श्लोक 18
श्लोक 18
समुद्रात निरंतर लाटा येतच रहाव्यात. एक
लाट विरते तो दुसरी उठावी त्याप्रमाणे एकानंतर एक असे अत्यंत सरस श्लोक
जगन्नाथांना स्फुरत होते. मुखातून निघालेला एक श्लोक संपताना जणु दुसर्या
श्लोकाला घेऊनच येत होता. ‘हे जननी तू
धर्माचे निधान, विलक्षण आनंदाचे विधान, त्रैलोक्याचे निर्मल परिधान, बुद्धीचे
समाधान. अज्ञांचे तिरोधान आहेस. आमचं दुःख दूर कर.’
हे जननी गे,
धारणात् धर्मः। धर्मशास्त्रांनी व्यक्तीच्या
व समाजाच्या धारणेसाठी नेमून दिलेलं उपयोगी काम म्हणजे धर्म. समाज वा समाजातील
व्यक्तीचं अस्तित्त्व टिकून रहावं त्याला सुरक्षा मिळावी, आधार लाभावा म्हणून
केलेले हे हिताचे कल्याणाचे नियम म्हणजे
धर्म.
स्वतःहून स्वीकारलेलं हितकारी काम, कर्तव्य म्हणजेही धर्म. वा तो
माणूस ज्या स्थानावर असेल त्या स्थानमहात्म्याला साजेल असं न्यायसम्मत उचित काम
करणं हाच योग्य स्वधर्म असतो. त्याप्रमाणे आपद्धर्म असतो, शेजारधर्म असतो,
विद्यार्थ्याला विद्यार्थी धर्म पाळावा लागतो तर पत्नीला पत्नीधर्म, पतीला पतीधर्म
तसा प्रत्येकाला त्याचा धर्म आचरावा लागतो. माणसाला अनेक कर्तव्ये पार पाडावी
लागतात. अशावेळेला माणसाने आदर्श म्हणून पहावं ते तुझ्याकडे!
तू ज्या क्षणी स्वर्गातून पृथ्वीवर
अवतरलीस त्या क्षणापासून प्राणीमात्रांचं दैन्य, दुःख दूर करायचा वसा घेतलास.
स्वीकारलेलं काम, विहित कार्य किती सातत्याने, अनन्य भावाने अखंड करत रहावं,
ह्याचा तू आदर्श घालून दिलास. तुझं काम अथक चालूच आहे. अनेक कर्तव्यांना तू सहज
निभावून नेतेस. तुझ्या किनार्यावर समृद्धिचं वरदान देत, तुझा प्रवाह पुढे जातो.
अनेक जळचरांचं तू आवडतं सदन झाली आहेस. अनेकांची तृषा तुझ्याविना कोण शमवणार?
तुझ्या तीरावर मृत्यू आला तर तो अपाप होऊन त्याला स्वर्ग प्राप्त होतो.
खजिन्यात मूल्यवान गोष्टी सुरक्षित
ठेवलेल्या असतात. तुझा कोष उघडला की तुझी सर्व कर्तव्ये किती सहज निभावून नेतांना
दिसतेस. लखलखितपणे तू पार पाडत आहेस हे दिसते. तू सकल धर्मांचं निधान आहेस. धर्म
सुरक्षित ठेवणारी जागा आहेस. अनेकांना तुझ्या ह्या तीरांवर आपापल्या कर्तव्यांचा
बोध होतो. माय, तू सर्व प्रकारच्या कर्तव्यांचा महान निधी आहेस. (निधानं धर्माणां)
माय कुठलीही गोष्ट मिळेपर्यंतच तिचं कौतुक
असतं. एकदा का ती गोष्ट घरी आली की तिच्यामुळे मिळणरा आनंद संपून ती गोष्ट घरातील नको
असलेली अडगळ बनते. पण तुझ्यामुळे मिळणारा आनंद कायम ताजा तवाना नवीन वाटतो. तुझ्या
प्रवाहाकडे नुसतं जरी पहात राहीलं तरी मन आनंदाने भरून जातं. त्याचं कारणही तसच
आहे. तू म्हणजे त्या ब्रह्मानंदाची सगुण पुतळी आहेस. ज्या ठिकाणी मन पोचलं की
त्याला मागे फिरू नये असं वाटतं, आता अजून काही नको असं वाटतं, माणूस बाकी सर्व
सुखांना आता बास म्हणतो तो ब्रहमानंद तू आहेस. पोट भरलं की माणूस बास म्हणतो. बास
ह्या शब्दाचा पर्यायवाची संस्कृत शब्द आहे अलम्! आता मी पूर्ण सजले आता सजणं
बास! असं जो म्हणायला लावतो तो अलंकार
(अलं करोति) माते तू सर्व सुखांचे सुख;
आनंदाचा आनंदरूपी अलंकार, निरतिशय आनंद म्हणजेच ते परब्रह्मच आहेस. तू त्या अवर्णनीय
परब्रह्माची सगुण रचना आहेस. साधन आहेस, त्याचीच मधुर उक्ती आहेस. नवनवीन आनंद
निर्माण करण्याच्या विधीचे जणु शास्त्र वाक्य आहेस (विधानं नवमुदां)
वहावी सौख्याची अविरत सुधा निर्झरि हृदी
म्हणोनी शास्त्रे ज्या वदतिच विधानास जननी ।
विधाने ती तू गे सुख स्फुरण तू नित्य असशी
असे तू हर्षाचा नित नवनवोन्मेष हृदयी।।
ह्या पृथ्वीवर अनेक तीर्थस्थान आहेत पण
तुझ्यासारखी तूच! सर्व पवित्र पावन तीर्थांमधे
तू सर्वश्रेष्ठ आहेस. सर्व तीर्थांमध्ये प्रमुख तीर्थ आहेस. (प्रधानं तीर्थानाम्)
माय, एक नूर आदमी दस नूर कपडा महणतात.
