श्लोक 18 ते 34 संस्कृत, मराठी विश्लेषणासहित

 

जगन्नाथ पण्डितकृता पीयूषलहरी / गङ्गालहरी (विश्लेषण)

श्लोक 18- 34

श्लोक 18

समुद्रात निरंतर लाटा येतच रहाव्यात. एक लाट विरते तो दुसरी उठावी त्याप्रमाणे; एकानंतर एक असे अत्यंत सरस श्लोक जगन्नाथांना स्फुरत होते. मुखातून निघालेला एक श्लोक संपताना जणु दुसर्‍या श्लोकाला घेऊनच येत होता.  ‘हे जननी तू धर्माचे निधान, विलक्षण आनंदाचे विधान, त्रैलोक्याचे निर्मल परिधान, बुद्धीचे समाधान. अज्ञांचे तिरोधान आहेस. आमचं दुःख दूर कर.’

हे जननी गे,

धारणात् धर्मः। धर्मशास्त्रांनी व्यक्तीच्या व समाजाच्या धारणेसाठी नेमून दिलेलं उपयोगी काम म्हणजे धर्म. समाज वा समाजातील व्यक्तीचं अस्तित्त्व टिकून रहावं त्याला सुरक्षा मिळावी, आधार लाभावा म्हणून केलेले हे हिताचे कल्याणाचे  नियम म्हणजे धर्म.

स्वतःहून स्वीकारलेलं  हितकारी काम, कर्तव्य म्हणजेही धर्म. वा तो माणूस ज्या स्थानावर असेल त्या स्थानमहात्म्याला साजेल असं न्यायसम्मत उचित काम करणं हाच योग्य स्वधर्म असतो. त्याप्रमाणे आपद्धर्म असतो, शेजारधर्म असतो, विद्यार्थ्याला विद्यार्थी धर्म पाळावा लागतो तर पत्नीला पत्नीधर्म, पतीला पतीधर्म तसा प्रत्येकाला त्याचा धर्म आचरावा लागतो. माणसाला अनेक कर्तव्ये पार पाडावी लागतात. अशावेळेला माणसाने आदर्श म्हणून पहावं ते तुझ्याकडे!

तू ज्या क्षणी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरलीस त्या क्षणापासून प्राणीमात्रांचं दैन्य, दुःख दूर करायचा वसा घेतलास. स्वीकारलेलं काम, विहित कार्य किती सातत्याने, अनन्य भावाने अखंड करत रहावं, ह्याचा तू आदर्श घालून दिलास. तुझं काम अथक चालूच आहे. अनेक कर्तव्यांना तू सहज निभावून नेतेस. तुझ्या किनार्‍यावर समृद्धिचं वरदान देत, तुझा प्रवाह पुढे जातो. अनेक जळचरांचं तू आवडतं सदन झाली आहेस. अनेकांची तृषा तुझ्याविना कोण शमवणार? तुझ्या तीरावर मृत्यू आला तर तो अपाप होऊन त्याला स्वर्ग प्राप्त होतो.

खजिन्यात मूल्यवान गोष्टी सुरक्षित ठेवलेल्या असतात. तुझा कोष उघडला की तुझी सर्व कर्तव्ये किती सहज निभावून नेतांना दिसतेस. लखलखितपणे तू पार पाडत आहेस हे दिसते. तू सकल धर्मांचं निधान आहेस. धर्म सुरक्षित ठेवणारी जागा आहेस. अनेकांना तुझ्या ह्या तीरांवर आपापल्या कर्तव्यांचा बोध होतो. माय, तू सर्व प्रकारच्या कर्तव्यांचा महान निधी आहेस. (निधानं धर्माणां)

 

माय कुठलीही गोष्ट मिळेपर्यंतच तिचं कौतुक असतं. एकदा का ती गोष्ट घरी आली की तिच्यामुळे मिळणरा आनंद संपून ती गोष्ट घरातील नको असलेली अडगळ बनते. पण तुझ्यामुळे मिळणारा आनंद कायम ताजा तवाना नवीन वाटतो. तुझ्या प्रवाहाकडे नुसतं जरी पहात राहीलं तरी मन आनंदाने भरून जातं. त्याचं कारणही तसच आहे. तू म्हणजे त्या ब्रह्मानंदाची सगुण पुतळी आहेस. ज्या ठिकाणी मन पोचलं की त्याला मागे फिरू नये असं वाटतं, आता अजून काही नको असं वाटतं, माणूस बाकी सर्व सुखांना आता बास म्हणतो तो ब्रहमानंद तू आहेस. पोट भरलं की माणूस बास म्हणतो. बास ह्या शब्दाचा पर्यायवाची संस्कृत शब्द आहे अलम्! आता मी पूर्ण सजले आता सजणं बास!  असं जो म्हणायला लावतो तो अलंकार (अलं करोति)  माते तू सर्व सुखांचे सुख; आनंदाचा आनंदरूपी अलंकार, निरतिशय आनंद म्हणजेच ते परब्रह्मच आहेस. तू त्या अवर्णनीय परब्रह्माची सगुण रचना आहेस. साधन आहेस, त्याचीच मधुर उक्ती आहेस. नवनवीन आनंद निर्माण करण्याच्या विधीचे जणु शास्त्र वाक्य आहेस (विधानं नवमुदां)

वहावी सौख्याची अविरत सुधा निर्झरि हृदी

म्हणोनी शास्त्रे ज्या वदतिच विधानास जननी ।

विधाने ती तू गे सुख स्फुरण तू नित्य असशी

असे तू हर्षाचा नित नवनवोन्मेष हृदयी।।

 

ह्या पृथ्वीवर अनेक तीर्थस्थान आहेत पण तुझ्यासारखी तूच!  सर्व पवित्र पावन तीर्थांमधे तू सर्वश्रेष्ठ आहेस. सर्व तीर्थांमध्ये प्रमुख तीर्थ आहेस. (प्रधानं तीर्थानाम्)

माय, एक नूर आदमी दस नूर कपडा महणतात. सुंदर वस्त्र माणसाची शोभा अशी काही वाढवतो की, रंकही राव दिसायला लागतो. कधी अरुणोदयाच्या गुलाबी छटांनी नटलेलं तुझं नीरवस्त्र मन मोहून घेतं तर कधी सूर्याच्या सोनेरी किरणांनी विणलेलं तळपणारं सुवर्णवस्त्र अचंबित करतं. रात्री चंद्राच्या मंद  रुपेरी प्रकाशानी नटलेलं रुपेरी तरी कधी चांदण्या तुझ्या प्रवाहात उतरलेली बुट्टेदार चंद्रकळा! कधी झाडांची फुलं पडून सुंगधित झालेलं तर कधी लोकांनी सोडलेल्या इवल्या इवल्या पणत्यांनी नटलेलं. तुझं हे नीर वस्त्र स्वर्ग, भूलोक आणि पाताळ जिथेजिथे तू प्रवास करतेस त्या तीनही लोकांना आच्छादून त्यांना अलौकिक सुंदर करतं. माय तुझं वस्त्र अमल आहे.  स्वर्ग, पृथ्वी, पाताळ यात अपरिहार्य असलेले मळ तुझ्या नीरवस्त्राला जराही चिकटत नाहीत. सदा सर्वदा ते स्वच्छ  असतं. रंग फिके न पडलेलं  नवीन उज्ज्वल असतं. ‘विगतः मलः’ ज्याचा मळ निघून गेला आहे त्याला विमल म्हणतात, ज्याला मळ विरहित आहे त्याला निर्मळ म्हणतात पण ज्याने मळ कधी अनुभवलाच नाही ज्याला मळ नाहीच मुळी ते तुझं अमल नीरवस्त्र ह्या त्रैलोक्याचं भूषण आहे. माय, ह्या बरड भूमीला तुझं नीरवस्त्र लाभल्याबरोबर तीही जलसांद्र होऊन साक्षात लक्ष्मीच्या रूपात उभी आहे. (अमलपरिधानं त्रिजगतः।)

बुद्धीचा वारू कायम दौडतच असतो. त्याला नाना शंका असतात, नाना गोष्टी जाणून घ्यायची आस असते. अनेक गोष्टी उकलायच्या असतात. पण ही बुद्धी तुझ्यापाशी आली की तिचे सर्व प्रश्न संपतात. बुद्धीत विवेक जागृत झाला की, सर्व गोष्टी सुकर होतात.  ‘सेना बैसला निवांत विठ्ठल नाम उच्चारीत’ असे त्या भक्त सेना प्रमाणे तुझ्या तीरावर आल्यावर तुझ्या प्रवाहाकडे पहाता पहाता एकचित्त होतात. मनातला सर्व गुंता सुटतो. ‘गॉर्डियन नॉट’ प्रमाणे न सुटणारी संसारची गाठही हळुच उकलते. कुठचाही प्रश्न रहात नाही. सुखाच्या वरच्या वरच्या पायर्‍या चढत माणूस सर्वोच्च सुखाची जी पायरी त्या समाधानाच्या पायरीवर येऊन स्थिरावतो. त्याचं सर्व दिशांना धावणं खुंटत. मनाचा, बुद्धीचा सर्वोच्च समाधानाचा हा शेवटचा पडाव त्याला लाभतो. तो तू आहेस. (समाधानं बुद्धेः)

माय, तुझ्या तीरी आलेले सर्वजण ‘अवघेचि नरनारी हर अथवा हरी’ होऊन जातात. ‘नमो गंगे’ ही एकमेव पंक्ती सर्वांच्या मुखात असते. तुझ्यापाशी कोणी लहान नाही वा मोठं नाही. तीरावर आलेले सर्वच सारखे, सर्वांच्याच हृदयात तुझ्या भक्तीभावाचा दीप उजळलेला असतो. त्यामुळे अधीय म्हणजे न शिकलेले अज्ञ, अडाणी हेही तुझ्या नामाच्या आच्छादनात लोकांच्या हेटाळणीपासून सुरक्षित राहतात. आईला आपलं कमी पडणारं लेकरू जास्त लाडाचं असतं ती त्याला कुठे न सोडता पदरात झाकून हृदयाशी धरते.  तसे तू अज्ञानां तू तुझ्या पदराने झाकून पोटाशी धरतेस.(तिरोधानमधियां)

अगे माय, तुझी ही समृद्ध, सौभाग्यशाली जलतनू ही लक्ष्मीलाही आपल्या वारशात मिळालेले स्त्रीधन आहे असे वाटते; तर मोक्षलक्ष्मी मिळविणार्‍या योगी जनांना त्यांच्या मार्गावर चालण्यासाठी तुझा हा सुखमय प्रवाह हाच पुंजी वाटतो.

असा हा तुझा सुंदर, मनोहारी, सकलांच्या मनाला आनंद देणारा, बुद्धीला समाधान देणारा तुझा जलौघ माय, आमच्या मनातील सतत खदखदणारी दुःखे, निराशा, सर्व प्रकारचे कष्ट वेदना कायमच्या दूर करो.

 

निधानं धर्माणां किमपि च विधानं नवमुदां

प्रधानं तीर्थानाममलपरिधानं त्रिजगतः।

समाधानं बुद्धेरथ खलु तिरोधानमधियां

श्रियामाधानं नः परिहरतु तापं तव वपुः।। 18 ।।

अन्वय – (हे जननि ), धर्माणां निधानं, नवमुदां किमपि च विधानं, तीर्थाना प्रधानं, त्रिजगतः अमलपरिधानं, बुद्धेः समाधानम्, अधियां खलु तिरोधानम्, अथ श्रियां आधानं तव वपुः नः तापं परिहरतु । (18)

अन्वयार्थ - (भो जननि – हे आई); धर्माणां – वेदप्रणित धर्माचे, कर्तव्याचे; निधानं – खजिना, दौलत, आगर, भांडार ; – आणि नवमुदां – नूतन हर्ष ; किमपि – काही एक, अवर्णनीय ; विधानम् – कृती करण्याचे शास्त्रोक्त वर्णन; च - आणि तीर्थानां - पवित्र जलस्थानांमध्ये ; प्रधानं – मुख्य च – आणि;  त्रिजगतः – त्रैलोक्याचे ; अमलपरिधाानं-  स्वच्छ, निर्मळ वस्त्र च - आणि बुद्धेः – बुद्धीचे ; समाधानं – स्थैर्य, शांती, संतोष ; अथ – आणि ; अधियां – मूढांचे;  तिरोधानं – आच्छादन ; च – आणि ; श्रियां – लक्ष्मीचे; सौभाग्य, मोक्षसिद्ध्यादि लक्ष्मीचे ; आधानं – विरासत, वारसा हक्काने मिळालेली सम्पत्ती, निवेश असे;  तव – तुझे  वपुः – प्रवाहरूपी शरीर नः – आमचे ; तापं – पीडा, कष्ट, संताप, वेदना, दुःख ; परिहरतु – दूर करो . (18)

 

स्वधर्माचा तू गे अनुपम असे कोष जननी

असे तू हर्षाचा नित नवनवोन्मेष हृदयी।

असे तूची पुण्यस्थल-प्रमुख गंगेच जगती

गमे त्रैलोक्याचे वसन जणु तू निर्मल अती ।। 18.1 ।।

जिथे बुद्धीचेही सकल सुटुनी प्रश्न सगळे

सुटे संसाराचा अति गहन गुंता तुजमुळे ।

समाधानाचे गे अविरत समाधीसुख मिळे

असे तो बुद्धीचा जननि परमानंद नित गे ।।18.2 ।।

अजाणा, अज्ञांना जननि पदरानेच तुझिया

अगे झाकूनी तू धरिसि हृदयाशी नित तुझ्या

गमे लक्ष्मीलाही तव जललता स्त्रीधन तिचे

मनीच्या क्षोभाला तव तनुलता दूर  करु दे ।।18.3 ।।

---------------------------------------------------

 श्लोक 19

पृथ्वीच्या पोटात, जाड थरांच्या अत्यंतिक दबावाखाली जसं कोळशाचं कायमचं रूपांतर हिरकणीत होतं; तशी पश्चात्तापदग्ध जगन्नाथाच्या हृदयद्रावक दुःखाची परिणती एका लखलखीत काव्यात होत होती. गंगेला उद्देशून त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडत होते,

हे जननी, ‘तरुणस्तावत् तरुणीरक्तः’ म्हणतात ते खोटं नाही. सळसळणार्‍या तारुण्याला चमचमणार्‍या, झळाळणार्‍या गोष्टींची सहज भुरळ पडते. सूर्य प्रकाशात चमचमणार्‍या शिंपल्यांचाच चांदी म्हणून मोह पडतो.

