श्लोक 19

 

 श्लोक 19



 

पृथ्वीच्या पोटात, जाड थरांच्या अत्यंतिक दबावाखाली जसं कोळशाचं कायमचं रूपांतर हिरकणीत होतं; तशी पश्चात्तापदग्ध जगन्नाथाच्या हृदयद्रावक दुःखाची परिणती एका लखलखीत काव्यात होत होती. गंगेला उद्देशून त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडत होते,

हे जननी, ‘तरुणस्तावत् तरुणीरक्तः’ म्हणतात ते खोटं नाही. सळसळणार्‍या तारुण्याला चमचमणार्‍या, झळाळणार्‍या गोष्टींची सहज भुरळ पडते. सूर्य प्रकाशात चमचमणार्‍या शिंपल्यांचाच चांदी म्हणून मोह पडतो.

मीही ‘दिल्लीश्वरो वा जगदीश्वरो वा’ असे मोठ्या आढ्यतेने म्हणत माझ्या हितचिंतकांना तुच्छ समजून, त्यांचा तिरस्कार करत, त्यांच्या योग्य उपदेशाकडे दुर्लक्ष करत, अनेक राजांच्या, बादशहांच्या चाकरीत रूजु होण्यातच धन्यता मानली.  दिवस असो की रात्र! जन्मभर धावून धावून त्यांच्यापुढे हांजी हांजी करण्यातच आयुष्यााचं सार्थक मानलं. ते म्हणतील त्याला मान डोलावत, त्याची खिदमत करण्यात उभं आयुष्य व्यर्थ घालवलं. पण धनाची, ऐश्वर्याची, सत्तेची, शक्तीची धुंदी ही मदिरेच्या धुंदीपेक्षा जास्त जीवघेणी असते हे तेव्हा मला माहित नव्हतं. सत्तेची नशा चढलेल्या लहरी सम्राटांनी त्यांची इच्छा फिरताच माझं सर्व वैभव हिरावून घेतलं. माझे लखलखित गुण त्यांच्या लहरीस्वभावापुढे मातीमोल ठरले. मी उघड्यावर पडलो. माय, माझ्या हे लक्षातच आलं नव्हतं की,

शरद ऋतुत आलेला एखादा छोटा ढग कशी आणि कितीशी सावली देणार? महा विषारी नागाच्या फण्याच्या सावलीत कोणी कसा सुखाने राहू शकेल ? अमृत म्हणून विषच प्राशन केलं तर मरण अटळ आहे. बादशहाच्या चाकरीचा घोर परिणाम मी अनुभवत आहे.

समोर दिसणार्‍या त्याच्या वैभवाला भुलल्याने आणि तेव्हा त्याने अंगावर फेकलेल्या चार दिडक्यांनी शेफारून, काय हितकारी काय अहितकारी हे मला समजलच नाही. मीच माझा शत्रू बनलो. माझ्याच हिताचा मी शतदा घात केला. सर्व कल्याणकारी गोष्टींकडे मी पाठ फिरवली. तू सतत माझ्या सानिध्यात असूनही तुझ्या शीतल जलात स्नान करून धन्य व्हावं अशी साधी सुबुद्धी मला सुचली नाही. तुझ्या वियोगाच्या जणीवेने मला कधी मला खेद झाला नाही. मी सतत तुझी उपेक्षाच केली.

 माय, माझी क्षणैक वैभवाची घमेंड उतरली आहे. माझ्या अहंकाराचा बुडबुडा फुटला आहे. खोट्या ऐश्वर्याच्या लागलेल्या चकव्यातून मी बाहेर पडलो आहे. उजाडलं की सर्व रस्ते स्वच्छ दिसतात त्याप्रमाणे माझ्या मनात उजाडलं आहे. माझा चुकीचा मार्ग मी सोडून दिला आहे. इतके दिवस तुझ्या समई सारख्या शांत, मन उजळवून टाकणार्‍या उपदेशाची केलेली अवहेलना आठवून मला लाज वाटत आहे. घोर पश्चात्तापाने माझं अंतःकरण विदीर्ण झालं आहे. माझा हा मनस्ताप, माझा हा विषाद क्षणा क्षणाने वाढत जाऊन असह्य दुःखाने मी खचून गेलो आहे.