सुंदर वस्त्र माणसाची शोभा अशी काही वाढवतो की, रंकही राव दिसायला लागतो. कधी
अरुणोदयाच्या गुलाबी छटांनी नटलेलं तुझं नीरवस्त्र मन मोहून घेतं तर कधी
सूर्याच्या सोनेरी किरणांनी विणलेलं तळपणारं सुवर्णवस्त्र अचंबित करतं. रात्री
चंद्राच्या मंद रुपेरी प्रकाशानी नटलेलं
रुपेरी तरी कधी चांदण्या तुझ्या प्रवाहात उतरलेली बुट्टेदार चंद्रकळा! कधी झाडांची
फुलं पडून सुंगधित झालेलं तर कधी लोकांनी सोडलेल्या इवल्या इवल्या पणत्यांनी
नटलेलं. तुझं हे नीर वस्त्र स्वर्ग, भूलोक आणि पाताळ जिथेजिथे तू प्रवास करतेस
त्या तीनही लोकांना आच्छादून त्यांना अलौकिक सुंदर करतं. माय तुझं वस्त्र अमल आहे. स्वर्ग, पृथ्वी, पाताळ यात अपरिहार्य असलेले मळ
तुझ्या नीरवस्त्राला जराही चिकटत नाहीत. सदा सर्वदा ते स्वच्छ असतं. रंग फिके न पडलेलं नवीन उज्ज्वल असतं. ‘विगतः मलः’ ज्याचा मळ
निघून गेला आहे त्याला विमल म्हणतात, ज्याला मळ विरहित आहे त्याला निर्मळ म्हणतात
पण ज्याने मळ कधी अनुभवलाच नाही ज्याला मळ नाहीच मुळी ते तुझं अमल नीरवस्त्र ह्या
त्रैलोक्याचं भूषण आहे. माय, ह्या बरड भूमीला तुझं नीरवस्त्र लाभल्याबरोबर तीही जलसांद्र
होऊन साक्षात लक्ष्मीच्या रूपात उभी आहे. (अमलपरिधानं त्रिजगतः।)
बुद्धीचा वारू कायम दौडतच असतो. त्याला
नाना शंका असतात, नाना गोष्टी जाणून घ्यायची आस असते. अनेक गोष्टी उकलायच्या
असतात. पण ही बुद्धी तुझ्यापाशी आली की तिचे सर्व प्रश्न संपतात. बुद्धीत विवेक
जागृत झाला की, सर्व गोष्टी सुकर होतात. ‘सेना बैसला निवांत विठ्ठल नाम उच्चारीत’ असे
त्या भक्त सेना प्रमाणे तुझ्या तीरावर आल्यावर तुझ्या प्रवाहाकडे पहाता पहाता
एकचित्त होतात. मनातला सर्व गुंता सुटतो. ‘गॉर्डियन नॉट’ प्रमाणे न सुटणारी
संसारची गाठही हळुच उकलते. कुठचाही प्रश्न रहात नाही. सुखाच्या वरच्या वरच्या
पायर्या चढत माणूस सर्वोच्च सुखाची जी पायरी त्या समाधानाच्या पायरीवर येऊन
स्थिरावतो. त्याचं सर्व दिशांना धावणं खुंटत. मनाचा, बुद्धीचा सर्वोच्च समाधानाचा हा
शेवटचा पडाव त्याला लाभतो. तो तू आहेस. (समाधानं बुद्धेः)
माय, तुझ्या तीरी आलेले सर्वजण ‘अवघेचि नरनारी
हर अथवा हरी’ होऊन जातात. ‘नमो गंगे’ ही एकमेव पंक्ती सर्वांच्या मुखात असते. तुझ्यापाशी
कोणी लहान नाही वा मोठं नाही. तीरावर आलेले सर्वच सारखे, सर्वांच्याच हृदयात
तुझ्या भक्तीभावाचा दीप उजळलेला असतो. त्यामुळे अधीय म्हणजे न शिकलेले अज्ञ, अडाणी
हेही तुझ्या नामाच्या आच्छादनात लोकांच्या हेटाळणीपासून सुरक्षित राहतात. आईला
आपलं कमी पडणारं लेकरू जास्त लाडाचं असतं ती त्याला कुठे न सोडता पदरात झाकून
हृदयाशी धरते. तसे तू अज्ञानां तू तुझ्या
पदराने झाकून पोटाशी धरतेस.(तिरोधानमधियां)
अगे माय, तुझी ही समृद्ध, सौभाग्यशाली
जलतनू ही लक्ष्मीलाही आपल्या वारशात मिळालेले स्त्रीधन आहे असे वाटते; तर
मोक्षलक्ष्मी मिळविणार्या योगी जनांना त्यांच्या मार्गावर चालण्यासाठी तुझा हा
सुखमय प्रवाह हाच पुंजी वाटतो.