मीही ‘दिल्लीश्वरो वा जगदीश्वरो वा’ असे मोठ्या आढ्यतेने म्हणत माझ्या हितचिंतकांना तुच्छ समजून, त्यांचा तिरस्कार करत, त्यांच्या योग्य उपदेशाकडे दुर्लक्ष करत, अनेक राजांच्या, बादशहांच्या चाकरीत रूजु होण्यातच धन्यता मानली.  दिवस असो की रात्र! जन्मभर धावून धावून त्यांच्यापुढे हांजी हांजी करण्यातच आयुष्यााचं सार्थक मानलं. ते म्हणतील त्याला मान डोलावत, त्याची खिदमत करण्यात उभं आयुष्य व्यर्थ घालवलं. पण धनाची, ऐश्वर्याची, सत्तेची, शक्तीची धुंदी ही मदिरेच्या धुंदीपेक्षा जास्त जीवघेणी असते हे तेव्हा मला माहित नव्हतं. सत्तेची नशा चढलेल्या लहरी सम्राटांनी त्यांची इच्छा फिरताच माझं सर्व वैभव हिरावून घेतलं. माझे लखलखित गुण त्यांच्या लहरीस्वभावापुढे मातीमोल ठरले. मी उघड्यावर पडलो. माय, माझ्या हे लक्षातच आलं नव्हतं की,

शरद ऋतुत आलेला एखादा छोटा ढग कशी आणि कितीशी सावली देणार? महा विषारी नागाच्या फण्याच्या सावलीत कोणी कसा सुखाने राहू शकेल ? अमृत म्हणून विषच प्राशन केलं तर मरण अटळ आहे. बादशहाच्या चाकरीचा घोर परिणाम मी अनुभवत आहे.

समोर दिसणार्‍या त्याच्या वैभवाला भुलल्याने आणि तेव्हा त्याने अंगावर फेकलेल्या चार दिडक्यांनी शेफारून, काय हितकारी काय अहितकारी हे मला समजलच नाही. मीच माझा शत्रू बनलो. माझ्याच हिताचा मी शतदा घात केला. सर्व कल्याणकारी गोष्टींकडे मी पाठ फिरवली. तू सतत माझ्या सानिध्यात असूनही तुझ्या शीतल जलात स्नान करून धन्य व्हावं अशी साधी सुबुद्धी मला सुचली नाही. तुझ्या वियोगाच्या जणीवेने मला कधी मला खेद झाला नाही. मी सतत तुझी उपेक्षाच केली.

 माय, माझी क्षणैक वैभवाची घमेंड उतरली आहे. माझ्या अहंकाराचा बुडबुडा फुटला आहे. खोट्या ऐश्वर्याच्या लागलेल्या चकव्यातून मी बाहेर पडलो आहे. उजाडलं की सर्व रस्ते स्वच्छ दिसतात त्याप्रमाणे माझ्या मनात उजाडलं आहे. माझा चुकीचा मार्ग मी सोडून दिला आहे. इतके दिवस तुझ्या समई सारख्या शांत, मन उजळवून टाकणार्‍या उपदेशाची केलेली अवहेलना आठवून मला लाज वाटत आहे. घोर पश्चात्तापाने माझं अंतःकरण विदीर्ण झालं आहे. माझा हा मनस्ताप, माझा हा विषाद क्षणा क्षणाने वाढत जाऊन असह्य दुःखाने मी खचून गेलो आहे.

पण माय! आईचा डोळा चुकवून वाघाच्या रानात गेलेलं लेकरू असंख्य हिंस्र श्वापदांच्या हल्ल्यातून जखमी होऊनही परत येतं तेव्हा आई त्याला दूर लोटत नाही तिच्या डोळ्यात त्याच्या काळजीने अश्रुधारा वाहत असतात. ती त्याला पोटाशी घेते. सर्व उपचार करते आणि त्याला बरं करते. माय!  सर्वांच्या धारदार शब्दांनी, कृतीनी घायाळ झालेलं हे तुझं लेकरू तुझ्याजवळ परत आलं आहे. त्याचा आह्वेर करू नकोस. त्याला तुझ्या कुशीत घे. माझे सर्व अपराध पोटात घालून माय, मला क्षमा कर.  (19)

 

पुरो धावं धावं द्रविणमदिराघूर्णितदृशां

महीपानां नानातरुणतरखेदस्य नियतम्।

ममैवायं मन्तुः स्वहितशतहन्तुर्जडधियो

वियोगस्ते मातर्यदिह करुणातः क्षणमपि।।19

अन्वय – भो मातः, इह ते वियोगः (इति) यत् (अभूत् ) अयं मन्तुः, द्रविणमदिराघूर्णितदृशां नाना महीपानां पुरो नियतं धावंधावं तरुणतरखेदस्य स्वहितशतहन्तुः जडधियः ममैव (अस्ति) अतः क्षणमपि (त्वया) मयि करुणा (करणीया) (19)

भो मातः - हे आई ; इह – ह्या लोकी यत् – ज्या अर्थी ; ते – तुझा ; वियोगः - ताटातूट किंवा स्नान  सेवनादिकांचा लाभ न होणं ;  अयं – हा ; द्रविणमदिरा – धन हेच जणु दारू वा मद्य त्याने आघूर्णित – भ्रमित आहे ; दृषाम् - दृक् – दृष्टि; ज्यांची ते ; द्रविण – धन ; द्रविणमदिराघूर्णितदृशः – धनरूपी मद्याने ज्यांचे डोळे फिरले आहेत अशा; नाना -अनेकविध ; महीपानां - राजांच्या ; पुरः – पुढे ; नियतं – नियमाने ; धावं धावं - धावून धावून – तरूणतरखेदस्य – ज्याला सतत वेगवेगळ्या गोष्टींचा नित्य नव्याने खेद होत आहे त्याचा  ; स्वहितशतहन्तुः – आपल्या शेकडो कल्याणांचा नाश करणार्‍या ; जडधियः – मंदबुद्धी, मूर्खाचा ; मम एव - माझाच ; मंतुः – अपराध (समजून) ; अतः – या कारणास्तव (त्वया- तुझ्याकडून ) क्षणम् अपि -  क्षणभर तरी करुणा – दया ; (करणीया – केली जावी.) (19)

जयांना सत्तेची चढलि मदिरा ती विषभरी

अहंकाराने जे कृति करिति बेबंद लहरी ।

धनाने सत्तेने नृप असति उन्मत्त बहु जे

अगे हांजी हांजी करत फिरलो त्या पुढति गे ।। 19.1।।

 

तुला सोडुनी मी नृपति पदि त्या नित्य झुकलो

तया मागे मागे फिरत बहु दुःखात पिचलो ।

नव्याने नित्याने फिरुन फिरुनी खेद मजला-

सतावे; गोष्टींचा किति निरनिराळ्या अजुन का ।। 19.2 ।।

 

हिताचा माझ्या मी करुनचि कसा घात शतदा

कसा कल्याणाचा पथ अडविला मीच मजला ।

अगे भूलोकी तू असुनहि दुरावाच धरुनी

न केले स्नाना मी जननि तुझिया निर्मळ जळी ।। 19.3 ।।

 

अशा ह्या वेड्याची कणव करि गे तूच हृदयी

क्षमा माझ्या सार्‍या गहन अपराधांसचि करी ।

अगे मानूनी तू क्षणभर कृपापात्र मजसी

तुझ्या वात्सल्याचा अनुभव मला दे कणभरी ।। 19.4 ।।

---------------------------------------------------

श्लोक 20

गंगेच्या घाटावर उभे असलेल्या जगन्नाथ पंडितांना भूतकाळातील अनेक गोष्टी आठवत असाव्यात. गंगेच्या सानिध्यातले काही निर्मळ क्षण नजरेसमोर तरळत असावेत. तिचं निर्मळ जल, नलिनीबन (कमळांचे बन)------- आणि बरचं काही. ते सर्व चित्रमय क्षण त्यांच्या मुखातील श्लोकातून बाहेर पडू लागले.

हे जननी गे,

तुझं अलौकिक सौंदर्य बघत मी तुझ्या तीरावर उभा आहे. इथे निर्माण झालेलं हे वातावरण अवर्णनीय आहे. वार्‍याच्या मंद मंद शीतल झुळका  अधुनमधुन सारख्या येत आहेत. त्याने तुझं हे आरशासारखं चमकदार पाणी हळुवार हलुन त्यात तरंगांच्या कोमल मालिका तयार होत आहेत.  तुझ्या काठावर असलेल्या नलिनीबनातील कमलांनाही त्या तरंगाचे हळुवार स्पर्श होऊन कमळेही मंद मंद डोलत आहेत. कमळांच्या सतत हलण्या डुलण्याने त्यांच्या पाकळ्या सैलावून खाली झुकल्या आहेत त्यामुळे, कमळातील केशरी पराग जलस्तरावर पडत आहेत. त्याने पाण्याला केशरकांति प्राप्त झाली आहे.

उषःकाली देवस्त्रियांनी तुझ्या पाण्यात स्नान केल्याने त्यांच्या अंगीची चंदन, केशर, कस्तूरी, आगरु,ची उटी पाण्यात मिसळून तुझ्या काठा काठांच पाणी सुगंधित आणि दाटसर झालं आहे.

जलतरंगाच्या कोमल रेखा, कमलांचे नाजुक तंतु, पराग कणाचा केशरी रंग अंगरागाचे रंगकण सर्व मिळून जलरंगातील एक नाजुक, मनमोहक चित्रजाल तयार होत आहे.

हे माय, माझं हे जनन मरणाचं जाळं मात्र अभेद्य अत्यंत चिवट, न तुटणारं आहे. त्याच्यात अडकून एखाद्या माश्याची व्हावी तशी माझी तडफड होत आहे. मला ह्या जननमरणाच्या भयानक जंजाळातून सोडवायला तुझं हे नलिनीबनातील चित्रजाल पुरेसं आहे. कित्येक वेळा एखाद अवघड काम करायला लहानशी गोष्ट पुरते. ‘जो काम करे सुई क्या करे तरवारी’ म्हणतात ना! बळीला पराजित करण्याचं जे काम सर्व देवांना मिळूनही जमलं नाही; ते छोट्या बटु वामनानी करून दाखवलं. हे माय, माझ्यावर कृपा कर. तुझ्या असहाय्य लेकराला असं दूर लोटू नकोस. जलतरंग, कमल रंग, कमलतंतु, पराग बिंदु आणि अंगरागामुळे  तयार झालेल्या तुझ्या ह्या कोमल जालाने माझ्या ह्या जनन मरणाच्या जंजाळातून मला बाहेर काढ. (20)

 

मरुल्लीलालोलल्लहरिलुलिताम्भोजपटली-

स्खलत्पांसुव्रातच्छुरणविसरत्कौङ्कुमरुचि।

सुरस्त्रीवक्षोजक्षरदगरुजम्बालजटिलं

जलं ते जम्बालं मम जननजालं जरयतु।। 20 ।।

अन्वय –   (भो मातः) मरुल्लीलालोलल्लहरिलुलिताम्भोजपटली-स्खलत्पांसुव्रातच्छुरणविसरत्कौङ्कुमरुचि। सुरस्त्रीवक्षोजक्षरदगरुजम्बालजटिलंजलं ते जम्बालं मम जननजालं जरयतु।

 

भो मातः– हे आई, मरुतः लीला – वार्‍याचा विलासयुक्त इतस्ततः संचाराने; लोल  - हलणार्‍या तां अंभसि - त्या पाण्यात.  लहरिलुलित –  हलणार्‍या तरंगांनी ज्यांच्या; तां अंभोजपटली- ( अंभोज -पाण्यात निर्माण होणारी) कमळे;  (त्यांची) पटली – पाकळ्या; लहरिलुलितअंभोजपटली- हलणार्‍यालहरींनी ज्यांच्या पाकळ्या मऊ/लुळ्या केल्या आहेत त्यामुळे त्यातील (परागकण)  स्खलन्तः - पडतात ते ; पांसु – पराग कण त्यांचा व्रात – समूह त्याचे च्छुरण – मिश्रण ते  विसरति – प्रसार पावते; विसरन्ती –( त्या मिश्रणाने)  प्रकट होणारी ती ; कौकुमरुचिः – केशरकांति असे;. (वायूने चंचल झालेल्या लहरींनी हलविलेल्यामुळे  सैलावलेल्या कमळ-पाकळ्यांमुळे परागकण गळत आहेत त्याने जलावर केशरकांती पसरली आहे); सुरस्त्री वक्षोज क्षरत् – देवांच्या स्त्रियांच्या स्तनांवरून (पाण्याने ओघळुन) खाली येणारे अगरु; जंबाल जटिलम् – अगर, चंदन  आदि सुवासिक लेपांची घट्ट दाट उटी जी पाण्याच्या स्पर्शाने ओली होऊन तिचे दाट गंधाप्रमाणे तयार होणारे मिश्रण युक्त उदक म्हणजे पाणी; मम – माझे जननजालं - जन्ममृत्यूचे चक्र त्याचा जरयतु- क्षीण करो. (20)

 

तुझ्या तीरी माते, झुळुक झुळके शीतल सुखे

तरंगांची नक्षी  नितळ जळि  रेखे पवन गे ।

तरंगांनी त्या गे डुलति कमळे नाजुकपणे

परी होती सारी अति शिथिल पद्मांचिच दळे ।। 20.1 ।।

परागांचे त्यांच्या कण विखुरती दूर जळि गे

किनारा रंगे तो जणु अरुण कांतीत तव गे ।

करीता स्नानासी सुरवर स्त्रिया गे तव जळी

तयांच्या अंगिची मिसळत जळी गंधित उटी ।। 20.2 ।।

 

उटीने ते गंगाजल घडतसे गंधयुतही

जणू कोणी रेखे अभिनव नवे चित्र सलिली ।

तरंगा रेघा ह्या, उटि कमलतंतूच नलिनी

अगे ह्यांचा गुंता अनुपम गमे हे सुरनदी ।।20.3 ।।

 

परी गुंताडा हा जनन-मरणाचा भयद गे

मला त्याने आहे, जननि पुरते गे जखडले।

‘जला-जंजालाच्या’ अति सुखद स्पर्शे जननि गे

महा पीडादायी जननमरण जंजाळ विरु दे ।। 20.3 ।।

---------------------------------------------------

श्लोक 21

लेकराच्या मनात आई आणि आईच्या मनात लेकरू असं हे विलक्षण नातं आहे. ह्या नात्यात श्रीमंत, गरीब; उच्च नीच ह्या कुठल्याही गोष्टींना स्थान नाही. लेकरू जेवढं अनन्य भावाने आईला बिलगतं तेवढी ती त्याला जवळ घेते. जगन्नाथ पंडित म्हणतात,

माता कुलीन, खानदानी, श्रीमंत घरातील असो वा गरीब घरातील, ती सामर्थ्यवान असो वा दुर्बळ; तिच्या अपत्यावर कोणी हल्ला केला वा झडप घातली वा त्याला त्रास देण्याचा प्रयत्न जरी केला तर ती सर्वशक्तीनिशी चवताळून त्याच्यावर प्रतिहल्ला चढवते. एखाद्या वाघिणीच्या बछड्याला कोणी जरा जरी त्रास दिला तर वाघीण चवताळून त्याच्यावर धावून जाते. वा ती आई गरीब गाय जरी असली तरी ती वासराच्या अंगावर येणार्‍या वाघाला शिंगावर घेतल्याशिवाय रहात नाही. आपल्या शिशुसाठी सर्व सुखसमाधान सोडून प्राणांचीही पर्वा न करता आई त्याची ढाल बनते.  

