श्लोक 1 ते 17 संस्कृत, मराठी विश्लेषणासहित
श्लोक 1 ते 17 संस्कृत, मराठी विश्लेषणासहित
जगन्नाथ पण्डितकृता पीयूषलहरी / गङ्गालहरी (विश्लेषण)
पेरुभट्ट आणि लक्ष्मी
ह्या अत्यंत विद्वान तेलंगी ब्राह्मण दाम्पत्याच्या पोटी जन्मलेला जगन्नाथराय हा
मुलगा गङ्गालहरी ह्या काव्याचा कवी. वडिलांनाच महागुरू मानून
त्यांच्याकडूनच जगन्नाथाने विद्या संपादन केली. (त्यांच्या रसगंगाधर ह्या ग्रंथात
वडिलांचा महागुरू असा उल्लेख आहे.) जगाला दीपविणारी विद्वत्ता, उत्तम शरीरसंपदा आणि
तारुण्य असलेल्या ह्या सरस्वतीच्या पुत्रावर लक्ष्मीची कृपादृष्टी नव्हती. अर्थातच
त्याच्या महत्वाकांक्षी मनाला स्वस्थ बसणे मानवले नाही. त्याने सरळ दिल्लीची वाट
धरली.
मोगल साम्राज्यात
शहाजहानच्या पदरी तो स्थिरावला. बादशहाची मुलगी लवंगिका ह्या तडफदार कवीवर भाळली
होती. एक दिवस बादशहा शहाजहान आणि जगन्नाथ पंडित बसलेले असतांना अचानक लवंगिका
तेथे आली. बादशहाने ह्या शीघ्रकवीला स्वतःच्या मुलीवरच त्याक्षणी काव्य करुन
दाखवायची आज्ञा केली. जगन्नाथ पंडिताची रसवंती पाझरु लागली. त्याने केलेले ते
उत्तम काव्य ऐकल्यावर प्रसन्न झालेल्या बादशहाने त्याला `काय पाहिजे ते माग' असं सांगितले आणि जगन्नाथ पंडिताने लवंगिकेचीच मागणी केली. एक तर जगन्नाथ पंडिताचं
वय लवंगिकेपेक्षा बरच जास्त होतं आणि तो हिंदू म्हणजे बादशहाच्या दृष्टीने काफर
होता. पण-- नाईलाजाने बादशहाला त्याची मागणी पूर्ण करायला लागली. बादशहाने
जगन्नाथ पंडिताला घर,सम्पत्ती जहागिरीही दिली.
पण एका यवन कन्येबरोबरचा तो विवाह हिंदू आणि मुसलमान दोन्ही पक्षांना
सारखाच अमान्य होता. औरंगजेब राज्यावर आल्या आल्या त्याने जगन्नाथ पंडिताची जहागिरी, संपत्ती जप्त केली.
दोन्ही समाजाने वाळीत टाकलेला जगन्नाथ पंडित उघड्यावर पडला. त्याला
गंगामातेच्या किनार्याशिवाय कोणाचाच आधार उरला नव्हता. एक दिवस पहाटे लवंगिकेच्या
उरलेल्या एकमेव वस्त्रावर स्वतःच्याही शरीराची लाज झाकत लवंगिकेजवळ गंगेच्या
घाटावर झोपलेल्या जगन्नाथ पंडिताकडे अप्पय्या दीक्षितांची नजर गेली. अप्पय्या दीक्षित ह्या व्याकरण पंडितांने आधीही ‘हा कसला कवी?’ म्हणून जगन्नाथ पंडितांची वारंवार
अवहेलना केली होती. आता तर दयनीय अवस्थेत झोपलेल्या जगन्नाथाला पाहून अप्पय्या दीक्षित खवचटपणे म्हणाले,--
‘‘किं निःश्शङ्कं शेषे शेषे वयसि त्वमागते मृत्यौ।
अथवा सुखं शयीथाः निकटे जागर्ति जाह्नवी भवतः।।’’
‘‘अरे, मृत्यू जवळ
आल्यावर जीवनाच्या अंतिम समयी सुद्धा काही लाज लज्जा न बाळगता कोडग्यासारखा झोपतोस
तरी कसा?’’ निर्धन झालेल्या जगन्नाथ
पंडिताला हिणवत परत तो म्हणला, ‘‘झोप बाबा सुखाने झोप. तू झोपलास तरी तुझ्याजवळ
गंगा तर सतत जागी आहे!’’ सर्व ऐश्वर्य तर कधीच निघून गेलं आहे. गंगेच्या घाटाशिवाय
तुला रहायला घर कुठे आहे? गंगेशवाय तुला कोणाचा आसरा नाही. हे जणू त्याचे जळजळीत शब्द सूचित करत होते. अप्पय्याच्या
वाग्बाणाने विद्ध झालेला जगन्नाथ अप्पय्याला काही बोलला नाही. पण मनातील उठलेलं
काहूर शांत कसं होणार? ‘खरय माय’, त्याने गंगेकडे दृष्टिक्षेप टाकला. ‘तुझ्याशिवाय
मला दुसरं आहेच कोण? आणि माय तू असलीस तर दुसरं कोणी असायला कशाला पाहिजे?’ मनात
उचंबळून आलेल्या सर्व भावना अनन्यभावाने गंगेच्या स्तुतीपर एका एका श्लोकातून
उत्स्फूर्तपणे त्यांच्या मुखातून बाहेर पडू लागल्या. जणु गंगेपर्यंत उतरण्यासाठी---
नव्हे नव्हे गंगेने एक एक पायरी वर चढत येण्यासाठी बावन्न श्लोकरूपी पायर्या
असलेला गंगालहरींचा मनोरम घाट जगन्नाथ बांधत होता. गंगेसाठी पायघड्यांप्रमाणे
अंथरलेल्या मखमली रत्नजडित श्लोकांवरून गंगेला एक एक पायरी चढून वर यायला भाग
पाडलं त्यानं. बावन्न पायर्या चढून शेवटच्या श्लोकाला जगाने दूर लोटलेल्या ह्या आपल्या पुत्राला
लवंगिकेसह तिने आपल्या कुशीत घेत आपल्यात सामावून घेतलं तीच ही गंगालहरी! जगन्नाथ
पंडित आपल्या काव्याला पीयूषलहरी म्हणतात.
‘दिल्लीश्वरो वा
जगदीश्वरो वा’ म्हणजे मी दिल्लीश्वराच्या पायी तरी राहीन किंवा जगदीश्वराच्या तरी
पायी लीन होईन असे म्हणणारा हा महाकवी संस्कृत साहित्याला मोलाचे योगदान देऊन
गंगेत विलीन झाला.
मित्रांनो, एखादी अमर कलाकृती टोकदार भाल्याप्रमाणे हृदयात घुसते
आणि कायमची तिथेच विसावते. त्यातील भावभावनांच्या छटा मनात कायमचं काहूर माजवून
जातात. अस्वस्थ करतात. चकवा लागल्या प्रमाणे त्याच्याभोवतीच मनाला फिरत ठेवतात.
17 मे ते 25 मे ला येणार्या
गंगादशहराच्या निमित्ताने ह्या अनुपम स्तोत्राचा आस्वाद मराठीतही घेता यावा म्हणून
गंगालहरींना मराठीत विश्लेषण आणि भावानुवादित करुन उद्यापासून आपल्यासारख्या
रसिकांसमोर ठेवत आहे. ह्या गंगालहरी वाचतांना आपल्या मनात आनंदलहरी निर्माण करतील
अशी आशा आहे.
--------------------------------------
हे नीरगात्री गंगे, तू उताराकडे वहात
जाणारी निम्नगा! पण हे माय, तुझ्या भक्तांना मात्र तू बोट धरून वैराग्याची एक एक
पायरी चढवत नेतेस आणि स्वतः स्वर्गापर्यंत पोचणारा स्वर्गसोपान होतेस. माय, जगाने
झिडकारलेल्या तुझ्या निःसीम भक्ताला जगन्नाथ पंडिताला आणि लवंगिकेला लेकरांप्रमाणे
तू कायमचं तुझ्या कुशीत घेतलस. त्याच्या पीयूष लहरींच्या अमृतस्पर्शाने जगन्नाथ
आजही अमर झाला. जगन्नाथाचा ‘‘प्राणप्रयाणमहोत्सव’’ मी ‘गंगालहरीं’च्या साक्षीने
अनुभवणार आहे. तुझ्या शांत गंभीर लहरींप्रमाणे हे ‘शिखरिणी’ वृत्त शब्दांना एकतारी
प्रमाणे मंद सुरेल साथ देत राहील. त्याच्यासवे माझा मराठी भावानुवादाचा छोटासा
दीप, तुझ्या प्रवाहात सोडत आहे. त्याला तुझ्या लहरींसवे डुलत डुलत पार करव.
गुणाढ्याने लिहीलेल्या बृहत्कथा ह्या
विशाल ग्रंथांचे एक एक पान वाचून तो अग्नीत अर्पण करत गेला आणि अग्नी त्याला
भस्मसात करत गेला. तुझे तसे नाही. तू सर्वांना तारून नेतेस. खवळलेला भवसागरही पार
करवतेस; म्हणून, तुझ्या प्रवाहात सोडलेला भावार्थदीप लाटांसोबत जपून पुढे नेशील ह्या
विश्वासाने तो तुला अर्पण करत आहे.
लहानपणी माझ्या हाती गंगालहरीचा अनुवाद
ठेवणार्या वामन पंडित , ल.गो. विंझे, द.कृ. पाध्ये ह्या पूर्वसुरींना नमन करून मी
गंगालहरीचा भावानुवाद/ गद्य-पद्य विश्लेषण काव्यात सांगत आहे.
------------------------------------
श्लोक 1
हे गंगा मैय्या तुझ्या ह्या निर्मल जलाचा महिमा मी काय आणि कसा वर्णन करू?
तुझ्या निर्मल जलाची गोडी, विपुल जलौघाचा विशाल विस्तार, जलाचा निरंतर टिकणारा
ताजेपणा सर्वच अलौकिक आहे. (तळटीप पहावी)
‘‘हे गंगामाते, वसु म्हणजे धन, दौलत. ही वसुंधा सर्व प्रकारच्या
ऐश्वर्याने सम्पन्न आहे. परंतु ह्या वसुंधरेला सम्पन्न, वैभवशाली करण्यात तुझं
योगदान फार मोठं आहे. तुझ्या सहभागाविना ही धरित्री इतकी सुजला, सुफला, सस्य
श्यामला झाली नसती. तिची खरी समृद्धी, सम्पन्नता, श्रीमंती ही तूच
आहेस.
गंगा जल हेच तुझं स्वयंसिद्ध ऐश्वर्य आहे. तुला ते उदारहस्ते शिव, विष्णु
वा कोणत्या देवाने बहाल केलेलं नाही तर, ते तुझं अंगभूत ऐश्वर्य आहे. तुझं हे
निर्मल जल तुला सर्वोच्च पदी विराजमान करतं. तुझं हे ईशित्व, योग्यता,
सामर्थ्य, सम्पन्नता, निरिच्छता, दुसर्याला उदारहस्ते ऐश्वर्य प्रदान करण्याचा
मोठेपणा, तुझी दीन दुःखितांविषयी असलेली करुणा, प्रेम ह्या सर्व गुणांमुळेच तर
भगिरथाने तुला भूतलावर आणलं. आणि तूही सर्व सगर पुत्रांचा उद्धार
केलास.
ज्याप्रमाणे अलंकारांनी नटलेल्या लावण्यवतीला माथ्यावरचा
सौभाग्याचा कुंकुमतिलक विशेष शोभून दिसतो त्याप्रमाणे ह्या वसुंधरेवर
सौभाग्याचा तिलक लावल्याप्रमाणे तुझं गंगाजल मनोरम आहे. हे गंगा जल ह्या वसुधेचं सौभाग्य आहे.
तुझ्या प्रवाहात कधी जलाची कमतरता नसते. तुझा विशाल
जलप्रवाह अलोट जलानी तुला समृद्ध करतो. तुझं जल अनेक गुणांनी श्रीमंत आहे. ते अमृताप्रमाणे मधुर आहे.
माय! बाळाच्या मुखातून निघालेल्या सुभाषिताने जसा आईचा सुसंस्कृपणा कळतो
तशी तुझ्या तीरावरील समृद्धी पाहून तुझ्या जलाच्या महान ऐश्वर्याचा सहज अंदाज करता येतो. तुझ्या जलाच्या सम्पन्नतेची
, वैभवाची चुणूक तुझ्या तीरावरची सुबत्ता, मुबलकता पाहून समजते. तुझे किनारे
सुजल असल्याने धनधान्य, तरुलता, वनश्री, पक्षी, प्राणी आणि मानव संस्कृतीं हयांची
कायम भरभराट करत राहतात. हे भगवती गंगे, समग्र ऐश्वर्य, समग्र धर्म, समग्र यश,
समग्र श्री, पूर्ण ज्ञान, पूर्ण वैराग्य ह्या सहांच्या समुच्चयाला भग म्हणतात. हे
परम ऐश्वर्य तुझ्यापाशी असल्यानेच तुला ‘भगवती गंगे’ असं संबोधलं जातं.
आद्य शंकराचार्य तुझं वर्णन करताना म्हणतात,
त्रैलोक्याचे असे तू, त्रिभुवनजननी सार सामर्थ्य,शक्ती
।
येई ना या जलाची, लवभर सरही ,वस्तुसी कोणत्याही
।।
अक्राळविक्राळ, बलाढ्य संकट असो वा भीषण समस्या; त्यांना छिन्नविच्छिन्न
करण्यासाठी शिव समर्थ आहे. नित्य शस्त्रसज्ज आहे. त्यासाठीच त्याने हातात कायम
परशू धारण केला आहे. म्हणूनच शिवाला खंडपरशू म्हणतात. तो देवांचाही देव महादेव जणु काही खेळाखेळात करावीत इतक्या
सहजगत्या हे 14 भुवनांचं सर्व विश्व निर्माण करतो. ज्या महादेवाच्या पायाशी सर्व
प्रकारचं अद्भुत सामर्थ्य, ऐश्वर्य लोळण घेतं, त्या महादेवालाही गंगा हे त्याचं
महान ऐश्वर्य वाटतं. म्हणून तो तिला आपल्या माथ्यावर धारण करतो.
चांगल्या मनाच्या लोकांना सुमन म्हणतात. देवांनाही सुमन किंवा सुर
म्हणतात.(सुष्ठ राति - सुष्ठु म्हणजे जनहिताचं, कल्याणकारी. राति म्हणजे देतात ते सुर! ) देव कायम लोकांच्या हिताची कामं करतात.
म्हणुनच त्यांना सुर म्हणतात. देव जी काही सत्कृत्य करतात, लोकांच्या हिताचं काम
करतात, त्याचं दृश्य स्वरूप, कृतीचा परिपाक/परिणाम म्हणजे तूच आहेस. कारण जगाच्या
हितासाठी झटण्यापलिकडे तू काही जाणत नाहीस.