असा हा तुझा सुंदर, मनोहारी, सकलांच्या
मनाला आनंद देणारा, बुद्धीला समाधान देणारा तुझा जलौघ माय, आमच्या मनातील सतत
खदखदणारी दुःखे, निराशा, सर्व प्रकारचे कष्ट वेदना कायमच्या दूर करो.
निधानं धर्माणां किमपि च विधानं नवमुदां
प्रधानं तीर्थानाममलपरिधानं त्रिजगतः।
समाधानं बुद्धेरथ खलु तिरोधानमधियां
श्रियामाधानं नः परिहरतु तापं तव वपुः।।18
अन्वय – (हे जननि ), धर्माणां
निधानं, नवमुदां किमपि च विधानं, तीर्थाना प्रधानं, त्रिजगतः अमलपरिधानं, बुद्धेः
समाधानम्, अधियां खलु तिरोधानम्, अथ श्रियां आधानं तव वपुः नः तापं परिहरतु ।
अन्वयार्थ - (भो जननि –
हे आई); धर्माणां – वेदप्रणित धर्माचे, कर्तव्याचे; निधानं – खजिना,
दौलत, आगर, भांडार ; च – आणि नवमुदां – नूतन हर्ष ; किमपि –
काही एक, अवर्णनीय ; विधानम् – कृती करण्याचे शास्त्रोक्त वर्णन; च -
आणि तीर्थानां - पवित्र जलस्थानांमध्ये ; प्रधानं – मुख्य च –
आणि; त्रिजगतः – त्रैलोक्याचे ; अमलपरिधाानं- स्वच्छ, निर्मळ वस्त्र च - आणि बुद्धेः
– बुद्धीचे ; समाधानं – स्थैर्य, शांती, संतोष ; अथ – आणि ; अधियां
– मूढांचे; तिरोधानं – आच्छादन
; च – आणि ; श्रियां – लक्ष्मीचे; सौभाग्य, मोक्षसिद्ध्यादि
लक्ष्मीचे ; आधानं – विरासत, वारसा हक्काने मिळालेली सम्पत्ती, निवेश
असे; तव – तुझे वपुः – प्रवाहरूपी शरीर नः –
आमचे ; तापं – पीडा, कष्ट, संताप, वेदना, दुःख ; परिहरतु – दूर करो
. (18)
स्वधर्माचा तू गे अनुपम असे कोष जननी
असे तू हर्षाचा नित नवनवोन्मेष हृदयी।
असे तूची पुण्यस्थल-प्रमुख गंगेच जगती
गमे त्रैलोक्याचे वसन जणु तू निर्मल अती ।। 18.1 ।।
जिथे बुद्धीचेही सकल सुटुनी प्रश्न सगळे
सुटे संसाराचा अति गहन गुंता तुजमुळे ।
समाधानाचे गे अविरत समाधीसुख मिळे
असे तो बुद्धीचा जननि परमानंद नित गे ।।18.2 ।।
अजाणा, अज्ञांना जननि पदरानेच तुझिया
अगे झाकूनी तू धरिसि हृदयाशी नित तुझ्या ।
गमे लक्ष्मीलाही तव जललता स्त्रीधन तिचे
मनीच्या क्षोभाला तव तनुलता दूर करु दे ।।18.3 ।।
---------------------------------------------------
Comments
Post a Comment