श्लोक 17
श्लोक 17
बाहेर धडपडून आलेलं लेकरू जेव्हा आईला
पहातं तेव्हा ते तिच्या गळ्यात पडतं. त्याचं सगळ दुःख रडण्यावाटे बाहेर पडतं. आईने
जखमेवर लावलेली तेलहळद मनालाही शांत थंड करते. आपली आई किती चांगली आहे ह्या
विचाराने त्याचं मन भरून येतं.तसच काहीसं
जगन्नाथ पंडितांचं झालं. गंगामैया समोर पाहून जगानी दिलेला सर्व त्रास आठवलाही आणि
तिच्या वात्सल्यमूर्ती दर्शनाने शांतही झाला. ते गंगेची स्तुती करू लागले,
हे जननी, ह्या पृथ्वीतलावर अनेक छोटी,
मोठी तीर्थक्षेत्रे आहेत. ही तीर्थक्षेत्रे त्यांच्या त्यांच्या क्षमतेनुसार प्राणीमात्रांची
दुःखे दूर करण्याचा प्रयत्न करत असतात. पापी लोकांची पापे दूर करत असतात. पण
दुष्कर्मे जर धडकी भरवणारी भेसूर असतील तर त्या पापांचं निवारण त्यांनाही शक्य होत
नाही. तीर्थक्षेत्रेही कचरतात, भयाने मागे सरतात. त्यांची पाप निवारण्याची सीमा
संपल्याचे सांगून गुपचूप बसतात. कारण एवढी कुवत त्यांच्या अंगी नसते.
जेथे ह्या छोट्यामोठ्या तीर्थांवरची
अवलंबित्वाची सीमा संपते तेथे तुझ्या कृपेचा अथांग पारावार/
सागर पसरलेला असतो. जे काम करण्यास
भले भले मागे सरतील ते पाप निवारणाचं काम तू चुटकीसरशी करून दाखवतेस. चिमणीही उडते
आणि गरूडही उडतो पण त्याच्या भरारीत अंतर असणारच नं!
आपापल्या क्षमतेनुसार, कुवतीप्रमेणे झेपेल असं
काम प्रत्येकजण करत असतो. मांजर उंदीर, मारू शकते; पण मदमस्त हत्तीच्या गंडस्थळावर
थेट झेप घेऊन त्याला लोळवायला पंचानन केसरीच लागतो. त्याप्रमाणे जेव्हा एखादं
अशक्यप्राय, अवाढव्य काम करताना कौशल्याचा
आणि क्षमतेचा कस लागतो तेव्हा, उगीच पुढेपुढे करणारे बिचकतात, त्यांची बोलती बंद
होते. ते काढता पाय घेतात. अशावेळी खर्या सामर्थ्याची परीक्षा होते. जो समर्थ
असतो तोच ह्या शर्यतीत टिकतो, पुढे येतो, कुठच्याही प्रकारे वल्गना न करता,
कुठचाही डामडौल न दाखवता ते काम सहज पूर्ण करतो. त्याच्यासाठी ते काम अकष्टसाध्य
असतं. त्याला जणु कष्ट पडतच नाहीत. त्याच्या यशाची ध्वजा गगनात सदैव फडकत राहते.
माते तू अशीच आहेस. तुझी असीम कृपा अनुभवत मी तुझी स्तुती करत आहे. माते तुला
नमस्कार. (17)
कृतक्षुद्रैनस्कानथ झटिति सन्तप्तमनस:
समुद्धर्तुं सन्ति त्रिभुवनतले तीर्थनिवहाः।
अपि प्रायश्चित्तप्रसरणपथातीतचरितान्
नरान् दूरीकर्तुं त्वमिव जननि त्वं विजयसे।।17
अन्वय – हे जननि, कृतक्षुद्रैनस्कान् अथ च झटिति
सन्तप्तमनसः नरान् समुद्धर्तुं
त्रिभुवनतले तीर्थनिवहाः सन्ति । प्रायश्चित्तप्रसरणपथातीतचरितान् अपि
(नरान्) दूरीकर्तुं त्वं इव त्वं विजयसे । (17)
अन्वयार्थ-
हे जननि – हे आई; कृतक्षुद्रैनस्कान् –
स्वल्प किवा क्षु्द्र पापे करणारे(कृतानि क्षुद्रैः एनांसि यैः ते
कृतक्षुद्रैनस्काः)( क्षुद्र – अल्प, जी एनांसि- पातके ती कृत – केली आहेत ज्यांनी ते) ; अथ – पापाचरणानंतर; झटिति - तत्काल; सन्तप्तमनसः – पश्चात्तापयुक्त
अंतःकरणाच्या; नरान् – माणसांना; समुद्धर्तुम्
– केलेल्या पापापासून मुक्त करण्यास; त्रिभुवनतले – त्रैलोक्यात; तीर्थनिवहाः
- तीर्थांचे समूह; सन्ति – आहेत; अथापि – परंतु ; हे जननि – हे आई; प्रायश्चित्तप्रसरणपथातीतचरितान्
- पापनाशासाठी धर्मशास्त्रांनी जे विधी सांगितले आहेत. त्यांचा प्रसरणपथ
म्हणजे त्यांची जास्तीत जास्त जी क्षमता आहे तीही ओलांडून ज्यांचे चरित म्हणजे
आचरण गेले आहे ते; अपि – सुद्धा. म्हणजे खूप काळ बुद्धिपूर्वक मोठी मोठी
पातके केल्यामुळे ज्यांना प्रायश्चित्ताचा मार्गच राहिला नाही अशाही (नरान्- माणसांना);
दूरीकर्तुं -पापापासून दूर करावयास; त्वं इव – तुझ्यासारखी; त्वं – तूच! ; विजयसे – उत्कर्ष
पावतेस.
किती तीर्थे त्यांची गणति करिती कोण जगती
अती छोटी पापे धुवुनि जन उद्धार करिती ।
परी कारस्थाने रचुन अति गे सावधपणी
करी कृत्ये काळी नर कुणि पिसाटापरि जगी ।। 17.1 ।।
अवाका शास्त्राचा अमल करण्याचा पुनरपि
पहा ओलांडूनी अधम कृति जे घोर करति ।
न प्रायश्चित्तेही कथिलिच जया शास्त्रवचनी
दिसे ना उद्धारा पथचि कुठला दाट तिमिरी
।। 17.2 ।।
अशांसी पाहूनी हृदय दडपूनी सकल ही
खुजी तीर्थे घेती अति निमुट
माघार जननी ।
परी येसी तूची त्वरित पतितांच्या मदतिसी
तयांच्या पापांना धुवुन करिसी निर्मलमति ।। 17.3 ।।
तयांच्या उद्धारा तुज सम असे तूच जगती
तुझ्या पासंगासी पुरति नच क्षेत्रेच कुठली
सदा आकाशी ह्या तव यशपताका फडकती
हरोनी पापे ‘ती’ सतत यशसोपान चढसी ।।17.4 ।।
---------------------------------------------------

Comments
Post a Comment