श्लोक 21

 


श्लोक 21



लेकराच्या मनात आई आणि आईच्या मनात लेकरू असं हे विलक्षण नातं आहे. ह्या नात्यात श्रीमंत, गरीब; उच्च नीच ह्या कुठल्याही गोष्टींना स्थान नाही. लेकरू जेवढं अनन्य भावाने आईला बिलगतं तेवढी ती त्याला जवळ घेते. जगन्नाथ पंडित म्हणतात,

माता कुलीन, खानदानी, श्रीमंत घरातील असो वा गरीब घरातील, ती सामर्थ्यवान असो वा दुर्बळ; तिच्या अपत्यावर कोणी हल्ला केला वा झडप घातली वा त्याला त्रास देण्याचा प्रयत्न जरी केला तर ती सर्वशक्तीनिशी चवताळून त्याच्यावर प्रतिहल्ला चढवते. एखाद्या वाघिणीच्या बछड्याला कोणी जरा जरी त्रास दिला तर वाघीण चवताळून त्याच्यावर धावून जाते. वा ती आई गरीब गाय जरी असली तरी ती वासराच्या अंगावर येणार्‍या वाघाला शिंगावर घेतल्याशिवाय रहात नाही. आपल्या शिशुसाठी सर्व सुखसमाधान सोडून प्राणांचीही पर्वा न करता आई त्याची ढाल बनते.  

माय तू त्याला अपवाद कसा असशील? तुझी दोन्ही कुळं ही श्रेष्ठतम अशीच आहेत. त्या रमारमण म्हणजेच लक्ष्मीपती विष्णूच्या अत्यंत निर्मळ चरणकमलांच्या निरोगी, चमकदार गुलाबी, अमल नखापासून तुझी उत्पत्ती झाली. अशा अत्यंत श्रेष्ठ, सम्पन्न कुळात तू जन्मली आहेस.

तर आपल्या पाच बाणात सर्व पृथ्वी पादाक्रांत करणार्‍या मदनाचा ज्याने कडवा प्रतिकार केला, त्याला युद्धात प्रत्युत्तर देऊन ज्याने त्याला कायमचं पराजित केलं, आपल्या नेत्रातील ज्वालांनी त्याला जाळून टाकलं असा जो महान योद्धा महादेव; त्याने तुझ्या सद्गुणांवर मोहित होऊन तुला जटाजुटामधे धारण केलं.  त्याच्या भव्य विशाल जटाजुटांवर तू आनंदाने वास्तव्य करत होतीस.

पण विषाने, शस्त्राने, अपघाताने मरणारे आगतिक लोक पाहून, अनेक अपराधांसाठी प्रायश्चित्ते घेणारे दुःखी, कष्टी, असह्य पीडा भोगणारे लोक पाहिल्यावर तुला गलबलून आलं. ह्या सर्वांना माझ्याविना कोण आधार देईल? ‘बुडते हे जग पहावेना डोळा’ ! अशी तुझ्या जीवाची घालमेल झाली. पापी लोकांना पवित्र करणे  ही  तुला अंतरातून साद घालणारी, हृदयापासून आलेली तुझी आवड आहे.  

तू तुझ्या पवित्र, कल्याणकारी सुख शांतीचे निधान असलेल्या विष्णूपदांचा त्याग केलास आणि शिव जटाजूटही त्यागलेस. तू तुझ्या लाखो दीन असहाय्य भक्तांच्या सहाय्यासाठी धावून आलीस. दीन दुःखितांच्या सहाय्याला धावून जाणं हा तुझा व्यासंग आहे. तुला लागलेला छंद आहे.

तुझी त्यांच्याविषयीची आपुलकी, कळवळा त्यांच्याविषयीचा प्रेमाचा उमाळा, पतितांचा उद्धार करण्याची तू केलेली प्रतिज्ञा आणि तिचं चरम सीमेपर्यंत पालन ; त्यासाठी कितीही कष्ट सोसायची तुझी तयारी हे तुझे सर्व गुण अलौकिक, अद्भुत आहेत माते. लोकांच्या मनात तुझ्या विषयीचा आदरभाव त्यामुळे कायमच दुणावेल, वाढत राहील ह्यात शंका नाही. तुझ्या यशाची ही चढती कमान लोकांच्या मनात कायमच आदरास, गौरवास पात्र कशी बरं नसेल?.