माय तू त्याला अपवाद कसा असशील? तुझी दोन्ही कुळं ही श्रेष्ठतम अशीच आहेत. त्या रमारमण म्हणजेच लक्ष्मीपती विष्णूच्या अत्यंत निर्मळ चरणकमलांच्या निरोगी, चमकदार गुलाबी, अमल नखापासून तुझी उत्पत्ती झाली. अशा अत्यंत श्रेष्ठ, सम्पन्न कुळात तू जन्मली आहेस.

तर आपल्या पाच बाणात सर्व पृथ्वी पादाक्रांत करणार्‍या मदनाचा ज्याने कडवा प्रतिकार केला, त्याला युद्धात प्रत्युत्तर देऊन ज्याने त्याला कायमचं पराजित केलं, आपल्या नेत्रातील ज्वालांनी त्याला जाळून टाकलं असा जो महान योद्धा महादेव; त्याने तुझ्या सद्गुणांवर मोहित होऊन तुला जटाजुटामधे धारण केलं.  त्याच्या भव्य विशाल जटाजुटांवर तू आनंदाने वास्तव्य करत होतीस.

पण विषाने, शस्त्राने, अपघाताने मरणारे आगतिक लोक पाहून, अनेक अपराधांसाठी प्रायश्चित्ते घेणारे दुःखी, कष्टी, असह्य पीडा भोगणारे लोक पाहिल्यावर तुला गलबलून आलं. ह्या सर्वांना माझ्याविना कोण आधार देईल? ‘बुडते हे जग पहावेना डोळा’ ! अशी तुझ्या जीवाची घालमेल झाली. पापी लोकांना पवित्र करणे  ही  तुला अंतरातून साद घालणारी, हृदयापासून आलेली तुझी आवड आहे.  

तू तुझ्या पवित्र, कल्याणकारी सुख शांतीचे निधान असलेल्या विष्णूपदांचा त्याग केलास आणि शिव जटाजूटही त्यागलेस. तू तुझ्या लाखो दीन असहाय्य भक्तांच्या सहाय्यासाठी धावून आलीस. दीन दुःखितांच्या सहाय्याला धावून जाणं हा तुझा व्यासंग आहे. तुला लागलेला छंद आहे.

तुझी त्यांच्याविषयीची आपुलकी, कळवळा त्यांच्याविषयीचा प्रेमाचा उमाळा, पतितांचा उद्धार करण्याची तू केलेली प्रतिज्ञा आणि तिचं चरम सीमेपर्यंत पालन ; त्यासाठी कितीही कष्ट सोसायची तुझी तयारी हे तुझे सर्व गुण अलौकिक, अद्भुत आहेत माते. लोकांच्या मनात तुझ्या विषयीचा आदरभाव त्यामुळे कायमच दुणावेल, वाढत राहील ह्यात शंका नाही. तुझ्या यशाची ही चढती कमान लोकांच्या मनात कायमच आदरास, गौरवास पात्र कशी बरं नसेल?.

समुत्पत्तिः पद्मारमणपदपद्मामलनखा-

न्निवासः कन्दर्पप्रतिभटजटाजूटभवने।

अथायं व्यासङ्गो हतपतितनिस्तारणविधौ

 कस्मादुत्कर्षस्तव जननि जागर्तु जगतः।। 21

अन्वय – हे जननि,(तव) समुत्पत्तिः पद्मारमणपदपद्मामलनखात् (अस्ति)। निवासः कन्दर्पप्रतिभटजटाजूटभवने (अस्ति)। अथ अयं (ते) व्यासंगः हतपतितनिस्तारणविधौ (अस्ति)। (अतः) तव जगतः उत्कर्षः कस्मात् न जागर्तु (21)

 

  अन्वयार्थ - भो जननि -  हे आई;  पद्मा-रमण – लक्ष्मीचा पती म्हणजे विष्णू त्याच्या; पदपद्मस्य – चरण कमळाच्या/ कमळासारख्या सुंदर पावलांच्या; अमल नखात् – पवित्र,निर्मळ नखापासून; तव समुत्पत्तिः – तुझी निर्मिती (झाली).  कंदर्पः – मदन; त्याचा प्रति भट – त्याला प्रतिकार करणारा योद्धा; त्याच्या  जटाजूट भवने – जटासमूहात असलेला तुझा; निवास – घर; अथ-  आणि; हत – विष, शस्त्रादिकांनी मृत; पतित – प्रायश्चित्तास योग्य निस्तारण विधौ -  उद्धार करण्याविषयी;  अय़ं – हा; तव- तुझा; व्यासंगः –  सवय, नादिष्टपणा, छंद, आवड,एखाद्या गोष्टी बद्दलचे प्रेम, बांधिलकी; जगतः – सर्व लोकांकडून;  तव – तुझा, उत्कर्षः – उत्कर्ष, श्रीमंती, पूज्यत्व;  कस्मात्  न जागर्तु – (लोक) का बरे मानणार नाहीत? का बरे त्यांच्या मनात जागृत  होणार नाही?

 

अगे ज्या लक्ष्मीचा पति अतिच श्रीमंत जगती

जयाची पाऊले अमल कमलांच्यासम जशी ।

गुलाबी कांतीची चमकति नखे उज्ज्वल अती

तयापासूनी गे जननि तव उत्पत्ति घडली ।। 21.1 ।।

 

सुटेना प्राणी तो कुणि मदनबाधेतुन कधी

मनोजासी त्या दे शिव तिखट प्रत्युत्तर युधी

महा योद्धा शंभू शिव करितसे राख तयिची

परी मोहूनी तो  तुज निज शिरी धारण करी ।। 21.2 ।।

 

जटांचा त्याच्या तो जरि सुखवि प्रासाद तुजसी

जरी विष्णूची ती चरणकमले मोहक अती ।

तरीही तू माते हरिचरण पद्मे हि त्यजसी

तुझे विश्रामाचे स्थल  शिव-जटा-त्याग करसी ।। 21.3 ।।--

 

विषाने, शस्त्राने जन मृतचि झाले जगति ह्या

अधोगामी जे जे जन ढळति नीतीपथचि वा ।

अशांच्या उद्धारा अवतरसि पृथ्वीवर पुन्हा

अगे उद्धारावे पतित-जन व्यासंग तव हा ।। 21.4 ।।

 

तुझा पाहूनी हा पतित विषयीचा कळवळा

प्रतिज्ञा पूर्तीच्यास्तवचि झटणे हे अविरता ।

बघोनी निष्ठा ही तव अति असामान्य प्रतिची

कळावे कैसे ना जननि तव माहात्म्य जगती ।। 21.5 ।।

---------------------------------------------------

 श्लोक 22

गंगेची भरभरून स्तुती करतांना भारावून जगन्नाथ पंडित म्हणाले, हे माय गे! लोक म्हणतील, ‘मी गंगेची इतकी अथक स्तुती करावी  अशी गंगा कोण लागून गेली? जगात बाकी नद्या नाहीतच की काय?  कितीतरी नद्या गंगेहून दूरगामी असतील. जलौघाने गंगेहून विशाल असतील. ह्या जगात एकाहून एक श्रेष्ठ गोष्टी असतात.’  माय, पर्वतातून निघून समुद्राला मिळणार्‍या अगणित नद्या आहेत हे मला मान्य आहे. त्या सुंदर असतील, विशाल असतील, दूरगामी असतील, प्राणीमात्रांना मदत करणार्‍या परोपकारीही असतील पण माय तुझी सर त्यातील कुठल्याच निर्झरिणीला कशी यावी?

हे स्वर्लोककल्लोलिनी, तू स्वर्गातून पृथ्वीवर उतरतांना तुझा प्रचंड आवेग सहन करणं हे महादेवांशिवाय अजून कोणाला शक्य होतं? तारकाक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली सारखे भयावह राक्षस आणि त्यांनी पृथ्वीपासून दूर अंतरावर उभारलेली तीन पुरे ह्यांना ध्वस्त करणारे त्रिपुरारारि महादेव ह्यांनी प्रत्यक्ष तुझा स्वर्गातून धो धो कोसळणारा प्रवाह त्यांच्या शिरी, जटांमधे थोपवून धरला. त्यांच्या जटाजुटांमधे बांधून तुझा वेग नियंत्रित केला. अन् त्यांनाही तुझ्या गुणांचा मोह पडला;  त्यांनी तुला कायमचं त्यांच्या शिरावर स्थान दिलं. सर्व देवांचे जे देव महादेव त्यांच्या जटाजुटांमध्ये राहण्याचं सौभाग्य अजून कुठल्या नदीला प्राप्त झाल्याचे ऐकिवात नाही. कोणाची ती योग्यताही नाही. तुझ्यासारखी केवळ तूच!

 

 त्या ऐश्वर्यसम्पन्न लक्ष्मीपती भगवान विष्णूंची स्वतःची महती केवढी मोठी! कृष्णावतारात कालिया मर्दनाच्यावेळी, कालियाच्या फण्यावर नृत्य करतांना भगवंताच्या पायाला जे सर्पविष लागले ते धुण्याचे दुःसाहस करायला बाकी कुठली सरिता कशी धजावेल? त्या सर्पविषाचा जहालपणा पाहून बाकी नद्या आपलंही पाणी विषारी, दूषित होईल म्हणून मागे सरकतील. त्याची ती क्षमताच नोहे. पण हे अचाट सामर्थ्य फक्त तुझ्या पवित्र जलात आहे. तू विष्णूचे पाय धुवून पुनश्च ते निर्मळ केलेस. पुन्हा कमलकोमल केलेस. तुझं हे अद्भुत सामर्थ्य, अलौकिक पराक्रम, कितीही दुष्कर काम करू शकण्याची क्षमता बाकी सर्वसाधारण निम्नगांच्या अंगी कशी यावी?

 

माय, ‘जो न देखे रवी वह देखे कवी ’ अशा अद्भुत कल्पनाविलासाच्या एखाद्या कवीनेही तुझी तुलना एखाद्या मनोहर निर्झरिणी बरोबर करायची ठरवली तरी त्याला ते जमणार नाही कारण तुझ्यासारखी केवळ तूच आहेस. तुझं हे एकमेवाद्वितीय असलेलं सर्वश्रेष्ठपद कायमचं तुझच आहे. माय त्याशिवाय का हा जगन्नाथ तुझी हृदयापासून स्तुती करेल ? (22)

नगेभ्यो यान्तीनां कथय तटिनीनां कतमया

पुराणां संहर्तुः सुरधुनि कपर्दोऽधिरुरुहे।

कया वा श्रीभर्तुः पदकमलमक्षालि सलिलै-

स्तुलालेशो यस्यां तव जननि दीयेत कविभिः।।22

अन्वय – हे जननि, कविभिः यस्यां तव तुलालेशः दीयेत ( तादृशी का वर्तते?) हे सुरधुनि, नगेभ्यो यांतीनां तटिनीनां कतमया पुराणां संहर्तुः कपर्दः अधिरुरुहे । कया वा श्रीभर्तुः पदकमलं सलिलैः अक्षालि (तत् कथय) (22)

अन्वयार्थ - हे सुरधुनी – हे देवनदी; नगेभ्यः – पर्वतापासून; यांतीनां – वाहणार्‍या, जाणार्‍या; तटिनीनां- नद्यांमध्ये ; कतमया – कोणत्या नदीने; पुराणां-तीन पुरांच्या स्वामी असलेल्या त्रिपुरांचा, त्रिपुर नावाच्या राक्षसांचा; संहर्तुः – नाशकर्त्या शिवाचा; कपर्दः – जटाजूट; अधिरुरुहे – निवासस्थान केले? (किंवा) कया वा – वा कोणत्या (नदीने); श्रीभर्तुः – लक्ष्मीच्या पतीचे, विष्णूचे ; पदकमलं – कमळासारखी पाउले; सलिलैः – पाण्याने ; अक्षालि – धुतली; हे कथय – सांग; हे जननि – हे आई; कविभिः – कवीजनांनी; यस्यां – जिला तव – तुझ्या; तुलालेशः -उपमेचा अंश; दीयेत – दिला जाईल.

 

गिरीतूनी येती कितिक सरिता हे सुरधुनी

मिळाले का कोणा परि शिवशिरी स्थान कधिही? ।

जलौघाने वा का चरण कमलाकांत हरिचे

करे प्रक्षाळूनी विमल कुणि का निर्झरि स्वये ।। 22.1 ।।

 

कुणापाशी आहे इतुकि क्षमता गे सुरसरी

तुझ्या तोडीची ना जननि सरिता एकही जगी ।

कवींनी द्याया गे तुजसी उपमा ना दुजि कुणी

नसे तोलामोलाचिच तुजसमा एकहि नदी ।। 22.2 ।।

 

---------------------------------------------------

श्लोक 23

आईशिवाय लेकराचे खरे हितचिंतक कोण असणार? बाळाने रात्री अपरात्री जरी दुःखाने कळवळून आऽऽई  म्हणून हाक मारली तरी ती धावत येते. तिच्या चित्तात आपल्या बाळाशिवाय दुसरं कोणीच नसतं. म्हणूनच तापत्रयाने गांजलेले जगन्नाथ गंगामातेला आर्त साद घालत आहेत.

‘हे जननी, ब्रह्मा, विष्णू, महेश ह्या तिघांनीही जगाच्या कल्याणाचे काम आपापसात वाटून घेतले आहे. त्यांना नेमून दिलेलं जेवढं काम आहे तेवढे ते करतात. हे जगज्जननी गंगे, प्राणीमात्रांचे कल्याण हे तुला नेमून दिलेले काम नसून तुझा व्यासंग आहे, तुझा छंद आहे, तुझ्या जीवनाचं ध्येय आहे. आयुष्यभराचं ध्येय म्हणून स्वीकारलेलं काम अंतापर्यंत निभावून नेण्याची अत्युच्च प्रतिची कर्तव्य दक्षता तुझ्याजवळ आहे. सूर्य स्वतः जळून सर्व सृष्टीला प्रकाश उब देतो खरा पण, त्याला मावळणं आहे. त्याप्रमाणे हा विधाता, ब्रह्मदेव अनेक वेळा समाधीत गढून जातो; तर हा विष्णू चातुर्मासाचे चार महिने त्याच्या शेषनागावर झोप घेतो; तर हा महादेव त्याच्या मनात आलं की, तांडवनृत्यात मग्न होतो. हे कल्याणकारी म्हणवणारे देवसुद्धा भरवशाचे नाहीत.

 

तुझं तसं नाही. जगाच्या अंतापर्यंत जगाच्या कल्याणाची शाश्वती तू देतेस. तुझा निरंतर वाहणारा प्रवाह कल्याणस्वरूपच आहे. त्यामुळे हा ब्रह्मदेव कितीही काळ समाधि लावून बसो; वा हा विष्णू कितीही काळ शेषावर पहुडलेला राहो; वा हा शंभू महादेव त्याच्या नृत्यात त्याला विसरून जावो.---- तू निरंतर वाहते आहेस. तू सदोदित जागी आहेस. हे तीनही देव असले किंवा नसले तरी त्याने फरक पडत नाही.  जगाचं कल्याण ह्या एकमेव ध्येयावरून तुझं लक्ष जराही विचलित होत नाही. तुझा हा कर्मयोग बाकी कोणाला साधणार नाही.