तुझा हा विशाल प्रवाह कायम सर्व भूतमात्रांचं कल्याण करण्यासाठीच वाहत
असतो. माय, वेद तरी वेगळं काय सांगतात गं? विमोह टाकुन कर्मफळाचा सिद्ध होई पार्था । कर्तव्याने घडतो माणुस जाणुन
पुरुषार्था हेच
तर सांगतात ना? तुझं नावच गंगा! गंगा म्हणजे कायम पुढे पुढे जाणारी. मागे वळूनही
तू पहात नाहीस. दोन्ही किनार्यांना सुबत्तेचं भरभरून, विपुल दान देऊनही तुझ्या
निरिच्छ मनाला कुठल्याही फळाची आशा नाही.
पतित-पावना हे जननी मम। परोपकारास्तव तव जीवन
तुझ्या तिरावर राहती त्यांचे। कौतुक पुरविसी कल्पलतेसम
चारही वेदांची शिकवण सत्यात आणणारा असा हा तुझा जलप्रवाह आहे. माय,
तुझ्या तीरावर विचारांनी समृद्ध असलेल्या संस्कृतिंचा उदय झाला. त्यांची भरभराट
झाली; वेद हे त्याचंच फलित आहेत. ह्या वेदांचं सारं सर्वस्व तूच आहेस.
अमृताहून गोड असलेलं तुझं पाणी अनेक जीवांना जीवन देणारं आहे. अमृत मृतांना
संजीवनी देतं. त्याप्रमाणे सर्व जीवसृष्टीला संजीवनी देण्याचं काम तू करतेस. जीवन
प्रदान करतेस. त्यांना जगवतेस, फुलवतेस, समृद्ध करतेस. अमृत आणि अमृतासमान तुझं
गोड पाणी ह्यात काही अंतर आहे असं मला वाटत नाही.
तसं पाहिलं तर ही सुधा आणि तुझी ही सुधाधारा दोघीही जणु जुळ्या बहिणी
वाटाव्या इतकं तुमच्यात साम्य आहे. तुमच्या कृती सर्व जीव जंतूना उत्तम आयुष्य
आरोग्य देतात. जीवन प्रदान करतात. तू समुद्राला मिळतेस तर सुधा ही सिंधूतच होती.
समुद्रमंथनाच्यावेळी ती बाहेर आली. समुद्रातून बाहेर आलेला सुधांशु(चंद्र) हाही
अमृत किरणं बरसवत असतो. त्यामुळे सुधा, सुधांशु आणि गंगा तुम्ही
एकमेकांची भावंडे आहात. सुधा आणि सुधांशु प्रमाणे शांत, शीतल, निस्वार्थपणे
वाहणारा हा तुझा जलौघ हित, कल्याण, परोपकार करतच पुढे जातो.
केले विश्व पवित्र मंगलमयी पृथ्वीस आनंदवी
श्रद्धास्थानचि वाटते मम हृदी ऐसीच भागीरथी
नाशी पाप अमंगलास अवघ्या दुःखे करी दूर जी
माझे रक्षण ती करो; मम हिता पाहो सदा जाह्नवी।।
--------------------------------
(वृत्त- शिखरिणी अक्षरे
- 17, गण- य म न स भ ल ग ,
यति
- 6, 11 )
समृद्धं सौभाग्यं सकलवसुधायाः किमपि तन्-
महैश्वर्यं लीलाजनितजगतः खण्डपरशोः।
श्रुतीनां सर्वस्वं सुकृतमथ मूर्तं सुमनसां
सुधासोदर्यं* ते सलिलमशिवं नः शमयतु।।1
अन्वय - भो गंगे, सकलवसुधायाः किमपि समृद्धं सौभाग्यं , लीलाजनितजगतः
खण्डपरशोः महैश्वर्यं, श्रुतीनां सर्वस्वं, सुमनसां मूर्तं सुकृतं, अथ सुधासोदर्यं
तत् ते सलिलं , नः शमयतु (1)
(भो गङ्गे!) हे गंगे ते-
तुझे तत् – ते सलिलं-
जलप्रवाह नः – आमच्या अशिवं – अपवित्र शमयतु – शमवो. नाश
करो. यत् - जे सकल वसुधायाः
– संपूर्ण पृथ्वीचे किमपि – अवर्णनीय, अमूल्य समृद्धं - समपन्नता सौभाग्यं
- , लीलाजनितजगतः – ज्याने विना सायास ही 14 जगे निर्माण केली आहेत
तो खण्डपरशोः – शत्रूचे खंडन/ नाश
करणारा परशु ज्याच्या जवळ आहे असा शिव महैश्वर्यं- असीम सम्पत्ती श्रुतीनां
- वेदांचे सर्वस्वं – संपूर्ण धन सर्वस्व, सुमनसां- पवित्र मनाच्या देवांचे
मूर्तं -मूर्तिमंत सुकृतं - पुण्य सुधासौंदर्यं - अमृतासमान शोभा / सुधासोदर्यं –
अमृताची बहीण असणं
(सुधासोदर्यम्* - सुधा म्हणजे अमृत हे
समुद्रमंथनातून बाहेर आले तर गंगा समुद्रात विलीन होते. एकाच समुद्राच्या पोटी
असलेल्या या जणु सख्या बहिणीच आहेत. त्यांचे गुण ही सारखेच आहेत. दोघीही
कल्याणकारीच आहेत असा अर्थ अभिप्रेत आहे. काही ठिकाणी सुधासौंदर्यम् असा पाठही आहे. अर्थात
ह्याचाही अर्थ अमृताप्रमाणे सौंदर्य असलेली म्हणजेच कल्याणकारी असाच आहे. )
खुले भाळी जैसा तिलक जणु लावण्यवतिसी
तसे गंगेचे हे सलिल नटवी ह्या अवनिसी ।
असे सौभाग्याचे प्रतिक जल हेची धरतिचे
असे गंगामाते तव सलिल ऐश्वर्य क्षितिचे ।। 1.1 ।।
सदा राहे तूची मधुर जलसम्पन्न सरिते
असे कल्याणाची सुखद पुतळी तूचि सरिते ।
तृषार्ता पृथ्वीची शमविसिच तृष्णा तव जले
असे गंगाम्बु हे विभवचि स्वयंसिद्ध तव गे ।।1.2 ।।
सुधाधारा ह्या गे हरित अवनी ही फुलविती
तुझ्या मार्गामध्ये उधळण सुखाचीच करिती ।
फळांनी पुष्पांनी नटवि वसुधा तू सुरधुनी
महीची तृप्ती तू, बहु सुख समाधान असशी ।। 1.3।।
जयाच्या खड्गाने रिपु सकल ते दुष्ट वधिले
जगाची उत्पत्ती अति सहज ज्या खेळचि असे
अगे शंभू तोही तव सलिल सामर्थ्य बघुनी
तुला सन्मानाने मिरवित असे का नित शिरी ।। 1.4 ।।
तुझी धारा शुभ्रा स्फटिक धवला शुद्ध सरिते
सुधेची तू शोभे भगिनि दुसरी कल्पलतिके
असे तू वेदांचे उजळ अवघे पुण्य बरवे
असे वा देवांचे सुकृत नयना जे दिसतसे ।।1. 5 ।।
सुधेलाही जिंके मधुमधुर हेची जल तुझे
मृतालाही ज्याने अति सुखद संजीवनि मिळे
सदा चैतन्याने उसळत असे जे जल तुझे
अनर्थांसी सार्या नित शमवु दे माय मम गे ।।1.6 ।।
----------------------------------------
तळटीप - गंगाजलामधे
असलेले बॅक्टेरिओफेज नावाचे उपयोगी बॅक्टेरिया
गंगेच्या पाण्यातील बाकी विषाणुंना खाऊन टाकतात. गंगाजलात असलेलं
गंधकाचं सूक्ष्म प्रमाण आणि ऑक्सिजनचा असलेला एक विशेष प्रकार (ड्युटेरॉन नावाचा
आयसोटोप) गंगेचं पाणी स्वच्छ ठेवतो. ह्या विशिष्ट द्रव्यांमुळे आणि विशेष अशा
सूक्ष्म जीवांमुळे इतर सर्वसाधारण पाण्याप्रमाणे गंगाजल कधी
खराब होत नाही, नासत नाही.
----------------------------------------
श्लोक 2
हे माते तू तर गुरूमाऊली आहेस. तुझ्या प्रवाहाकडे एकदा नुसती नजर
जरी टाकली तरी ती हटत नाही. तुझ्या विशाल प्रवाहाकडे पाहता कोणीही आपल्या कोत्या
कूपमंडूक प्रवृत्तीचा त्याग करेल. तुझी धीर गभीर धारा पाहून मनाचा उथळपणा जाऊन
त्याच्या विचारांना सद्गुणांची, सद्विचारांची,
सत्प्रवृत्तिची खोली लाभेल. तुझा निरंतर वाहणारा प्रवाह मनातील आळसही वाहून नेईल.
सर्व भूतमात्राच्या हितासाठी समर्पित केलेलं तुझं जीवन पाहता मनातील स्वार्थी,
तुच्छ विचार, लोभ, मोह कसे बरं टिकतील? तुझा सर्वांप्रति समभाव पाहून मी, माझा,
माझ्यासाठी असे संकुचित स्वार्थी विचार वाहून जातील.
माय! अर्धवट ज्ञान किंवा अज्ञानाचा अंधार मोठी विचित्र परिस्थिती
निर्माण करतो. अर्धवट उजेडात दोरीही सापासारखी दिसू लागते त्याप्रमाणे अज्ञानामुळे
नाही नाही त्या गोष्टी खर्या वाटतात. तर योग्य गोष्टींचं आकलन होत नाही. लहानपणी
विचारांना परिपक्वता नसल्यामुळे ज्या बागुलबुवाची क्षणोक्षणी धास्ती वाटते. तो
बागुलबोवा थोडी समज वाढताच नष्ट होतो. माय! त्याप्रमाणे अज्ञान, विद्येचा अभाव
मनात अविद्येचा, भयाचा एक महा प्रचंड, काल्पनिक वृक्ष तयार करतो.
काही अंजन इतकी प्रभावी असतात की, त्याच्यामुळे इतरांना सहजी न
दिसणार्या गोष्टी त्याने दिसू लागतात. गुरू ज्ञानरूप अंजन जेव्हा शिष्याच्या
डोळ्यात घालतो, तेव्हा त्याला ज्ञानाची अज्ञानभेदक दूरगामी नजर प्राप्त होते. तुझा
हा अमोघ जलौघ माणसाच्या मनातील अज्ञान दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा गुरू आहे.
ज्ञानाच्या प्रकाशाचं अस्तित्व हे अज्ञानाचा अंधार, भयाचा बागुलबोवा तात्काळ दूर
करतात.
हे माय, धनाची समृद्धी तर तुझ्या ह्या जलौघामुळे लाभतेच लाभते. अजून
मनाच्या कोतेपणला, मनाच्या दारिद्र्याला तू दूर करतेस. तुझा हा अखंड वाहणारा
प्रवाह आमच्या तन मन धनास अजून समृद्ध करो. (2)
दरिद्राणां दैन्यं दुरितमथ दुर्वासनहृदां
द्रुतं दूरीकुर्वन्सकृदपि गतो
दृष्टिसरणिम्।
अपि द्रागाविद्याद्रुमदलनदीक्षागुरुरिह
प्रवाहस्ते वारां श्रियमयमपारां
दिशतु न:।।2
अन्वय – (भो गंगे), इह दृष्टिसरणिं सकृत् अपि गतः (सन्)
दरिद्राणां दैन्यं , अथ दुर्वासनहृदां दुरितं अपि द्रुतं दूरीकुर्वन्, द्रागाविद्याद्रुमदलनदीक्षागुरुः
अयं ते वारां प्रवाहः, नः अपारां श्रियं दिशतु।
अन्वयार्थ - (भो गङ्गे! ) इह दृष्टिसरणिं -
नेत्रमार्गाप्रत सकृत् अपि – एकदा जरी
गतः(सन्) – प्राप्त झाला असता दरिद्राणां
दैन्यं – दीन जनांचे दारिद्र्य, अथ- आणि दुर्वा़सनहृदां – ज्यांच्या मनात दुष्ट
वृत्ती राहते असे, पापी पुरुषांचे दुरितं - पाप अपि- सुद्धा दृतं-
तात्काळ दूरीकुर्वन्- दूर करणारी द्राक् - शीघ्र अविद्याद्रुमदलनदीक्षागुरुः-
माया, अज्ञान, मूर्खपणा त्यांचा जो द्रुम म्हणजे वृक्ष त्याच दलन
म्हणजे खंडन करण्याची दीक्षा देणारा गुरू अयं
– (जो) हा, , ते- तुझा वारां प्रवाहः – जळाचा प्रवाह, नः - आम्हाला अपारां- अपरिमित श्रियं-
सम्पत्ती दिशतु- देवो. ।
जलौघासी पाहे निमिषभर जो दीन कुणिही
तयाच्या दैन्याची जननि न निशाणीहि उरवी
मनी दुष्टांच्याही कणव अति
निर्माण करिसी
प्रवृत्ती पापाची सकल करिसी ध्वस्त मनिची ।।2.1
मनी फोफावे जो सघन तरु अज्ञानस्वरुपी
करी त्याचे उन्मूलन सहजि लाटा सुरधुनी
गुरू तो शिष्याला सजग करी ज्ञानांजनबळे
जलाने गे तैसे मम सकल अज्ञान हरणे।।2.2
गुरू माऊली तू तवची जलधारा पुनित ही
मनाच्या अज्ञाना अति जलद टाकी निरसुनी ।
तुझी धारा वाहे अविरतचि माते सुखमयी
हरो ती पापांना करुनि मजला मंगलमयी ।। 2.3
-------------------------------------------------------
श्लोक 3
कुठल्या मनस्विनी स्त्रीला सवत आवडेल? आपल्या पतीने महाक्रोधाने सर्व जगाचा
नाश केल्यावरही, जी पत्नी कुठलाही राग व्यक्त न करता, फिरून सर्व विश्व तितक्याच
आस्थेने , प्रेमाने निर्माण करते; अशा कर्तबगार पार्वतीला तर सवत कशी रुचावी? ती सवत जर सुंदर, सुस्वाभावी, सुशील, कुलीन गंगा असेल
आणि
पतीने तिला त्याच्या डोक्यावर बसवलं असेल तर पत्नीला राग येणं स्वाभाविकच आहे.
पार्वतीच्या तळपायाची आग मस्तकी गेल्यावर प्रत्यक्ष महादेवांनाही तिच्या लाथेचा
तडाखा माथ्यावर सहन करायला लागला. (त्याची
रोचक गोष्ट तळटिपेत देते) मग प्रत्यक्ष सवतीला म्हणजे गंगेला हिमाद्रिकन्येची दहशत
वाटणं उचितच आहे.
