श्लोक 12
श्लोक 12
आईची मुलावर पडलेली प्रेमळ नजर मुलाचं सर्वस्व असते. तिच्या एका दृष्टिक्षेपासाठी आसुसलेले जन्नाथ पंडित म्हणतात,
हे माय, केवळ तुझ्या कृपाकटाक्षानेच सर्व पापे तू
दूर करू शकतेस असे अलौकिक सामर्थ्य तुझ्या नजरेत आहे. (ईक्षामात्रात् परिहरन्ती) तुझी कल्याणकारी
दृष्टी ज्या कोणा व्यक्तीवर क्षणभर का होईना पडते त्याचे सर्व भवताप, संसारामुळे
उद्भवणारी सर्व दुःखे, पीडा तू सर्वतोपरी दूर करतेस. तुझी ही नीरगात्री मूर्ती
विलक्षण सुंदर आहे. निर्मळ, कल्याणकारी(शिवा) आहे. हे जननी, तू नुसतं एकवार तुझ्या
स्नेहमयी नजरेने पाहिल्यावरच कुठल्याशा अनामिक अपार शांतीने मन भरून
जातं. ह्या भौतिक संसाराचा सर्व ताप कोणीही विसरून जातो. मनातल्या मनात एकमेकांना
छेद देणार्या विविध भावनांचा कल्लोळ, उलट सुलट विचारांचा कोलाहल, अनेक प्रकारची
मानसिक द्वंद्वे संपून त्याची जागा एका अवर्णनीय शांत आनंदाने घेतलेली जाते. तुझी
स्तुती करण्यासाठी शब्द थिटे पडतात.
तुझ्या ह्या प्रवाही शुभंकर तनुची थोरवी कोण कसा
वर्णन करू शकेल? तुझ्या अफाट कर्तृत्वाचा गौरव करणं ही काही कोणा सामान्य
माणसाच्या आटोक्यातील गोष्ट नाही. तुझ्या प्रतापाचा डंका वाजवायला, तुझ्या तेजाची
आरती करण्यासाठी कोणी तुझ्या तोलामोलाचा तेजस्वीच कोणी हवा. तुला नजराणा म्हणून द्यावयाची
गोष्टही
अनमोल व तितक्याच उंचीची हवी.
‘गुणी गुणं वेत्ति’ म्हणजे गुणी माणसालाच
दुसर्याचे गुण कळतात असं म्हणतात त्याच प्रमाणे दुसर्यांच्या कल्याणासाठी ज्याने
प्रचंड कष्ट अनुभवले आहेत तोच दुसर्याच्या कष्टाचे अनुमान करू शकतो. ह्या नीलकंठाने
ह्या जगाच्या कल्याणासाठी हालाहलासारखं जहाल विष कायमचं आपल्या कंठात धारण केलं.
सार्या ब्रह्मांडाचं कायमचं रक्षण केलं; अजूनही हे जाळणारं विष कंठ्याप्रमाणे
मिरवणारा महादेवच तुझी महती जाणू शकतो.
निस्वार्थ भावाने अथकपणे चाललेली तुझी
भूतमात्रांची सेवा पाहून देवांचे देव महादेवही विस्मित झाले असले तर त्यात नवल ते
काय! तुझ्या गुणानी अत्यंत प्रभावित होऊन
ते तुझ्यावर भाळले. मोहित झाले. देवाधिदेव महादेवांनी तुला त्यांच्या मस्तकी जटाजूटांमधे
सर्वोच्च स्थान कायमचं बहाल केलं. हा तुझ्या निस्वार्थ सेवेचा तुला मिळालेला सर्वोच्च
सन्मान आहे. तुझ्या सद्गुणांचं यश आहे.
कैलासपतीने
आपल्या अर्धांग व्यापलेल्या अर्धांगिनीचा नगाधिपुत्री गिरिजेचाही इतका गौरव कधी
केला नव्हता; इतका अत्युच्च बहुमान तिला दिला नव्हता; जो त्यांनी तुला आनंदाने
बहाल केला.