 

विधत्तां निःशङ्कं निरवधिसमाधिं विधिरहो

सुखं शेषे शेतां हरिरविरतं नृत्यतु हरः।

कृतं प्रायश्चित्तैरलमथ तपोदानयजनैः

सवित्री कामानां यदि जगति जागर्षि जननि।।23

अन्वय – भो जननि, जगति कामानां सवित्री (त्वं) यदि जागर्षि, (तर्हि) विधिः निरवधिसमाधिं निःशंकं विधत्ताम् । हरिः शेषे सुखं शेतां, हरः अविरतं नृत्यतु, प्रायश्चित्तैः कृतम्। अथ तपोदानयजनैः अलम्, अहो!

अन्वयार्थ -

जगति -  ह्या त्रिभुवनात; कामानां – अभीष्ट मनोरथांची; सवित्री – (सूते सा) – प्रसवते ती वा दात्री; त्वं -तू; यदि – जर जागर्षि – जागृत आहेस; (तर्हि -तर) विधिः- त्रैलोक्य उत्पन्न करणारा ब्रह्मदेव; निरवधि -ज्याला अवधि नाही असा म्हणजे चिरकाल ; समाधि- चित्तवृत्ति निरोध ; निःशंकं – (मी सृष्टीचा व्यापार चालवला नाही तर सृष्टी कशी  चालेल ही) शंका सोडून; विधत्तां – करो; हरि – जो दुःखाचे निवारण करतो असा विष्णू; शेषे – शेष नावाच्या नागावर ; शेतां – शयन करो ; हरः – त्रैलोक्याचा संहार करणारा शिव; अविरतं -  निरंतर ; नृत्यतु- तांडव नावाचं संहार करणारं नृत्य करोः प्रायश्चित्तैः  – प्रायश्चित्तांनीं (आपल्याकडून पातकी जनांची शुद्धी होत नाही म्हणून) कृतम् -  अधिक नको, बास करावे, थांबावे; अथ – आणि ; तपोदानयजनैः – तप, दान, देवपूजा, यज्ञादि कर्मे इत्यादिकांनीही, अलम् – बास करावे वा पुरे व्हावे; अहो !- केवढे हे आश्चर्य! (सर्व देवादिकांची कामे गंगा एकटी करण्यास समर्थ आहे) 

कसे चालावे ह्या सुरळितचि माझ्याविण जगी

नको शंका ऐसी क्षणभर विधात्या हृदि अशी ।

सुखे ब्रह्मा बैसो अविरत समाधीत गढुनी

करावे रुद्राने समय कितिही तांडव भुवी ।। 23.1 ।।

 

हरे जो दुःखांसी, हरिहि बहु निश्चिंत हृदयी

सुखे झोपो शेषावर नित करो तो शयनची ।

नको प्रायश्चित्ते तप यजन दानेच कुठली

जगाच्या चालाया नच गरज ह्यांचीच उरली ।। 23.2 ।।

 

जगाच्या उद्धारा सुरनदि पुरे एकच अशी

करे सारी कामे सकलचि सुरांना न जमली ।

मनीषा पूर्तीसी; नित शमविण्या क्षोभ सहजी

असे गंगा जागी नित निरसण्या दुःख जगती ।। 23.3 ।।

---------------------------------------------------

श्लोक 24

माणूस जे त्याच्या हिताचं आहे नेमकं ते सोडून जे त्याच्या इंद्रियांना सुखाचं वाटतं, गोड वाटतं तेच आचरणात आणतो. आधी गोड वाटणारी बचनागाची मुळी प्रत्यक्षात महाविषारी असल्याने प्राणघातक ठरते. गळाला लावलेलं अमीष खाण्यासाठी मासा धावतो खरा पण त्याची नंतर जी स्थिती होते त्याचं वर्णन आद्य शंकराचार्यांनी फार प्रभावीपणे नृसिंहस्तोत्रात केलं आहे. ते म्हणतात,

जाळ्यात मी गवसलो भवसागरीच्या । नाही तिथून सुटका करु काय देवा।।

संसाररूप गळ हा मम कंठ छेदी । घायाळ मी तडफडे बहु वेदनांनी।।

प्राणांतिका कळ उठे मम मस्तकी ही । फाटून जाय मुख हे मम प्राण कंठी।।

पंडित जगन्नाथालाही शहाजहाँनने दिलेला उच्च मानसन्मान, ऐश्वर्य त्याच्या मुलाने, कावेबाज औरंगजेबाने सर्व जप्त केलं. काळाच्या एका फटकार्‍यासरशी लक्ष्मी निघून गेली.  अशा लहरी राजांची चाकरी कधी घात करेल हे सांगता येत नाही. जगन्नाथाचं मन पश्चात्तापानी भरून गेलं.

मदोन्मत्त मी स्वैर,स्वच्छंद, वेडा । अमर्याद ही लालसा, काम माझा ।

कुकर्मी रती संगती दुर्जनांची । मनी घोळते वासना पापबुद्धी ।

सर्व अलबेल असताना आईची आठवण होत नाही पण सर्व जगानी पाठ फिरवली, कष्ट, यातना, दुःख त्यांचं भेसूर रूप घेऊन समोर उभे राहिले की, पहिली आठवण होते ती आईची. जगन्नाथांचे डोळे उघडले . माय---गे!!! म्हणत डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला

भवाच्याच पाशात हा गुंतलो मी  । तुझ्यावीण ना मार्ग दृष्टीस येई ।

 अशांती मना राहिली व्यापुनी ही ।  मला जाह्नवी ना तुझ्यावीण कोणी 

माय, एखाद्याने जे जे करायलो नको ते ते करणारा दुराचारी मी आहे. आयुष्यभर मनात येईल तसं स्वैर वर्तन मी केलं. माय गे! ,मला सर्व सर्व मान्य आहे. पण जीवनाच्या ज्या वळणावर मी उभा आहे तेथून मला निराशेशिवाय काहीच दिसत नाही. दाट अंधारच्या खोल खाईत मी पडतो आहे. आई मला हात दे. मला सावर.

हे माय, मी पोरका, पूर्णपणे निराधार, निराश्रित, सर्वांनी वाळित टाकलेला असहाय असा तुझा शिशु असलो तरी अशा दीन, निराधारांविषयी तुझ्या हृदयात सतत वात्सल्यच झिरपत असत. तू कायमच स्नेहाने संपृक्त आहेस. तुझी माया कधी आटत नाही.

माय, माझे सर्व मार्ग खुंटले आहेत (विगलितगतिः) ना ह्या पृथ्वीवर मला काही आशेचा किरण दिसत आहे ना केलेल्या पुण्यामुळे माझा पुण्य लोकीचा रस्ता उजळून गेला आहे. माझ्या पापांमुळे माझ्यासाठी सर्वत्र अंधारच दाटला आहे.

जगन्नाथ पंडित म्हणत आहेत, माय माझ्या पापाचरणामुळे, माझा स्वधर्म न पाळल्यामुळे मला पततिताला जरी स्वर्गलोक मिळणार नसला तरी तू माझी आई आहेस आणि तू पुण्य लोक मिळवून देण्यास समर्थ आहेस (पुण्यगतिदा); कारण, तू विश्वाचा उद्धार करायला समर्थ आहेस. (विश्वोद्धारिणी)

 माय मी असाध्य अशा भवरोगाने गळून गलो आहे. गलितगात्र झालो आहे (गदविगलित) पण तू माझ्या सर्व रोगांवरील उपचार जाणणारी निष्णात वैद्य आहेस.(सिद्ध भिषज) मी तहानेने व्याकूळ झालो आहे. माझी विषयतृष्णा काही केल्या न शमणारी आहे.(तृष्णाकुलितहृदयः) तू मात्र अमृताचा अथांग पारावार आहेस. (सुधासिंधु)

 माय, तुझ्यात माझ्यात जणु ही आकाश पाताळाइतकी गुण दोषांची तफावत आहे. तू सद्गुणांची पुतळी तर मी सर्व दोषांचा पुतळा आहे. असं असूनही माय,  मला फक्त एकच गोष्टीचं निश्चित ज्ञान आहे ते म्हणजे, तू माझी माय आहेस आणि मी तुझं लेकरू आहे. लेकराला आपल्या घरचा पत्ता, रस्ता माहित नसला तरी त्याने आईचं बोट पकडलं आणि तिच्या सोबत जात राहिलं तर ते नक्कीच इच्छित स्थळी, योग्य जागी वा घरी पोचतं. माय, जर मी तुझं अनुसरण केलं, तुझ्या मागेमागे आलो तर मला योग्य पुण्यगती मिळेल हा माझा विश्वास आहे.

 ह्या जगाचा भीषण अनुभव घेऊन, अत्यंत व्याकूळ होऊन, मी तुझ्याकडे आलो आहे. तुझी योग्यता जाणून आलो आहे. तुझ्यासमोर उभं राहण्याचीही माझी पात्रता नाही हेही मी जाणून आहे. तरीही हे माझी माय गे! तुझ्या पायाला घट्ट मिठी घालून मी तुला शरण आलो आहे. आता मला तारायचं का मारायचं हे तूच ठरव. ह्या तुझ्या लेकराचं तुला जे योग्य वाटेल ते तू कर.

अनाथः स्नेहार्द्रां विगलितगतिः पुण्यगतिदां

पतन्विश्वोद्धर्त्रीं गदविगलितः सिद्धभिषजम्।

सुधासिन्धुं तृष्णाकुलितहृदयो मातरमयं

शिशुः सम्प्राप्तस्त्वामहमिह विदध्याः समुचितम् ।। 24 ।।

अन्वय – (भो गंगे) अनाथः विगलितगतिः ; पतन्, गदविगलितः , तृष्णाकुलितहृदयः अयं अहं शिशुः , स्नहार्द्रां, पुण्यगतिदां विश्वोद्धर्त्री, सिद्धभिषजं, सुधासिंधुं मातरम् त्वां सम्प्राप्तः (अस्मि) । इह त्वं (मे) समुचितं विदध्याः । (24)

अन्वयार्थ- (भो गंगे – हे गंगा माते)  अनाथः – निराश्रित, ज्याला कोणी नाही असा मी;   स्नेहार्द्राम् – प्रेमाने आर्द्र/ अत्यंत दयाळु (अशी गंगा) ; विगलितगतिः - ज्याची उत्तम गति/ लोक नष्ट झाला आहे असा मी; पुण्यगतिदां -पुण्यलोक देणार्‍या (तुला) ;  पतन् – पतित (स्वधर्मापासून ढळलेला) मी ; विश्वोद्धर्त्रीं – त्रिभुवनाची पापे नाहिशी करणार्‍या अशा तुला;  गद – रोग ; गदविगलित – जराजर्जर, रोगग्रस्त ; सिद्धभिषजं – सर्व जडिबूटी, औषधे आणि ज्ञान ह्यांनी सज्ज असलेला वैद्य ( त्या तुझ्याकडे)  तृष्णा – तहान ; तृष्णाकुलितहृदयः – विषयांच्या इच्छेने ज्याचे हृदय/ अंतःकरण व्याप्त/अस्वस्थ झाले आहे असा विषयलोलूप मी;  सुधासिंधुं – अमृताचा सागर/ अमृततुल्य असलेल्या तुजप्रत ;  अयं अहं – असा हा मी ;  शिशुः – बालक ; तां – अशा तुझ्याकडे;) मातरं – आई झालेल्या  त्वां – तुजकडे ; संप्राप्तः – आलो आहे ; इह –इथे, ह्या लोकी, या विषयी;  त्वं – तू ; समुचितम् – योग्य असेल ते ; विदध्याः – करावे.

अनाथाचे माझ्या अति कटु असे दुःखद जिणे

दयेने ओथंबे हृदय तव वात्सल्यमय हे ।

अगे उद्धाराचे सकल पथ हे बंद मजसी

परी सर्वा देसी मिळवुनचि तू पुण्यगति ही ।। 24.1 ।।

 

स्वधर्मापासूनी सतत ढळलेला पतित मी

जगाच्या उद्धारा सतत झटते तू दृढव्रती ।

भवाच्या रोगांनी अति गलितगात्रे जगतसे

परी तूची माते अति निपुण हा वैद्य मज गे ।। 24.2 ।।

 

शमेना तृष्णा ही मम विषय-व्याकूळ मनिची

सुधा-धारा तू गे जलतनुचि तू अमृतमयी

अनन्याभावाने जननि तव हा बाळ दमुनी

तुझ्यापाशी आला; करि उचित जे गे तुज मनी ।। 24.3 ।।

---------------------------------------------------

 

श्लोक 25

लोकांच्या, समाजाच्या नजरेतून जगन्नाथ पतित होता. आपल्या स्वधर्माला सोडून वागणारा धर्मभ्रष्ट होता. त्याला मृत्यूनंतरही पुण्यगती मिळायचा रस्ता जणु बंद होता. त्यामुळे दुःखाने हतबल झालेला जगन्नाथ शरण तरी कोणाला जाणार? गंगामाय ही त्याचा एकमेव आसरा होती. गंगेची महती तो परत परत गाऊ लागला;

हे माय, ज्या क्षणी स्वर्गातून तू पृथ्वीवर अवतरलीस , अगदी त्या क्षणापासूनच भूतमात्रांच्या कल्याणाचं नवीन पर्व सुरू झालं. पृथ्वीवर तुझी जनहितकथा आरंभ झाली. तू पृथ्वीवर अवतरलीस तोच एक पुण्यसोहळा होता. तुझ्या येण्याने सौख्यमहोत्सव सुरू झाला. तू दयार्द्र आहेस तुझ्या नितांत कोमल स्वर्गीय स्पर्शाची अलौकिक जादू सर्वांना अनुभवायला मिळाली. माय तुझ्या पावन स्पर्शाने  तुझ्या तीरी मरण पावणार्‍यांना तू मुक्ती देतेस. आणि थेट त्यांना स्वर्ग प्रदान करतेस. तुझ्या स्पर्शाने त्यांना दिव्य देह लाभतात आणि ते स्वर्गात जाण्यासाठी प्रस्थान करतात. तुझ्या ह्या कृतीने विमानातून स्वर्गात जाणार्‍यांची गर्दी उसळली. स्वर्गात तर देवांच्या येण्याजाण्याच्या रस्त्यांवरची यातायात खोळंबली. पृथ्वीवरून येणार्‍यांच्या गर्दीने स्वर्गाच्या रस्त्यावर अडथळे निर्माण झाले. वाहतुकीची प्रचंड कोंडी तयार झाली.