सूर्य उगवल्यावर काही लपून रहात नाही सर्व काही स्वच्छ दिसतं. तसच
महादेवांच्या आणि गंगेच्या नात्याचे बिंग फुटलं आणि उमादेवींना सर्व प्रकार अवगत
झाला तेव्हा गिरिजेचा महा राग माहित असल्याने गंगेचा नुसता थरथराट होणं स्वाभाविकच आहे. जणु काही तिच्या लाटा
गगनाला भिडल्या. गंगेचं उसळणारं पाणी पाहून कवी मनाच्या जगन्नाथाच्या
कल्पनाशक्तीचा वारूही भरधाव उधळला नाही तरच नवल!
ह्या श्लोकात पंडितराय म्हणतात, पतिचं हे कपट उघड होताच, पार्वतीचे
नेत्र महादेवांच्या माथ्यावरील जटाजुटांमधे खेळणार्या, अल्लडपणे बागडणार्या
गंगेला पाहून, उदयाचलावर येणार्या लालबुंद सूर्यबिंबाप्रमाणे रागाने लाल झाले
आहेत. हे जननी, हे गंगा माते, तिच्या भीतीने तर तुझ्या ह्या नीरदेहाचा थरकाप होत नाही?
तिच्या जळजळीत कटाक्षाने तर तुझ्या ह्या लाटा उंच उंच उसळत नसाव्यात? ते काहीही
असो पण तुझ्या ह्या उंच उंच उसळणार्या लाटा सर्व भूतमात्रांचे कल्याणच करतात.
तुझ्या भयातही लोककल्याणच दडले आहे.
उदञ्चन्मार्तण्डस्फुटकपटहेरम्बजननी-
कटाक्षव्याक्षेपक्षणजनितसंक्षोभनिवहाः।
भवन्तु त्वङ्गन्तो हरशिरसि गंगातनुभुव-
स्तरङ्गाः प्रोत्तुङ्गा दुरितभयभङ्गाय भवताम् ।। 3 ।।
अन्वय – उदञ्चन्मार्तण्डस्फुटकपटहेरम्बजननीकटाक्षव्याक्षेपक्षणजनितसंक्षोभनिवहाः
हरशिरसि त्वगन्तः गङ्गातनुभुवः प्रोत्तुङ्गाः तरङ्गाः , भवतां दुरित भवभङ्गाय
भवन्तु ।
अन्वयार्थ –
उदञ्चन्मार्तण्ड- उगवणारा सूर्य; स्फुटकपट- कपट स्पष्ट
होता; हेरम्बजननी- गणपतीची आई म्हणजे पार्वती; कटाक्ष- नजरेचा कटक्ष;
व्याक्षेप- चिरकाल स्थिती; क्षणं – स्वल्पकाळ; जनित –
उत्पन्न; संक्षोभनिवहाः- भयांचा समूह; हरशिरसि शिवाच्या माथ्यावर; त्वङ्गन्तः
– कापतात, थरथरतात. गङ्गातनु – गंगेची तनू म्हणजे देह म्हणजे तिचा
प्रवाह; भुवः – उत्पन्न होतात; प्रोत्तुङ्गाः तरङ्गाः -अत्यंत उंच
उंच लाटा; भवतां - तुम्हा भक्त जनांच्या दुरितभय-
पाप,भय,भीती भङ्गाय भवतु – त्याचा भंग, नाश होवो ।
तुला मोहूनी गे शिव करि शिरी धारण तुला
लबाडी शंभूची पुरति कळता ती गिरिसुता ।
असूया ईर्षेने मनि जळफळे पेटुन उठे
हृदी गौरीच्या त्या जहरि सवतीमत्सर उठे ।। 3.1।।
तिच्या नेत्रांमध्ये जणु उगवतीच्या रविसमा
प्रकाशे लालीमा जणुचि करण्या खाक तुजला ।
उमा टाकी कैशी जळजळित दृष्टी तुजवरी
अगे पाणी पाणी तव हृदय हो त्या बघुनची ।। 3.2 ।।
शिवानीच्या ऐशा तिखटचि कटाक्षांस बघुनी
भवानीचा मोठा फणफुणत त्रागाच
बघुनी ।
भयाने काया का थरथरत राहे तव अशी
जणू वाटे गंगाधर-शिरि पदन्यास करसी ।। 3.3 ।।
नभाशी लाटा ह्या तव सहजि स्पर्धाच करिती
जणू त्या स्वर्गाचा अति सहज सोपान बनती ।
तुझ्या या उत्तुंगा लहरी मम कल्याण करु दे
धुवोनी पापांसी विमल करि सर्वां जननि गे ।। 3.4 ।।
---------------------------------------------------
(तळटीप -
सौंदर्यलहरी ह्या स्तोत्रात 86 व्या श्लोकात एक छोटी गोष्ट आहे.
पतीपत्नीमध्ये
गप्पा गोष्टी करतांना पतिदेवांना हमखास काही खोचक बोलायची हुक्की येते. तशीच उमेची
थट्टा करायची लहर शंभूदेवांना आली खरी पण चुकून त्यांच्या जिभेवरून ‘‘प्रिय
उमे’’ ह्या संबोधनाऐवजी ‘‘प्रिये गंगे’’ असे शब्द निसटले मात्र!
ही थट्टा जरा जास्तच झाली. उमेसारख्या तेजस्वी, लावण्यवती, मानिनीला आपल्या
पतिमुखातून सवतीचा इतक्या प्रेमळपणे झालेला उल्लेख कसा बरं सहन होईल? सर्व
विश्वाचा कारभार चालवणार्या, उमेसारख्या मोठा अधिकार असलेल्या पत्नीला तर हे कधीच
रुचणार नाहीत. ते शब्द एखाद्या शल्यासारखे तिच्या हृदयात घुसले.
थट्टा
करता करता चुकून जिभेवरून निसटलेले शब्द शंभूमहादेवांना महागात पडले. महा भयांकर
क्रोधाने उमेची तनुलता थरथरतांना पाहून शिवाला आपल्यावर होणार्या अंगार-वर्षावाचा
अंदाज आला आणि त्यानी तात्काळ गिरीजेच्या पायांवर त्याचे मस्तक झुकवून क्षमायाचना
केली. पण हाय रे हाय! पार्वतीच्या पायांची जोरदार लाथ त्याच्या कपाळावर बसली.
पती-पत्नीच्यामधल्या
ह्या भांडणप्रसंगाला कोणी शेजारी प्रेक्षक लाभला तर तो त्याचा चांगलाच
आस्वाद आणि आनंद घेतो. त्यातल्या त्यात तो जर कोणी शत्रुपक्षातला असेल तर मग काय
विचारता! त्याला हास्याच्या उकळ्या नाही फुटल्या तरच नवल! येथेही शिवाचा
कट्टर शत्रू हजर होता. बोलून चालून त्याला शरीर नसल्याने तो गिरिजेच्या लोभस चेहर्याचा
तर कधी सुंदर अवयवांचा आश्रय घेऊन राहतो. शिवाच्या कपाळावरील अग्निनेत्राने
त्याला जाळून अनंग /अंगहीन केले हे शल्य त्याच्या मनात खूप काळापासून होते. त्या
अग्निनेत्रावर असा सणसणित लत्ताप्रहार होताना पाहून, आपल्या शत्रूची अशी फटफजिती
होताना पाहून, अनंगाला खुदुखुदु हसू येऊ लागले. शिवमस्तकावरील प्रहारावेळी
उमेच्या पायातील पैंजणांमधून त्यावेळी जो किलकिल आवाज झाला तो पैजणांचा नसून
आनंदाच्या उकळ्या फुटणार्या मदनाच्या उपहास गर्भ खुदुखुद हसण्याचा असावा.अशी श्री
आद्यशंकराचार्यांनी केलेली सुंदर कल्पना आहे.
कधी गप्पागोष्टी करित असता
गे तुजसवे
जरा खोटे खोटे हसत वदता
खोचकपणे ।
मुखी शंभूच्या ये
चुकुन ‘‘प्रिय भागीरथि’’ असे
रुचावे कैसे ते वचन अपमानीत
करि जे ।।
ढळे जिह्वा ऐसी दुखवि
गिरिशाची तव हृदी
तनु कापे त्याने, विपुल उसळे
क्रोध हृदयी ।
कळाले शंभूसी धडगत न त्याची
लव मुळी
इलाजासी त्याच्या शरण तुज
जाणे उचितची ।।
जरी घाली लोटांगण तव पदी
शंभुशिवही
कपाळी शंभूच्या त्वरितचि पदाघात करिसी ।
अनंगासी होई सुख बघुन हे दृश्य भलते
म्हणे तो आहाहा! मम विजय हा
थोरचि असे ।। )
---------------------------------------------------
हे माय, तुझं जवळ असणच लेकरासाठी केवढं
दिलासादायक, आश्वस्त करणारं असतं. आई त्याच्या पाठीशी उभी आहे; ह्याचा त्याला
केवढा भक्कम आधार वाटतो; मग काय पत्रास बाकीच्या कोणाची! जगाचीही त्याला भीती वाटत
नाही. आईला घातलेली प्रदक्षिणा विश्व प्रदक्षिणा ठरते. गगनाला गवसणी घातल्याप्रमाणे
अभिमानास्पद कामगिरी वाटते हे गजाननाने दाखवून दिलं.
तू माझ्या पाठीशी आहेस, तू कोणाला माझा केसही
वाकडा करू देणार नाहीस; ह्या प्रचंड आत्मविश्वासाच्या जोरावर माय माझ्या हातून
अनेक चुका झाल्या. तुझ्या उज्ज्वल प्रतिमेपुढे मी देवांनाही तुच्छ समजून
अविचाराने, त्यांची अवज्ञा केली. अनादर केला. आपल्या लेकराचा हा बेछूट उद्धटपणा, सहन
न झाल्याने तर तू माझ्यावर रागवली नाहीस ना? एकतर देवांचा अनादर केल्याने ते आता
माझ्या मदतीला कसे धावून येतील? त्याच्या लेखी मी तर नसल्यातच जमा आहे. आता तूही रागावून
माझ्याकडे अशी पाठ फिरवली आहेस. रागावलेल्या आईच्या पायाला मिठी घालून ‘तूच मला
उचलून घे’ असं सांगत रडण्यापलिकडे बालक काय करू शकेल? माय तू माझं सर्वस्व आहेस.
तूच मला झिडकारलस तर मी पूर्णपणे अनाथ, निराधार होऊन जाईन. दोर तुटलेला पतंग जसा
गोते खात काटेरी झुडपात, इकडे तिकडे अडकुन फाटून तुटून जातो. त्या पतंगाप्रमाणे
मीही केविलवाणा, दीन होऊन जाईन. माय तू दूर लोटणं ही कल्पनाच अंगावर वीज कोसळल्याप्रमाणे
असह्य, जाळून टाकणारी आहे.
माय, आईच्या स्तन्यावर जगणारं लेकरू आईनी
टाकून दिलं तर जगू शकेल काय? लेकरू दाणगट, व्रात्य आहे म्हणून आई त्याला कधी सोडून
देते का गं? एकवेळ सार्या जगाने मला सोडलं तरी मला चालेल. जग माझ्याकडे पाहून
कितीही कुत्सितपणे हसू देत. मला त्यांची पर्वा नाही पण तू मला दूर लोटू नकोस. तू
नसलीस तर मी कोणाच्या कुशीत शिरुन माझ्या आसवांना वाट मोकळी करून देऊ?
तवालम्बादम्ब स्फुरदलघुगर्वेण सहसा
मया सर्वेऽवज्ञासरणिमथ नीताः सुरगणाः।
इदानीमौदास्यं भजसि यदि भागीरथि तदा
निराधारो हा रोदिमि कथय केषामिह पुरः।। 4 ।।
अन्वय – हे अम्ब , तव आलम्बात् स्फुरदलघुगर्वेण मया , सहसा सर्व
सुरगणाः अवज्ञासरणिं नीताः । अथ हे भागीरथि, (त्वं) इदानीं यदि औदास्य भजसि तदा निराधारः (अहं) इह केषां
पुरः हा रोदिमि ( तत् त्वं एव कथय) (4)
अन्वयार्थ - भो अम्ब! – हे जननि; तव- तुझ्या; आलम्बात्-
आश्रयामुळे ; स्फुरन् अलघुः गर्वेण- ज्याचा दर्प अत्यंत वाढला आहे अशा; मया
– म्या/मी; सर्वे – संपूर्ण सुरगणाः – देवांचे ताफे, समूह अवज्ञासरणिं
-अवहेलनेच्या मार्गावर (सरणिं -पथावर) सहसा – अविचाराने, अकस्मात्;
नीताः – नेले; भो भागिरथि – हे भगीरथि, हे गंगे; इदानीं - आता उद्धरण
समयी; यदि – जर; औदास्यं भजसि
– उदासीन क्रियाशून्यत्व अंगिकारलेस; तदा-
तर; निराधारः अहं – आधार सुटलेला, आधारहीन असा मी; इह – या लोकी; केषां
– कोणाच्या; पुरः – पुढे; रोदिमि - रडू? हा! – हाय हाय!; इति – हे; त्वं
कथय – तूच सांग. (4)
अगे माझ्या पाठी जननि नित खंबीर असता
कुणा भ्यावे मी का? मजसि तव आधार असता ।
असे वाटूनी मी जननि अविचारीच बनलो
कुचेष्टा देवांची करुन उपहासेच हसलो ।। 4.1।।
रुचावे कैसे गे तुजसि मम उद्दामपण हे
कुचेष्टा देवांची करुन हसणे उद्धटपणे ।
अगे मांडे थट्टा सकल सुरवरांची नित नवी
सहाय्याला त्याच्या सुरवर कसे येतिल झणी ।। 4.2 ।।
अशा वेळी तूही नच जननि गे पाठ फिरवू
व्यथा सांगू कोणा? सुमुखचि कुणाचेच निरखू ?।
अगे उद्धाराचा समय मम येताच जवळी
अबोला ऐसा का जननि धरणे योग्य तुजसी ।। 4.3 ।।
अगे सोडूनी तू मजसि जरि जाशीलच अशी
अनाथासी कैसा तुजविणचि आधार जगती
कसा स्फुंदू माते शिरुनचि कुणाच्या कुशित मी
निराधारासी ह्या, तुजविण न कोणीच जगती ।। 4.4 ।।
---------------------------------------------------
श्लोक 5
हे जननी तू मनाची इतकी चांगली आहेस की, देव तर तुला पूजनीय (संसेव्य) मानतातच
पण, ज्या ज्या लोकांनी आयुष्यात कधीही चांगलं काम केलं नाही त्यांनीही तुझा नुसता
आठव करताच तू त्यांना भवसागरातून सुरक्षित तारुन नेतेस. किंवा गंगा ही स्वर्गातील
नदी असल्याने देवांची तृष्णा भागविण्यासाठी, पीण्यासाठी (संसेव्य) ते गंगाजलच
सुयोग्य समजतात.
