श्लोक 23


श्लोक 23



आईशिवाय लेकराचे खरे हितचिंतक कोण असणार? बाळाने रात्री अपरात्री जरी दुःखाने कळवळून आऽऽई  म्हणून हाक मारली तरी ती धावत येते. तिच्या चित्तात आपल्या बाळाशिवाय दुसरं कोणीच नसतं. म्हणूनच तापत्रयाने गांजलेले जगन्नाथ गंगामातेला आर्त साद घालत आहेत.

‘हे जननी, ब्रह्मा, विष्णू, महेश ह्या तिघांनीही जगाच्या कल्याणाचे काम आपापसात वाटून घेतले आहे. त्यांना नेमून दिलेलं जेवढं काम आहे तेवढे ते करतात. हे जगज्जननी गंगे, प्राणीमात्रांचे कल्याण हे तुला नेमून दिलेले काम नसून तुझा व्यासंग आहे, तुझा छंद आहे, तुझ्या जीवनाचं ध्येय आहे. आयुष्यभराचं ध्येय म्हणून स्वीकारलेलं काम अंतापर्यंत निभावून नेण्याची अत्युच्च प्रतिची कर्तव्य दक्षता तुझ्याजवळ आहे. सूर्य स्वतः जळून सर्व सृष्टीला प्रकाश उब देतो खरा पण, त्याला मावळणं आहे. त्याप्रमाणे हा विधाता, ब्रह्मदेव अनेक वेळा समाधीत गढून जातो; तर हा विष्णू चातुर्मासाचे चार  महिने त्याच्या शेषनागावर झोप घेतो; तर हा महादेव त्याच्या मनात आलं की, तांडवनृत्यात मग्न होतो. हे कल्याणकारी म्हणवणारे देवसुद्धा भरवशाचे नाहीत.

 

तुझं तसं नाही. जगाच्या अंतापर्यंत जगाच्या कल्याणाची शाश्वती तू देतेस. तुझा निरंतर वाहणारा प्रवाह कल्याणस्वरूपच आहे. त्यामुळे हा ब्रह्मदेव कितीही काळ समाधि लावून बसो; वा हा विष्णू कितीही काळ शेषावर पहुडलेला राहो; वा हा शंभू महादेव त्याच्या नृत्यात त्याला विसरून जावो.---- तू निरंतर वाहते आहेस. तू सदोदित जागी आहेस. हे तीनही देव असले किंवा नसले तरी त्याने फरक पडत नाही.  जगाचं कल्याण ह्या एकमेव ध्येयावरून तुझं लक्ष जराही विचलित होत नाही. तुझा हा कर्मयोग बाकी कोणाला साधणार नाही.

 

विधत्तां निःशङ्कं निरवधिसमाधिं विधिरहो

सुखं शेषे शेतां हरिरविरतं नृत्यतु हरः।

कृतं प्रायश्चित्तैरलमथ तपोदानयजनैः

सवित्री कामानां यदि जगति जागर्षि जननि।।23

अन्वय – भो जननि, जगति कामानां सवित्री (त्वं) यदि जागर्षि, (तर्हि) विधिः निरवधिसमाधिं निःशंकं विधत्ताम् । हरिः शेषे सुखं शेतां, हरः अविरतं नृत्यतु, प्रायश्चित्तैः कृतम्। अथ तपोदानयजनैः अलम्, अहो!

अन्वयार्थ -

जगति -  ह्या त्रिभुवनात; कामानां – अभीष्ट मनोरथांची; सवित्री – (सूते सा) – प्रसवते ती वा दात्री; त्वं -तू; यदि – जर जागर्षि – जागृत आहेस; (तर्हि -तर) विधिः- त्रैलोक्य उत्पन्न करणारा ब्रह्मदेव; निरवधि -ज्याला अवधि नाही असा म्हणजे चिरकाल ; समाधि- चित्तवृत्ति निरोध ; निःशंकं – (मी सृष्टीचा व्यापार चालवला नाही तर सृष्टी कशी  चालेल ही) शंका सोडून; विधत्तां – करो; हरि – जो दुःखाचे निवारण करतो असा विष्णू; शेषे – शेष नावाच्या नागावर ; शेतां – शयन करो ; हरः – त्रैलोक्याचा संहार करणारा शिव; अविरतं -  निरंतर ; नृत्यतु- तांडव नावाचं संहार करणारं नृत्य करोः प्रायश्चित्तैः  – प्रायश्चित्तांनीं (आपल्याकडून पातकी जनांची शुद्धी होत नाही म्हणून) कृतम् -  अधिक नको, बास करावे, थांबावे; अथ – आणि ; तपोदानयजनैः – तप, दान, देवपूजा, यज्ञादि कर्मे इत्यादिकांनीही, अलम् – बास करावे वा पुरे व्हावे; अहो !- केवढे हे आश्चर्य! (सर्व देवादिकांची कामे गंगा एकटी करण्यास समर्थ आहे) 

कसे चालावे ह्या सुरळितचि माझ्याविण जगी

नको शंका ऐसी क्षणभर विधात्या हृदि अशी ।

सुखे ब्रह्मा बैसो अविरत समाधीत गढुनी

करावे रुद्राने समय कितिही तांडव भुवी ।। 23.1 ।।

 

हरे जो दुःखांसी, हरिहि बहु निश्चिंत हृदयी

सुखे झोपो शेषावर नित करो तो शयनची ।

नको प्रायश्चित्ते तप यजन दानेच कुठली

जगाच्या चालाया नच गरज ह्यांचीच उरली ।। 23.2 ।।

 

जगाच्या उद्धारा सुरनदि पुरे एकच अशी

करे सारी कामे सकलचि सुरांना न जमली ।

मनीषा पूर्तीसी; नित शमविण्या क्षोभ सहजी

असे गंगा जागी नित निरसण्या दुःख जगती ।। 23.3 ।।

---------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

गंगालहरी अनुक्रमणिका

श्लोक 1

श्लोक 3