माय, दुसर्‍या बाजूला मात्र त्या नरकात चिटपाखरू फिरकेना. तिकडे शुकशुकाट पसरला. यमपरी ओस पडली. तेथील यमयातनाही किती भयंकर! उकळत्या तेलात टाकणे, कड्यावरून ढकलणे. पण त्या भयद यमयातना भोगायला आता तेथे आता आहेच कोण? त्यामुळे तेथून उठणार्‍या किंकाळ्या, आक्रोश, असह्य वेदनांनी उठणारे चित्कार आता ऐकू येईनासे झाले आहेत. तुझ्या तीरांवर यमाच्या दूतांना यमपुरीत नेण्यासाठी  आता जीवात्मे मिळणेही अवघड झाले आहे. त्यामुळे जीवात्म्यांच्या शोधात त्यांना आता तुझ्या किनार्‍यांपासून दूर दूर हिंडावे लागते.  माते ही प्रचंड विसंगती ही तुझ्या कल्याणकारी कथेचा महिमा आहे!

विलीनो वै वैवस्वतनगरकोलाहलभरो

गता दूता दूरं क्वचिदपि परेतान् मृगयितुम्।

विमानानां व्रातो विदलयति वीथीर्दिविषदां

कथा ते कल्याणी यदवधि महीमण्डलमगात् ।। 25 ।।

अन्वय – (भो जननि) यदवधि ते कल्याणी कथा महीमण्डलं अगात्। (तदारभ्य) वैवस्तनगरकोलाहलभरः वै विलीनः। दूताः अपि परेतान् मृगयितुं क्वचित् दूरं गताः । विमानानां व्रातः द्विविषदां वीथीः विदलयति ।

अन्वयार्थ -

(भो जननि – हे माते,) यदवधि – जेव्हापासून (तू पृथ्वीवर अवतरलीस) तेव्हांपासून ;  ते – तुझी ; कल्याणी – कल्याणकारक अशी; कथा – गोष्ट ; महीमण्डलं – पृथ्वीवर ; अगात् – पोचली, प्राप्त झाली; तदारभ्य – त्या दिवसापासून ;  वैवस्वत - विवस्वान म्हणजे सूर्य त्याचा पुत्र वैवस्वत म्हणजे यम; वैवस्वतनगरकोलाहलः – यमाच्या नगरीत चाललेला कोलाहल, गोंगाट ; भरः – (गोंगाटचे)ओझे, भार विलीनः - नष्ट झाला आहे.  दूताः  - यमदूत ; परेतान् – मृत प्राण्यांना,प्रेतांना ; मृगयितुम् – शोधण्याकरिता ; क्वचिद् दूरं – कोठेतरी दूरदेशी; गताः – गेले ; विमानानां – विमानांचा ; व्रातः – समुदाय दिविषदां – स्वर्गात राहणार्‍या देवांचा; वीथीः – मार्ग ; विदलयति - कोंडून टाकतो, रोधतो.

 

क्षणी ज्या आली तू सुरसरिच स्वर्गातुन भुवी

क्षणापासूनी त्या जनहितकथा हो सुरु भुवी ।

तुझ्या स्पर्शाने हे सकल जन स्वर्गास मिळवी

विमानी लोकांची लगबगचि जाण्या सुर-पुरी ।। 25.1।।

 

विमानांचे ताफे सुरपथि करी व्यत्यय अती

प्रभावे गंगेच्या नरकपुरि ती ओस पडली

न ये ऐकू कानी यमसदन-आक्रोश कधिही

जिथे पापांसाठी अति भयद शिक्षाच मिळती ।। 25.2 ।।

 

मिळेना जीवात्मे कितिक फिरुनी गे तव तिरी

यमाच्या दूतांच्या  पुनरपि निराशाच पदरी

अशी ही कल्याणी तव सुरस गाथा सुखमयी

तुझ्या रूपाने गे सुख अवतरे ह्या महिवरी ।। 25.3 ।।

---------------------------------------------------

श्लोक 26

आपल्याला एखादी गोष्ट मिळावी अशी  कामना आपल्या मनात उत्पन्न होणं ही अगदी स्वाभाविक वाटणारी गोष्ट आहे; पण ती इतकीच साधीसुधी मर्यादित रहात नाही. ह्या इच्छेची तीव्रता वाढत ती आसक्तीत, तीव्र लालसेत, हव्यासात कधी बदलेल हे सांगता येत नाही. कामनापूर्ती झाली नाही तर निराशा वैफल्यात आणि वैफल्य क्रोधात बदलायला वेळ लागत नाही

आणि कामनापूर्ती झाली तरीही ती क्षणैक टिकणारी असते. एक कामना पूर्ण झाली की आनंद संपतो. दुसरी इच्छा डोकं वर काढते. इच्छाही कधी एकटी येत नाही. ज्याप्रमाणे निमंत्रित दृष्टीहीन आपल्यासोबत दुसर्‍या व्यक्तीला घेऊन येतो त्याप्रमाणे, कामनाही बरोबर अनेक कामनांना घेऊन येते. आपल्या अमर्याद कामनापूर्तीसाठी माणूस आयुष्यभर धावत राहतो. प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. आपलं उभं आयुष्य वाया घालवतो. जाळून टाकतो.  माणसांची ससेहोलपट होऊन जाते.

 कामाची हाव वणव्याप्रमाणे जलद गतीने पसरणारी असते. अग्नी सर्वभक्षी असतो. वनेच्या वने जाळून खाक करतो. सुक्यासोबत ओलंही जाळून टाकतो.  कामक्रोधाच्या वणव्यात ससेहोलट होणारी माणसं पाहून, चहूबाजूंनी निरंतर जळणारे नरदेह पाहून जगन्नाथ पंडित गंगेला साकडं घालतात,

 

हे गंगामैय्या, कामक्रोधाच्या वणव्यात जळून जाणारी उभी आयुष्य, जळून जाणारे हे मानवी देह पाहून तुला करूणा येत नाही का गं ? ह्या कामक्रोधाचे असह्य चटके आम्हा भक्तांच्या  देहांना आता सहन होत नाहीत. ही असह्य पीडा शमविण्यासाठी माय, तुझ्या जळाशिवाय दुसरा उपायही नाही!

माय तू स्वर्गातील नदी आहेस अमृताची निर्झरिणी आहेस. हिमालयातून आल्याने तुझं पाणी अत्यंत शीतल आहे. त्यात सतत वाहणार्‍या वार्‍याने तुझ्या प्रवाहात तरंगमालिका तयार होत आहेत. तुझ्या ह्या उंच उठणार्‍या आनंदलहरी किनार्‍यांवर, खडकांवर आपटून फुटल्या की हजारो, लाखो, अगणित तुषारांचे शीतल समुदाय वरती उसळत आहेत. माय हे शीतल तुषारांचे समुदाय कामक्रोधाच्या वणव्यात जळणार्‍या, आम्हा भक्तांच्या तप्त शरीरांना शांत करोत. कामक्रोधाचा उसळलेला वणवा विझवून टाकून आम्हा भक्तांच्या देहांना पोळणारं दुःख दूर करोत हे असह्य दुःख तुझ्याशिवाय कोण दूर करेल?(26)

स्फुरत्कामक्रोधप्रबलतरसंजातजटिल-

ज्वरज्वालाजालज्वलितवपुषां न: प्रतिदिनम्।

हरन्तां सन्तापं कमपि मरुदुल्लासलहरी-

च्छटाश्चञ्चत्पाथः कणसरणयोः दिव्यसरितः।।26

अन्वय – (हे मातः) दिव्य सरितः मरुदुल्लासलहरीच्छटाश्चञ्चत्पाथः कणसरणयः स्फुरत्कामक्रोधप्रबलतरसंजातजटिलज्वरज्वालाजालज्वलितवपुषां न: प्रतिदिनम् कमपि सन्तापं हरन्ताम् ।(26)

 

 अन्वयार्थ –

(भो जननि – हे माते,) दिव्य सरितः – स्वर्गात उत्पन्न झालेली नदी तिचे ; मरुदुल्लास – (मरुतः उल्लासः) – वायूचा वेग/गमन; मरुदुल्लासलहरी - वायूच्या वेगामुळे उत्पन्न झालेल्या आनंद लहरी ;  त्यांच्या छटा – एकामागोमाग येणार्‍या लाटांचा समुह व त्यांचे सातत्य ; त्यांनी चंचत् – उसळणारे पाथः (पाथस्) – पाणी; त्याचे– तुषार -जलबिंदु त्यांचे सरणयः – समुदाय; स्फुरत् कामक्रोधौ – धगधगणारे/ प्रदीप्त झालेले काम आणि क्रोध ; प्रबलतर संजातः -  अतिशय बलवान झाले आहेत; त्याचे जटिल ज्वर ज्वाला जाल –अत्यंत अवघड गुंतागुंतीच्या ताप देणार्‍या/पोळणार्‍या ज्वाळांचे जाळे/समूह त्याने ज्वलित – जळले आहे असे ; वपुः – शरीर ज्याचे अशा आम्हाला (कामक्रोधामुळे सुख   न मिळणारे आम्ही ) नः – त्या आमचा ; प्रतिदिनं – दररोज ; कमपि – कोणत्याही ( व्यवहार विलक्षण औषधांदि उपायांनी घालविण्यास कठीण अशा); सन्तापम् - त्रासाचा ; हरन्ताम् – नाश करोत. (26)

 

मनी कामक्रोधे धगधगत आहेच वणवा

जयाच्या ज्वाळा ह्या उसळुनि करी दग्ध तनुला

न ह्या दाहासी गे शमविल असा मार्गचि दुजा

उपायू नाशी जो सकल अमुच्या दुःखद व्यथा ।। 26.1 ।।

 

परी तू स्वर्गीची अनुपम अशी अमृतझरी

प्रवाहासंगे ह्या सतत फिरती वायुलहरी ।

तयाने लाटा ह्या उठति पुढती धावति किती

अति वेगाने त्या फुटतिच तिरी आदळतिही ।। 26.2 ।।

 

जलाच्या बिंदुंचे वर उधळती मौक्तिक अहा

फवार्‍यांनी त्या गे तव जल तुषारे उसळत्या,

महा हव्यासाचा विझवि वणवा जो भडकला

अगे दाहासी ह्या शमवि अमुच्या दग्ध तनुच्या ।। 26.3 ।।

---------------------------------------------------

श्लोक 27

अनेक अलंकार आपल्या काव्यात सहज वापरणार्‍या जगन्नाथ पंडितांनी 27 व्या श्लोकात थोडी अतिशयोक्ती केली असली तरी फार सुंदर आहे. गंगामातेच्या विशाल रूपाचं केलेलं ह्या श्लोकातील वर्णन वाचताना; आपल्या आईला म्हणजे पार्वतीमातेलाच ब्रह्मांड मानून तिला घातलेली प्रदक्षिणा हीच ब्रह्मांडाची प्रदक्षिणा आहे असं ठासून सांगणार्‍या बालगणेशाची आठवण येते. जगन्नाथ पंडित म्हणतात,

तिन्ही लोकांच्या कल्याणासाठी  भगवान शंकरांनी हालाहल ना गिळलं ना ओठातून बाहेर काढलं. गिळलं तर उदरातील ब्रह्मांडाचा नाश होईल आणि बाहेर टाकलं तर स्वर्गादि लोक व देवांचा नाश होईल अशा बिकट परिस्थितित त्यांनी ते जहाल विष कायमचं कंठात धारण  केलं. सर्वांच्या कल्याणाचा समग्र विचार करून घेतलेला हा लोकोत्तर निर्णय अभूतपूर्व होता. अशा शिवाची स्तुती करताना आद्य शंकराचार्यही (शिवानंद लहरी श्लोक 31 मधे )म्हणतात,

जेंव्हा सागरमंथनी गरल ते आले वरी भीषण

सारे दानवदेव ही पळुनि ते गेले भये सत्वर।।

 

तेंव्हा प्राशुन ते असह्य विष तू,कंठी असे रोधिले

नाही तू गिळले,म्हणून उदरी ब्रह्मांड राही सुखे ।

ना यत्किंचित थेंबही पडु दिला बाहेर ओठातुनी

देवांचे गण रक्षिले भयद त्या हालाहलापासुनी।।

 

ऐसे प्रेम तुझे अलौकिक असे निःसीम सर्वांवरी

सारे हे जग जाणिते तव कृपा आधार तू एकची ।।

 

 

शिवाचा काळानिळा पडलेला कंठ, त्याला देवांचा देव महादेव बनवून गेला. त्याचं महान वैभव ठरला. निळा कंठ हीच ज्याची शोभा आहे त्या ‘श्रीकंठाने’ हे गंगामाय तुला त्याच्या जटाजुटांवर कोसळायला  विस्तीर्ण जागा उपलब्ध करून दिली. हे स्वर्लोककल्लोलिनी! हे गंगा माय, तू स्वर्गातून पृथ्वीवर अत्यंत वेगाने अक्षरशः कोसळलीस. शिवाच्या अस्ताव्यस्त, गुंतागुंतीच्या जटांच्या जटिल पसार्‍यातून, बिकट, अवघड जागांमधून वाट काढत, मार्ग शोधत, तुझ्या प्रवाहपथ तयार करत तुझा हा प्रचंड जलौघ वेगाने पुढे चालला आहे. ह्या गंगौघाची व्याप्ती कल्पनातीत आहे.

जगन्नाथ पंडित म्हणतात,

हे गंगामैया, तुझा विस्तार, तुझी व्याप्ती अफाट आहे. 14 भुवनांना निर्माण करणारं, त्रैलोक्याला आपल्या उदरात सामावून घेणारं हे ब्रह्मांड, ज्याचा आदि अंत कळत नाही; ज्याचा परीघ केवढा विस्तृत आहे त्याचं अनुमान करता येत नाही; ते ब्रह्मांड तुझ्या लाटांनी पार वेढून टाकलं आहे. एखादं टेंभुर्णीचं चिमुकल फळ लाटावंरती हेलकावत रहावं, लाटांच्या प्रचंड वेगामधे गटांगळ्या खात रहावं तसं हे ब्रह्मांड तुझ्या लाटांवर हालत डुलत, हेलकावत, कधी गटांगळ्या खातांना दिसत आहे.

तुझा हा अति प्रचंड जलसंघात, ह्या असीम जलराशी आम्हा भक्तांचे त्रिविध ताप दूर करोत.

 

इदं हि ब्रह्माण्डं सकलभुवनाभोगभवनं

तरङ्गैर्यस्यान्तर्लुठति परितस्तिन्दुकमिव।

 एष श्रीकण्ठप्रविततजटाजूटजटिलो

जलानां संघातस्तव जननि तापं हरतु नः।। 27 ।।

अन्वय – हे जननि, यस्य अन्तः सकलभुवनाभोगभवनं इदं ब्रह्माण्डं  हि तरङ्गैः तिन्दुकमिव परितः लुठति। स एष श्रीकण्ठप्रविततजटाजूटजटिलः तव जलानां संघातः नः सन्तापं हरतु।

अन्वयार्थ - हे जननि – हे माते ;  यस्य – ज्याच्या (ज्या जलसमूहाच्या); अन्तः – आंत, मध्यभागी ; सकल भुवन – 14 भुवने; त्यांचा आभोगः – घेरा, परीघ त्याचे भवनं – त्याचे उत्पत्ती स्थान असलेले ( सर्व चौदा भुवनांच्या वाढीचे उत्पत्तीचे स्थान असलेले); इदं – हे ; ब्रह्माडं- ब्रह्मांड ; हि – सुद्धा ; तरंगैः- लाटांनी ; तिन्दुकम् इव   – टेंभुर्णीचे फळासारखे; परितः लुठति –सर्व बाजूंनी हेलकावे खाते, गटांगळ्या खाते ; सः एषः – तोच हा ; श्रीकंठः – शोभिवंत/शोभायमान कंठ असलेला शिव ; प्रवितत जटाजूट – विस्तृत अस्ताव्यस्त , त्यामुळे जटिल जटायुक्त – शिवाच्या विशाल अस्ताव्यस्त जटांमुळे गुंतागुंतीचा, बिकट, अडचणींचा झालेला, गोंधळणारा  ; तव – तुझा ; जलानां संघातः – पाण्याचा प्रवाह, समूह ;  नः – आमचा ; संतापं – दुःख, क्लेश ; हरतु -  नाहीसा करो. हरण करो.