हे गंगामैय्या, अंधार्या रात्री चंद्र आशेचे किरण घेऊन येतो; त्याच्या
सौम्य प्रकाशाने धीर देतो, मार्ग दाखवतो. माझ्या मनात निराशेचा अंधकार दाटला आहे.
त्यातून बाहेर पडायला कुठला मार्ग तरी कसा दिसेल? माझ्यासाठी एकमेव मार्गदर्शक प्रकाश
तूच आहेस. चंद्रप्रकाशाप्रमाणे माझ्यासाठी तू आशेचा प्रकाश आहेस. चंद्राच्या
प्रकाशाने घनदाट अंधार निघून जावा आणि हळुहळु रस्ता दिसायला लागावा त्याप्रमाणे,
माय तू माझ्या सोबत राहून मला योग्य मार्ग दाखवशील ही मला खात्री आहे. ‘बाळ, घाबरू
नकोस’ म्हणून आईने पाठीवर हात ठेवला की सर्व भीती पळून जाते. तू माझ्या मनातील
निराशेचा, अज्ञानचा अंधार दूर कर माय!
माय, मलाही माहित आहे की मी तुझा सुपुत्र नसून कुपुत्र आहे. पण माय, एका
हाताची सर्वच बोटं सारखी नसतात ना गं! मी केलेल्या पापाचरणांमुळे माझ्या मनाला
यातना होत आहेत. त्या व्यथेने माझा जीव अस्वस्थ आहे; तळमळत आहे. मी केलेल्या
कायिक, वाचिक, मानसिक सर्व पापांवर तूच एक उतारा आहेस. तूच औषध आहेस. तूच मला
तारून ने.
स्मृतिं याता पुंसामकृतसुकृतानामपि च या
हरत्यन्तस्तन्द्रां तिमिरमिव चन्द्रांशुसरणिः।
इयं सा ते मूर्तिः सकल-सुर-संसेव्यसलिला
ममान्त:सन्तापं त्रिविधमपि पापं च हरताम्।।5
अन्वय – (हे
गंगे), या अकृतसुकृतानां अपि पुंसां स्मृतिं याता च(सती) चंद्राशुसरणिः तिमिरं इव अन्तस्तंद्रां हरति।
सा इयं सकलसुरसंसेव्यसलिला ते मूर्तिः मम अन्तःसन्तापम् अथ त्रिविधं पापं च हरताम्
। (5)
अन्वयार्थ - हे गंगे!; या – जी; अकृत
– जे केले नाही ते; सुकृत – पुण्य; अपि – तरीसुद्धा; अकृतसुकृतानां अपि – पुण्य न
करणार्या; पुंसां – पुरुषांच्या; स्मृतिं – स्मरणाप्रत, याता
सती – प्राप्त झाली असता; सरणिः – रस्ता; चंद्रांशुसरणिः
– चंद्राच्या किरणांचा पथ; तिमिरं इव – अंधाराला जसा; अंतः
तंद्रा – अंतःकरणाील तंद्रा म्हणजे अज्ञानाला; हरति – नाश
करतो; सा इयं – ती ही; सकल सुर संसेव्य सलिला - सगळ्या
देवांना जिचे पाणी सेवनीय आहे अशी; सलिल मूर्तिः - तुझी
प्रवाहरूप मूर्ती; मम – माझ्या; अंतः – अतःकरणातील; त्रिविधं
पापं- कायिक, वाचिक, मानसिक अशी तीन प्रकारची पापं/दुष्कृत (आणि
पातकांपासून उत्पन्न झालेला); त्रिविधसंतापं –(आध्यात्मिक, आधिदैविक,
आधिभौतिक )अशा सन्तापं – दुःख, क्लेश हरताम्- दूर
करो. (5)
तमा सारी दूरी
कुमुदप्रिय तो चंद्रचि जसा
पथा दावी रात्री
घनतमि प्रकाशून पथिका ।
तसे तू हारी गे
सकल तिमिरासी हृदयिच्या
लया न्यावी पापे
त्रिविधचि जलानेच तुझिया ।।5.1।।
उभ्या जन्मी
ज्यांना कधिहि न सदाचार शिवला
अशाही पाप्यांनी
हृदयि करिता आठव तुझा।
महा दोषातूनी हसत
करिसी मुक्तचि तया
सदा देसी
स्फूर्ती विरघळवि त्यांची शिथिलता ।।5.2।।
असे देवांनाही जलतनु तुझी वंद्य जगती
/
(तृषा शांतीसाठी सुर तव जला प्राशन करी)
अगे पीडा देती त्रिविध मम पापे मज अती ।
करो त्या पीडेचे
निरसन तुझी नीरतनु ही
कृपादृष्टीने गे
तगमग मनीचीच शमवी।।5.3 ।।
---------------------------------------------------
(संसेव्य चे वंद्य असणे व प्राशन करणे
दोन्ही अर्थ आहेत.)
श्लोक 6
हे गंगे, हे जननी, तू वाहतच होतीस, वाहतच
असतेस निरंतर वाहत राहशील. तुझ्या ह्या अखंड प्रवाहाने तू तुझ्या दोन्ही तीरांना
समृद्ध बनवतेस. अलौकिक सुंदर बनवतेस. तुझ्या हया धीर गंभीर, वरतून शांत पण प्रवाही
जलौघाची ओढ भल्याभल्यांना भुरळ घालते. सहाजिकच आहे. जे जे भव्य, जे जे दिव्य
त्यापुढे कोणाचंही मस्तक सहजपणे झुकतं. तुझ्या विशाल पात्राला पाहून कोणालाही आपलं
क्षुद्रपण मनोमन जाणवायला लागतं.
तुझ्या ह्या समृद्ध ऐश्वर्यापुढे आपलं
सुवर्ण भांडार किति थिटं आहे, हिर्यामोत्याचे, रत्न माणकांचे खजिने किती क्षुल्लक
आहेत, तुझ्या झगमगत्या नीर वस्त्राच्या तलम पोतापुढे आपली रेशमी वस्त्रही जाडीभरडी
आहेत, तुझ्या पात्राच्या विशालतेपुढे आपलं राज्य नखभर सुद्धा नाही ह्या जाणीवेने
सम्राटांच्या सम्राटालाही स्वतःच्या राज्याचा मोह सुटून तुझ्या तीरांचा मोह पडतो.
सर्व
प्राणीमात्रांची सदयतेने अविरत काळजी घेणारा हा तुझा कृपाळू नीरदेह पाहिला की
भल्याभल्यांचा स्वकर्तृत्वाचा अभिमान गळून पडतो. तुझी अभंग सेवावृत्ती पाहिल्यावर
‘‘आता कोठे धावे मन तुझे चरण देखिलिया’’ म्हणत मन तुझ्या तीरावर स्थिरावतं.
तुझ्या जलौघाचं गारूड अनुभवत थोर थोर राजे
रजवाडे, महान सम्राट अकस्मातपणे आपली महान राज्य कस्पटासमान, तृणवत् समजून सोडून
देतात. राज्य, राजवैभव, मानमरातब सर्व सर्व त्यांना तुझ्या अनमोल प्रवाहापुढे
मातिमोल वाटतं. त्यातील फोलपणा दिसू लागतो. कळू लागतो. तुझ्या तीरावरील वार्यावर
डोलणार्या वेळूच्या बनांमधे कुठल्याही लौकिक वैभवाशिवाय राहणं हे त्यांना परमानंद
देणारं वाटू लागतं. राजवाड्यात मिळणारी उत्तमोत्तम आहार, विहाराची सर्व सुखं निरस
वाटायला लागतात आणि तुझं झुळझुळ वाहणारं पाणी अमृताप्रमाणे गोड वाटू लागतं. त्या
पाण्यावरच आपली तहानभूक भागवून अत्यंत तृप्त मनाने, समाधानाने, परम संतोषाने ते
तुझ्या तीरी राहू लागतात. जी मनःशांती त्याना राजवाड्यात लाभत नाही; सर्व भौतिक
सुखाच्या राशींमधे मिळत नाही ती त्यांना सर्व सर्व सुखांचा त्याग करून तुझ्या
सान्निध्यात लाभते. ह्या सुखापुढे त्यांना स्वर्गसुखही निरस वाटतं. मोक्षही सर्वस्वी
फिका वाटतो. जणू काही त्याना मिळालेला तो आनंद, मोक्षाकडे पाठ फिरवून, मोक्षाकडे
साफ दुर्लक्ष करून त्याला उपहासाने हसत; हे दाखवू इच्छित असतो की, बाबरे मी कुठे?
तू कुठे? माझी बरोबरी करायला तू जाऊ नकोस. माझ्या नखाचीही सर तुला कधी येणार नाही.
(6)
अपि प्राज्यं राज्यं तृणमिव परित्यज्य सहसा
विलोलद्वानीरं तव जननि तीरं श्रितवताम्।
सुधातः स्वादीयस्सलिलभरमातृप्ति पिबतां
जनानामानन्दः परिहसति निर्वाणपदवीम्।।6
अन्वय – (भो जननि) प्राज्यं अपि
राज्यं सहसा तृणम् इव परित्यज्य, विलोलद्वानीरं तव तीरं श्रितवतां, सुधातः (च)
स्वादीयःसलिलभरं आतृप्ति पिबतां जनानां आनंदः निर्वाणपदवीं परिहसति।
(भो जननि !) हे माते!; प्राज्यं
अपि – समुद्रवलयांकित अशीही; राज्यं – राज्याते/राज्यासी; सहसा –
एकाएकी, निर्लोभपणे; तृणं इव – गवताप्रमाणे; परित्यज्य – टाकून; विलोलद्वानीरं
– विलोलंतः वानीराः यस्मिन् तत्। वायूने वेताची झाडे जेथे कापत आहेत अशा; वानीर
– वेताची झाडे; तव- तुझ्या; तीरं
– तीरावर; श्रितवतां - आश्रय करते झाले; सुधातः – अमृताहून; स्वादीयस्सलिभरं – फार फार मधुर; सलिलाना
भरः – पाण्याचा समूह; स्वादीयान् -अति मधुर; आतृप्ति - तृप्ति
होईपर्यंत; पिबतां – पिणार्या; जनानां – लोकांचा; आनंदः –
आनंद; निर्वाणपदवीं - मोक्षाचा दर्जा, स्थान, मार्गाचा; परिहसति –
उपहास करतो. (6)
जयांच्या सीमा ह्या पसरतिच आसिंधु अशि ही
महासाम्राज्येही तृणसम अती तुच्छ स्मरुनी ।
महीची ऐश्वर्ये विभवहि अकस्मात त्यजुनी
तुझ्या ओढीने हे नृप कितिक आले तव तिरी ।। 6.1।।
बने वेळूची ही डुलति पवनासंगति जिथे
बनी वेतांच्या त्या वसतिच सुखाने नृप तिथे ।
मिळे त्यांना तृप्ती सलिल तव आकंठ पिउनी
सुधेलाही नाही सर तव जलाची लवभरी ।। 6.2 ।।
तुझे प्राशूनीय मधुर जल हे अमृतमयी
नृपांना लाभे जो सतत परमानंद हृदयी
अगे तो मोक्षासी सतत खिजवी गे हसुनची ।
म्हणे हे मोक्षाचे पदचि कवडीमोल मजसी ।। 6.3 ।।
---------------------------------------------------
श्लोक 7
हे जननी! हे माते, तुझ्या स्पर्शमात्रे
सर्व भूतमात्रांचा उद्धार होतो मग तो स्पर्श प्रत्यक्ष असो वा अप्रत्यक्ष!
दूरान्वयानेही जो तुझ्या संपर्कात येतो त्याचे सत्वर हित करण्याचे दायित्व, जबाबदारी
तू स्वीकारतेस. त्यावेळी हा उच्च हा नीच, हा लहान हा मोठा असा भेदभाव तू करत
नाहीस. सर्वांवर तू आईसारखी समान माया करतेस कारण वात्सल्य हा तुझा स्थायीभाव आहे.
आपल्या दीन दुबळ्या लेकरावर तर आईचा जास्तच जीव असतो. त्याच्यासाठी तिचा जीव
तिळतिळ तुटत असतो. त्याच्यासाठी तिच्या मनात अपार करूणा दाटून येते.
तुझही
तसच आहे. तुझ्या पाण्यात राजस्त्रिया रोज सकाळी स्नान करतात. त्यांच्या अंगावर
त्यांनी कस्तूरीची उटी लावलेली असते. ह्या राजस्त्रियांचं तू कल्याण करतेसच पण, त्यांच्या
अंगाची कस्तूरी पाण्यात मिसळताक्षणीच तुला, नाभीत कस्तूरी धारण करणार्या त्या
कस्तूरी मृगांचाही कळवळा आल्याशिवाय रहात नाही. त्यांनाही तू विनाविलंब मोक्ष
प्रदान करतेस. (कस्तूरी मृगांची कस्तूरी काढून घेण्यापूर्वी त्यांची मृगया केली
जाते. ह्या दुःखाने तुला त्यांचा कळवळा येतो.) अशा ह्या मृगांना ( मानवंदना
म्हणून) हजारो देव त्यांना घेऊन जाण्यासाठी विमानातून भूलोकी उतरतात. देवांचा हा
ताफा मोठ्या लवाजम्यासह सन्मानाने कस्तूरीमृगांना सुरक्षित कड्यात(वेढ्यात)(escort)मधे
विमानातून इंद्राच्या नंदनवनात घेऊन जातो. मोठ्या हर्षाने, स्वेच्छेने ते तेथे
प्रवेश करतात, बागडतात. तुझ्या कृपेने
त्यांचे देह अमल, विमल दिव्य होतात. इंद्राच्या अलकापुरीच्या नंदनवनात देवांच्या
समूहासह ते आनंद लुटत असतात. माय ही सर्व तुझीच कृपा! (7)
प्रभाते स्नातीनां नृपतिरमणीनां कुचतटी-
गतो यावन्मातर्मिलति तव तोयैर्मृगमदः।
मृगास्तावद्वैमानिकशतसहस्रैः परिवृता
विशन्ति स्वच्छन्दं विमलवपुषो नन्दनवनम्।।7
अन्वय - भो मातः , प्रभाते
स्नातीनां नृपतिरमणीनां कुचतटिगतः मृगमदः, तव तोयैः यावत् मिलति तावत् मृगाः ,
वैमानिकशतसहस्रैः परिवृताः विमलवपुषः सन्तः, स्वच्छंदं नंदनवनं विशन्ति। (7)
अन्वयार्थ - भो मातः !
