श्लोक 28

 

श्लोक 28



 ‘नको देवराया अंत आता पाहू। प्राण हा सर्वथा फुटो पाहे । हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले। मजलागी जाहले तैसे देवा।। अशी जगन्नाथाची बिकट अवस्था  झाली होती.

अशावेळेस जगन्नाथ म्हणतात, हे जननी गे, तुझा महिमा मी कोणत्या शब्दात वर्णन करू? माय, मी देवांना शरण गेलो पण; माझ्या उद्धाराचा विषय निघाल्यावर; माझ्याकडे पाहताक्षणीच, माझ्या सर्व पापांचा अंदाज येताच, ही अशी परिस्थिती पूर्वी कधी उद्भवली नव्हती; अशा प्रकारच्या दुराचाराचं प्रकरण आणि उदाहरण आत्तापर्यंत ऐकिवातही नाही; ह्या पापांना प्रायश्चित्ते नाहीत म्हणून, मी मी म्हणणार्‍या भल्या भल्या तीर्थांनी माघार घेतली. हे अशक्यप्राय काम करण्यासाठी आपण समर्थ नाही हे लक्षात येता, सर्व तीर्थक्षेत्रांच्या माना शरमेनी खाली गेल्या.

 इतकच काय लोकांच्या कल्याणाचा ठेका घेतल्याप्रमाणे तोर्‍यात वागणारे देवही हे अशा प्रतीचे पापक्षालन करणे आम्हाला अशक्य आहे, असंभनीय आहे ह्या विचारांनी विवश होऊन कानावर हात ठेऊन ‘शिव शिव’ म्हणू लागले.

ह्याच्या (जगन्नाथाच्या) दुराचारांनी प्रायश्चित्तांचीही पातळी ओलांडली आहे. आता आम्ही ह्याला काही मदत करू शकत नाही म्हणून, ज्यांच्या नावाचा अर्थच कल्याण, हित आहे अशा शंभुमहादेवांनीही माझ्या पापांसमोर माघार घेतली घेतली आहे. ह्या असमर्थ ठरलेल्या तीर्थांना, ह्या देवगणांना, ह्या रुंडमाळा मिरवणार्‍या कपाली शंभूमहादेवांनाही जणु काही माझा धावा ऐकूच येत नाही. कानांवर हात ठेऊन त्यांनी माझ्याकडे पुरता कानाडोळा केला आहे. माझ्याकडे पाठ फिरवली आहे.

 माय, पण माझी ही केविलवाणी, असहाय्य अवस्था पाहून तू कशी स्वस्थ बसशील? माझा अंत तू पाहणार नाहीस. मला पाहून, तुझं अंतःकरण मऊ लोण्यासारखं झालं नाही तरच नवल! एखादा सांद्र घननीळ मेघ तृषार्त धरणीची तहान भागवायला जसा आपणहून धावून येतो, तशी तू धावून येतेस. माय गे, ह्या जगन्नाथाचे सर्व अपराध पोटात घालून, माझ्या पापांना तुझ्या निर्मल जलानी तू धुवून टाकतेस.

ह्या गर्विष्ठ देवांना ‘आम्ही कायम (सुष्ठु राति) कल्याण करणारे सुर आहोत असा अहंकार आहे;  तर ह्या तीर्थांना ‘आम्ही पापांच्या उपचाराचे साधन अशी तीर्थक्षेत्रे आहोत; आम्ही पापमोचन करणारी पवित्र स्थाने आहोत अशी मोठी घमेंड आहे.

माय, माझे सारे सारे अपराध पोटात घालून, माझी पापे क्षालन करून ह्या आढ्यताखोर देवांचा नक्षा तू उतरवतेस. ह्या घमेंडखोर तीर्थक्षेत्रांचा अहंकार जिरवतेस. ह्या सर्वांना पापनाशनाचा जो गर्व झाला आहे; त्या गर्वाला, आढ्यतेला तू अक्षरशः धुळीत मिळवतेस. माय, मी तुझ्या चरणांवर शरण आलो आहे.

 

त्रपन्ते तीर्थानि त्वरितमिह यस्योद्धृतिविधौ

करं कर्णे कुर्वन्त्यपि किल कपालिप्रभृतयः ।

इमं तं मामम्ब त्वमियमनुकम्पार्द्रहृदये

पुनाना सर्वेषामघमथनदर्पंदलयसि ।। 28 ।।  

 

अन्वय – हे अनुकंपार्द्रहृदये अंब, इह यस्य उद्धृतिविधौ तीर्थानि त्वरितं त्रपन्ते। कपालिप्रभृतयः अपि किल कर्णे करं कुर्वन्ति। तं इमं मां पुनाना त्वं (तेषां सर्वेषां) अघमथनदर्पं दलयसि ।

अन्वयार्थ -

हे अनुकंपार्द्रहृदये – जिचे हृदय अनुकंपेने, दयेने आर्द्र म्हणजे ओले झाले आहे अशाः  हे माम अंब – हे माझ्या माते गंगे ; इह – हया भूतळावर ; यस्य – ज्याच्या ; उद्धृतिविधौ – उद्धाराच्या कार्यामध्ये ; तीर्थानि - अनेक तीर्थे ; त्वरितं – लगेचच (मला पहाताच) ; त्रपन्ते – लाजतात ; कपालि प्रभृतयः – कपालि म्हणजे शिव ज्यांचा प्रमुख आहे असे सर्व देव ; अपि – सुद्धा ; किल – खरोखर ; कर्णे करं कुर्वन्ति – कानावर हात ठेवतात, माहित नाही असे दाखवात ; तं – त्या ; इमं मां – ह्या मला; पुनाना त्वं – पावन करणारी तू ; तेषां सर्वेषां – त्यांचा सर्वांचा ; अघ – पाप ; मथन – नाश करणे ; अघ मथन दर्पं - पाप नाहिसे करण्याचा गर्व ; दलयसि – तोडतेस, घालवतेस. 

अगे उद्धाराचा विषय मम चर्चेस निघता

दुराचारी ऐशा मजसि बघता तत्क्षणि पहा ।

कशी तीर्थे माना त्वरित शरमेने झुकविती

करा ठेवी कानी `शिवशिव' म्हणे देवगण ही ।। 28.1 ।।

 

अगे माझ्या पापांपुढति सुर सामर्थ्यहि फिके

कपालीही होई हतबल दुरापास्तचि म्हणे ।

तिथे होई अंतःकरण नवनीतासम तुझे

दयार्द्रा होसी तू मजवर कृपामेघ बरसे ।। 28.2 ।।

 

मला पाप्यालाही पुनित करिता जाह्नवि त्वरे

सुरांना, तीर्थांना परिचय नव्याने तव घडे  ।

‘कसे प्रक्षाळावे नित दुरित आम्हाविण कुणी’

असा ताठा त्यांचा चुटकिसरशी  चूर करिसी ।। 28.3 ।।

---------------------------------------------------

Comments