गळा काळा ज्याचा, विभवचि शिवाचे खचित ज्या

जटांचा त्याचा हा कितिकचि पसारा पसरला ।

असे गुंतागुंती शिव शिरि जटांची अमुप ही

तयातूनी जाशी बिकट वहिवाटा उमजुनी ।। 27.1 ।।

 

जलौघाची व्याप्ती अगणित अमर्याद तव ही

कसे ब्रह्मांडाही अति सहज घेरे चहु दिशी ।

असे ब्रह्मांडाचा परिघ कितीही विस्तृत जरी

धरे त्रैलोक्याला सकल भुवनांसीच उदरी ।। 27.2 ।।

 

प्रवाही गंगेच्या परि डुलत ब्रह्मांड बघुनी

तरंगे कैसे हे फळ चिमुकले वाटत मनी ।

जलाच्या राशी ज्या हरति नित पापे सुरधुनी

हरो त्याची तापत्रयचि अमुचे नित्य जननी ।। 27.3 ।।

---------------------------------------------------


श्लोक 28

 ‘नको देवराया अंत आता पाहू। प्राण हा सर्वथा फुटो पाहे । हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले। मजलागी जाहले तैसे देवा।। अशी जगन्नाथाची बिकट अवस्था  झाली होती.

अशावेळेस जगन्नाथ म्हणतात, हे जननी गे, तुझा महिमा मी कोणत्या शब्दात वर्णन करू? माय, मी देवांना शरण गेलो पण; माझ्या उद्धाराचा विषय निघाल्यावर; माझ्याकडे पाहताक्षणीच, माझ्या सर्व पापांचा अंदाज येताच, ही अशी परिस्थिती पूर्वी कधी उद्भवली नव्हती; अशा प्रकारच्या दुराचाराचं प्रकरण आणि उदाहरण आत्तापर्यंत ऐकिवातही नाही; ह्या पापांना प्रायश्चित्ते नाहीत म्हणून, मी मी म्हणणार्‍या भल्या भल्या तीर्थांनी माघार घेतली. हे अशक्यप्राय काम करण्यासाठी आपण समर्थ नाही हे लक्षात येता, सर्व तीर्थक्षेत्रांच्या माना शरमेनी खाली गेल्या.

 इतकच काय लोकांच्या कल्याणाचा ठेका घेतल्याप्रमाणे तोर्‍यात वागणारे देवही हे अशा प्रतीचे पापक्षालन करणे आम्हाला अशक्य आहे, असंभनीय आहे ह्या विचारांनी विवश होऊन कानावर हात ठेऊन ‘शिव शिव’ म्हणू लागले.

ह्याच्या (जगन्नाथाच्या) दुराचारांनी प्रायश्चित्तांचीही पातळी ओलांडली आहे. आता आम्ही ह्याला काही मदत करू शकत नाही म्हणून, ज्यांच्या नावाचा अर्थच कल्याण, हित आहे अशा शंभुमहादेवांनीही माझ्या पापांसमोर माघार घेतली घेतली आहे. ह्या असमर्थ ठरलेल्या तीर्थांना, ह्या देवगणांना, ह्या रुंडमाळा मिरवणार्‍या कपाली शंभूमहादेवांनाही जणु काही माझा धावा ऐकूच येत नाही. कानांवर हात ठेऊन त्यांनी माझ्याकडे पुरता कानाडोळा केला आहे. माझ्याकडे पाठ फिरवली आहे.

 माय, पण माझी ही केविलवाणी, असहाय्य अवस्था पाहून तू कशी स्वस्थ बसशील? माझा अंत तू पाहणार नाहीस. मला पाहून, तुझं अंतःकरण मऊ लोण्यासारखं झालं नाही तरच नवल! एखादा सांद्र घननीळ मेघ तृषार्त धरणीची तहान भागवायला जसा आपणहून धावून येतो, तशी तू धावून येतेस. माय गे, ह्या जगन्नाथाचे सर्व अपराध पोटात घालून, माझ्या पापांना तुझ्या निर्मल जलानी तू धुवून टाकतेस.

ह्या गर्विष्ठ देवांना ‘आम्ही कायम (सुष्ठु राति) कल्याण करणारे सुर आहोत असा अहंकार आहे;  तर ह्या तीर्थांना ‘आम्ही पापांच्या उपचाराचे साधन अशी तीर्थक्षेत्रे आहोत; आम्ही पापमोचन करणारी पवित्र स्थाने आहोत अशी मोठी घमेंड आहे.

माय, माझे सारे सारे अपराध पोटात घालून, माझी पापे क्षालन करून ह्या आढ्यताखोर देवांचा नक्षा तू उतरवतेस. ह्या घमेंडखोर तीर्थक्षेत्रांचा अहंकार जिरवतेस. ह्या सर्वांना पापनाशनाचा जो गर्व झाला आहे; त्या गर्वाला, आढ्यतेला तू अक्षरशः धुळीत मिळवतेस. माय, मी तुझ्या चरणांवर शरण आलो आहे.

 

त्रपन्ते तीर्थानि त्वरितमिह यस्योद्धृतिविधौ

करं कर्णे कुर्वन्त्यपि किल कपालिप्रभृतयः ।

इमं तं मामम्ब त्वमियमनुकम्पार्द्रहृदये

पुनाना सर्वेषामघमथनदर्पंदलयसि ।। 28 ।।  

 

अन्वय – हे अनुकंपार्द्रहृदये अंब, इह यस्य उद्धृतिविधौ तीर्थानि त्वरितं त्रपन्ते। कपालिप्रभृतयः अपि किल कर्णे करं कुर्वन्ति। तं इमं मां पुनाना त्वं (तेषां सर्वेषां) अघमथनदर्पं दलयसि ।

अन्वयार्थ -

हे अनुकंपार्द्रहृदये – जिचे हृदय अनुकंपेने, दयेने आर्द्र म्हणजे ओले झाले आहे अशाः  हे माम अंब – हे माझ्या माते गंगे ; इह – हया भूतळावर ; यस्य – ज्याच्या ; उद्धृतिविधौ – उद्धाराच्या कार्यामध्ये ; तीर्थानि - अनेक तीर्थे ; त्वरितं – लगेचच (मला पहाताच) ; त्रपन्ते – लाजतात ; कपालि प्रभृतयः – कपालि म्हणजे शिव ज्यांचा प्रमुख आहे असे सर्व देव ; अपि – सुद्धा ; किल – खरोखर ; कर्णे करं कुर्वन्ति – कानावर हात ठेवतात, माहित नाही असे दाखवात ; तं – त्या ; इमं मां – ह्या मला; पुनाना त्वं – पावन करणारी तू ; तेषां सर्वेषां – त्यांचा सर्वांचा ; अघ – पाप ; मथन – नाश करणे ; अघ मथन दर्पं - पाप नाहिसे करण्याचा गर्व ; दलयसि – तोडतेस, घालवतेस. 

अगे उद्धाराचा विषय मम चर्चेस निघता

दुराचारी ऐशा मजसि बघता तत्क्षणि पहा ।

कशी तीर्थे माना त्वरित शरमेने झुकविती

करा ठेवी कानी `शिवशिवम्हणे देवगण ही ।। 28.1 ।।

 

अगे माझ्या पापांपुढति सुर सामर्थ्यहि फिके

कपालीही होई हतबल दुरापास्तचि म्हणे ।

तिथे होई अंतःकरण नवनीतासम तुझे

दयार्द्रा होसी तू मजवर कृपामेघ बरसे ।। 28.2 ।।

 

मला पाप्यालाही पुनित करिता जाह्नवि त्वरे

सुरांना, तीर्थांना परिचय नव्याने तव घडे  ।

‘कसे प्रक्षाळावे नित दुरित आम्हाविण कुणी’

असा ताठा त्यांचा चुटकिसरशी  चूर करिसी ।। 28.3 ।।

---------------------------------------------------

श्लोक 29

दुराचारी लोकांमधे सुद्धा श्रेणी असतात. काही दुराचारी लोकांच्या जमाती सर्वसामान्य जगाचे नीती नियम धुडकावून लावून कुठलीही हीन कृत्ये करावयास मागेपुढे पहात नाहीत. जे धर्माने निषिद्ध सांगितले आहे अशी अनेक कृत्ये ते सहज करत असतात. श्वानमांसही भक्षण करतात. अशा अत्यंत खालच्या पातळीच्या दुष्कर्म्यांच्या टोळ्यांचे काही नियम असतात. त्यांचीही काही न्यायव्यवस्था असते. त्यांच्या ह्या न्याय व्यवस्थेनुसार, काही वेळा काही दुष्कृत्ये करावीत का न करावीत असा त्यांच्याही मनात संभ्रम तयार होतो. (To be or not to be that is the question) अशा वेळी तेही अनेक पापे, कुकर्मे नको रे बाबा! ही फार भयंकर आहेत म्हणून नाकारतात.

कवी जगन्नाथ म्हणतात, माझ्या पातकांची पातळी इतकी नीच आहे की काय सांगू? माय, समाजाचे कुठलेही नियम न पाळणार्‍या, अधम, नीच लोकांनीही जी कृत्ये करू नयेत म्हणून दूर लोटली, अशी त्याज्य, हद्दपार केलेली, बेघर झालेली  पापे    माझ्याशिवाय जाणार कुठे? पाप्यांनीही दूर लोटलेल्या महा पापाचे मी एकमेव वसतिस्थान आहे. अशा पापराशींचे मी आगर आहे.

पण माय! तुला माझ्याविषयी अपार आस्था उत्पन्न झाली. मला पाहून तुला माझा कळवळा आला हे साहजिकच आहे कारण तू माझी मायच आहेस ना! कुठलीही जन्मदात्री आपलं लेकरू असं वार्‍यावर सोडून देत नाही. नाहीच पातकी कोणी, माझ्यासमचि एक मी ।’

असं जरी असलं तरी,  ‘जाळाया घोर कर्मे ती , नाही तव समा  कुणी ।।’ हेही तितकच खरं आहे

माय, भक्त जेवढा हीन दीन, तेवढी तुझी त्याच्या विषयीची करुणा वाढत जाते. (अपराधक्षमापन स्तोत्र श्लोक 11,9 थोडे बदल करून)

असलो जरि पुत्र दुष्ट मी । करुणेचा घन तू महानची

अपराध सहस्र मी करी । मजसी स्नेह अलोट तू करी।।

न विलक्षण यात काहिही । जननी  एकचि रीत ही जगी

अपराध करी अपत्य ते। परि त्या माय न दूर लोटते।।

ह्याच न्यायाने माझा उद्धार करण्यासाठी कंबर कसून तू तयार आहेस. मला मात्र तुझी कशी स्तुती करावी हेच कळत नाही. माय मी तर मनुष्य रूपात असलेला नरपशू आहे. तुझी स्तुती करायचे सामर्थ्य मला कसे  प्राप्त व्हावे?

भागीरथी जननि गे न करे कधी मी । वाहून शब्द सुमने तव कीर्तनासी ।

केले न चिंतन मनी नच पाप ऐसे  वाणी धजेल न कधी वदलोचि ऐसे।।

 

झालो कृतघ्न जरि मी ममता तुझी गे  माझ्यावरी बरसते जननी तुझी गे।

आहे तुझे उचित वर्तन हेचि माते  जन्मे कृतघ्न सुत, माय न वैरिणी गे ।।

--

श्वपाकानां व्रातैरमितविचिकित्साविचलितै-

र्विमुक्तानामेकं किल सदनमेनःपरिषदाम्।

अहो मामुद्धर्तुं जननि घटयन्त्याः परिकरं

तव श्लाघां कर्तुं कथमिव समर्थो नरपशुः।। 29 ।।

अन्वय – हे  जननि, अमितविचिकित्साविचलितैः श्वपाकानां व्रातैः विमुक्तानां एनः परिषदां किल एकं सदनं मां उद्धर्तुं परिकरं घटयन्त्याः तव श्लाघां कर्तुं नरपशु; इव (अहं) अहो कथं समर्थः(स्याम्) (29)

अन्वयार्थ - हे जननि – हे माझ्या माते गंगे ; अमितः – अपरिमित ; विचिकित्सा – संशय , तस्याः विचलिताः – कंपित झालेले तैः – त्याच्यापासून श्वपाकानां – कुत्र्याला शिजवणार्‍यांच्या, म्हणजे चांडालांच्या किंवा नीच लोकांच्या; व्रातैः – समुहानी विमुक्तानां -सोडलेल्या ; एनः परिषदां – ह्या पापांच्या सभेचे एकं – एकमेव  सदनं – घर असलेल्या अशा ; मां – मला उद्धर्तुं – उद्धार करण्याकरता परिकरं – कमरेस ; घटयन्त्या – बांधणर्‍या (कंबर कसून तयार झालेल्या )  तव – तुझी ; श्लाघा कर्तुं -  स्तुती करण्यास ; नरपशुः इव – मनुष्यरूपी पशूसमान ; अहं – मी; कथं समर्थः स्याम् – कसा समर्थ होईन? (29)

 

नसे ज्यांना नीती नियम कुठले सभ्य जगिचे

असे पापी जेव्हा पडतिच विचारात कधि गे ।

अहो दुष्कर्मे ही उचित असती का अनुचिता

तयांच्या चित्तीही उमटत असे सम्भ्रम असा ।। 29.1।।

 

अशावेळी पापी त्यजिति दुरिते त्याज्य म्हणुनी

नसे ज्या पापांसी अधम-मनि थारा लवभरी ।

असे पापांचे जे समुह असती बेघर कुणी

तयांसाठी मी गे सदनचि असे केवळ जगी ।। 29.2 ।।

 

परी उद्धाराया त्वरित मज पाप्यास जननी

सुसिद्धा आहे तू सतत कसुनी कंबर तुझी ।

कुठे सौजन्याची तव अमल मूर्तीच जननी

कुठे मी हा पापी नर नच पशू केवळ जगी ।। 29.3 ।।

 

तुझी आस्था माझ्याविषयि बघुनी माय मम गे

अगे भांबावूनी नच मजसि काही कळतसे ।

तुझ्या प्रेमामध्ये भिजुन जरि गेलो तरि कसे

स्तुती गाण्या यावे बळ कुवत सामर्थ्य मज गे ।। 29.4।।

--------------------------------------------------

श्लोक 30

आपल्या सामर्थ्याचा लोकांना परिचय व्हावा; आपला अफाट पराक्रम पाहून जगानी आश्चर्यानी तोंडात बोट घालावं; आपलं महान कार्य पाहून लोकांचे डोळे  आश्चर्याने विस्फारले जावेत, सर्व जगाने माझं अतुल्य कार्य पाहून माझा जयजयकार करावा, स्तुतीसुमनं उधळावीत असं कुठल्या समर्थ, कर्तबगार व्यक्तीला वाटणार नाही?