- हे आई; प्रभाते – प्रभातकाळी; स्नातीनां (स्नांति ताः -स्नान
करतात त्या स्नाती)- तुझ्या पाण्यात स्नान करणार्या; नृपतिरमणीनां –
राजांच्या सुंदर स्त्रियांच्या; कुचतटिगतः - स्तनांच्या भागावर रात्री
विलासार्थ लावलेला; मृगमद- कस्तूरी; तव – तुझ्या; तोयैः –
पाण्याशी, पाण्यासोबत; यावत् – जेव्हा; मिलति - संलग्न होते,
मिसळते, संपर्कात येते तेव्हा; तावत् – तात्काल; विमलवपुषः –
ज्यांचे (वपु-) शरीर पातके जाऊन निष्पाप झाले आहे ते; मृगाः – (कस्तूरी)
मृग/हरिण, वैमानिकशतसहस्रैः - विमानातून आकाशात फिरणार्या (देवांची) शते
आणि त्या शतांची सहस्रे - म्हणजे अगणित देवगणांनी; परिवृताः – वेढलेले, युक्त
झालेले(मृग); नंदनवनं – इंद्राच्या क्रीडावनात; स्वच्छंदं – यथेच्छ,
मनसोक्त; विशंति – प्रवेश करतात, संचार करतात. (7)
जळी स्नानासाठी अरुण-उदयाच्याच समयी
स्त्रिया राजांच्या ह्या जळि शिरति आकर्षक किती ।
तयांच्या अंगीची जळि विरघळे कस्तुरि उटी
मृगांची होई त्या तनु अमल त्याने त्वरितची ।।7.1।।
जथे देवांचे हे उतरति विमानातुन भुवी
सुरक्षेच्या वेढ्यातुन सुर मृगा ने सुरवनी
सुरांसगे जाती बसुनच विमानी मृग किती
खुशीने स्वेच्छेने शिरति फिरती नंदनवनी ।। 7.2 ।।
अगे कस्तूरीसी सलिल करता स्पर्श अमले
मिळे त्या पुण्याने `परिमलमृगा' स्वर्ग सुख हे
अशी ही पुण्याई तवचि करुणेचे फळ असे
तुझ्या संपर्की ये अति दुरुन त्याही सुख मिळे ।। 7.3 ।।
(परिमलमृग – कस्तूरीमृग. कस्तूरीमृगांची कस्तूरी वापरून
केलेली उटी गंगेच्या पाण्यात विरघळली , तेंव्हा गंगेचा स्पर्श त्या कस्तूरीला झाल्याने,
तत्क्षणी कस्तूरीमृगांनाही स्वर्ग प्राप्त झाला.)
---------------------------------------------------
श्लोक 8
गंगा = गम् + गा
गम्- ह्या संस्कृत क्रियापदाचा अर्थ जाणे
असा आहे.
गा - गामिनी
म्हणजे जाणारी ह्या अर्थी गा
म्हणून गंगा ह्या शब्दाचा अर्थ जाते, जात
राहते म्हणजे निरंतर जात राहणारी, अखंड वाहत राहणारी असा आहे. जी ‘भवत्पादात्’
म्हणजे विष्णूच्या पायापासून निघते आणि सर्वांना विष्णूच्या पायापर्यंत पोचवते ती
गंगा! जी भक्तांना ब्रह्मपदाकडे घेऊन जाते ती गंगा! हे गंगे, तुझी सुधा धारा
अविश्रांत वाहतच राहते. तुझ्या कर्तव्यदक्षतेत कधीही अंतर पडत नाही. तुझ्या
प्रवाहाचा ओघ आणि ओढ विस्मित करणारी आहे.
माय, गंगा ही दोन अक्षरे कोणाला माहित
नाहीत? ती सर्वश्रुत आहेत. सुप्रसिद्ध आहेत. गंगा ही दोन निर्मल अक्षरे उच्चारताच
वा नुसतं त्यांच स्मरण केल्यानेही; तुझी पवित्र, ओघवती, चैतन्यमयी चरितसरिता
नजरेसमोर येते. गंगा ह्या नावाचं गारूड मनाला सम्मोहित करतं. हृदयात व्यापून
राहतं. मनाला अपार शांती प्रदान करतं. मनातील इतर सर्व त्रासदायक विचार, अनेक पीडा
दूर होतात. विलक्षण समाधानाने मन भरून जातं. ‘आता कोठे धावे मन तुझे चरण देखिलिया’
म्हणत मन शांतपणे हृदयात येऊन बसतं.
तुझ्या नावात विलक्षण चैतन्य आहे. अपार माया,
स्नेह आहे. अलौकिक अनुभूति आहे. अगाध ज्ञान आहे. अपरिमित आनंद आहे. अलोट ,
वात्सल्य आहे अमोघ वैराग्य आहे. तुझं हे मनाला परम आनंदित करणारे नावं माझ्या
मुखात सतत राहो. माझ्या प्राणप्रयाणकाळीही ते माझ्या मुखात शेवटच्या क्षणापर्यंत
लखलखत राहो. (8)
स्मृतं सद्यः स्वान्तं विरचयति शान्तं सकृदपि
प्रगीतं यत्पापं झटिति भवतापं च हरति।
इदं तद् गङ्गेति श्रवणरमणीयं खलु पदं
मम प्राणप्रान्ते वदनकमलान्तर्विलसतु।।8
अन्वय
– (हे भागीरथी), यत् सकृत् अपि स्मृतं (सत्) सद्यः स्वान्तं शान्तं विरचयति।
प्रगीतं च (सत्) झटिति पापं (च) भवतापं हरति। तत् इदं खलु श्रवणरमणीयं गङ्गा
इति पदं मम प्राणप्रान्ते वदनकमलान्तः
विलसतु । (8)
अन्वयार्थ
- भो भागिरथी – हे गंगे; यत्-
जे; सकृत -एकदा; अपि – सुद्धा; स्मृतं- चिंतिले असता; सद्यः
– तात्काळ; स्वांतं- अंतःकरणातें; शांतं - द्वेश,लोभादि विकार
रहित/ सुखयुक्त अशा; विरचयति- निर्माण करणे; यत्- जे; सकृदपि – एकवारही; प्रगीतं
– उत्कंठेने , भक्तिभावाने गीत उच्चारले असता; पापं– पाप; दुःख च -
आणि भवतापं – संसार संबंधी दुःखे, ताप; झटिति – तत्काल; हरति –
नाश करते; तत् – ते/हे; श्रवणरमणीयं- कानांना सुखकारक किंवा ऐकावयास
मधुर; गंगा इति - गंगा असे; प्रसिद्ध पदं – विख्यात, नावाजलेला अक्षरसमुदाय; मम – माझ्या; प्राणप्रान्ते –
मरणसमयी; प्राण सीमारेषेवर असतांना; (प्रान्त- सीमा) वदनकमलान्तः –
मुखकमलामधे; विलसतु – तळपत राहो, चमकत राहो, झगमगत राहो, क्रीडा करत राहो
(8)
अगे “गंगा” ही जी श्रवण सुख दे अक्षरद्वयी
करे कानांनाही निरतिशय जी तृप्त सहजी
जया उत्कंठेने सहज स्मरता एकसमयी
मिळे चित्तासी ह्या अपरिमित शांती त्वरितची ।। 8.1 ।।
सुखे उच्चारीता मधुमधुर गंगा पद मुखी
सुटे संसाराचा अति जटिल गुंता सहजची ।
न ठेवी दुःखाच्या विफल लवलेशा क्षणभरी
मिळे चित्तासी ह्या अतिशय समाधान सुखही ।। 8.2 ।।
अगे सीमारेषेवर असति हे प्राण मम गे
मुखी राहो तेव्हा लखलखित हे नाम तव गे ।
`नमो गंगे' ऐशा मधु-मधुर शब्दांस रसना
सदा सेवो, ठेवो मुखकमलि गे अंतसमया ।। 8.3 ।।
---------------------------------------------------
श्लोक 9
निरंतर वाहणार्या गंगेला पाहून जगन्नाथ पंडितांना गलबलून आलं. नीर
वाहे डोळा अशी अवस्था झाली आणि उत्स्फूर्तपणे त्यांच्या मुखातून शब्द बाहेर आले
----
हे जननी, तुझ्याजवळ अपपरभाव नाहीच मुळी! लेकरू
काळबेंद्र असलं तरी त्याला आईजवळ यायला संकोच वाटत नाही. परकेपणा भासत नाही.
आईवरच्या जन्मसिद्ध हक्काने ते आईला
बिलगतं आणि कुठल्याही अपेक्षेविना वात्सल्यमूर्ती जननी त्याला कुशीत घेते. आई जवळ
यायला बालकाला कुठलं कारण लागत नाही, काळवेळ लागत नाही. आईच्या वात्सल्यालाही ना
कुठली अपेक्षा असते ना कुठल्या नियमाचं बंधन! माय-लेकराच्या नात्यातील हे देखणेपण
बाकी कुठल्या नात्यात नाही.
तुझ्या तीरावर कावळ्यांसारखे सामान्य
वाटणारे पक्षीही आनंदाने बागडत असतात, निवास करत असतात. तुझ्या तीरावर मिळणार्या
अलोट सुखामुळे त्यांना इंद्राच्या सर्व सुखांनी युक्त असलेल्या अलंकापुरी नगरीत
जायची इच्छा सुद्धा होत नाही. (काशीत मरण आलेल्या सर्वांना लगेचच मोक्ष मिळतो असं
म्हणतात. त्यामुळे माणूस मरण पावल्यावर पिंडाला कावळा शिवल्याशिवाय मोक्ष मिळत
नाही असं म्हणतात ते सर्व काशीला फोल ठरते. कावळ्यांना कामच न उरल्यानेही ते
तुझ्या तीरावर आनंदाने बागडत असावेत.)
आपल्या प्रिय जनांना गमावलेले, दुःखानी
गांजलेले, संकटांनी खचलेले, वैफल्याने ग्रस्त अनेक जीव त्यांचं दुःख हलकं
करण्यासाठी तुझ्यापाशी येतात. दीन दुबळ्या लेकरांबद्दल आईला जास्तच चिंता, आपुलकी,
कळकळ असते. त्यांच्या मदतीला ती तत्पर असते. डोळ्यात तेल घालून त्यांचं रक्षण करत
असते. माय तुझे हे दोन्ही तीर कायमच दुःखितांच्या नेत्रातील नीर पुसणारे, त्यांना
धीर देणारे असोत.(9)
यदन्तः खेलन्तो बहुलतरसन्तोषभरिता
न काका नाकाधीश्वरनगरसाकांक्षमनसः।
निवासाल्लोकानां जनिमरणशोकापहरणं
तदेतत्ते तीरं श्रमशमनधीरं भवतु नः ।।9
अन्वय
– (भो भागीरथि), यदन्तः खेलन्तः काकाः बहुलतर सन्तोषभरिताः(सन्तः)
नाकाधीश्वरनगरसाकांक्षमनसः न (भवन्ति)। निवासात् लोकानां जनिमरणशोकापहरणं ते तत्
एतत् तीरं, नः श्रमशमनधीरं भवतु।।(9)
भो गंगे –
हे गंगे यदन्तः – (यस्य अन्तः
यदन्तः) ज्या तीरावर खेलन्तः – क्रिडा करतात,खेळतात काकाः – कावळे बहुलतरसन्तोषभरितः
– अतिशय आनंदाने युक्त झालेले नाकस्य – स्वर्गाचा अधीश्वर- पती नाकाधीश्वरस्य
– इंद्राचे नगर- गाव/पुर ते साकांक्षमनः – इच्छेने
युक्त,साभिलाष मन- अन्तःकरण न भवन्ति – होत नाहीत; तसेच निवासात्
– निवास केल्याने, राहिल्याने लोकानां – जनांचे जनिमरणशोकापहरणं –
जन्म, मृत्यू आणि शोक (पत्नी, पुत्र इत्यादि नाशापासून होणारे दुःख ते जनिमरणशोक )
त्याचा नाश करणारे; तत् – ते हे तुझे; तीरं- किनारे; काठ; नः – आम्हाला; श्रमशमन – श्रमांचे
शमन – नाश, धीर – समर्थ; श्रमशमनधीरं-
श्रमांचा नाश करण्यास समर्थ असलेले; भवतु – होवोत. (9)
कुणीही येता गे तुज जवळि त्यासी सुखविसी
असो साधा दुर्लक्षित खग कुणी वायस जरी ।
तुझ्या तीरी तोही अनुपम सुखासीच मिळवे
मनाजोगे खेळे मुदितमन स्वच्छंद विहरे ।। 9.1 ।।
कधी स्वर्गाची तो हृदयि अभिलाषा नच धरी
नको वाटे त्यासी सुखमयचि स्वर्गादिक गती ।
बुडाले शोकाते जन प्रियजनांच्याच विरहे
दिलासा लाभे त्या तव तिरि रहाताच सुभगे ।। 9.2 ।।
कितीही सायासा तनु-मन-श्रमासीच हरण्या
मनाच्या वैफल्या सकल थकव्यासीच तनुच्या
कराया दूरी गे प्रबल असती जे तट तुझे
करो दूरी कष्टा, श्रम, खटपटी, शीण अमुचे ।। 9.3 ।।
---------------------------------------------------
श्लोक 10
जगन्नाथ पंडित गंगेशी
संवाद साधत म्हणतात,
हे जननी, तू
साक्षात स्वर्गातून भूलोकी आलीस. तू देवांचीच नदी सुरनदी आहेस. तू म्हणशील की,
सारे जण तर ब्रह्म हे एकमेव सत्य मानतात. श्रेष्ठ मानतात. असं असताना मी तुलाच का
सर्वश्रेष्ठ मानत आहे? तुझीच का स्तुती करत आहे? तर ऐक,
हे जननी! ह्या निराकार
निरालंब ब्रह्माचं सर्वजण सर्वकाळ गुणगान करत असतात पण प्रत्यक्षात ते कोणालाच
नक्की सांगता येत नाही. प्रत्यक्ष वेदही शेवटी ‘‘नेति नेति’’ म्हणजे—‘हे म्हणजे
ब्रह्म नाही ते म्हणजे ब्रह्म नाही.’ म्हणून सर्वच वस्तूंना नाकारतात. थकतात.
व्यासादिंची प्रतिभाही कुंठित होते.
जे निराकार आहे, नित्य
निरंतर आहे, ज्याला जन्म-मरण नाही, ज्याला माया स्पर्शही करू शकत नाही, जे
स्वयंप्रकाशी आहे आणि आपल्या प्रकाशाने, आपल्या महतीने सारे अज्ञान दूर करते हे
सर्व ब्रह्माचे वर्णन तुलाही लागू होते. न
दाखवता येणारं निर्गुण निराकार ब्रह्म जर कधी प्रत्यक्ष सगुण साकार रूपात प्रकट
झालच तर ते तुझ्या रूपातच अवतीर्ण झालं आहे असं मी मानतो. तू तुझ्या निर्मळ
वागण्याने सर्व भेदाभेद दूर केला आहेस. सर्व अज्ञान दूर केलं आहेस. हे
ब्रह्मस्वरूप माते ते अनादि तत्त्व तूच आहेस, ह्याविषयी माझ्या मनात कुठलाही संदेह
नाही. तुझ्याहून कुठलं वेगळं ब्रह्म आहे असं मी मानत नाही. हे ब्रह्मस्वरूप माते,
तुला नमस्कार!
