श्लोक 13

 

  श्लोक 13 

 

हे मााय, एकदा का माणसाचा  पाय घसरला की त्याचा शेवट पडण्यात होतो. एखादा छोटासा अपराध, एखादी छोटीशी चूक माणसाला महा घोर अपराधांच्या निसरड्या रस्त्यावरून थेट महा अपराधांच्या दलदलीत ढकलते. बुडत्याचा पाय खोलात ह्या नियमाप्रमाणे त्याने किती जरी चिखलातून बाहेर यायचा प्रयत्न केला, तरी तो भीषण अपराधांच्या चिखलात अजून अजून खोल रुतत जातो. त्याला मदत करण्याऐवजी सर्वजण त्याची निर्भर्त्सना करू लागतात. त्याला झिडकारू लागतात.

अगे माय, असा हा अत्यंत लाचार, दीन, बापुडा कोणी पाहून; त्याच्या वाढत्या अपराधांच्या श्रेणी बरोबर तुझ्या मनातील त्याच्याविषयीचा कळवळा मात्र वाढत जातो. त्याची दयनीय स्थिती पाहून अपार करुणेने तुझं मन भरून जातं. समाजानी नाकारलेल्या ह्या पाप्याविषयी तुझ्या मनात अगाध स्नेह उत्पन्न होतो. सर्वांनी समाजाबाहेर टाकलेल्या ह्या बहिष्कृत लेकराची कणव येऊन तू त्याला उचलून घेतेस. त्याच्या अपराधांचा चिखल तुझ्या शीतल, वात्सल्यपूर्ण जलकरांनी धुवून टाकतेस. ज्यांच्यावर धर्ममार्तंडांनी नरकाचा शिक्कामोर्तब केलेला असतो त्यांना तू पापमुक्त करतेस

मदोन्मत्त पुरुषांना सुद्धा जी कामे निंद्य वाटतात; जातीभ्रष्ट लोकही जी करायला धजत नाहीत; धर्मविहीनांनाही मुखातून ज्याचा उच्चार करावासा वाटत नाही, फार काय पण जी ऐकल्यावर दुर्जनही थरारून  त्यांच्या अंगावर भीतीने रोमांच उभे राहतात अशा प्रकारची अगणित पातके दूर करण्यासाठी अविश्रांतपणे तू एकटीच झटत असतेस. ना तुझ्या मदतीला कोणी असतं. ना तुला क्षणभर विश्रांती! पण विना तक्रार, विना कटकट,  श्रमांचे जराही ओझे न मानता, अत्यंत आपुलकीने तू सर्व निंदनीय जनांना तारून नेतेस. हे सर्व तू सहजपणे करतेस. तुझं हे अकष्टसाध्य असं महान कर्तृत्व अद्भुत आहे. म्हणूनच ह्या भूमंडलावर तुझी विजयपताका कायम फडकत राहते. तुझ्या यशाचे पवाडे गायले जातात. (13)

विनिन्द्यान्युन्मत्तैरपि च परिहार्याणि पतितै-

रवाच्यानि व्रात्यैः सपुलकमपास्यानि पिशुनैः।

हरन्ती लोकानामनवरतमेनांसि कियतां

कदाप्यश्रान्ता त्वं जगति पुनरेका विजयसे।।13

अन्वय – भो गंगे, उन्मतैः अपि विनिन्द्यानि , पतितैः परिहार्याणि, व्रात्यैः अवाच्यानि , च पिशुनैः सपुलकं अपास्यानि कियतां लोकानां एनांसि अनवरतं हरन्ती पुनः कदा अपि अश्रान्ता एका त्वं जगति विजयसे। (13)

अन्वयार्थ - (भो गंगे हे गंगे,); उन्मतैः - अविचारी पुरूषांनी; विनिन्द्यानि – महा निंदा करावयास अत्यंत योग्य अशी; अपि च – आणि, पतितैः – पातके करून प्रायश्चित्त न केल्याने जातिभ्रष्ट धर्मभ्रष्ट झालेल्या, दुश्चरित्र झालेल्या पुरूषांनी; परिहार्याणि - टाकावयास योग्य, परिहार्य अशी; व्रात्यैः- उपनयनादि संस्कार न झाल्याने धर्मभ्रष्ट झालेल्या पुरूषांनीही; अवाच्यानि -बोलावयास अशक्य अशी, उच्चारही करता येणार नाही अशी; पिशुनैः – चुगलखोरांनी दुर्जनांनी; सपुलकैः – भीतीने अंगावर काटा येऊन; अपास्यानि - ज्याचा त्याग करावा अशी; कियतां – किती मोठी, जिथे गणतीला अर्थच नाही अशी अगणित; लोकानां- लोकांची ;  एनांसि – पापे, अपराध, दोष;  अनवरत – निरंतर; हरन्ती – नाशणारी अशी; एका – एकटीच, कोणाच्या सहाय्याविना; कदा- अपि – कधिही; अश्रान्ता – श्रम न पावणारी; त्वं - तू ; जगति – भूमंडलावर; विजयसे – जय पावतेस. (13)

 

कुकर्मे ऐकूनी अति अधम जी विकृत अती

खलांचा माथाही सहजचि झुकावा शरमुनी ।

मदोन्मत्तांनाही खजिल करि जे पाप मनि गे

न उच्चारावेही म्हणतिच अधर्मी नर असे ।। 13.1 ।।

 

धजेना ज्या कर्मा अधम करण्या निंद्य म्हणुनी

खलांच्या ये अंगी सरसरुन काटाच श्रवणी ।

अशाही पापांचे निरसन कशी एकटिच करी

दमेना तू माते अनवरत सत्कार्य करिसी ।। 13.2 ।।

 

असे कोणापाशी तुजसमचि सामर्थ्य इतुके?

श्रमांचे वाटेना कधि तुजसि ओझे जललते

तुझ्या ह्या कीर्तीचा त्रिभुवनिच डंका घुमतसे

जगी सातत्याने सुविजय पताका फडकते ।।13.3 ।।

 

---------------------------------------------------


Comments

Popular posts from this blog

श्लोक 1

श्लोक 3

श्लोक 2