त्याचा व्हायचा तो दुष्परिणाम झालाच! अग्नीच्या साक्षीने पाणिग्रहण
केलेल्या पत्नीला असं दुय्यम स्थान मिळालेलं पाहून पार्वती क्रोधाने लाल झाली.
तिचे नेत्र क्रोधाने आग ओकू लागले. अग्नी जवळ असलेली वस्तू जशी सुकते तसा
क्रोधाग्नीने त्या हिमाद्रिकन्येचा चेहराही सुकून म्लान झाला.
पण क्रोध, संतापाने शेवटी हताश झालेल्या, झुरणार्या, उद्विग्न झालेल्या,
चेहराही सुकून म्लान झालेल्या त्या नगाधिपुत्री पार्वतीच्या नाराजीला न
जुमानता, तिचा अनुनय करायचा सोडून महादेव आपल्या विचारांवर ठाम राहिले.
त्यांनी तुला माथ्यावर कायमचं स्थान बहाल केलं. हे जननी गंगे, हेच तर तुझ्या
गुणांचं महान साफल्य आहे. तुझा हा अलौकिक महिमा, तुझी महान थोरवी गायला, निवेदन
करायला कोण बरे समर्थ आहे? हे गंगा माते, तुला वारंवार नमस्कार असो. (12)
नृणामीक्षामात्रादपि परिहरन्त्या भवभयं
शिवायास्ते मूर्तेः क इह महिमानं निगदतु।
अमर्षम्लानायाः परममनुरोधं गिरिभुवो
विहाय श्रीकण्ठः शिरसि नियतं धारयति याम्।।12
अन्वय – (भो गंगे), श्रीकण्ठः
,अमर्षम्लानायाः गिरिभुवः परमं अनुरोधं विहाय यां नियतं शिरसि धारयति (तस्याः)
ईक्षामात्रात् अपि नृणां भवभयं परिहरन्त्याः शिवायाः ते मूर्तेः महिमानं इह कः
निगदतु (12)
अन्वयार्थ - (भो गंगे
- हे गंगे,) ईक्षामात्रात् – दर्शनमात्रेच, नृणाम् – मनुष्याच्या; भवभयम्
– संसारापासून उत्पन्न होणार्या भयाचा; परिहरन्त्याः – सर्व बाजूने दूर करणार्या तुला; शिवायाः – कल्याणकारी किंवा कल्याणयुक्त करते ती; ते –
तुझ्या; मूर्तेः – (प्रवाहरूपी सगुण) मूर्तीच्या; महिमानं –
महात्म्य; इह - या लोकी; कः – कोण; निगदतु –
बोलेल? श्रीकण्ठः – ( हलाहल प्राशनाने काळा होण्याची) श्री म्हणजे शोभा
ज्याच्या कंठाला प्राप्त झाली आहे तो श्रीकंठ शिव; अमर्षम्लानायाः - क्रोधाने
म्लान , मूर्छित झाली आहे गिरिभुवः – हिमालय पर्वतापासून उत्पन्न झालेल्या
पार्वतीचा; परमम् – अत्यंत; अनुरोधम् विहाय – अनुनय, अनुसरण सोडून; यां
– जिला; नियतं – निरंतर; शिरसि- मस्तकी धारयति - धारण
करतो. (12)
तुझी दृष्टी ज्याच्यावर पडतसे गे क्षणभरी
तया संसाराचे भय न उरते गे लवभरी
कसा वर्णावा तो तवचि महिमा उज्ज्वल बरे
विषाचा कंठा जो मिरवि हर त्या तू रुचतसे ।। 12.1 ।।
हृदी शंभूच्या तू उपजविच मोहा बघुन हे
शिवाची अर्धांगी फणफणत कोपागृही झुरे
हिमाद्रीकन्येचा अनुनय परी ना शिव करे
तिला दुर्लक्षूनी शिव तुजसि माथ्यावरि धरे ।। 12.2 ।।
गुणांची ऐशी ही कदर गिरिशानेच करणे
अगे ह्याहूनी का अजुन कुठला गौरव असे ।
कसा सामान्यांनी जननि तव गावाच महिमा
असे शब्दांचे हे विभव अपुरे गे स्तुतिस गा ।। 12.3 ।।
---------------------------------------------------

Comments
Post a Comment