न यत्साक्षाद्वेदैरपि गलितभेदैरवसितं
न यस्मिन् जीवानां प्रसरति मनोवागवसरः।
निराकारं नित्यं निजमहिमनिर्वासिततमो
विशुद्धं यत्तत्त्वं सुरतटिनि तत्त्वं न विषयः।।10
अन्वय - हे सुरतटिनि, यत् गलित भेदैः अपि वेदैः
साक्षात् न अवसितं, यस्मिन् जीवानां मनोवागवसरः न प्रसरति, निराकारं नित्यं
निजमहिमनिर्वासिततमःविशुद्धं यत् तत्त्वं तत् त्वं (असि )। विशयः न (असि) ।
अन्वयार्थ - हे सुरतटिनी – हे
देवांच्या नदी गंगे; यत् – जे; गलित
भेदैः – ज्यांच्यात या विषयी मतभेद उरला ना ही अशा ( म्हणजे प्रत्येक वेदचा
उद्देश थोडा वेगळा आहे. तरी चारही वेदांना मिळुन देखिल जे तत्त्व स्वरूप निश्चित
करता आले नाही ते ब्रह्म)); वेदैः अपि – वेदांनीही; साक्षात –
प्रत्यक्ष; न अवसितम् – निर्धारित
केले नाही, निश्चित केले नाही; यस्मिन्- ज्या विषयी; जीवानाम्- कोणी
भूतमात्र वा मानवांचे; मनोवागवसरः न प्रसरति – मन आणि वाणी यांचा अवसर
म्हणजे व्यापार प्रसार पावत नाही, प्रवृत्त होत नाही; निराकारं -
ज्याचा आकार गेला आहे ते शरीर नसलेले; नित्यं – निरंतर,नित्य, उत्पत्ती,नाश
रहित, निजमहिमनिर्वासिततमः - स्वप्रकाशाने किवा स्वप्रभावाने ज्याने अंधकार
वा अज्ञान दूर केला आहे, नष्ट केला आहे ते
; विशुद्धं – मायामलविरहित, यत्
तत्त्वं – जे ब्रह्म; तत् त्वं
(असि) – ते तू आहेस ; न विशयः – ह्यात संशय नाही.
असे अद्वैताचे निरवयव जे ब्रह्मपदची
करीती ज्याचाची निगम महिमामंडन अति ।
परी वर्णू जाता म्हणति, ‘‘कळले ना अजुनही’’
पदा त्या वर्णाया शरण म्हणुनी मौन धरिती ।। 10.1 ।।
मती खुंटे सार्यांचिच उकलता ब्रह्मपद जे
स्फुरे ना वाचा ही स्वरुप बघुनी निर्गुण असे ।।
‘अशा तत्त्वाचे का अनुसरण सोडूनचि भले
करावा ऐसा का सलिल-तनुचा गौरव बरे’
।। 10.2 ।।
विचारी का ऐसे जननि मजला आजचि असे
असे तूची तेचि खचितच महा ब्रह्मपद ते ।
अगे तूही मायाविरहित निराकार असशी
अगे अज्ञानाचा घनतम निवारी सहजची ।। 10.3 ।।
तुझी धारा वाहे अविरत; नसे नाश तुजसी
करी ना भेदासी हृदय तव गे निर्मळ अती ।
दिसे ना डोळ्यांना जननि असुनी ब्रह्मपद ते
परी चिद्रूपाची सगुण पुतळी तू मज दिसे ।। 10.4 ।।
निगम – वेद
---------------------------------------------------
श्लोक 11
गंगेच्या घाटावर उभ्या
असलेल्या, पंडित जगन्नाथाचं गंगेवर असलेलं अलोट प्रेम त्यांच्या शब्दाशब्दातून
व्यक्त होत होतं. गंगेविषयी असलेला त्यांचा अनन्यभाव काव्यातून ओसंडून वहात होतं. ‘‘हे जननी, तुझी महती मी काय सांगू?
‘यस्मात् विश्वं इदं सर्वं तस्य शक्त्या महात्मनः।
तस्मादेवोच्यते विष्णुः विश् धातोः प्रवेशनात्’ ।।
ज्याच्यापासून आणि ज्याच्या शक्तीच्या
प्रभावाने हे विश्व निर्माण होते तो विष्णू अशी ज्याची ओळख आहे त्या विष्णुपदावर
पोचण्यासाठी, त्याच्यासवे सारूप्य मुक्ती मिळविण्यासाठी लोक काय काय करत असतात.
मोठी मोठी दानं म्हणजे महा दाने देतात. गज, अश्व, तुला, पुरु, शिबिक ह्यांच्या
दानांना महा दानं म्हणतात. हत्ती घोडे पूर्वी दान म्हणून दिले जात. तुला म्हणजे
एखाद्या व्यक्तीच्या भाराइतके सोने, रूपे, अन्न इत्यादि वस्तू लोकांना दान देणे.
पुरु म्हणजे पालनपोषणासाठी प्रचुर लौकिक साहित्य दान देणे. शिबिका म्हणजे तंबू,
रथ,पालखी इ. सामान दान देणे.
विष्णुपद मिळविण्यासाठी अनेकजण
ध्यान-धारणा
करतात, किती किती अवघड व्रतवैकल्य करतात. अत्यंत खडतर तप करून आपला पुण्यसंचय
वाढवतात. मोठे मोठे यज्ञ करतात. अनेक दुष्कर उपायांनी आपला पुण्यसंचय वाढवतात.
जगन्नाथ पंडित म्हणाले, आई गं, इतके अलोट
कष्ट, अत्यंत खडतर मेहनत घेऊनही अनेकवेळा जे अशक्यप्राय वाटतं; असं विष्णुपद तू
सर्वांना सहजपणे मिळवून देतेस. तुला स्वतःलाच लोक ‘विष्णुपदी़’ म्हणतात कारण, तू
भगवान विष्णूंच्या पायाच्या अंगठ्यापासून निघालीस आणि महादेवांनी त्यांच्या
जटाजूटांमधे तुला धारण केलं. विष्णूचे पाय धुण्याचे महत्भाग्य तुला लाभले आहे.
असे म्हणतात की, कालिया मर्दनाच्या वेळी
कालियाच्या फण्यावर नाचलेल्या कृष्णाच्या पायाला कालियाचे विष लागून जे मालिन्य
आले ते तुझ्या अत्यंत श्रेष्ठ अशा निर्मळ जलाने धुतले गेले. तुझ्या परम पावन
निर्मळपणामुळे तुला लाभलेले हे भाग्य स्वतःपुरते मर्यादित न ठेवता तू ह्या
भाग्याचा लाभ सर्वांना घडवतेस. तुझ्या इतकी उदार वात्सल्यमूर्ती अजुन कोण असेल?
तुझी कोणासोबत तुलनाच होऊ शकत नाही माय! तुला माझा दंडवत! (11)
महादानैर्ध्यानैर्बहुविधवितानैरपि च यन्
न लभ्यं घोराभिः सुविमलतपोराशिभिरपि।
अचिन्त्यं तद्विष्णोः पदमखिलसाधारणतया
ददाना केनासि त्वमिह तुलनीया कथय नः।। 11 ।।
अन्वय – (हे गंगे) महादानैः
ध्यानैः बहुविधवितानैः अपि च घोराभिः सुविमलतपोराशिभिः अपि यत् न लभ्यं, तत्
अचिन्त्यं विष्णोः पदं अखिलसाधारणतया ददाना त्वं इह केन तुलनीया असि (इति) नः कथय
।
अन्वयार्थ - भो भागिरथि –
हे गंगे; यत् – जे; महादानैः – मोठ्या दानांनी; ध्यानैः – चित्त एकाग्र करणार्या
प्राणायामरूप समाधिने; बहुविध वितानैः – अनेक प्रकारच्या यज्ञांनी; च – आणि; घोराभिः
– भयंकर, करावयास अत्यंत कठीण अशा; सुविमलतपोराशिभिः - अत्यंत शुद्ध
निर्मळ अशा तपाच्या मोठ्या संचयाने, समूहाने; अपि न लभ्यं – सुद्धा जे मिळत
नाही; तत् – ते; अचिन्त्यम्- विचार सुद्धा करू शकणार नाही असे; विष्णोः
पदम् – नारायणाचे पाय, वैकुंठ ; अखिलसाधारणतया – कोणाला लहान मोठे असा
भाव न ठेवता, सर्वांना समभावाने; ददानां – देणारी, त्वं – तू; इह
– ह्या लोकी; केन – कोणाशी; तुलनीया – तुलयितुं योग्या-
तोलावयास योग्य, बरोबरी करण्यास पात्र; असि – आहेस? इति – ते,
आम्हाला कथय – सांग.(11)
विचारांच्या वाटे अति पलिकडे विष्णुपद जे
जयाच्या लाभाच्या मन कधि विचारास न धजे ।
किती मोठी दाने व्रत नियम ध्यानादि करुनी
मिळेना कोणासी हरि चरण जे घोर तपुनी
।। 11.1 ।।
मिळेना यज्ञांनी; जमवुन महा पुण्य जवळी
करोनी कामे ती खडतर महा दुष्कर अशी ।
करोनी नाना त्या खटपटि न विष्णूपद मिळे
जिथे टेकीती गे करचि कचरूनी जन पुरे ।। 11.2 ।।
असे वैकुंठाचे पद सहजि देसी मिळवुनी
अगे सर्वांशी तू सतत समभावास धरुनी
जनांना नेशी त्या निकट हरिच्या पद्मपदिही
तुझ्या दातृत्वाला जननि तुलना या न जगती ।।11.2 ।।
---------------------------------------------------
श्लोक 12
आईची मुलावर पडलेली प्रेमळ नजर मुलाचं
सर्वस्व असते. तिच्या एका दृष्टिक्षेपासाठी आसुसलेले जन्नाथ पंडित म्हणतात,
हे माय, तुझी कल्याणकारी दृष्टी ज्या कोणा व्यक्तीवर क्षणभर का होईना
पडते त्याचे सर्व भवताप, संसारामुळे उद्भवणारी सर्व दुःखे, पीडा तू सर्वतोपरी दूर
करतेस. (ईक्षामात्रात् परिहरन्ती) तुझी ही नीरगात्री मूर्ती विलक्षण सुंदर आहे.
निर्मळ, कल्याणकारी(शिवा) आहे. हे जननी, तू नुसतं एकवार तुझ्या स्नेहमयी नजरेने
पाहिल्यावरच कुठल्याशा अनामिक अपार शांतीने मन भरून जातं. ह्या भौतिक
संसाराचा सर्व ताप कोणीही विसरून जातो. मनातल्या मनात एकमेकांना छेद देणार्या
विविध भावनांचा कल्लोळ, उलट सुलट विचारांचा कोलाहल, अनेक प्रकारची मानसिक द्वंद्वे
संपून त्याची जागा एका अवर्णनीय शांत आनंदाने घेतलेली जाते. तुझी स्तुती
करण्यासाठी शब्द थिटे पडतात.
तुझ्या ह्या प्रवाही शुभंकर तनुची थोरवी कोण कसा
वर्णन करू शकेल? तुझ्या अफाट कर्तृत्वाचा गौरव करणं ही काही कोणा सामान्य
माणसाच्या आटोक्यातील गोष्ट नाही. तुझ्या प्रतापाचा डंका वाजवायला, तुझ्या तेजाची
आरती करण्यासाठी कोणी तुझ्या तोलामोलाचा तेजस्वीच कोणी हवा. तुला नजराणा म्हणून द्यावयाची
गोष्टही
अनमोल व तितक्याच उंचीची हवी.
‘गुणी गुणं वेत्ति’ म्हणजे गुणी माणसालाच
दुसर्याचे गुण कळतात असं म्हणतात त्याच प्रमाणे दुसर्यांच्या कल्याणासाठी ज्याने
प्रचंड कष्ट अनुभवले आहेत तोच दुसर्याच्या कष्टाचे अनुमान करू शकतो. ह्या नीलकंठाने
ह्या जगाच्या कल्याणासाठी हालाहलासारखं जहाल विष कायमचं आपल्या कंठात धारण केलं.
सार्या ब्रह्मांडाचं कायमचं रक्षण केलं; अजूनही हे जाळणारं विष कंठ्याप्रमाणे
मिरवणारा महादेवच तुझी महती जाणू शकतो.
निस्वार्थ भावाने अथकपणे चाललेली तुझी
भूतमात्रांची सेवा पाहून देवांचे देव महादेवही विस्मित झाले असले तर त्यात नवल ते
काय! तुझ्या गुणानी अत्यंत प्रभावित होऊन
ते तुझ्यावर भाळले. मोहित झाले. देवाधिदेव महादेवांनी तुला त्यांच्या मस्तकी
जटाजूटांमधे सर्वोच्च स्थान कायमचं बहाल केलं. हा तुझ्या निस्वार्थ सेवेचा तुला
मिळालेला सर्वोच्च सन्मान आहे. तुझ्या सद्गुणांचं यश आहे.
कैलासपतीने
आपल्या अर्धांग व्यापलेल्या अर्धांगिनीचा नगाधिपुत्री गिरिजेचाही इतका गौरव कधी
केला नव्हता; इतका अत्युच्च बहुमान तिला दिला नव्हता; जो त्यांनी तुला आनंदाने
बहाल केला.
त्याचा व्हायचा तो दुष्परिणाम झालाच! अग्नीच्या साक्षीने पाणिग्रहण केलेल्या
पत्नीला असं दुय्यम स्थान मिळालेलं पाहून पार्वती क्रोधाने लाल झाली. तिचे नेत्र
क्रोधाने आग ओकू लागले. अग्नी जवळ असलेली वस्तू जशी सुकते तसा क्रोधाग्नीने त्या
हिमाद्रिकन्येचा चेहराही सुकून म्लान झाला.
पण क्रोध, संतापाने शेवटी हताश झालेल्या, झुरणार्या, उद्विग्न झालेल्या,
चेहराही सुकून म्लान झालेल्या त्या नगाधिपुत्री पार्वतीच्या नाराजीला न
जुमानता, तिचा अनुनय करायचा सोडून महादेव आपल्या विचारांवर ठाम राहिले.