समुत्पत्तिः पद्मारमणपदपद्मामलनखा-

न्निवासः कन्दर्पप्रतिभटजटाजूटभवने।

अथायं व्यासङ्गो हतपतितनिस्तारणविधौ

 कस्मादुत्कर्षस्तव जननि जागर्तु जगतः।। 21

अन्वय – हे जननि,(तव) समुत्पत्तिः पद्मारमणपदपद्मामलनखात् (अस्ति)। निवासः कन्दर्पप्रतिभटजटाजूटभवने (अस्ति)। अथ अयं (ते) व्यासंगः हतपतितनिस्तारणविधौ (अस्ति)। (अतः) तव जगतः उत्कर्षः कस्मात् न जागर्तु (21)

 

  अन्वयार्थ - भो जननि -  हे आई;  पद्मा-रमण – लक्ष्मीचा पती म्हणजे विष्णू त्याच्या; पदपद्मस्य – चरण कमळाच्या/ कमळासारख्या सुंदर पावलांच्या; अमल नखात् – पवित्र,निर्मळ नखापासून; तव समुत्पत्तिः – तुझी निर्मिती (झाली).  कंदर्पः – मदन; त्याचा प्रति भट – त्याला प्रतिकार करणारा योद्धा; त्याच्या  जटाजूट भवने – जटासमूहात असलेला तुझा; निवास – घर; अथ-  आणि; हत – विष, शस्त्रादिकांनी मृत; पतित – प्रायश्चित्तास योग्य निस्तारण विधौ -  उद्धार करण्याविषयी;  अय़ं – हा; तव- तुझा; व्यासंगः – सवय, नादिष्टपणा, छंद, आवड,एखाद्या गोष्टी बद्दलचे प्रेम, बांधिलकी; जगतः – सर्व लोकांकडून;  तव – तुझा, उत्कर्षः – उत्कर्ष, श्रीमंती, पूज्यत्व;  कस्मात्  न जागर्तु – (लोक) का बरे मानणार नाहीत? का बरे त्यांच्या मनात जागृत  होणार नाही?

 

अगे ज्या लक्ष्मीचा पति अतिच श्रीमंत जगती

जयाची पाऊले अमल कमलांच्यासम जशी ।

गुलाबी कांतीची चमकति नखे उज्ज्वल अती

तयापासूनी गे जननि तव उत्पत्ति घडली ।। 21.1 ।।

 

सुटेना प्राणी तो कुणि मदनबाधेतुन कधी

मनोजासी त्या दे शिव तिखट प्रत्युत्तर युधी

महा योद्धा शंभू शिव करितसे राख तयिची

परी मोहूनी तो  तुज निज शिरी धारण करी ।। 21.2 ।।

 

जटांचा त्याच्या तो जरि सुखवि प्रासाद तुजसी

जरी विष्णूची ती चरणकमले मोहक अती ।

तरीही तू माते हरिचरण पद्मे हि त्यजसी

तुझे विश्रामाचे स्थल  शिव-जटा-त्याग करसी ।। 21.3 ।।--

 

विषाने, शस्त्राने जन मृतचि झाले जगति ह्या

अधोगामी जे जे जन ढळति नीतीपथचि वा

अशांच्या उद्धारा अवतरसि पृथ्वीवर पुन्हा

अगे उद्धारावे पतित-जन व्यासंग तव हा ।। 21.4 ।।

 

तुझा पाहूनी हा पतित विषयीचा कळवळा

प्रतिज्ञा पूर्तीच्यास्तवचि झटणे हे अविरता

बघोनी निष्ठा ही तव अति असामान्य प्रतिची

कळावे कैसे ना जननि तव माहात्म्य जगती ।। 21.5 ।।

---------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

गंगालहरी अनुक्रमणिका

श्लोक 1

श्लोक 3