श्लोक 25
श्लोक 25
लोकांच्या, समाजाच्या नजरेतून जगन्नाथ पतित
होता. आपल्या स्वधर्माला सोडून वागणारा धर्मभ्रष्ट होता. त्याला मृत्यूनंतरही
पुण्यगती मिळायचा रस्ता जणु बंद होता. त्यामुळे दुःखाने हतबल झालेला जगन्नाथ शरण
तरी कोणाला जाणार? गंगामाय ही त्याचा एकमेव आसरा होती. गंगेची महती तो परत परत गाऊ
लागला;
हे माय, ज्या क्षणी स्वर्गातून तू पृथ्वीवर
अवतरलीस , अगदी त्या क्षणापासूनच भूतमात्रांच्या कल्याणाचं नवीन पर्व सुरू झालं. पृथ्वीवर
तुझी जनहितकथा आरंभ झाली. तू पृथ्वीवर अवतरलीस तोच एक पुण्यसोहळा होता. तुझ्या
येण्याने सौख्यमहोत्सव सुरू झाला. तू दयार्द्र आहेस तुझ्या नितांत कोमल स्वर्गीय
स्पर्शाची अलौकिक जादू सर्वांना अनुभवायला मिळाली. माय तुझ्या पावन स्पर्शाने तुझ्या तीरी मरण पावणार्यांना तू मुक्ती देतेस.
आणि थेट त्यांना स्वर्ग प्रदान करतेस. तुझ्या स्पर्शाने त्यांना दिव्य देह लाभतात
आणि ते स्वर्गात जाण्यासाठी प्रस्थान करतात. तुझ्या ह्या कृतीने विमानातून स्वर्गात
जाणार्यांची गर्दी उसळली. स्वर्गात तर देवांच्या येण्याजाण्याच्या रस्त्यांवरची
यातायात खोळंबली. पृथ्वीवरून येणार्यांच्या गर्दीने स्वर्गाच्या रस्त्यावर अडथळे निर्माण
झाले. वाहतुकीची प्रचंड कोंडी तयार झाली.
माय, दुसर्या बाजूला मात्र त्या नरकात
चिटपाखरू फिरकेना. तिकडे शुकशुकाट पसरला. यमपरी ओस पडली. तेथील यमयातनाही किती भयंकर!
उकळत्या तेलात टाकणे, कड्यावरून ढकलणे. पण त्या भयद यमयातना भोगायला आता तेथे आता आहेच
कोण? त्यामुळे तेथून उठणार्या किंकाळ्या, आक्रोश, असह्य वेदनांनी उठणारे चित्कार
आता ऐकू येईनासे झाले आहेत. तुझ्या तीरांवर यमाच्या दूतांना यमपुरीत नेण्यासाठी आता जीवात्मे मिळणेही अवघड झाले आहे. त्यामुळे जीवात्म्यांच्या
शोधात त्यांना आता तुझ्या किनार्यांपासून दूर दूर हिंडावे लागते. माते ही प्रचंड विसंगती ही तुझ्या कल्याणकारी
कथेचा महिमा आहे!
विलीनो वै वैवस्वतनगरकोलाहलभरो
गता दूता दूरं क्वचिदपि परेतान् मृगयितुम्।
विमानानां व्रातो विदलयति वीथीर्दिविषदां
कथा ते कल्याणी यदवधि महीमण्डलमगात् ।। 25 ।।
अन्वय
– (भो जननि) यदवधि ते कल्याणी कथा महीमण्डलं अगात्। (तदारभ्य) वैवस्तनगरकोलाहलभरः
वै विलीनः। दूताः अपि परेतान् मृगयितुं क्वचित् दूरं गताः । विमानानां व्रातः
द्विविषदां वीथीः विदलयति ।
अन्वयार्थ
-
(भो
जननि – हे माते,) यदवधि – जेव्हापासून (तू पृथ्वीवर अवतरलीस)
तेव्हांपासून ; ते – तुझी ; कल्याणी
– कल्याणकारक अशी; कथा – गोष्ट ; महीमण्डलं – पृथ्वीवर ; अगात्
– पोचली, प्राप्त झाली; तदारभ्य – त्या दिवसापासून ; वैवस्वत
- विवस्वान म्हणजे सूर्य त्याचा पुत्र वैवस्वत म्हणजे यम; वैवस्वतनगरकोलाहलः
– यमाच्या नगरीत चाललेला कोलाहल, गोंगाट ; भरः – (गोंगाटचे)ओझे, भार विलीनः
- नष्ट झाला आहे. दूताः - यमदूत ; परेतान् – मृत
प्राण्यांना,प्रेतांना ; मृगयितुम् – शोधण्याकरिता ; क्वचिद् दूरं –
कोठेतरी दूरदेशी; गताः – गेले ; विमानानां – विमानांचा ; व्रातः
– समुदाय दिविषदां – स्वर्गात राहणार्या देवांचा; वीथीः –
मार्ग ; विदलयति - कोंडून टाकतो, रोधतो.
क्षणी ज्या आली तू सुरसरिच स्वर्गातुन भुवी
क्षणापासूनी त्या जनहितकथा हो सुरु भुवी ।
तुझ्या स्पर्शाने हे सकल जन स्वर्गास मिळवी
विमानी लोकांची लगबगचि जाण्या सुर-पुरी ।। 25.1।।
विमानांचे ताफे सुरपथि करी व्यत्यय अती
प्रभावे गंगेच्या नरकपुरि ती ओस पडली
न ये ऐकू कानी यमसदन-आक्रोश कधिही
जिथे पापांसाठी अति भयद शिक्षाच मिळती ।। 25.2 ।।
मिळेना जीवात्मे कितिक फिरुनी गे तव तिरी
यमाच्या दूतांच्या पुनरपि निराशाच पदरी
अशी ही कल्याणी तव सुरस गाथा सुखमयी
तुझ्या रूपाने गे सुख अवतरे ह्या महिवरी ।। 25.3 ।।
---------------------------------------------------

Comments
Post a Comment