श्लोक 24

 

 

श्लोक 24



माणूस जे त्याच्या हिताचं आहे नेमकं ते सोडून जे त्याच्या इंद्रियांना सुखाचं वाटतं, गोड वाटतं तेच आचरणात आणतो. आधी गोड वाटणारी बचनागाची मुळी प्रत्यक्षात महाविषारी असल्याने प्राणघातक ठरते. गळाला लावलेलं अमीष खाण्यासाठी मासा धावतो खरा पण त्याची नंतर जी स्थिती होते त्याचं वर्णन आद्य शंकराचार्यांनी फार प्रभावीपणे नृसिंहस्तोत्रात केलं आहे. ते म्हणतात,

जाळ्यात मी गवसलो भवसागरीच्या । नाही तिथून सुटका करु काय देवा।।

संसाररूप गळ हा मम कंठ छेदी । घायाळ मी तडफडे बहु वेदनांनी।।

प्राणांतिका कळ उठे मम मस्तकी ही । फाटून जाय मुख हे मम प्राण कंठी।।

पंडित जगन्नाथालाही शहाजहाँनने दिलेला उच्च मानसन्मान, ऐश्वर्य त्याच्या मुलाने, कावेबाज औरंगजेबाने सर्व जप्त केलं. काळाच्या एका फटकार्‍यासरशी लक्ष्मी निघून गेली.  अशा लहरी राजांची चाकरी कधी घात करेल हे सांगता येत नाही. जगन्नाथाचं मन पश्चात्तापानी भरून गेलं.

मदोन्मत्त मी स्वैर,स्वच्छंद, वेडा । अमर्याद ही लालसा, काम माझा ।

कुकर्मी रती संगती दुर्जनांची । मनी घोळते वासना पापबुद्धी ।

सर्व अलबेल असताना आईची आठवण होत नाही पण सर्व जगानी पाठ फिरवली, कष्ट, यातना, दुःख त्यांचं भेसूर रूप घेऊन समोर उभे राहिले की, पहिली आठवण होते ती आईची. जगन्नाथांचे डोळे उघडले . माय---गे!!! म्हणत डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला

भवाच्याच पाशात हा गुंतलो मी  । तुझ्यावीण ना मार्ग दृष्टीस येई ।

 अशांती मना राहिली व्यापुनी ही ।  मला जाह्नवी ना तुझ्यावीण कोणी 

माय, एखाद्याने जे जे करायलो नको ते ते करणारा दुराचारी मी आहे. आयुष्यभर मनात येईल तसं स्वैर वर्तन मी केलं. माय गे! ,मला सर्व सर्व मान्य आहे. पण जीवनाच्या ज्या वळणावर मी उभा आहे तेथून मला निराशेशिवाय काहीच दिसत नाही. दाट अंधारच्या खोल खाईत मी पडतो आहे. आई मला हात दे. मला सावर.

हे माय, मी पोरका, पूर्णपणे निराधार, निराश्रित, सर्वांनी वाळित टाकलेला असहाय असा तुझा शिशु असलो तरी अशा दीन, निराधारांविषयी तुझ्या हृदयात सतत वात्सल्यच झिरपत असत. तू कायमच स्नेहाने संपृक्त आहेस. तुझी माया कधी आटत नाही.

माय, माझे सर्व मार्ग खुंटले आहेत (विगलितगतिः) ना ह्या पृथ्वीवर मला काही आशेचा किरण दिसत आहे ना केलेल्या पुण्यामुळे माझा पुण्य लोकीचा रस्ता उजळून गेला आहे. माझ्या पापांमुळे माझ्यासाठी सर्वत्र अंधारच दाटला आहे.

जगन्नाथ पंडित म्हणत आहेत, माय माझ्या पापाचरणामुळे, माझा स्वधर्म न पाळल्यामुळे मला पततिताला जरी स्वर्गलोक मिळणार नसला तरी तू माझी आई आहेस आणि तू पुण्य लोक मिळवून देण्यास समर्थ आहेस (पुण्यगतिदा); कारण, तू विश्वाचा उद्धार करायला समर्थ आहेस. (विश्वोद्धारिणी)

 माय मी असाध्य अशा भवरोगाने गळून गलो आहे. गलितगात्र झालो आहे (गदविगलित) पण तू माझ्या सर्व रोगांवरील उपचार जाणणारी निष्णात वैद्य आहेस.(सिद्ध भिषज) मी तहानेने व्याकूळ झालो आहे. माझी विषयतृष्णा काही केल्या न शमणारी आहे.(तृष्णाकुलितहृदयः) तू मात्र अमृताचा अथांग पारावार आहेस. (सुधासिंधु)

 माय, तुझ्यात माझ्यात जणु ही आकाश पाताळाइतकी गुण दोषांची तफावत आहे. तू सद्गुणांची पुतळी तर मी सर्व दोषांचा पुतळा आहे. असं असूनही माय,  मला फक्त एकच गोष्टीचं निश्चित ज्ञान आहे ते म्हणजे, तू माझी माय आहेस आणि मी तुझं लेकरू आहे. लेकराला आपल्या घरचा पत्ता, रस्ता माहित नसला तरी त्याने आईचं बोट पकडलं आणि तिच्या सोबत जात राहिलं तर ते नक्कीच इच्छित स्थळी, योग्य जागी वा घरी पोचतं. माय, जर मी तुझं अनुसरण केलं, तुझ्या मागेमागे आलो तर मला योग्य पुण्यगती मिळेल हा माझा विश्वास आहे.