त्यांनी तुला माथ्यावर कायमचं स्थान बहाल केलं. हे जननी गंगे, हेच तर तुझ्या
गुणांचं महान साफल्य आहे. तुझा हा अलौकिक महिमा, तुझी महान थोरवी गायला, निवेदन
करायला कोण बरे समर्थ आहे? हे गंगा माते, तुला वारंवार नमस्कार असो. (12)
नृणामीक्षामात्रादपि परिहरन्त्या भवभयं
शिवायास्ते मूर्तेः क इह महिमानं निगदतु।
अमर्षम्लानायाः परममनुरोधं गिरिभुवो
विहाय श्रीकण्ठः शिरसि नियतं धारयति याम्।।12
अन्वय – (भो गंगे), श्रीकण्ठः
,अमर्षंन्लानायाः गिरिभुवः परमं अनुरोधं विहाय यां नियतं शिरसि धारयति (तस्याः)
ईक्षामात्रात् अपि नृणां भवभयं परिहरन्त्याः शिवायाः ते मूर्तेः महिमानं इह कः निगदतु
(12)
अन्वयार्थ - (भो गंगे
- हे गंगे,) ईक्षामात्रात् – दर्शनमात्रेच, नृणाम् – मनुष्याच्या; भवभयम्
– संसारापासून उत्पन्न होणार्या भयाचा; परिहरन्त्याः – सर्वतोपरी नाश
करणारी; शिवायाः – कल्याणकारी किंवा कल्याणयुक्त करते ती; ते –
तुझ्या; मूर्तेः – (प्रवाहरूपी सगुण) मूर्तीच्या; महिमानं –
महात्म्य; इह - या लोकी; कः – कोण; निगदितु –
बोलेल? श्रीकण्ठः – ( हलाहल प्राशनाने काळा होण्याची) श्री म्हणजे शोभा
ज्याच्या कंठाला प्राप्त झाली आहे तो श्रीकंठ शिव; अमर्षम्लानायाः - क्रोधाने
म्लान , मूर्छित झाली आहे गिरिभुवः – हिमालय पर्वतापासून उत्पन्न झालेल्या
पार्वतीचा; परमम् – अत्यंत; अनुरोधम् विहाय – अनुनय, अनुसरण सोडून; यां
– जिला; नियतं – निरंतर; शिरसि- मस्तकी धारयति - धारण
करतो. (12)
तुझी दृष्टी ज्याच्यावर पडतसे गे क्षणभरी
तया संसाराचे भय न उरते गे लवभरी
कसा वर्णावा तो तवचि महिमा उज्ज्वल बरे
विषाचा कंठा जो मिरवि हर त्या तू रुचतसे ।। 12.1 ।।
हृदी शंभूच्या तू उपजविच मोहा बघुन हे
शिवाची अर्धांगी फणफणत कोपागृही झुरे
हिमाद्रीकन्येचा अनुनय परी ना शिव करे
तिला दुर्लक्षूनी शिव तुजसि माथ्यावरि धरे ।। 12.2 ।।
गुणांची ऐशी ही कदर गिरिशानेच करणे
अगे ह्याहूनी का अजुन कुठला गौरव असे ।
कसा सामान्यांनी जननि तव गावाच महिमा
असे शब्दांचे हे विभव अपुरे गे स्तुतिस गा ।। 12.3 ।।
---------------------------------------------------
श्लोक 13
हे माय, एकदा का पाय घसरला की त्याचा शेवट
पडण्यात होतो. एखादा छोटासा अपराध, एखादी छोटीशी चूक माणसाला महा घोर अपराधांच्या
निसरड्या रस्त्यावरून थेट महा अपराधांच्या दलदलीत ढकलते. बुडत्याचा पाय खोलात ह्या
नियमाप्रमाणे त्याने किती जरी चिखलातून बाहेर यायचा प्रयत्न केला, तरी तो भीषण
अपराधांच्या चिखलात अजुन अजुन खोल रुतत जातो. त्याला मदत करण्याऐवजी सर्वजण त्याला
झिडकारू लागतात.
हे माय, असा हा अत्यंत लाचार, दीन, बापुडा
कोणी पाहून; त्याच्या वाढत्या अपराधांच्या श्रेणी बरोबर तुझ्या मनातील
त्याच्याविषयीचा कळवळा मात्र वाढत जातो. त्याची दयनीय स्थिती पाहून अपार करुणेने
तुझं मन भरून जातं. समाजानी नाकारलेल्या ह्या पाप्याविषयी तुझ्या मनात अगाध स्नेह
उत्पन्न होतो. सर्वांनी समाजाबाहेर टाकलेल्या ह्या बहिष्कृत लेकराची कणव येऊन तू
त्याला उचलून घेतेस. त्याच्या अपराधांचा चिखल तुझ्या शितल, वात्सल्यपूर्ण जलकरांनी
धुवून टाकतेस. ज्यांच्यावर धर्ममार्तंडांनी नरकाचा शिक्कामोर्तब केलेला असतो
त्यांना तू पापमुक्त करतेस
मदोन्मत्त पुरुषांना सुद्धा जी कामे
निंद्य वाटतात; जातीभ्रष्ट लोकही जी करायला धजत नाहीत; धर्मविहीनांनाही मुखातून
ज्याचा उच्चार करावासा वाटत नाही, फार काय पण जी ऐकल्यावर दुर्जनही थरारून भीतीने
त्यंच्या अंगावर रोमांच उभे राहतात अशा प्रकारची अगणित पातके दूर करण्यासाठी अविश्रांतपणे
तू एकटीच झटत असतेस. ना तुझ्या मदतीला कोणी असतं. ना तुला क्षणभर विश्रांती! पण
विना तक्रार, विना कटकट, जराही श्रमांचे ओझे न मानता, अत्यंत आपुलकीने तू सर्व
निंदनीय जनानां तारून नेतेस. हे सर्व तू सहजपणे करतेस. तुझं हे अकष्टसाध्य असं
महान कर्तृत्व अद्भुत आहे. म्हणूनच ह्या भूमंडलावर तुझी विजयपताका कायम फडकत
राहते. (13)
विनिन्द्यान्युन्मत्तैरपि च परिहार्याणि पतितै-
रवाच्यानि व्रात्यैः सपुलकमपास्यानि पिशुनैः।
हरन्ती लोकानामनवरतमेनांसि कियतां
कदाप्यश्रान्ता त्वं जगति पुनरेका विजयसे।।13
अन्वय
– भो गंगे, उन्मतैः अपि विनिन्द्यानि , पतितैः परिहार्याणि, व्रात्यैः अवाच्यानि ,
च पिशुनैः सपुलकं अपास्यानि कियतां लोकानां एनांसि अनवरत हरन्ती पुनः कदा अपि
अश्रान्ता एका त्वं जगति विजयसे। (13)
अन्वयार्थ - (भो गंगे हे गंगे,); उन्मतैः
- अविचारी पुरूषांनी; विननिन्द्यानि – महा निंदा करावयास अत्यंत योग्य अशी;
अपि च – आणि, पतितैः – पातके करून प्रायश्चित्त न केल्याने
जातिभ्रष्ट धर्मभ्रष्ट झालेल्या, दुश्चरित्र झालेल्या पुरूषांनी; परिहार्याणि -
टाकावयास योग्य, परिहार्य अशी; व्रात्यैः- उपनयनादि संस्कार न झाल्याने
धर्मभ्रष्ट झालेल्या पुरूषांनीही; अवाच्यानि -बोलावयास अशक्य अशी, उच्चारही
करता येणार नाही अशी; पिशुनैः – चुगलखोरांनी दुर्जनांनी; सपुलकैः – भीतीने
अंगावर काटा येऊन; अपास्यानि - ज्याचा त्याग करावा अशी; कियतां –
अपरिमित; लोकानां- लोकांच्या; एनांसि
– ज्याच्या योगाने पुरूष; अघः – नरकाप्रत जातात; अनवरत – निरंतर;
हरन्ती – नाशणारी अशी; एका – एकटीच, कोणाच्या सहाय्याविना; कदा-
अपि – कधिही; अश्रान्ता – श्रम न पावणारी; त्वं - तू ; जगति
– भूमंडलावर; विजयसे – जय पावतेस. (13)
कुकर्मे ऐकूनी अति अधम जी विकृत अती
खलांचा माथाही सहजचि झुकवा शरमुनी ।
मदोन्मत्तांनाही खजिल करि जे पाप मनि गे
न उच्चारावे ही म्हणतिच अधर्मी नर असे ।। 13.1 ।।
धजेना ज्या कर्मा अधम करण्या निंद्य म्हणुनी
खलांच्या ये अंगी सरसरुन काटाच श्रवणी ।
अशाही पापांचे निरसन चि तू एक करि गे
न घे विश्रामासी अनवरत सत्कार्य करि हे ।। 13.2 ।।
असे कोणापाशी तुजसमचि सामर्थ्य इतुके?
श्रमांचे वाटेना कधि तुजसि ओझे जललते
तुझ्या ह्या कीर्तीचा त्रिभुवनिच डंका घुमतसे
जगी सातत्याने सुविजय पताका फडकते ।।13.3 ।।
---------------------------------------------------
श्लोक 14
जगात असं दिसतं की, कित्येक वेळा अंगीचे
गुणच क्षतिकारक ठरतात. बंधनकारी होतात. दोषाला कारणीभूत ठरतात. कायमचा बंदिवास ही पोपट,
मैनांच्या मधुर वाणीची निष्पत्ती ठरावी, गोड बोलण्याचा असा अनिष्ट परिणाम पोपटाला
भोगावा लागावा, गुणाचे पर्यवसन असे कायमच्या दोषात व्हावे हा केवढा विपर्यास! जगन्नाथ पंडित म्हणतात,
हे गंगा माते, पृथ्वीवरील लोकांच्या
व्यथा, कष्ट, त्यांची पीडा पाहून तुझं मन द्रवलं आणि स्वर्गातील सर्व ऐषोआराम,
सुखदायक जीवनाचा तू त्याग केलास. ‘अधोधो गंगेयं भवति विनिपातः शतमुखैः।’ शतसहस्र धारांनी तू
भूमीवर कोसळलीस. स्वर्गाला कायमचा निरोप देत तुझं पृथ्वीवर झालेलं कायमचं अधःपतन पाहून
सद्गुणांचा अतिरेक हा कायमचा दोष ठरतो असे मला वाटतं. सोन्याचे दागिने झाले तरी
त्यातील सोनेपण जात नाही पण दुधाचं दही होताना रासायनिक क्रियेने दूधपण कायमचं
मिटतं त्याप्रामाणे माय, तुझ्या गुणांचे
सोने होताना झालेलं गुणाचं रूपांतरण कायमच्या दोषात परिणत व्हावं हा केवढा
दैवदुर्विलास!
पृथ्वीवरील प्राणीमात्रांच्या वेदना, दुःख
दूर करण्यासाठी तू पृथ्वीवर अवतरलीस. शिवाने तुला पृथ्वीवर उतरण्यासाठी सुयोग्य
स्थान म्हणून त्याच्या माथ्यावर स्थान दिलं. आणि तुझा वेग नियंत्रित रहावा म्हणून
तुला त्याच्या जटांमधे बांधून ठेवलं. प्रवाहीपण, सतत वाहत राहणं हा तुझा धर्म! पण
तुझे सद्गुणच जणु तुझी बेडी झाले. तुला महादेवांनी त्यांच्या जटाबंधनात तुला
बांधलं.
ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने विद्युन्माली,
कमलाक्ष आणि तारकासूर ह्या तीन असुरांनी पृथ्वीपासून शंभर योजने दूर तीन फिरती
पुरे मयासुराकडून बांधून घेतली. ती एका रेषेत येतील तेव्हाच, एका बाणाने तिनही
पुरे जो भेदेल तोच ह्या पुरांचा आणि तीनही असुरांचा नाश करू शकेल असा
ब्रह्मदेवाकडून वर मिळवला. पुष्य नक्षत्रावर ती एका रेषेत आल्यावर महादेवांनी प्रत्यक्ष
विष्णूचा बाण करून ती तिनही पुरे एका बाणात ध्वस्त केली. म्हणून महादेवांना पुरारी
वा त्रिपुरारी म्हणून संबोधू लागले; अशा अलौकिक पराक्रम असलेल्या महादेवांना हे
जननी तुझ्या ह्या निर्मळ जलौघाचा मोह पडावा ह्याचा मला विस्मय वाटतो.
ज्याला विश्वजयी म्हणतात अशा, मदनाच्या
बाणाने घायाळ झाला नाही असा एकही प्राणीमात्र नाही. त्या कामदेवालाही ज्याने जाळून
अंग विरहित म्हणजेच अनंग केलं अशा वैराग्यमूर्ती शिवालाही तुझी ओढ निर्माण व्हावी हा
तर मोठा चमत्कारच म्हणावा लागेल.
माते, जो शिव अत्यंत अनासक्त, उदासीन आहे,
वासनारहित, निरिच्छ, निर्गुण निराकार आहे, ज्याला कोणी मोहात पाडू शकत नाही तो
शिवशंभू तुझ्या गुणांवर भाळावा हे केवढं मोठं नवलच आहे! तुझं निर्मळ मन,
भूतमात्रांविषयी असलेली आस्था, प्राणीमात्रांच्या कल्याणाची तळमळ ह्या सर्व
गुणांमुळे त्या निर्मोही शंभूलाही त्याच्या जटांमधे तुला बांधून ठेवायची इच्छा
झाली. तुझे सद्गुणच असे दोष ठरून विराग्याला मोही बनवतात; निर्गुण निराकारामधेही
विकार घडवून त्याला सगुण रूप घ्यायला लावतात. ज्याचे कामच भेद करणे, विविधतेला
मोडून टाकणे आहे त्या शिवाने तुला स्वतःशी बांधून ठेवले हा विरोधाभासही त्या
गुणामुळेच आला.
तुझे पावित्र्य, परोपकार, निर्लोभीपणा
ह्या अशा अगणित सद्गुणांमधे असा विकार, विपरीत परिणाम दिसावा; कधी कधी गुणातिरेक
हाच दोष तयार होतो तो असा! तुला शिवजटांचे बंधन सोसावे लागले; तर निर्मोही आणि
निर्गुण निराकार शंभूला सगुण साकार होऊन तुझ्या आसक्तीचा आरोप सहन करावा लागला!
(14)
स्खलन्ती स्वर्लोकादवनितलशोकापहृतये
जटाजूटग्रन्थौ यदसि विनिबद्धा पुरभिदा।
अये निर्लोभानामपि मनसि लोभं जनयतां
गुणानामेवायं तव जननि दोषः परिणतः।।14
अन्वय – अये जननि, अवनितलशोकापहृतये स्वर्लोकात् स्खलन्ती (त्वं)
पुरभिदा जटाजूटग्रन्थौ यत् विनिबद्धा असि (अतः) निर्लोभानाम् अपि मनसि लोभं जनयतां
तव गुणानां एव अयं दोषः परिणतः (।4)
अन्वयार्थ -(अये जननि – हे आई); अवनितलशोकापहृतये –
पृथ्वीवरील जनांच्या शोकशमनासाठी; स्वर्लोकात् – स्वर्गातून; स्खलन्ती - कोसळणारी ; त्वं – तू;
पुरभिदा- त्रिपुराला भेदणार्या त्या शिवाने; जटाजूटग्रन्थौ – जटा
बांधून तयार झालेल्या गाठीमध्ये; यत् – ज्यापेक्षा; विनिबद्धा –
विशेष कौशल्याने बांधली; असि – आहेस. निर्लोभानाम् अपि – निरिच्छ पुरुषांच्याही;
मनसि – मनात; लोभं जनयतां – लोभ उत्पन्न करणार्या अशा; तव -
तुझ्या ; गुणानानां एव – (सर्वांविषयी करुणा, परोपकार, पाप हरण करणे इ.)
