मनोगत
मनोगत
अनुप्रास, यमक, नादमाधुर्य असलेलं गंगालहरी
सारखं अनुपम काव्य वाचताना वा पाठ म्हणतांना मन प्रसन्नतेने भरून जातं. त्याच्यातील
अनेक ओळी; जशा 20 व्या श्लोकातील ‘मरुल्लीलालोल्ललहरिलुलिताम्भोजपटली -------
जलं ते जबालं मम जननजालं जरयतु’ त्याच्या नादमाधुर्याने मुखात घोळत
राहतात तर, ‘चिरादुन्निद्रं मां सदयहृदये शायय चिरम्’ सारख्या ओळी त्यातील
आर्त भावामुळे भाल्यासारख्या मनात रुतून बसतात. तर श्लोक 40, 51 मधील सवतीमत्सराच्याही
अनोख्या कल्पना अचंबित करून टाकतात. ह्या सर्व स्तोत्राचे भावगर्भ आर्तपण, कल्पनाविलास,
प्रवाहीपण तसेच ठेऊन; ते जर माझ्या माय मराठीत आणता आलं तर त्याची गोडी अनेकांना
चाखायला मिळेल अशा हेतूने मी गंगा दशहरा च्या सुयोग्य मुहूर्तावर मराठी समवृत्त भाषांतर समाज माध्यमांवर ठेवले.
ज्याप्रमाणे प्रवाही नदीचा उगम खडकाळ
डोंगरातून होतो आणि हा प्रवास दूर सागराला मिळेपर्यंत चालू राहतो; तशी गद्यातील
विश्लेषणाने झालेली सुरवात समवृत्त पद्याने जास्त प्रवाहीत होऊन लोकांची रुची
वाढेल ह्या माझ्या कल्पनेला उचलून धरत हे सर्व लेखन (peeyushlahari.blogspot.com)
ह्या ब्लॉगवर असूनही अनेकांनी ‘आम्हाला हे पुस्तक स्वरूपात पाहिजे’ असा आग्रह
धरला. ह्या असंख्य वाचकांच्या प्रेमाची मी कायमच ऋणी आहे.
त्याचवेळेस नागपूरच्या संस्कृत
प्रचारिणीसभेचे डॉ. चंद्रगुप्त वर्णेकर
ह्यांनी ‘आपण हे पुस्तक स्वरूपात लगेचच प्रकाशित करू’ असे सांगून मला सुखद धक्का
दिला. त्यांची मी ऋणी आहे.
हे
विश्लेषण लिहीतांना मला डॉ. सौ. माणिक श्रीनंद ठकार ह्यांनी खूप मदत केली. त्या माझे सासरे पं. कै. नारायणशास्त्री दीक्षित
यांच्या विद्यार्थिनी व संस्कृतच्या तज्ज्ञ आहेत. त्या सावित्रीबाई फुले
विद्यापीठात संस्कृत प्राकृत भाषा विभागात व संस्कृत प्रगत अध्ययन केंद्रात विविध
प्रकल्पात संशोधन करत होत्या. त्यांनी पीएच् डी सोबत धर्मशास्त्रावरही काम केले आहे. अनेक
विद्याशाखांचे त्या अध्यापनही करत होत्या. त्यांनी अनुवादाचे, आशयाचे परीक्षण करून
त्यात सुधारणा तसेच तो उत्कृष्ट
होण्यासाठी अनेक सूचना केल्या. त्यांच्या
मोलाच्या मार्गदर्शनासाठी मी त्यांची ऋणी आहे. माझे पती श्री प्रवीण दीक्षित
ह्यांनीही वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केले. त्यांनाही धन्यवाद.
तसेच वीणाताई गानू व त्यांच्या
सहकार्यांनी प्रुफ रिडींग आणि त्याला पुस्तकाप्रत न्यायचा मोठाच कार्यभाग सांभाळला
त्यांचीही मी ऋणी आहे. पडद्यामागील माहित नसलेले अनेक मदतीचे हात जे मला दिसले
नाहीत पण त्यांच्याशिवाय हे पुस्तक पूर्ण होऊ शकलं नसतं अशा सर्वांचे मी आभार
व्यक्त करते. हे पुस्तक आपल्याला नक्की आवडेल. आपण गंगालहरी ह्या मूळ स्तोत्राचा, विश्लेषणाचा व समवृत्त पद्याचा आनंद
घेऊन इतरांनाही तो द्यावा अशी रसिक वाचकांना प्रेमाची विनंती करते.
अरुंधती प्रवीण दीक्षित.
12 जून 2026
---------------------------------------
लेखिकेचा परिचय
अरुंधती दीक्षित यांनी रसायन शास्त्रात विशेष
प्राविण्याने पदवी प्राप्त केली आहे. त्यांची नाते लडाखशी, अनुवाद चम्पकम्, अनुवाद
पारिजात ही समवृत्त भावनुवादाची पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांच्या अनुवाद पारिजात
ह्या पुस्तकाला अनुवादासाठी असलेला न्यामूर्ती महादेव गोविंद रानडे पुरस्कार (2017) मिळाला आहे.
तरूणभारत
(नागपूर), सकाळ (मुंबई) ह्या वृत्तपत्रात तर जीवन विकास (रामकृष्णमठ) जयजय रघुवीर
समर्थ (सज्जनगड), प्रज्ञालोक (नागपूर), चिंतन(ठाणे), मेनका अशा अनेक मासिकांसाठी व
कालनिर्णय ह्या कॅलेंडर साठी लिखाण केले आहे. त्यांचे सर्व लिखाण https://anuvadparijat.blogspot.com/
ह्या ब्लॉग वर उपलब्ध आहे. त्याचा आस्वाद भारतातीलव
परदेशातील असंख्य रसिक वाचक वारंवार घेत आहेत.
Comments
Post a Comment