 ह्या जगाचा भीषण अनुभव घेऊन, अत्यंत व्याकूळ होऊन, मी तुझ्याकडे आलो आहे. तुझी योग्यता जाणून आलो आहे. तुझ्यासमोर उभं राहण्याचीही माझी पात्रता नाही हेही मी जाणून आहे. तरीही हे माझी माय गे! तुझ्या पायाला घट्ट मिठी घालून मी तुला शरण आलो आहे. आता मला तारायचं का मारायचं हे तूच ठरव. ह्या तुझ्या लेकराचं तुला जे योग्य वाटेल ते तू कर.

अनाथः स्नेहार्द्रां विगलितगतिः पुण्यगतिदां

पतन्विश्वोद्धर्त्रीं गदविगलितः सिद्धभिषजम्।

सुधासिन्धुं तृष्णाकुलितहृदयो मातरमयं

शिशुः सम्प्राप्तस्त्वामहमिह विदध्याः समुचितम् ।। 24 ।।

अन्वय – (भो गंगे) अनाथः विगलितगतिः ; पतन्, गदविगलितः , तृष्णाकुलितहृदयः अयं अहं शिशुः , स्नहार्द्रां, पुण्यगतिदां विश्वोद्धर्त्री, सिद्धभिषजं, सुधासिंधुं मातरम् त्वां सम्प्राप्तः (अस्मि) । इह त्वं (मे) समुचितं विदध्याः । (24)

अन्वयार्थ- (भो गंगे – हे गंगा माते)  अनाथः – निराश्रित, ज्याला कोणी नाही असा मी;   स्नेहार्द्राम् – प्रेमाने आर्द्र/ अत्यंत दयाळु (अशी गंगा) ; विगलितगतिः - ज्याची उत्तम गति/ लोक नष्ट झाला आहे असा मी; पुण्यगतिदां -पुण्यलोक देणार्‍या (तुला) ;  पतन् – पतित (स्वधर्मापासून ढळलेला) मी ; विश्वोद्धर्त्रीं – त्रिभुवनाची पापे नाहिशी करणार्‍या अशा तुला;  गद – रोग ; गदविगलित – जराजर्जर, रोगग्रस्त ; सिद्धभिषजं – सर्व जडिबूटी, औषधे आणि ज्ञान ह्यांनी सज्ज असलेला वैद्य ( त्या तुझ्याकडे)  तृष्णा – तहान ; तृष्णाकुलितहृदयः – विषयांच्या इच्छेने ज्याचे हृदय/ अंतःकरण व्याप्त/अस्वस्थ झाले आहे असा विषयलोलूप मी;  सुधासिंधुं – अमृताचा सागर/ अमृततुल्य असलेल्या तुजप्रत ;  अयं अहं – असा हा मी ;  शिशुः – बालक ; तां – अशा तुझ्याकडे;) मातरं – आई झालेल्या  त्वां – तुजकडे ; संप्राप्तः – आलो आहे ; इह –इथे, ह्या लोकी, या विषयी;  त्वं – तू ; समुचितम् – योग्य असेल ते ; विदध्याः – करावे.

अनाथाचे माझ्या अति कटु असे दुःखद जिणे

दयेने ओथंबे हृदय तव वात्सल्यमय हे ।

अगे उद्धाराचे सकल पथ हे बंद मजसी

परी सर्वा देसी मिळवुनचि तू पुण्यगति ही ।। 24.1 ।।

 

स्वधर्मापासूनी सतत ढळलेला पतित मी

जगाच्या उद्धारा सतत झटते तू दृढव्रती ।

भवाच्या रोगांनी अति गलितगात्रे जगतसे

परी तूची माते अति निपुण हा वैद्य मज गे ।। 24.2 ।।

 

शमेना तृष्णा ही मम विषय-व्याकूळ मनिची

सुधा-धारा तू गे जलतनुचि तू अमृतमयी

अनन्याभावाने जननि तव हा बाळ दमुनी

तुझ्यापाशी आला; करि उचित जे गे तुज मनी ।। 24.3 ।।

---------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

गंगालहरी अनुक्रमणिका

श्लोक 1

श्लोक 3