गुणांचाच अयं- हा (बंधनरूप) , दोषः
– दोषा(त) ; परिणतः - कायमचा रूपांतरीत झाला आहे, पुन्हा मूळ
स्वभावी येणार नाही असा परिवर्तित झाला आहे.
जगाच्या कल्याणा अवतरसि पृथ्वीवर कशी
तुझ्या धारा धो धो उतरतिच स्वर्गातुन भुवी।
जटांमध्ये बांधी तव सलिल धारा जखडुनी --
कसा कौशल्याने सहज त्रिपुरारी प्रबळची ।। 14.1 ।।
विपर्यासाचे हे! गुणहि बनतो दोषच कधी
विरागी शंभूला तव भुलविती सद्गुण अती
गुन्हा कैसा व्हावा जननि तव हा चांगुलपणा
प्रवाही धारा तू असुन तुज निर्बंध झरण्या ।। 14.3 ।।
निराकारालाही सगुण करिसी तू तव गुणे
जलौघालाही गे विमल म्हणुनी बंधन घडे ।
त्यजूनी स्वर्गाला अवनिवर येणे तुज पडे
गुणांची का होई परिणति दोषात सुभगे ।। 14.4 ।।
---------------------------------------------------
श्लोक 15
समाजाने वाळीत टाकलेल्या जगन्नाथ
पंडितांना गंगेने मात्र कधी दूर लोटलं नाही. जगाने ह्या श्रेष्ठ कवीला पापी ठरवलं
तरी, गंगेचं त्याच्याविषयी असलेलं वात्सल्य आटलं नाही. त्यामुळे अनन्य भावाने
गंगेला शरण आलेल्या जगन्नाथ पंडितांच्या मनात राहून राहून हेच येत असावं की, हे
माय, दयाळूपणात तुझी तुलना कोणासोबतच होत नाही. ‘कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति।’
जरी आला पोटी अधम सुत तो दुर्जन अती
जगी होणे नाही कधिहि जननी निर्दय तरी।।
ते विचार करू लागले, पातकांचे तरी किती
विविध प्रकार! ब्रह्महत्या, सुरापान, सुवर्णाची चोरी, गुरुपत्नीगमन आणि हे आचरणार्या
ह्या अशा महापातक्यांशी संबंध ठेवणे ही पाच महापातके मानली जातात; जी घोर नरकास
कारणीभूत होतात. काही उपपातके असतात. काही पापांना प्रायश्चित्त असते काहींना तेही
नसते. जसे ‘कृतघ्नस्य नाऽस्ति निष्कृतिः।’ कृतघ्नपणा महापातक नसलं
तरी त्याला कुठलं प्रायश्चित्त नाही. अशा जीवांना ‘नारकिक/ नारकीय’ जीव म्हणतात.
यांचा कधी उद्धार होत नाही ते कायम नरकातच पिचत राहतात.
ह्या भूतलावर अनेक जण निर्बुद्ध, अडाणी, मतिमंद,
लुळे पांगळे, अवयवहीन, गतिमंद (जड) म्हणून
जन्माला येतात; कोणी जन्मजात आंधळे असतात; तर कोणी जन्मतः मुके, बोबडे, तोतरे
(उक्तिविकल) बहिरे (बधिर) असतात. कोणी ग्रहांच्या वाईट दशेमुळे त्रस्त असतात; तर
कोणी भूतपिशाच्च लागल्याने! ह्या सर्व दुःखी, व्याकूळ, पीडित जनांना ह्या कलियुगात
तरी कुठलं शास्त्रसंमत प्रायश्चित्त नाही.
साक्षात जन्मदात्री जननी सुद्धा आपल्या
अपत्याचे सर्व अपराध पोटात घालू शकत नाही. काही अपरांधांना इलाज
नसतो. एखाद्याचे किती घोर अपराध असतांना त्याला तारुन न्यावं ह्याला सुद्धा काही
सीमा असते. सर्वच अपराधांना प्रायश्चित्त नसल्याने काही वेळेला विशेष प्रकारच्या
मरुद्गणांना वा देवतांनाही(निलिंप) अशा अपराध्यांना तारून नेणं अवघड होऊन बसतं.
त्यामुळे ‘ह्यांना आम्ही काही मदत करू शकत नाही’ म्हणून देवही हात झटकून मोकळे होतात.
ह्या असहाय्य लोकांकडे देवांनीही पाठ फिरवली तर त्यांनी बघायचं तरी कोणाच्या
तोंडाकडे?
कवी जगन्नाथ म्हणतात, जेथे लोकांच्या
अपराधांचं निराकरण करण्याची देवांचीही क्षमता संपते, तेथे हे गंगामाते तुझ्या
कर्तृत्त्वाचा उत्तुंग आलेख चढत जातो. तेथे तू त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी
असतेस. महा कठीण पापांचे पर्वत तुझ्या अमल विमल जलात तू सहज विरघळवून टाकतेस.
माय, अशावेळी तुझ्याशिवाय त्यांच्यासाठी
अजून रामबाण इलाज तो काय! माय, ज्याप्रमाणे औषध त्या व्यक्तीचा दुःसह वाटणारा
त्रास कमी करतं, त्याला रोगातून मुक्ती देतं. त्याप्रमाणे पापांमुळे गलितगात्र झालेल्या
लोकांसाठी तू परिणामकारक, गुणकारी औषध आहेस.(15) तुझ्या कृपेला, दयाळूपणाला जगात
तोड नाही.
जडानन्धान् पङ्गून् प्रकृतिबधिरानुक्तिविकलान्
ग्रहग्रस्तानस्ताखिलदुरितनिस्तारसरणीन्।
निलिम्पैर्निमुक्तानपि च निरयान्तर्निपततो
नरानम्ब त्रातुं त्वमिह परमं भेषजमसि।।15
अन्वय – हे अम्ब, इह जडान् अन्धान् पङ्गून् प्रकृतिबधिरान्
उक्तिविकलान् ग्रहग्रस्तान् अस्ताखिलदुरितनिस्तारसरणीन् च निलिम्पैः अपि
निर्मुक्तान् निरयान्तः निपततः नरान् त्रातुं त्वं परमं भेषजं असि । (15)
हे अम्ब - हे
जननि; इह- ह्या कलियुगी; जडान् – मतिमंद ,अडाणी, ; अन्धान् –
नेत्रहीनांस; पंगून् – पांगळ्यास, प्रकृतिबधिरान्– जन्मजात बहिर्यांना;
उक्तिविकलान् - मूकांना; ग्रहग्रस्तान् –
नवग्रहांच्या दशेने त्रस्त झालेल्यांस; किंवा भुतपिशाच गणांनी अशांत, त्रस्त; अखिल
– संपूर्ण दुरित - पातके
त्याचा निस्तार – सुटका, मुक्ती, त्याची सरणिः - प्रायश्चित्त मार्ग;
अस्ताखिलदुरितनिस्तारसरणीन् – ज्यांची पातके दूर करण्याचे सर्व मार्ग खुंटले आहेत असे लोक ; निलिम्पैः – देवतांनी किंवा एक प्रकारचे
मरुद्गण, निर्मुक्तान् – आपल्या हातून रक्षण होत नाही म्हणून त्यागिलेले
अशा; अपि च - आणि; निरयान्तः-
नरकामध्ये, निपततः – पडतात त्या ;
नरान् –माणसांना, त्रातुं – रक्षिण्यास; त्वं – तू; परमं-
श्रेष्ठ, उत्कृष्ट, रामबाण,गुणकारी; भेषजं -औषध; असि- आहेस.
अपंगा अंधांना विकलमति वा मूक बधिरा
ग्रहांच्या पीडेने हतबलचि झाले जन तया ।
लुळे पंगू कोणी विकल विकृतीग्रस्तचि जगी
न प्रायश्चित्ते ज्या असति कुठली ह्या कलियुगी ।। 15.1 ।।
हराया पापे जी ग्रथित नच शास्त्रोक्त विधिही
सहाय्यासी त्यांच्या हतबलचि हे देव असती ।
नरांसी ऐशा ज्या सुरहि निरुपायेच त्यजती
अती दुःखाने ते नरकपुरिमध्येच पिचती ।। 15.2 ।।
अशांना रक्षाया, विमल करण्यासी पुनरपी
तयांच्या दुःखाचे निरसन कराया सकलची ।
कराया दूरी गे नरकपुरिचा क्लेश सहजी
प्रभावी ऐसे तू जननि असशी औषध जगी ।। 15.3 ।।
---------------------------------------------------
श्लोक 16
हे जननी, तुझं निर्मल जल निसर्गतःच शुद्ध
स्वच्छ शीतल(शिशिरः) आहे. ‘‘शैत्यं हि यत्सा प्रकृतिर्जलस्य,
श्वैत्यं हि यत्सा प्रकृतिर्हिमस्य ।’’
म्हणजे पाणी हे निसर्गतःच थंड असणार आणि हिम निसर्गतःच धवल असणार हा निसर्ग
नियमच आहे. तरीही, हे गंगे तुझं पाणी इतर नद्यांच्या पाण्याहून वेगळं आहे.
श्रेष्ठ, गुणकारी आहे. तुझ्या जळाची जे अनुभूती घेतात, तेच तुझा अपार महिमा
जाणतात.
तुझ्या पाण्याचं अलौकिक सामर्थ्य सगर
राजाच्या मुलांपेक्षा जास्त कोण जाणणार? इक्ष्वाकु कुळातील सगर राजाने अश्वमेध
यज्ञ केला. त्याचा अश्वमेध यज्ञ इंद्राने उधळून लावला. अश्वमेधाचा घोडा पळवून नेऊन
कपिलमुनींच्या आश्रमात बांधून ठेवला. (कोलकात्या पासून साधारण 100 कि.मि. वर गंगासागर
नावाचे बेट आहे. तेथे कपिलमुनींचा आश्रम होता असे म्हणतात. हुगळीनदी आणि बंगालचा
उपसागर ह्याच्या पवित्र संगमावर हे बेट आहे. दर मकरसंक्रातीला तेथे मोठा उत्सव
असतो) सगर राजाचे साठ हजार पुत्र घोड्याच्या शोधात सर्व पृथ्वी पालथी घालून शेवटी
कपिल मुनींच्या आश्रमात पोचले. तेथे घोडा पाहून तो ह्या मुनींनीच पळवला असावा असं समजून
ते त्यांच्या अंगावर धावून गेले; पण कपिल मुनींनी त्यांना आपल्या तपाच्या
सामर्थ्याने क्षणात भस्मसात केलं. शापाने मेलेल्या साठ हजार सगरपुत्रांना मोक्ष
मिळावा ह्यासाठी कपिलमुनींनी ठेवलेली अटही महाकष्टसाध्य असल्याने अशक्य कोटीतील
वाटावी अशीच होती. सगराचा पणतु भगिरथाला जेव्हा
ही खरी कहाणी अवगत झाली तेव्हा आपल्या राज्याचा त्याग करून भगिरथ प्रयत्नांनी हे
निलिंपनिर्झरी, हे देवनदी गंगे तुला स्वर्गातून पृथ्वीवर आणलं.
माय, तुझ्या जलात असलेल्या अत्यंत श्रेष्ठ
गुणांमुळे, निर्मळ, शीतल जलाच्या स्पर्शाने जळून राख झालेले सगरपुत्र राखेतून
प्रकट झाले. सगरपुत्रांचा उद्धार झाला. त्यांचे देह तुझ्या स्पर्शाने पुलकित झाले.
त्यांच्या अंगावर आनंदाचे रोमांच उभे राहिले. तुझ्या नामाचा महिमा गात गातच ते
विमानात बसून स्वर्लोकी पोचले. आजही ते तुझ्या गुणांचे अगम्य असा महिमा वर्णन
करणारे पवाडे स्वर्गात गात असतात. (16)
स्वभावस्वच्छानां सहजशिशिराणामयमपा-
मपारस्ते मातर्जयति महिमा कोऽपि जगति।
मुदा यं गायन्ति द्युतलमनवद्यद्युतिभृतः
समासाद्याद्यापि स्फुटपुलकसान्द्राः सगरजाः।।16
अन्वय -भो मातः , स्वभावस्वच्छानां सहजशिशिराणां ते अपां अपारः अयं
महिमा जगति जयति। अनवद्यद्युतिभृतः स्फुटपुलकसान्द्राः सगरजाः द्युतलं समासाद्य अद्यपि
मुदा यं कः अपि गायन्ति । (16)
भो मातः - हे आई;
स्वभावस्वच्छानां - नैसर्गिकपणे निर्मळ असलेल्या; सहजं –
अनायासाने; शिशिर – शीतल अशा ह्या तुझ्या; अपां – उदकांचा; अपारः – अथांग,
निरवधि असा; अयं – हा; कः अपि – अगम्य, लोकोत्तर; महिमा-
मोठेपणा; जगति – जगात; जयति – सर्वोत्कर्षाने राहतो;
सगरजाः – सगर राजाचे राजपुत्र; अनवद्य – निर्दोष, कलंकरहित; द्युति
– कांती, प्रभा; बिभ्रति -
धारण करतात ते; द्युतिभृतः –देदिप्यमान,
कान्तिमान असे; स्फुट – प्रकट; पुलक - रोमांच; सांद्र – मृदुल
स्पर्शी; स्फुटपुलकसान्द्राः – मृदुलस्पर्शी रोमांचानी रोमांचित झालेले
(सगरपुत्र); द्युतलम्- स्वर्ग लोक; समासाद्य- प्राप्त करून
(स्वर्गात) पोचून ; अद्यापि – अजूनही, इतका काळ लोटला तरी; यं – जो
( अगम्य महिमा), मुदा – आनंदाने; गायन्ति – गातात.
तुझे पाणी आहे नितळ सहजी शीतल सखे
कसे वर्णावे ते सलिल महिम्यासी अमर गे ।
तुझ्या पुण्यस्पर्शे सगरसुत हो धन्य सगळे
अगे राखेतूनी फिरुन उठले दिव्यतनु ते ।। 16.1 ।।
पहा झाले रोमांचित मृदुल ते कोमल तनू
कलंकांचे प्रक्षालन घडुन तनु हो उज्ज्वल जणु
अती आनंदाने सगरसुत भारावुन हृदी
विमानाने आले मुदित सगळे स्वर्गसदनी ।। 16.2 ।।
हजारो वर्षांचा समय जरि गेलाच सरुनी
अजूनीही स्वर्गी सगरसुत ते हर्षित मनी
तुझा गाती ‘तो’ गे सकल महिमा अद्भुत अती
सदाचाराची ही तव विजयगाथा झळकती ।। 16.3 ।।
---------------------------------------------------
Comments
Post a Comment