पण माय! आईचा डोळा चुकवून वाघाच्या रानात गेलेलं लेकरू असंख्य हिंस्र श्वापदांच्या हल्ल्यातून जखमी होऊनही परत येतं तेव्हा आई त्याला दूर लोटत नाही तिच्या डोळ्यात त्याच्या काळजीने अश्रुधारा वाहत असतात. ती त्याला पोटाशी घेते. सर्व उपचार करते आणि त्याला बरं करते. माय!  सर्वांच्या धारदार शब्दांनी, कृतीनी घायाळ झालेलं हे तुझं लेकरू तुझ्याजवळ परत आलं आहे. त्याचा आह्वेर करू नकोस. त्याला तुझ्या कुशीत घे. माझे सर्व अपराध पोटात घालून माय, मला क्षमा कर.  (19) 

 

पुरो धावं धावं द्रविणमदिराघूर्णितदृशां

महीपानां नानातरुणतरखेदस्य नियतम्।

ममैवायं मन्तुः स्वहितशतहन्तुर्जडधियो

वियोगस्ते मातर्यदिह करुणातः क्षणमपि।।19

अन्वय – भो मातः, इह ते वियोगः (इति) यत् (अभूत् ) अयं मन्तुः, द्रविणमदिराघूर्णितदृशां नाना महीपानां पुरो नियतं धावंधावं तरुणतरखेदस्य स्वहितशतहन्तुः जडधियः ममैव (अस्ति) अतः क्षणमपि (त्वया) मयि करुणा (करणीया) (19)

भो मातः - हे आई ; इह – ह्या लोकी यत् – ज्या अर्थी ; ते – तुझा ; वियोगः - ताटातूट किंवा स्नान  सेवनादिकांचा लाभ न होणं ;  अयं – हा ; द्रविणमदिरा – धन हेच जणु दारू वा मद्य त्याने आघूर्णित – भ्रमित आहे ; दृषाम् - दृक् – दृष्टि; ज्यांची ते ; द्रविण – धन ; द्रविणमदिराघूर्णितदृशः – धनरूपी मद्याने ज्यांचे डोळे फिरले आहेत अशा; नाना -अनेकविध ; महीपानां - राजांच्या ; पुरः – पुढे ; नियतं – नियमाने ; धावं धावं - धावून धावून – तरूणतरखेदस्य – ज्याला सतत वेगवेगळ्या गोष्टींचा नित्य नव्याने खेद होत आहे त्याचा  ; स्वहितशतहन्तुः – आपल्या शेकडो कल्याणांचा नाश करणार्‍या ; जडधियः – मंदबुद्धी, मूर्खाचा ; मम एव - माझाच ; मंतुः – अपराध (समजून) ; अतः – या कारणास्तव (त्वया- तुझ्याकडून ) क्षणम् अपि -  क्षणभर तरी करुणा – दया ; (करणीया – केली जावी.) (19)

जयांना सत्तेची चढलि मदिरा ती विषभरी

अहंकाराने जे कृति करिति बेबंद लहरी ।

धनाने सत्तेने नृप असति उन्मत्त बहु जे

अगे हांजी हांजी करत फिरलो त्या पुढति गे ।। 19.1।।

 

तुला सोडुनी मी नृपति पदि त्या नित्य झुकलो

तया मागे मागे फिरत बहु दुःखात पिचलो ।

नव्याने नित्याने फिरुन फिरुनी खेद मजला-

सतावे; गोष्टींचा किति निरनिराळ्या अजुन का ।। 19.2 ।।

 

हिताचा माझ्या मी करुनचि कसा घात शतदा

कसा कल्याणाचा पथ अडविला मीच मजला ।

अगे भूलोकी तू असुनहि दुरावाच धरुनी

न केले स्नाना मी जननि तुझिया निर्मळ जळी ।। 19.3 ।।

 

अशा ह्या वेड्याची कणव करि गे तूच हृदयी

क्षमा माझ्या सार्‍या गहन अपराधांसचि करी ।

अगे मानूनी तू क्षणभर कृपापात्र मजसी

तुझ्या वात्सल्याचा अनुभव मला दे कणभरी ।। 19.4 ।।


---------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

गंगालहरी अनुक्रमणिका

श्लोक 1

श्लोक 3