श्लोक 14

   


  श्लोक 14

जगात असं दिसतं की, कित्येक वेळा अंगीचे गुणच क्षतिकारक ठरतात. बंधनकारी होतात. दोषाला कारणीभूत ठरतात. कायमचा बंदिवास ही पोपट, मैनांच्या मधुर वाणीची निष्पत्ती ठरावी, गोड बोलण्याचा असा अनिष्ट परिणाम पोपटाला भोगावा लागावा, गुणाचे पर्यवसन असे कायमच्या दोषात व्हावे हा केवढा विपर्यास!  जगन्नाथ पंडित म्हणतात,

हे गंगा माते, पृथ्वीवरील लोकांच्या व्यथा, कष्ट, त्यांची पीडा पाहून तुझं मन द्रवलं आणि स्वर्गातील सर्व ऐषोआराम, सुखदायक जीवनाचा तू त्याग केलास. ‘अधोधो गंगेयं भवति विनिपातः शतमुखैः।’ शतसहस्र धारांनी तू भूमीवर कोसळलीस. स्वर्गाला कायमचा निरोप देत तुझं पृथ्वीवर झालेलं कायमचं अधःपतन पाहून सद्गुणांचा अतिरेक हा कायमचा दोष ठरतो असे मला वाटतं. सोन्याचे दागिने झाले तरी त्यातील सोनेपण जात नाही पण दुधाचं दही होताना रासायनिक क्रियेने दूधपण कायमचं मिटतं त्याप्रामाणे माय,  तुझ्या गुणांचे सोने होताना झालेलं गुणाचं रूपांतरण कायमच्या दोषात परिणत व्हावं हा केवढा दैवदुर्विलास!

पृथ्वीवरील प्राणीमात्रांच्या वेदना, दुःख दूर करण्यासाठी तू पृथ्वीवर अवतरलीस. शिवाने तुला पृथ्वीवर उतरण्यासाठी सुयोग्य स्थान म्हणून त्याच्या माथ्यावर स्थान दिलं. आणि तुझा वेग नियंत्रित रहावा म्हणून तुला त्याच्या जटांमधे बांधून ठेवलं. प्रवाहीपण, सतत वाहत राहणं हा तुझा धर्म! पण तुझे सद्गुणच जणु तुझी बेडी झाले. तुला महादेवांनी त्यांच्या जटाबंधनात तुला बांधलं.  

ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने विद्युन्माली, कमलाक्ष आणि तारकासूर ह्या तीन असुरांनी पृथ्वीपासून शंभर योजने दूर तीन फिरती पुरे मयासुराकडून बांधून घेतली. ती एका रेषेत येतील तेव्हाच, एका बाणाने तिनही पुरे जो भेदेल तोच ह्या पुरांचा आणि तीनही असुरांचा नाश करू शकेल असा ब्रह्मदेवाकडून वर मिळवला. पुष्य नक्षत्रावर ती एका रेषेत आल्यावर महादेवांनी प्रत्यक्ष विष्णूचा बाण करून ती तिनही पुरे एका बाणात ध्वस्त केली. म्हणून महादेवांना पुरारी वा त्रिपुरारी म्हणून संबोधू लागले; अशा अलौकिक पराक्रम असलेल्या महादेवांना हे जननी तुझ्या ह्या निर्मळ जलौघाचा मोह पडावा ह्याचा मला विस्मय वाटतो.

ज्याला विश्वजयी म्हणतात अशा, मदनाच्या बाणाने घायाळ झाला नाही असा एकही प्राणीमात्र नाही. त्या कामदेवालाही ज्याने जाळून अंग विरहित म्हणजेच अनंग केलं अशा वैराग्यमूर्ती शिवालाही तुझी ओढ निर्माण व्हावी हा तर मोठा चमत्कारच म्हणावा लागेल.

