श्लोक 26
श्लोक 26
आपल्याला एखादी गोष्ट मिळावी अशी कामना आपल्या मनात उत्पन्न होणं ही अगदी स्वाभाविक
वाटणारी गोष्ट आहे; पण ती इतकीच साधीसुधी मर्यादित रहात नाही. ह्या इच्छेची तीव्रता
वाढत ती आसक्तीत, तीव्र लालसेत, हव्यासात कधी बदलेल हे सांगता येत नाही. कामनापूर्ती
झाली नाही तर निराशा वैफल्यात आणि वैफल्य क्रोधात बदलायला वेळ लागत नाही
आणि कामनापूर्ती झाली तरीही ती क्षणैक टिकणारी
असते. एक कामना पूर्ण झाली की आनंद संपतो. दुसरी इच्छा डोकं वर काढते. इच्छाही कधी
एकटी येत नाही. ज्याप्रमाणे निमंत्रित दृष्टीहीन आपल्यासोबत दुसर्या व्यक्तीला
घेऊन येतो त्याप्रमाणे, कामनाही बरोबर अनेक कामनांना घेऊन येते. आपल्या अमर्याद
कामनापूर्तीसाठी माणूस आयुष्यभर धावत राहतो. प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. आपलं उभं
आयुष्य वाया घालवतो. जाळून टाकतो. माणसांची
ससेहोलपट होऊन जाते.
कामाची
हाव वणव्याप्रमाणे जलद गतीने पसरणारी असते. अग्नी सर्वभक्षी असतो. वनेच्या वने जाळून
खाक करतो. सुक्यासोबत ओलंही जाळून टाकतो. कामक्रोधाच्या
वणव्यात ससेहोलट होणारी माणसं पाहून, चहूबाजूंनी निरंतर जळणारे नरदेह पाहून जगन्नाथ
पंडित गंगेला साकडं घालतात,
हे गंगामैय्या, कामक्रोधाच्या वणव्यात
जळून जाणारी उभी आयुष्य, जळून जाणारे हे मानवी देह पाहून तुला करूणा येत नाही का
गं ? ह्या कामक्रोधाचे असह्य चटके आम्हा भक्तांच्या देहांना आता सहन होत नाहीत. ही असह्य
पीडा शमविण्यासाठी माय, तुझ्या जळाशिवाय दुसरा उपायही नाही!
माय तू स्वर्गातील नदी आहेस अमृताची निर्झरिणी
आहेस. हिमालयातून आल्याने तुझं पाणी अत्यंत शीतल आहे. त्यात सतत वाहणार्या वार्याने
तुझ्या प्रवाहात तरंगमालिका तयार होत आहेत. तुझ्या ह्या उंच उठणार्या आनंदलहरी
किनार्यांवर, खडकांवर आपटून फुटल्या की हजारो, लाखो, अगणित तुषारांचे शीतल समुदाय
वरती उसळत आहेत. माय हे शीतल तुषारांचे समुदाय कामक्रोधाच्या वणव्यात जळणार्या, आम्हा
भक्तांच्या तप्त शरीरांना शांत करोत. कामक्रोधाचा उसळलेला वणवा विझवून टाकून आम्हा
भक्तांच्या देहांना पोळणारं दुःख दूर करोत हे असह्य दुःख तुझ्याशिवाय कोण दूर करेल?(26)
स्फुरत्कामक्रोधप्रबलतरसंजातजटिल-
ज्वरज्वालाजालज्वलितवपुषां न: प्रतिदिनम्।
हरन्तां सन्तापं कमपि मरुदुल्लासलहरी-
च्छटाश्चञ्चत्पाथः कणसरणयोः दिव्यसरितः।।26
अन्वय – (हे मातः)
दिव्य सरितः मरुदुल्लासलहरीच्छटाश्चञ्चत्पाथः कणसरणयः स्फुरत्कामक्रोधप्रबलतरसंजातजटिलज्वरज्वालाजालज्वलितवपुषां न: प्रतिदिनम् कमपि
सन्तापं हरन्ताम् ।(26)
अन्वयार्थ –
(भो
जननि – हे माते,) दिव्य सरितः – स्वर्गात उत्पन्न झालेली नदी तिचे ; मरुदुल्लास
– (मरुतः उल्लासः) – वायूचा वेग/गमन; मरुदुल्लासलहरी - वायूच्या
वेगामुळे उत्पन्न झालेल्या आनंद लहरी ; त्यांच्या छटा – एकामागोमाग येणार्या
लाटांचा समुह व त्यांचे सातत्य ; त्यांनी चंचत् – उसळणारे पाथः (पाथस्)
– पाणी; त्याचे– तुषार -जलबिंदु त्यांचे सरणयः – समुदाय; स्फुरत्
कामक्रोधौ – धगधगणारे/ प्रदीप्त झालेले काम आणि क्रोध ; प्रबलतर संजातः - अतिशय बलवान झाले आहेत; त्याचे जटिल ज्वर
ज्वाला जाल –अत्यंत अवघड गुंतागुंतीच्या ताप देणार्या/पोळणार्या ज्वाळांचे
जाळे/समूह त्याने ज्वलित – जळले आहे असे ; वपुः – शरीर ज्याचे अशा
आम्हाला (कामक्रोधामुळे सुख न मिळणारे
आम्ही ) नः – त्या आमचा ; प्रतिदिनं – दररोज ; कमपि –
कोणत्याही ( व्यवहार विलक्षण औषधांदि उपायांनी घालविण्यास कठीण अशा); सन्तापम्
- त्रासाचा ; हरन्ताम् – नाश करोत. (26)
मनी कामक्रोधे धगधगत आहेच वणवा
जयाच्या ज्वाळा ह्या उसळुनि करी दग्ध तनुला ।
न ह्या दाहासी गे शमविल असा मार्गचि दुजा
उपायू नाशी जो सकल अमुच्या दुःखद व्यथा ।। 26.1 ।।
परी तू स्वर्गीची अनुपम अशी अमृतझरी
प्रवाहासंगे ह्या सतत फिरती वायुलहरी ।
तयाने लाटा ह्या उठति पुढती धावति किती
अति वेगाने त्या फुटतिच तिरी आदळतिही ।। 26.2 ।।
जलाच्या बिंदुंचे वर उधळती मौक्तिक अहा
फवार्यांनी त्या गे तव जल तुषारे उसळत्या,
महा हव्यासाचा विझवि वणवा जो भडकला
अगे दाहासी ह्या शमवि अमुच्या दग्ध तनुच्या ।। 26.3 ।।
---------------------------------------------------

Comments
Post a Comment