श्लोक 10
श्लोक 10
जगन्नाथ पंडित गंगेशी संवाद साधत म्हणतात,
हे जननी, तू साक्षात स्वर्गातून भूलोकी आलीस. तू देवांची नदी प्रत्यक्ष सुरनदी आहेस. तू म्हणशील की, सारे जण तर ब्रह्म हे एकमेव सत्य मानतात. श्रेष्ठ
मानतात. असं असताना मी तुलाच का सर्वश्रेष्ठ मानत आहे? तुझीच का स्तुती करत आहे? तर ऐक,
हे जननी! ह्या निराकार निरालंब ब्रह्माचं
सर्वजण सर्वकाळ गुणगान करत असतात पण प्रत्यक्षात ते कोणालाच नक्की सांगता येत
नाही. प्रत्यक्ष वेदही शेवटी ‘‘नेति नेति’’ म्हणजे—‘हे म्हणजे ब्रह्म नाही ते
म्हणजे ब्रह्म नाही.’ म्हणून सर्वच वस्तूंना नाकारतात. थकतात. भल्याभल्यांची
प्रतिभाही कुंठित होते.
जे निराकार आहे, नित्य निरंतर आहे, ज्याला जन्म-मरण नाही, ज्याला माया स्पर्शही करू शकत नाही, जे स्वयंप्रकाशी आहे आणि आपल्या प्रकाशाने, आपल्या महतीने सारे अज्ञान दूर करते हे सर्व ब्रह्माचे वर्णन तुला लागू होते. न दाखवता येणारं निर्गुण निराकार ब्रह्म जर कधी सगुण साकार रूपात प्रकट झालच तर ते प्रत्यक्ष तुझ्या रूपातच अवतीर्ण झालं आहे असं मी मानतो. तू तुझ्या निर्मळ वागण्याने सर्व भेदाभेद दूर केला आहेस. सर्व अज्ञान दूर केलं आहेस. हे ब्रह्मस्वरूप माते ते अनादि तत्त्व तूच आहेस ह्याविषयी माझ्या मनात कुठलाही संदेह नाही. तुझ्याहून कुठलं वेगळ ब्रह्म आहे असं मी मानत नाही. हे ब्रह्मस्वरूप माते, तुला नमस्कार!
न यत्साक्षाद्वेदैरपि गलितभेदैरवसितं
न यस्मिन् जीवानां प्रसरति मनोवागवसरः।
निराकारं नित्यं निजमहिमनिर्वासिततमो
विशुद्धं यत्तत्त्वं सुरतटिनि तत्त्वं न विषयः।।10
अन्वय - हे सुरतटिनि, यत् गलित भेदैः अपि वेदैः साक्षात्
न अवसितं, यस्मिन् जीवानां मनोवागवसरः न प्रसरति, निराकारं नित्यं
निजमहिमनिर्वासिततमः विशुद्धं यत् तत्त्वं
तत्
अन्वयार्थ - हे सुरतटिनी – हे
देवांच्या नदी गंगे; यत् – जे; गलित
भेदैः – ज्यांच्यात या विषयी मतभेद उरला नाही अशा ( म्हणजे प्रत्येक वेदचा
उद्देश थोडा वेगळा आहे. तरी चारही वेदांना मिळुन देखिल जे तत्त्व स्वरूप निश्चित
करता आले नाही ते ब्रह्म)); वेदैः अपि – वेदांनीही; साक्षात –
प्रत्यक्ष; न अवसितम् – निर्धारित
केले नाही, निश्चित केले नाही; यस्मिन्- ज्या विषयी; जीवानाम्- कोणी
भूतमात्र वा मानवांचे; मनोवागवसरः न प्रसरति – मन आणि वाणी यांचा अवसर
म्हणजे व्यापार प्रसार पावत नाही, प्रवृत्त होत नाही; निराकारं -
ज्याचा आकार गेला आहे ते शरीर नसलेले; नित्यं – निरंतर,नित्य, उत्पत्ती,नाश
रहित, निजमहिमनिर्वासिततमः - स्वप्रकाशाने किवा स्वप्रभावाने ज्याने अंधकार
वा अज्ञान दूर केला आहे, नष्ट केला आहे ते
; विशुद्धं – मायामलविरहित, यत्
तत्त्वं – जे ब्रह्म; तत् त्वं
(असि) – ते तू आहेस ; न विशयः – ह्यात संशय नाही.
असे अद्वैताचे निरवयव जे ब्रह्मपदची
करीती ज्याचाची निगम महिमामंडन अति ।
परी वर्णू जाता म्हणति, ‘‘कळले ना अजुनही’’
पदा त्या वर्णाया शरण म्हणुनी मौन धरिती ।। 10.1 ।।
मती खुंटे सार्यांचिच उकलता ब्रह्मपद जे
स्फुरे ना वाचा ही स्वरुप बघुनी निर्गुण असे ।।
‘अशा तत्त्वाचे का अनुसरण सोडूनचि भले
करावा ऐसा का सलिल-तनुचा गौरव बरे’
।। 10.2 ।।
विचारी का ऐसे जननि मजला आजचि असे
असे तूची तेचि खचितच महा ब्रह्मपद ते ।
अगे तूही मायाविरहित निराकार असशी
अगे अज्ञानाचा घनतम निवारी सहजची ।। 10.3 ।।
तुझी धारा वाहे अविरत; नसे नाश तुजसी
करी ना भेदासी हृदय तव गे निर्मळ अती ।
दिसे ना डोळ्यांना जननि असुनी ब्रह्मपद ते
परी चिद्रूपाची सगुण पुतळी तू मज दिसे ।। 10.4 ।।
---------------------------------------------------
Comments
Post a Comment