माते, जो शिव अत्यंत अनासक्त, उदासीन आहे, वासनारहित, निरिच्छ, निर्गुण निराकार आहे, ज्याला कोणी मोहात पाडू शकत नाही तो शिवशंभू तुझ्या गुणांवर भाळावा हे केवढं मोठं नवलच आहे! तुझं निर्मळ मन, भूतमात्रांविषयी असलेली आस्था, प्राणीमात्रांच्या कल्याणाची तळमळ ह्या सर्व गुणांमुळे त्या निर्मोही शंभूलाही त्याच्या जटांमधे तुला बांधून ठेवायची इच्छा झाली. तुझे सद्गुणच असे दोष ठरून विराग्याला मोही बनवतात; निर्गुण निराकारामधेही विकार घडवून त्याला सगुण रूप घ्यायला लावतात. ज्याचे कामच भेद करणे, विविधतेला मोडून टाकणे आहे त्या शिवाने तुला स्वतःशी बांधून ठेवले हा विरोधाभासही त्या गुणामुळेच आला.

तुझे पावित्र्य, परोपकार, निर्लोभीपणा ह्या अशा अगणित सद्गुणांमधे असा विकार, विपरीत परिणाम दिसावा; कधी कधी गुणातिरेक हाच दोष तयार होतो तो असा! तुला शिवजटांचे बंधन सोसावे लागले; तर निर्मोही आणि निर्गुण निराकार शंभूला सगुण साकार होऊन तुझ्या आसक्तीचा आरोप सहन करावा लागला! (14)

 

स्खलन्ती स्वर्लोकादवनितलशोकापहृतये

जटाजूटग्रन्थौ यदसि विनिबद्धा पुरभिदा।

अये निर्लोभानामपि मनसि लोभं जनयतां

गुणानामेवायं तव जननि दोषः परिणतः।।14

अन्वय – अये जननि, अवनितलशोकापहृतये स्वर्लोकात् स्खलन्ती (त्वं) पुरभिदा जटाजूटग्रन्थौ यत् विनिबद्धा असि (अतः) निर्लोभानाम् अपि मनसि लोभं जनयतां तव गुणानां एव अयं दोषः परिणतः (।4)

अन्वयार्थ -(अये जननि – हे आई); अवनितलशोकापहृतये – पृथ्वीवरील जनांच्या शोकशमनासाठी; स्वर्लोकात् – स्वर्गातून;  स्खलन्ती - कोसळणारी ; त्वं – तू; पुरभिदा- त्रिपुराला भेदणार्‍या त्या शिवाने; जटाजूटग्रन्थौ – जटा बांधून तयार झालेल्या गाठीमध्ये; यत् – ज्यापेक्षा; विनिबद्धा – विशेष कौशल्याने बांधली; असि – आहेस.  निर्लोभानाम् अपि – निरिच्छ पुरुषांच्याही; मनसि – मनात; लोभं जनयतां – लोभ उत्पन्न करणार्‍या अशा; तव - तुझ्या ; गुणानानां एव – (सर्वांविषयी करुणा, परोपकार, पाप हरण करणे इ.) गुणांचाच अयं-  हा (बंधनरूप) , दोषः – दोषा(त) ;  परिणतः  - कायमचा रूपांतरीत झाला आहे, पुन्हा मूळ स्वभावी येणार नाही असा परिवर्तित झाला आहे.

 

जगाच्या कल्याणा अवतरसि पृथ्वीवर कशी

तुझ्या धारा धो धो उतरतिच स्वर्गातुन भुवी।

जटांमध्ये बांधी तव सलिल धारा जखडुनी --

कसा कौशल्याने सहज त्रिपुरारी प्रबळची ।। 14.1 ।।

 

विपर्यासाचे हे! गुणहि बनतो दोषच कधी

विरागी शंभूला तव भुलविती सद्गुण अती

गुन्हा कैसा व्हावा जननि तव हा चांगुलपणा

प्रवाही धारा तू असुन तुज निर्बंध झरण्या ।। 14.3 ।।

 

निराकारालाही सगुण करिसी तू तव गुणे

जलौघालाही गे विमल म्हणुनी बंधन घडे ।

त्यजूनी स्वर्गाला अवनिवर येणे तुज पडे

गुणांची का होई परिणति दोषात सुभगे ।। 14.4 ।।

Comments

Popular posts from this blog

श्लोक 1

श्लोक 3

श्लोक 2