श्लोक 15

 

   श्लोक 15

समाजाने वाळीत टाकलेल्या जगन्नाथ पंडितांना गंगेने मात्र कधी दूर लोटलं नाही. जगाने ह्या श्रेष्ठ कवीला पापी ठरवलं तरी, गंगेचं त्याच्याविषयी असलेलं वात्सल्य आटलं नाही. त्यामुळे अनन्य भावाने गंगेला शरण आलेल्या जगन्नाथ पंडितांच्या मनात राहून राहून हेच येत असावं की, हे माय, दयाळूपणात तुझी तुलना कोणासोबतच होत नाही.कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति।’

जरी आला पोटी अधम सुत तो दुर्जन अती

जगी होणे नाही कधिहि जननी निर्दय तरी।।

ते विचार करू लागले, पातकांचे तरी किती विविध प्रकार! ब्रह्महत्या, सुरापान, सुवर्णाची चोरी, गुरुपत्नीगमन आणि हे आचरणार्‍या ह्या अशा महापातक्यांशी संबंध ठेवणे ही पाच महापातके मानली जातात; जी घोर नरकास कारणीभूत होतात. काही उपपातके असतात. काही पापांना प्रायश्चित्त असते काहींना तेही नसते. जसे ‘कृतघ्नस्य नाऽस्ति निष्कृतिः।’ कृतघ्नपणा महापातक नसलं तरी त्याला कुठलं प्रायश्चित्त नाही. अशा जीवांना ‘नारकिक/ नारकीय’ जीव म्हणतात. यांचा कधी उद्धार होत नाही ते कायम नरकात पिचत राहतात.

ह्या भूतलावर अनेक जण निर्बुद्ध, अडाणी, मतिमंद, लुळे पांगळे, अवयवहीन, गतिमंद  (जड) म्हणून जन्माला येतात; कोणी जन्मजात आंधळे असतात; तर कोणी जन्मतः मुके, बोबडे, तोतरे (उक्तिविकल) बहिरे (बधिर) असतात. कोणी ग्रहांच्या वाईट दशेमुळे त्रस्त असतात; तर कोणी भूतपिशाच्च लागल्याने! ह्या सर्व दुःखी, व्याकूळ, पीडित जनांना ह्या कलियुगात तरी कुठलं शास्त्रसंमत प्रायश्चित्त नाही.

साक्षात जन्मदात्री जननी सुद्धा आपल्या अपत्याचे सर्व अपराध पोटात घालू शकत नाही. काही अपरांधांना इलाज नसतो. एखाद्याचे किती घोर अपराध असतांना त्याला तारुन न्यावं ह्याला सुद्धा काही सीमा असते. सर्वच अपराधांना प्रायश्चित्त नसल्याने काही वेळेला विशेष प्रकारच्या मरुद्गणांना वा देवतांनाही(निलिंप) अशा अपराध्यांना तारून नेणं अवघड होऊन बसतं. त्यामुळे ‘ह्यांना आम्ही काही मदत करू शकत नाही’ म्हणून दृष्टीस न पडणारे देवतागण, मरुद्गणही (निलिंप) हात झटकून मोकळे होतात. ह्या असहाय्य लोकांकडे देवांनीही पाठ फिरवली तर त्यांनी बघायचं तरी कोणाच्या तोंडाकडे?

कवी जगन्नाथ म्हणतात, जेथे लोकांच्या अपराधांचं निराकरण करण्याची देवांचीही क्षमता संपते, तेथे हे गंगामाते तुझ्या कर्तृत्त्वाचा उत्तुंग आलेख चढत जातो. तेथे तू त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी असतेस. महा कठीण पापांचे पर्वत तुझ्या अमल विमल जलात तू सहज विरघळवून टाकतेस.

माय, अशावेळी तुझ्याशिवाय त्यांच्यासाठी अजून रामबाण इलाज तो काय! माय, ज्याप्रमाणे औषध त्या व्यक्तीचा दुःसह वाटणारा त्रास कमी करतं, त्याला रोगातून मुक्ती देतं;  त्याप्रमाणे पापांमुळे गलितगात्र झालेल्या लोकांसाठी तू परिणामकारक, गुणकारी औषध आहेस. तुझ्या कृपेला, दयाळूपणाला जगात तोड नाही.(15)

जडानन्धान् पङ्गून् प्रकृतिबधिरानुक्तिविकलान्

ग्रहग्रस्तानस्ताखिलदुरितनिस्तारसरणीन्।

निलिम्पैर्निमुक्तानपि च निरयान्तर्निपततो

नरानम्ब त्रातुं त्वमिह परमं भेषजमसि।।15

अन्वय – हे अम्ब, इह जडान् अन्धान् पङ्गून् प्रकृतिबधिरान् उक्तिविकलान् ग्रहग्रस्तान् अस्ताखिलदुरितनिस्तारसरणीन् च निलिम्पैः अपि निर्मुक्तान् निरयान्तः निपततः नरान् त्रातुं त्वं परमं भेषजं असि । (15)

 

हे अम्ब -  हे जननि;  इह- ह्या कलियुगी;  जडान् –  मतिमंद , निर्बुद्ध, अडाणी, गतिमंद लुळे पांगळे, अवयवहीन ; अन्धान् – नेत्रहीनांस; पंगून् – पांगळ्यास, प्रकृतिबधिरान्– जन्मजात बहिर्‍यांना; उक्तिविकलान् - मूके, तोतरे, बोबडे; ग्रहग्रस्तान् – नवग्रहांच्या दशेने त्रस्त झालेल्यांस; किंवा भुतपिशाच गणांनी अशांत, त्रस्त; अखिल – संपूर्ण  दुरित - पातके त्याचा निस्तार – सुटका, मुक्ती, त्याची सरणिः - प्रायश्चित्त मार्ग; अस्ताखिलदुरितनिस्तारसरणीन् – ज्यांची पातके दूर करण्याचे सर्व  मार्ग खुंटले आहेत अ‍से लोक  ; निलिम्पैः – देवतांनी किंवा एक प्रकारचे मरुद्गण त्यांनी, निर्मुक्तान् – आपल्या हातून रक्षण होत नाही म्हणून त्यागिलेले अशा;  अपि च -  आणि;  निरयान्तः- नरकामध्ये, निपततः – पडतात त्या ;  नरान् –माणसांना, त्रातुं – रक्षिण्यास; त्वं – तू; परमं- श्रेष्ठ, उत्कृष्ट, रामबाण,गुणकारी; भेषजं -औषध;  असि- आहेस.

अपंगा अंधांना विकलमति वा मूक बधिरा

ग्रहांच्या पीडेने हतबलचि झाले जन तया ।

लुळे पंगू कोणी विकल विकृतीग्रस्तचि जगी

न प्राश्चित्ते ज्या असति कुठली ह्या कलियुगी ।। 15.1 ।।

 

हराया पापे जी ग्रथित नच शास्त्रोक्त विधिही

सहाय्यासी त्यांच्या हतबलचि हे देव असती ।

नरांसी ऐशा ज्या सुरहि निरुपायेच त्यजती

अती दुःखाने ते नरकपुरिमध्येच पिचती ।। 15.2 ।।

 

अशांना रक्षाया, विमल करण्यासी पुनरपी

तयांच्या दुःखाचे निरसन कराया सकलची ।

कराया दूरी गे नरकपुरिचा क्लेश सहजी

प्रभावी ऐसे तू जननि असशी औषध जगी ।। 15.3 ।।

---------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

श्लोक 1

श्लोक 3

श्लोक 2