श्लोक 27

 

श्लोक 27



अनेक अलंकार आपल्या काव्यात सहज वापरणार्‍या जगन्नाथ पंडितांनी 27 व्या श्लोकात थोडी अतिशयोक्ती केली असली तरी फार सुंदर आहे. गंगामातेच्या विशाल रूपाचं केलेलं ह्या श्लोकातील वर्णन वाचताना; आपल्या आईला म्हणजे पार्वतीमातेलाच ब्रह्मांड मानून तिला घातलेली प्रदक्षिणा हीच ब्रह्मांडाची प्रदक्षिणा आहे असं ठासून सांगणार्‍या बालगणेशाची आठवण येते. जगन्नाथ पंडित म्हणतात,

तिन्ही लोकांच्या कल्याणासाठी  भगवान शंकरांनी हालाहल ना गिळलं ना ना ओठातून बाहेर काढलं. गिळलं तर उदरातील ब्रह्मांडाचा नाश होईल आणि बाहेर टाकलं तर स्वर्गादि लोक व देवांचा नाश होईल अशा बिकट परिस्थितित त्यांनी ते जहाल विष कायमचं कंठात धारण केलं. सर्वांच्या कल्याणाचा समग्र विचार करून घेतलेला हा लोकोत्तर निर्णय अभूतपूर्व होता. अशा शिवाची स्तुती करताना आद्य शंकराचार्यही (शिवानंद लहरी श्लोक 31 मधे )म्हणतात,

जेंव्हा सागरमंथनी गरल ते आले वरी भीषण

सारे दानव, देव ही पळुनि ते गेले भये सत्वर।।

 

तेंव्हा प्राशुन ते असह्य विष तू,कंठी असे रोधिले

नाही तू गिळले,म्हणून उदरी ब्रह्मांड राही सुखे ।

ना यत्किंचित थेंबही पडु दिला बाहेर ओठातुनी

देवांचे गण रक्षिले भयद त्या हालाहलापासुनी।।

 

ऐसे प्रेम तुझे अलौकिक असे निःसीम सर्वांवरी

सारे हे जग जाणिते तव कृपा आधार तू एकची ।।

 

 

शिवाचा काळानिळा पडलेला कंठ, त्याला देवांचा देव महादेव बनवून गेला. त्याचं महान वैभव ठरला. निळा कंठ हीच ज्याची शोभा आहे त्या ‘श्रीकंठाने’ हे गंगामाय तुला त्याच्या जटाजुटांवर कोसळायला  विस्तीर्ण जागा उपलब्ध करून दिली. हे स्वर्लोककल्लोलिनी! हे गंगा माय, तू स्वर्गातून पृथ्वीवर अत्यंत वेगाने अक्षरशः कोसळलीस. शिवाच्या अस्ताव्यस्त, गुंतागुंतीच्या जटांच्या जटिल पसार्‍यातून, बिकट, अवघड जागांमधून वाट काढत, मार्ग शोधत, तुझ्या प्रवाहपथ तयार करत तुझा हा प्रचंड जलौघ वेगाने पुढे चालला आहे. ह्या गंगौघाची व्याप्ती कल्पनातीत आहे.

जगन्नाथ पंडित म्हणतात,

हे गंगामैया, तुझा विस्तार, तुझी व्याप्ती अफाट आहे. 14 भुवनांना निर्माण करणारं, त्रैलोक्याला आपल्या उदरात सामावून घेणारं हे ब्रह्मांड, ज्याचा आदि अंत कळत नाही; ज्याचा परीघ केवढा विस्तृत आहे त्याचं अनुमान करता येत नाही; ते ब्रह्मांड तुझ्या लाटांनी पार वेढून टाकलं आहे. एखादं टेंभुर्णीचं चिमुकल फळ लाटावंरती हेलकावत रहावं, लाटांच्या प्रचंड वेगामधे गटांगळ्या खात रहावं तसं हे ब्रह्मांड तुझ्या लाटांवर हालत डुलत, हेलकावत, कधी गटांगळ्या खातांना दिसत आहे.

तुझा हा अति प्रचंड जलसंघात, ह्या असीम जलराशी आम्हा भक्तांचे त्रिविध ताप दूर करोत.

 

इदं हि ब्रह्माण्डं सकलभुवनाभोगभवनं

तरङ्गैर्यस्यान्तर्लुठति परितस्तिन्दुकमिव।

स एष श्रीकण्ठप्रविततजटाजूटजटिलो

जलानां संघातस्तव जननि तापं हरतु नः।। 27 ।।

अन्वय – हे जननि, यस्य अन्तः सकलभुवनाभोगभवनं इदं ब्रह्माण्डं  हि तरङ्गैः तिन्दुकमिव परितः लुठति। स एष श्रीकण्ठप्रविततजटाजूटजटिलः तव जलानां संघातः नः सन्तापं हरतु।

अन्वयार्थ - हे जननि – हे माते ;  यस्य – ज्याच्या (ज्या जलसमूहाच्या); अन्तः – आंत, मध्यभागी ; सकल भुवन – 14 भुवने; त्यांचा आभोगः – घेरा, परीघ त्याचे भवनं – त्याचे उत्पत्ती स्थान असलेले ( सर्व चौदा भुवनांच्या वाढीचे उत्पत्तीचे स्थान असलेले); इदं – हे ; ब्रह्माडं- ब्रह्मांड ; हि – सुद्धा ; तरंगैः- लाटांनी ; तिन्दुकम् इव   – टेंभुर्णीचे फळासारखे; परितः लुठति –सर्व बाजूंनी हेलकावे खाते, गटांगळ्या खाते ; सः एषः – तोच हा ; श्रीकंठः – शोभिवंत/शोभायमान कंठ असलेला शिव ; प्रवितत जटाजूट – विस्तृत अस्ताव्यस्त , त्यामुळे जटिल जटायुक्त – शिवाच्या विशाल अस्ताव्यस्त जटांमुळे गुंतागुंतीचा, बिकट, अडचणींचा झालेला, गोंधळणारा  ; तव – तुझा ; जलानां संघातः – पाण्याचा प्रवाह, समूह ;  नः – आमचा ; संतापं – दुःख, क्लेश ; हरतु -  नाहीसा करो. हरण करो.

गळा काळा ज्याचा, विभवचि शिवाचे खचित ज्या

जटांचा त्याचा हा कितिकचि पसारा पसरला ।

असे गुंतागुंती शिव शिरि जटांची अमुप ही

तयातूनी जाशी बिकट वहिवाटा उमजुनी ।। 27.1 ।।

 

जलौघाची व्याप्ती अगणित अमर्याद तव ही

कसे ब्रह्मांडाही अति सहज घेरे चहु दिशी ।

असे ब्रह्मांडाचा परिघ कितीही विस्तृत जरी

धरे त्रैलोक्याला सकल भुवनांसीच उदरी ।। 27.2 ।।

 

प्रवाही गंगेच्या परि डुलत ब्रह्मांड बघुनी

तरंगे कैसे हे फळ चिमुकले वाटत मनी ।

जलाच्या राशी ज्या हरति नित पापे सुरधुनी

हरो त्याची तापत्रयचि अमुचे नित्य जननी ।। 27.3 ।।

---------------------------------------------------


Comments

Popular posts from this blog

गंगालहरी अनुक्रमणिका

श्लोक 1

श्लोक 3