमाती सर्वसामान्य जगाचे नीती नियम धुडकावून लावून
कुठलीही हीन कृत्ये करावयास मागेपुढे पहात नाहीत. जे धर्माने निषिद्ध सांगितले आहे
अशी अनेक कृत्ये ते सहज करत असतात. श्वानमांसही भक्षण करतात. अशा अत्यंत खालच्या
पातळीच्या दुष्कर्म्यांच्या टोळ्यांचे काही नियम असतात. त्यांचीही काही
न्यायव्यवस्था असते. त्यांच्या ह्या न्याय व्यवस्थेनुसार, काही वेळा काही
दुष्कृत्ये करावीत का न करावीत असा त्यांच्याही मनात संभ्रम तयार होतो. (To be or not to be that is the question ) अशा वेळी तेही अनेक पापे, कुकर्मे नको रे बाबा! ही फार भयंकर आहेत
म्हणून नाकारतात.
कवी जगन्नाथ म्हणतात, माझ्या पातकांची
पातळी इतकी नीच आहे की काय सांगू? माय, समाजाचे कुठलेही नियम न पाळणार्या, अधम,
नीच लोकांनीही जी कृत्ये करू नयेत म्हणून दूर लोटली, अशी त्याज्य, हद्दपार केलेली, बेघर झालेली पापे माझ्याशिवाय जाणार कुठे? पाप्यांनीही दूर
लोटलेल्या महा पापाचे मी एकमेव वसतिस्थान आहे. अशा पापराशींचे मी आगर
आहे.
पण माय! तुला माझ्याविषयी अपार
आस्था उत्पन्न झाली. मला पाहून तुला माझा कळवळा आला हे साहजिकच आहे कारण तू माझी
मायच आहेस ना! कुठलीही
जन्मदात्री आपलं लेकरू असं वार्यावर सोडून देत नाही. ‘नाहीच पातकी कोणी, माझ्यासमचि एक मी ।’
असं जरी असलं तरी, ‘जाळाया घोर कर्मे ती , नाही तव समा कुणी ।।’ हेही तितकच खरं आहे
माय, भक्त जेवढा हीन दीन, तेवढी तुझी त्याच्या
विषयीची करुणा वाढत जाते. (अपराधक्षमापन स्तोत्र श्लोक 11,9 थोडे बदल करून)
असलो जरि पुत्र दुष्ट मी । करुणेचा घन तू महानची
अपराध सहस्र मी करी । मजसी स्नेह अलोट तू करी।।
न विलक्षण यात काहिही । जननी एकचि रीत ही जगी
अपराध करी अपत्य ते। परि त्या माय न दूर लोटते।।
ह्याच न्यायाने माझा उद्धार करण्यासाठी कंबर कसून
तू तयार आहेस. मला मात्र तुझी कशी स्तुती करावी हेच कळत नाही. माय मी तर मनुष्य
रूपात असलेला नरपशू आहे. तुझी स्तुती करायचे सामर्थ्य मला कसे प्राप्त व्हावे?
भागीरथी जननि गे न करे कधी मी । वाहून शब्द सुमने तव कीर्तनासी ।
केले न चिंतन मनी नच पाप ऐसे । वाणी धजेल न कधी वदलोचि ऐसे।।
झालो कृतघ्न जरि मी ममता तुझी गे । माझ्यावरी बरसते जननी तुझी गे।
आहे तुझे उचित वर्तन हेचि माते । जन्मे कृतघ्न सुत, माय न वैरिणी गे
।।
--
श्वपाकानां व्रातैरमितविचिकित्साविचलितै-
र्विमुक्तानामेकं किल सदनमेनःपरिषदाम्।
अहो मामुद्धर्तुं जननि घटयन्त्याः परिकरं
तव श्लाघां कर्तुं कथमिव समर्थो नरपशुः।। 29 ।।
अन्वय – हे जननि, अमितविचिकित्साविचलितैः श्वपाकानां
व्रातैः विमुक्तानां एनः परिषदां किल एकं सदनं मां उद्धर्तुं परिकरं घटयन्त्याः तव
श्लाघां कर्तुं नरपशु; इव (अहं) अहो कथं समर्थः(स्याम्) (29)
अन्वयार्थ - हे जननि – हे माझ्या माते गंगे ; अमितः
– अपरिमित ; विचिकित्सा – संशय , तस्याः
विचलिताः – कंपित झालेले तैः – त्याच्यापासून श्वपाकानां –
कुत्र्याला शिजवणार्यांच्या, म्हणजे चांडालांच्या किंवा नीच लोकांच्या; व्रातैः
– समुहानी विमुक्तानां -सोडलेल्या ; एनः परिषदां – ह्या
पापांच्या सभेचे एकं – एकमेव सदनं
– घर असलेल्या अशा ; मां – मला उद्धर्तुं – उद्धार करण्याकरता परिकरं
– कमरेस ; घटयन्त्या – बांधणर्या (कंबर कसून तयार झालेल्या ) तव – तुझी ; श्लाघा कर्तुं
- स्तुती करण्यास ; नरपशुः इव –
मनुष्यरूपी पशूसमान ; अहं – मी; कथं समर्थः स्याम् – कसा समर्थ
होईन? (29)
नसे ज्यांना नीती नियम कुठले सभ्य जगिचे
असे पापी जेव्हा पडतिच विचारात कधि गे ।
अहो दुष्कर्मे ही उचित असती का अनुचिता
तयांच्या चित्तीही उमटत असे सम्भ्रम असा ।। 29.1।।
अशावेळी पापी त्यजिति दुरिते त्याज्य म्हणुनी
नसे ज्या पापांसी अधम-मनि थारा लवभरी ।
असे पापांचे जे समुह असती बेघर कुणी
तयांसाठी मी गे सदनचि असे केवळ जगी ।। 29.2 ।।
परी उद्धाराया त्वरित मज पाप्यास जननी
सुसिद्धा आहे तू सतत कसुनी कंबर तुझी ।
कुठे सौजन्याची तव अमल मूर्तीच जननी
कुठे मी हा पापी नर नच पशू केवळ जगी ।। 29.3 ।।
तुझी आस्था माझ्याविषयि बघुनी माय मम गे
अगे भांबावूनी नच मजसि काही कळतसे ।
तुझ्या प्रेमामध्ये भिजुन जरि गेलो तरि कसे
स्तुती गाण्या यावे बळ कुवत सामर्थ्य मज गे ।। 29.4।।
---------------------------------------------------

Comments
Post a Comment