जगन्नाथ पंडित म्हणतात, हे गंगा माय, तुझ्याही मनात कित्येक दिवस अशी सुप्त इच्छा आहे की; ‘अशा एखाद्या पतिताहून पतित माणसाचा उद्धार मी असा काही चुटकीसरशी करून दाखवेन की सर्व जग बघतच राहील.’ ; पण ही तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी इतक्या खालच्या पातळीवर पोचलेला अधम पापी मात्र तुला मिळत नव्हता. त्यामुळे  इतका काळ लोटूनही तुझी ही इच्छा चिरकाल तुझ्या मनातच राहून गेली होती. माय, पण तुझी ही इच्छा पूर्ण करण्यासाठीच मी तुझ्या दारी आलो आहे. माझ्या इतका पापी तुला दुसरा मिळणार नाही. माय तुझ्या कृपेचा इतका वर्षाव कर इतका वर्षाव कर की, आम्ही सर्व निर्मल होऊच पण, सर्व जगाला इतक्या त्वरित झालेल्या उद्धारामुळे आश्चर्याचा धक्का बसेल.

 कोऽप्येतावन्तं खलु समयमारभ्य मिलितो

यदुद्धारादाराद्भवति जगतो विस्मयभरः।

इतीमामीहां ते मनसि चिरकालं स्थितवती-

मयं सम्प्राप्तोऽहं सफलयितुमम्ब प्रणय नः ।। 30 ।।

अन्वय – हे अम्ब, यदुद्धारात्  आरात् जगतः विस्मयभरः भवति (एतादृशः) एतावन्तं समयं आरभ्य न कोऽपि  खलु मिलितः । इति ते मनसि चिरकालं स्थितवतीं इमां इहां सफलयितुं  अयं अहं सम्प्राप्तः (अस्मि) (अतः) नः प्रणय ।

अन्वयर्थ - हे जननि – हे माझ्या माते गंगे ; यत् उद्धारात् – ज्याच्या उद्धारामुळे ; आरात् – शीघ्र, लवकर ; जगतः – जगाला ; विस्मयभरः -  आश्चर्यातिशय, प्रचंड आश्चर्य ; भवति – होईल ;  एतादृशः – असा ; एतावन्तं – इतकं परिमाण असलेल्या अशा ; समयं आरभ्य – काळाला आरंभ करून , न – नाही ; कोऽपि – कोणीही ; खलु- खरोखर ; मिलितः – प्राप्त झाला, सापडला ; इति – अशी ;  ते – तुझ्या ; मनसि – मनात ; चिरकालं – पुष्कळ काळापर्यंत ; स्थितवतीं – राहणार्‍या ; इमां – ह्या , ईहां – इच्छेला ;  सफलयितुं – पूर्ण करण्याकरता ; अयं – हा ; अहं – मी , सम्प्राप्तः – प्राप्त झालो आहे , आलो आहे ; अतः – म्हणून ; नः – आम्हाला ; प्रणय – अनुग्रह कर, कृपा कर.

‘दुराचारी खासा मजसि गवसावा कुणीतरी

तया उद्धारावे सहजचि क्षणार्धात बघ मी ।

जयांच्या उद्धारे सकलजन हो विस्मयभरे

पहा तारीला मी किति अधम अधमातीतचि त्वरे ।। 30.1 ।।

 

बहू कीर्ती माझी त्वरित पसरावीच जगती’

मनीषा ऐसी गे चिर वसत होती तव हृदी ।

अशा संकल्पाचा हृदयि तव आरंभ घडला

तयासीही लोटे अपरिमित गे काळ किति हा ।। 30.2 ।।

 

मिळाला ऐसा ना अधम इतुका गे परि तुला

तुझ्या ह्या उद्देशा सफल करण्या मी पतित हा ।

तुझ्या दारी आलो करि तव मनीषा सफल गा

कृपा वर्षावाने पुनित करि आम्हासचि पुन्हा ।। 30.3 ।।

---------------------------------------------------

श्लोक 31

जेव्हा परिस्थिती माणसाला अनुकूल असते तेव्हा त्याला आपल्यातल्या दुर्गणांची तितकीशी ओळख होत नाही. किंबहुना त्याचे दुर्गुण त्यालाच का इतरांनाही त्याच्या त्या विशिष्ट पदामुळे कौतुकास्पद तर कधी अनुकरणीयही वाटतात.  पण परिस्थिती पालटली, दुष्कृत्यांचा परिणाम समोर उभा ठाकला की, आपली सारी दुष्कर्म डोळ्यासमोर पिंगा घालू लागतात. जगन्नाथ पंडित म्हणतात,

हे जननी गे, मी माझ्याविषयी काय बोलू? माझ्या चांगल्या गोष्टींबद्दल बोलावे असे सद्गुण माझ्यात आहेत तरी कोठे? आपलं अस्तित्व टिकवण्यासााठी, जिवीका चालण्यासाठी कुत्रा जसा इतस्ततः भटकतो, लांगूल चालन करतो(शेपटी हलवतो),उष्ट माष्ट, टाकून दिलेलं काहीही खातो, त्याप्रमाणे माझं हे जीवनक्षुधार्ता पोटाची सतत भरण्या क्षुद्र खळगी । धनी उन्मत्तांची झिजवतचि दारे फिरत मी’ असं एखाद्या भटक्या कुत्र्यासारखं अत्यंत खालच्या पातळीचं आहे. कुत्र्याला जशी अशा लाचार जीवनाची लाज न वाटता, उलट खायला घालणार्‍याच्या पायावर लोळणं घेण्यातच ते धन्यता मानतं तसा ह्या लाचार जीवनाचा माझा गाढ परिचय, अभ्यास झाला आहे. एवढ्यासाठीच मी माझे सर्व परिश्रम करत माझं जीवन व्यर्थ घालवलं आणि ‘चुराडा आशांचा हर हरचि होतो प्रतिदिनी’ हा अनुभव घेऊन सुद्धा ‘पैशाची धरुनीच आस फिरलो देशोदिशी सर्व ह्या’ असेच वागत राहिलो. अखेर, अशा निलाजर्‍या जीवनाचा नाद आता मला लागला आहे.

असं म्हणतात की ‘नरो वा कुंजरो वा’—अश्वत्थामा मेला हे खरं आहे पण तो नर(माणूस) का कुंजर (हत्ती) हे मला माहित नाही असं मिथ्या बोलणार्‍या धर्मराजाचा कायम हवेतून जाणारा रथ सुद्धा त्याच्या एका संदिग्ध बोलण्याने जमिनीवर आला. माझ्या ह्या बेलगाम जिभेला संदिग्धच काय सरळ सरळ खोटं बोलायची, वाटेल ते बरळायची बेछूट सवय आहे.

शास्त्रांचे प्रतिपादन करताना तर्क सुद्धा योग्य मार्गाने केलेला असावा म्हणजे, सत्तर्क असावा हे गृहीत धरले जाते. पण मी ब्रह्मविद्या, तर्कशास्त्र अशा अनेक शास्त्रांच्या माझ्या अभ्यासाला कुतर्कांची जोड देऊन विसंगत तर्कांचीच पुनरावृत्ती करत राहिलो. कुतर्कांचे ठामपणे प्रतिपादन करून इतरांना पराजित करून, त्यांचा उपहास करून, त्यांनी मान खाली घालून लज्जित होण्यातच अभिमान बाळगला. त्यातच मोठं समाधान मला लाभत गेलं. माझ्या ह्या कुतर्कांचं, अत्यंत निद्य कर्मांचं समर्थन माय मी कसं करु?

‘मक्षिका व्रणम् इच्छति’ म्हणतात. प्राण्यांना झालेली एखादी जखम माशीला अत्यंत प्रिय असते. माशी त्याच्यावरच वारंवार बसते. त्याप्रमाणे दुसर्‍यांचे न्यून शोधून सतत त्याच्यावर विचार करून दुसर्‍याला अडचणीत आणण्यासाठी त्याचाच उहापोह करत राहण्याची वाईट खोड मला जडली आहे. माझी ही काकदृष्टी माझ्या डोळ्यातलं मुसळ न पाहता दुसर्‍याच्या डोळ्यातील कुसळ शोधत राहिली. वरवर काळजी दाखवत दुसर्‍यांच्याबरोबर दुष्टपणा कसा करता येईल हयाचाच मी विचार केला.

माय अशी ही माझ्या ‘गुणांची(?) मालिका’ पाहिल्यावर तुझ्याशिवाय माझा मुखडा कोणी प्रेमाने न्याहाळणार आहे का? कोणीही माझ्याकडे पाठच फिरवेल. जन्मदात्या मातेला मात्र लेकराचा कळवळा आल्याशिवाय कसा राहील? जेव्हा जगाकडून सर्व आशा सुटते तेव्हा भरकटलेलं , सर्व जगानी कुत्र्याप्रमाणे हाड हाड करून घालवून दिलेलं लेकरू आईशिवाय कोणाकडे जाणार? आणि त्याच्या मुखावरून प्रेमाने हात फिरवून त्याला आईशिवाय जवळ तरी कोण घेणार! 

श्ववृत्तिव्यासङ्गो नियतमथ मिथ्याप्रलपनं

कुतर्केष्वभ्यासः सततपरपैशुन्यमननम्।

अपि श्रावं श्रावं मम तु पुनरेवं गुणगणा-

नृते त्वत्को नाम क्षणमपि निरीक्षेत वदनम् ।। 31 ।।

अन्वय – (भो मातः) श्ववृत्तिव्यासंगः, अथ नियतं मिथ्या प्रलपनं, कुतर्केष्वभासः, सतत परपैशुन्यमननम्। एव तु मम गुणगणान् पुनः अपि श्रावं श्रावं त्वदृते को नाम (मम) मुखं निरीक्षेत?

अन्वयार्थ - हे जननि – हे माझ्या माते गंगे ;  श्ववृत्तिव्यासंगः – आपलं अस्तित्व टिकवण्यासााठी,जिवीका चालण्यासाठी कुत्रा जसा इतस्ततः भटकतो, लांगूल चालन करतो(शेपटी हलवतो),उष्ट माष्ट, टाकून दिलेलं काहीही खातो, त्याचा व्यासंग - म्हणजे उत्कंठा पूर्वक उद्योग ; अथ – आणि नियतं – नियमाने ; मिथ्याप्रलपनं – असत्य, अनर्थकारक भाषणबाजी, बडबड ; कुतर्केषु – वाईट, नको त्या विचारांचे चिंतन, उहापोह त्याचा अभ्यासः – वारंवार आचरणात आणणे ; सतत – निरंतर ; पर – दुसर्‍याचे ; पैशुन्य मननं – लोकांच्या क्षुद्रपणाचे, वाईट आचरणाचे वारंवार चिंतन ; एवं – असे ; तु – परंतु ; मम – माझ्या ; गुणगणान् – अशा माझ्या गुणांचा (अवगुणांचा) समुदाय त्यांना पुनः अपि – वारंवार ; श्रावंश्रावं – वारंवार ऐकून ; त्वद् ऋते – तुझ्याशिवाय ; कः नाम -  खरोखर कोण ; मम – माझे ; वदनं – तोंड ; निरीक्षेत – पाहील? अवलोकन करील?

 

अगे श्वाना जैसा बनुन अति लाचार फिरलो

भराया पोटाची खळगि धनिकांचे पद धुतो ।

धनी फेके त्याची उरिव तुकड्यांसी चघळिता

कसा लाचारीचा मजसि जडला छंदचि नवा ।। 31.1 ।।

 

असत्यासी बोले नच कचरता योग्य म्हणुनी

करे चर्चा सारी अनुचित कुतर्का लढवुनी ।

असे प्रस्थापाया अनृतही पटाईत बहु मी

करे मी शास्त्रांच्या सहज उपहासास जननी ।। 31.2 ।।

 

रुची वैगुण्याची, सतत परदोषांस चघळी

जशी माशी शोधे जखमचि कुणाची चिघळली।

असे कानी येता सतत ‘गुणभांडार’ मम गे

मुखासी माझ्या ह्या  तुजविण कसे कोण निरखे ।। 31.3 ।।

---------------------------------------------------

श्लोक 32

माणसाला रोज नवे नवे सुखोपभोग मोहवीत राहतात. मृगजळामागे धावत राहिल्याप्रमाणे माणूस ह्या लौकिक गोष्टींमागे धावत राहतो. जसा मृग मृगजळापर्यंत पोहचू शकत नाही आणि तहानेने अजून अजून व्याकूळ होत रहातो त्याप्रमाणे हया  काल्पनिक सुखांनी माणसाचं समाधान कधी होत नाही. त्याची वाढत जाणारी तृष्णाही शमत नाही.

जगन्नाथ पंडित म्हणतात, माय! तुझं तसं नाही. तू म्हणजे नितांत समाधान आहेस. तुझा हा नीर देह डोळ्यांनी नुसता निरखत राहणं ही मनाची खरी शांती आहे. नाहीतर अनेक सम्राटांचे सम्राट आपली आसिंधु पसरलेली राज्यं तृणवत् सोडून गंगेच्या किनारी येऊन राहिले नसते.

तुझा हा विलोभनीय नीर देह म्हणजे देहाची विश्रांती आहे. मनाची सुख शांती आहे.  नेत्रांची सम्पत्ती आहे. त्याच्यावरून नजर हटत नाही. नजरेने जणु तुझा प्रवाह पिऊन देहमनालाही पुष्टी, संतुष्टी मिळते इतका तो प्रभावी आहे. तुझ्या लाटांचा कलकल ध्वनी कानांना सुखावणारा आहे.

हे माय गे, जो माणूस त्याच्या विशाल नेत्रांनी कधी तुझा प्रवाह डोळ्यात साठवून ठेवत नाही, तुझ्या सलिल गात्रांना निरखत नाही, तुझा निरंतर वाहणारा प्रवाह त्याच्या नेत्रांनी अनुभवत नाही त्याच्या सुंदर नेत्रांचा काय उपयोग? ज्यासाठी त्याला विशाल नेत्र भगवंताने दिले त्याचा अनुचितच वापर झाला असे म्हणावे लागेल. अरेरे!

माय, तुझ्या लहरींचा होणारा हा मंद मंद कलकल आवाज मोठा गोड आहे. कानांना सुखावणारा आहे. तुझ्या तीरावर स्वस्थ बसून जर कोणी सरस्वतीच्या वीणेप्रमाणे मधुर झंकारणारा, तर कधी मृदु मुलायम ‘झाल्या’ (सतारीवर वाजवला जाणारा प्रकार) प्रमाणे किलकिल करणारा लहरींचा मधुरध्वनी ऐकला तर त्याला परम शांती लाभेल. पण जर हा मधुर झंकार दुर्लक्षित केला, ऐकलाच नाही तर त्याच्या कानांचा तरी असून काय उपयोग? माय, तू जीवनाला दिशा देणारं सूत्र आहेस,  आयुष्य जगण्याचं तंत्र आहेस. सुखाचा मंत्र आहेस. तुला मी शरण आलो आहे.  

 

विशालाभ्यामाभ्यां किमिह नयनाभ्यां खलु फलं

 याभ्यामालीढा परमरमणीया तव तनुः।

अयं हि न्यक्कारो जननि मनुजस्य श्रवणयो

र्ययोर्नान्तर्यातस्तव लहरिलीलाकलकलः।। 32 ।।

अन्वय – भो जननि, मनुजस्य याभ्यां नयनाभ्यां तव परमरणीया तनुः न आलीढा आभ्यां विशालाभ्यां (नयनाभ्यां) इह किं खलु फलं (अस्ति) तथा ययोः श्रवणयोः अन्तः तव लहरिलीलाकलकलः न यातः  तयोः अयं हि न्यक्कारः (एव)!

अन्वयार्थ - हे जननि – हे माझ्या माते गंगे ;  मनुजस्य – मनुष्यांच्या ; याभ्यां – ज्या ; नयनाभ्यां – डोळ्यांनी ; तव- तुझी ; परमरमणीया – अतिशय सुंदर ;  तनुः – मूर्ति ; न – नाही ; आलीढा – (चाटली), अवलोकिली ; आभ्यां – ह्या ; विशालाभ्यां- आकर्ण , मोठ्या ; खलु – खरोखर ; नयनाभ्यां – डोळ्यांना ; इह – ह्या जगात ; किं – काय, कोणते ; खलु फलं – फळ आहे? ; तथा – तसेच ; ययोः – ज्या ; श्रवणयोः – कानांच्या ; अन्तः – अन्तर्भागी, आत ; तव – तुझा ; लहरिलीलाकलकलः – लहरींच्या मनोरंजक खेळाचा कलकल आवाज ; न – नाही ; यातः – आला ; तयोः – त्यांस ; अयं - हा ; धिक्कारः हि – धिक्कार असो.

 

मनासी मोही गे जलमय तुझी सुंदर छबी

परी ह्या रूपा जी कमलनयने ना निरखिती

टपोरे ऐसे ते नयन सले वा न असले

असूनीही त्यांचे नित निरुपयोगीच असणे ।। 32.1 ।।

 

तरंगांची क्रीडा कलकलचि चाले सुरमयी

 तयाच्या माधुर्ये अविरत श्रुतींनाच रिझवी

श्रुती ना ऐकी ज्या, सुखद अनुभूती कुठुन त्या

फुका गात्रे ऐशी सतत करु धिःकार तयिचा ।।32.2 ।।

---------------------------------------------------

श्लोक 33

गंगेच्या महा प्रतापाचं वर्णन करताना जगन्नाथ पंडित म्हणतात, गंगेच्या ह्या विशाल पात्राला, ह्या अफाट जलौघाला कुठला आपपर भाव नाहीच मुळी! जो तिच्या तीरी येईल तो तिचाच असतो. कुठलाही आजादुजा भाव न ठेवता ती त्याच्यावर कृपेचा वर्षाव करत असते.

किनार्‍यावर तो प्रतापी असो वा पापी असो; सज्जन असो वा दुर्जन असो; सम्पन्न असो की विपन्न असो; सश्रद्ध असो की अश्रद्ध असो ; सर्वाधार असो वा निराधार असो; निष्कलंक असो वा कलंकित असो गंगामाता सर्वांना सारख्याच स्नेहाने आपल्या पदरात घेते. सर्वांनाच मोक्ष प्रदान करते. सर्वांचीच पापे धुवून त्यांना निष्कलंक करते. सर्वांनाच स्वर्गाचे अधिकारी बनवते. कोणाचीही निराशा करत नाही. कोणीही भक्त तिच्या किनार्‍यावरून विन्मुख जात नाही. जेथून जेथून गंगेचा हा पुण्यदायी प्रवाह वाहतो तेथील सार्‍यांचे निरंतर कल्याण करत ही गंगामैया वाहत असते.

पण ज्या प्रदेशातून, ज्या वस्त्यांमधून गंगेचा पुण्यदायी पावन प्रवाह वाहत नाही तेथील दुनिया पक्षपात करणारी, लोकालोकांमधे भेदभाव करणारी, त्यांना असमान वागणूक देणारी नितांत दुःखाची असते. तेथे लोकांना दिल्या जाणार्‍या वागणूकीत आकाश-पाताळा इतका फरक लोकांना अनुभवायला लागतो. तेथे पुण्यात्मे विमानाने मोठ्या आनंदाने स्वर्गात जात असतात तर; तेथे अधर्मी, दुराचारी लोकांना यमदूत तत्क्षणी बंदी बनवून यमलोकात घेऊन जातात. तेथील असह्य यमयातना भोगणे हेच त्यांचे नशिब ठरते. अशी आणि इतकी कमालीची तफावत जिथे गंगा नाही अशा अशुभ प्रदेशातच संभवते.

 

विमानैः स्वच्छन्दं सुरपुरमयन्ते सुकृतिनः

पतन्ति द्राक्पापा जननि नरकान्तः परवशाः।

विभागोऽयं तस्मिन्नशुभमयमूर्तौ जनपदे

 यत्र त्वल्लीला दलितमनुजाशेषकलुषा।।33

अन्वय – हे जननि, सुकृतिनः सुरपुरं विमानैः स्वच्छदं अयन्ते, पापाः परवशाः (सन्तः) नरकान्तः द्राक् पतन्ति, यत्र दलितमनुजाशेष कलुषा त्वल्लीला न, तस्मिन् अशुभमयमूर्तौ जनपदे अयं विभागः अस्ति।

अन्वयार्थ - हे जननि – हे माझ्या माते गंगे ; सुकृतिनः – ज्यांनी पुण्य केले आहे असे पुण्यवान लोक सुरपुरं – देवांच्या गावी म्हणजे स्वर्गाप्रत ; विमानैः – विमानांनी ; स्वच्छंदं- यथेच्छपणे; अयन्ते – जातात ; परवशाः – (यमाच्या दूतांच्या) अधीन असलेले; पापाः – पापी पुरूष ; नरकान्तः – नरकामधे ; द्राक् – शीघ्र; पन्तन्ति – पडतात; यत्र – जेथे, ज्या प्रदेशात ; ( दलितमनुजाशेषकलुषा ) अशेषं – सर्व; कलुषं- पाप ; दलितं – नाशिलेले ; मनुजानां – माणसांचे ; अशेष कलुषं – संपूर्ण पाप ; यया – जिने  ( मानवांचे संपूर्ण पाप नाश करणारी ) तव- तुझी ; लीला – चरित्र, न अस्ति – असत नाही ; तस्मिन् -त्या ; अशुभमयमूर्तौ – पाप युक्त स्वरूप असलेल्या अशा; जनपदे – देशात ; अयं - हा ; विभागः – भेद ;  अस्ति – आहे.

 

न वाहे देशी ज्या सलिलचि सलीले तव सुखे

कुणी ना स्नेहार्द्रा तुजसम सर्वांप्रति तिथे ।

अहो पुण्यात्मे ते सहजिच विमानी बसुनिया

सुखाने स्वच्छंदे सरपुरित त्या पावति सदा ।। 33.1।।

 

कृतांताचे तेथे बळजबरिने दूत जुलमी

कसे पाप्यांना गे परि पकडुनी नेति नरकी ।

जिथे गंगौघाने अमल करण्या सर्व जन हे

नसे माते तूची फरकचि तिथे हा दिसतसे ।। 33.2।।

 

जिथे वाहे गंगे! तव पुनित धारा सुखमयी

तिथे चिंता दुःखे दिसत न दुजाभाव कधिही ।

परी ना वाहे गे तव सुखद गंगौघ जिथुनी

प्रदेशांसी त्या गे नित अवकळा ये अशुभ ती ।। 33.3 ।।

---------------------------------------------------



श्लोक 34

गंगेच्या पावित्र्याचं वर्णन करताना, तिच्या सामर्थ्याची महति विषद करताना, तिच्या सर्वांशी समभावाने असलेल्या वात्सल्याची स्तुती करताना सहाजिकच जगन्नाथ पंडित जरा जास्तच भावुक झाले आहेत. कारण गंगेनी ज्याच्यावर कृपा करावी असं त्यांना वाटत आहे ती व्यक्ती ते स्वतःच आहेत. (एखादं लहान मूल  आपण केलेल्या वाईट गोष्टीसाठी आईने शिक्षा करू नये ह्यासाठी आधीच, शेजारच्या नंदूने ह्यापेक्षाही जास्त वाईट वागून देखील त्याच्या आईने त्याला गोळी दिली असे सांगते. तसेच काहिसे हे विधान आहे. )

‘आपल्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त महापापी, दुराचारी व्यक्तीलाही गंगा जर अंतसमयी तिची आठवण काढताच, पुण्यगति प्राप्त करून देत असेल तर मला का देणार नाही?’ असा त्याच्या मनातला (किंवा श्लोकाचा अंतस्थ भाव) अजाण लेकराप्रमाणे असलेला निष्पाप भाव गंगेलाही नक्कीच भावेल असा आहे.

मनुस्मृतीत(11/54 ) महापापे कोणती ते सांगणरा श्लोक आहे.

ब्रह्महत्या सुरापानं स्तेयं गुर्वङ्गनागमः ।

 महान्ति पापकान्याहुः संसर्गश्चापि तैः सह ।।

जगन्नाथ पंडित म्हणतात, विप्रांना ठार मारणारे, गुरुगृहीच्या पवित्र स्त्रियांची अभिलाषा धरून, फसवून त्यांचा उपभोग घेणारे, दारुबाज दारुडे, सोनेनाणे, दागदागिने लुबाडणारे; असे हे सर्व महा पातके करणारे; महा पापी आहेतच पण त्यांच्याशी  मैत्री करणारेही तितकेच पापी आहेत.

ज्या घोर अपराधांना क्षमा करणेही अशक्य आहे असे शास्त्र सांगते; असे अपराध करणारेही खूप असतात अशांनीही मरणसमयी गंगेची नुसती आठवण काढली; गंगेच्या जलौघात देहत्याग केला तर त्यांना मुक्ती मिळते.त्यांनाही गंगेच्या सामर्थ्यामुळे दिव्य लोक प्राप्त होतो.

इतकेच काय, सर्व देवही त्यांना नमन करतात. ज्या यज्ञात मोठी मोठी दाने द्यावी लागतात असे यज्ञ ज्यांनी केले आहेत; महान तप आचरले आहे; मोठमोठी दाने देऊन मरणोत्तर , स्वर्गात अनेक सुखे अनुभवत आहेत; त्यांच्या पेक्षाही श्रेष्ठ लोक आणि वरचढ सुखे त्यांना फक्त गंगेच्या अनुग्रहामुळे प्राप्त होतात.

जगन्नाथ पंडित म्हणतात, ‘माय ही तुझ्या जलाच्या अंगभूत गुणांची महती आहे. ही तुझ्या वात्सल्याची कहाणी आहे. ही तुझ्या सामर्थ्याची निशाणी आहे. माय, मग मलाही दूर लोटणार नाहीस ना? मला माझ्या पापातून मुक्त करशील ना? मलाही चांगली गति देशील ना? मीही अनन्यभावाने तुला शरण आलो आहे.’

 

अपि घ्नन्तो विप्रानविरतमुशन्तो गुरुसतीः

पिबन्तो मैरेयं पुनरपि हरन्तश्च कनकम् ।

विहाय त्वय्यन्ते तनुमतनुदानाध्वरजुषा-

मुपर्यम्ब क्रीडन्त्यखिलसुरसम्भावितपदाः ।। 34

अन्वय – हे जननि, अविरतं विप्रान् अपि घ्नन्तः, पुनरपि गुरुसतीः उशन्तः, मैरेयं अपि च पिबन्तः, कनकं च हरन्तः (ते) अन्ते त्वयि तनुं वाहाय अखिलसुरसंभावितपदाः (भूत्वा) अतनुदानाध्वरजुषांउपरि क्रीडन्ति । (34)

अन्वयार्थ - भो अंब – हे माझ्या माते गंगे ; अविरतं- निरंतर ; विप्रान् - ब्राह्मणांना ; अपि – सुद्धा ; घ्नन्तः – मारणारे ; पुनः - आणि ; गुरुसती – गुरूजनांच्या पतिव्रता स्त्रियांना ; उशन्तः – इच्छिणारे , भोगणारे ; मैरेयं – मद्याप्रत ; अपि – सुद्धा ; पिबन्तः – पिणारे ; कनकं – सोने ; च – आणि ; हरन्तः – चोरणारे; अन्ते – मरणसमयी  ; त्वयि – तुझ्या ठायी तुझ्या प्रवाहात , तनुं – देहाला ; विहाय – सोडून, टाकून ; अखिल – सर्व ; सुराः – देव त्यांनी संभावित – पूजिलेली ; पदानि – चरण ; अखिलसुरसंभावितपदाः – सर्व देवही ज्यांचे चरण वंदितात असे ; भूत्वा – होऊन ; अतनु – पुष्कळ मोठी दाने ज्यात आहेत असे अध्वर – यज्ञ ;  त्यांस जुषन्ति – सेविणारे— अतनुदानाध्वरजुषां – स्वर्गादि उत्तम लोकी जाऊन, त्यांची दिव्य भोगरूपी फळे भोगणार्‍या सत्पुरूषांच्या; उपरि – वर ; उर्ध्वलोकी , क्रीडन्ति – क्रीडा करतात. (34)

 

करी विद्वानाचा वध कुणि अती निर्दयपणे

लबाडीने कोणी कनक धन नेई लुटुन ते ।

गुरूपत्नीलाही अधम कुणी भोगे फसवुनी

सुरापानाऐसी अति अधम कृत्ये नित करी ।। 34.1

 

महापाप्यांनी या स्मरुन तुजसी अंतसमयी

जरी केले गंगाजल जवळ ते अंतसमयी

तरी त्यांच्या पायी सुरवर मुनी नित्य नमिती

अती पुण्यात्म्यांच्या वरचढचि त्या देव समजी ।। 34.2

 

मिळे यज्ञाचे ज्या फळ सकल सर्वस्व त्यजुनी

नरांपेक्षा ऐशा वरचढ सुखे त्यांस मिळती ।

तयांना स्वर्गाची गति मिळुन उत्कृष्ट प्रतिची

करीती क्रीडा ते, विविध सुख आनंद लुटती ।। 34.3

---------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

गंगालहरी अनुक्रमणिका

श्लोक 1

श्लोक 3